Skip to content Skip to sidebar Skip to footer

तुझं माझं जमेना भाग ९

माधव आपल्या डोक्यात प्रश्नांचं जे काहूर माजलं होतं ते सगळे प्रश्न घेऊन तिथून निघून जातो…पण आपल्या जन्मदात्रीच्या मनात नक्की काय आहे ? आई आपल्याशी का नाही सगळं शेअर करत म्हणून संध्याकाळी माधव आपल्या आईच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो…
माधव – आई…आत येऊ का…?

आईसाहेब – माधवा…अरे परवानगी रे कसली मागतोस…ये आत ये…किती दिवसांनी वाट चुकलं माझं लेकरू…नाहीतर सारखी कामं हो ना…

माधव – आई…आज मला तुझ्याशी एक मुलगा म्हणून बोलायचं…एका मित्रासारखं…

आईसाहेब – हो बाळा बोल की…सांग..काय आहे माझ्या बाळाच्या मनात…?

माधव – आई…पहिलं तुझ्या मनात काय चाललंय ते सांग मला…

आईसाहेब – तुझं लग्न लवकर व्हावं…नातवंड माझ्या अंगाखांद्यावर खेळावीत…माझ्या म्हातारीची दुसरी काय अपेक्षा असणार…

माधव – त्यासाठीच तू नीलिमाला बोलावून घेतलं होतंस हो ना…?

आईसाहेब – हो…पण नंतर नीलिमाने स्वतः तिचा विचार बदलला…

माधव – काय…? तिच्या मनात माझ्याशी लग्न करावं असं होतं…

आईसाहेब – हो…पण अचानक तिनेही लग्नाला नकार दिला…जाऊ देत असतील तिची काही स्वप्न…पण मी काही शांत बसणार नाही हा…ते जाऊ देत दोन दिवसांनी मी एका कुमारिकेला आपल्या घरातून जेवण करून पाठवणार आहे…

माधव – झालं…आता हे काय मधेच नवीन…तुझ्या डोक्यात कधी काय येईल ना सांगताच येत नाही…

आईसाहेब – माझ्या डोक्याचं सोड…तुझ्या डोक्याला मालिश करून देऊ का…?

माधव – हो दे ना…खूप दिवसात ही थेरपी केली नाही…

माधव ने आपले डोळे हलकेच बंद केले…आईसाहेबांनी आपल्या हातात तेलाची वाटी घेतली आणि हळू हळू माधवच्या सिल्की केसांना तेल लावून देत होत्या….आईसाहेबांना माहित होतं मनातलं ओठात आणायचं म्हणजे काहीतरी करावं लागणार म्हणून आईसाहेब अगदी प्रेमळ हाताने आपल्या लेकाच्या डोक्याला मालिश करत होत्या…मालिश करता करता म्हणाल्या…

आईसाहेब – बाळ…मी काही जगायचे नाही हो…एवढे दिवस…

माधव – का अभद्र बोलतेयस…?

आईसाहेब – या घराला सावरणारी पाहिजे बाळा…माझ्या नंतर कोण पाहिल हा डोलारा…

माधव – आई…नको ना भलत्या संकटात पाडूस मला…लग्न करून काय मिळणारे मला…

आईसाहेब – लग्न म्हणजे काही संकट नाही बाळा…एकमेकांना समजून घ्यायचं असतं…

माधव – आईसाहेब…मला नका त्या धर्मसंकटात टाकूत…एका तर खूप वाईट अनुभव आलेत मला…

आईसाहेब – वाईट अनुभव कोणते…जे मला माहिती नाहीत…

माधव – आईसाहेब…तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे…शार्ली चा अनुभव एवढा ताजा आहे ना तरीही तुम्ही असं कसं म्हणू शकता…

आईसाहेब – सगळ्या मुली शार्ली सारख्या थोडीच असतात…आपण भात शिजलाय की नाही हे कसं पाहतो सांग बरं…

माधव – आईसाहेब आता काय मुलगी मिळत नाही म्हणून पाककलेचे धडे देणार आहात की काय आम्हाला…?

आईसाहेब – [ हसून ] तसं नाही हे भात शिजण्याच उदाहरण का देतेय मी तेही सांगते…पहिलं माझ्या प्रश्नच उत्तर दे ना…भात शिजलाय की नाही हे कसं समजत आपल्याला…

माधव – सोप्पंय…आपण एकच भाताचं शीत हातात घेऊन दाबून पाहतो…

आईसाहेब – अगदी बरोबर…मग एक शार्ली तुला फसवत होती म्हणून ती खूपच वाईट…अगदी साहजिक आहे पण इतर मुली वाईट कशा काय असू शकतील…तू सगळा भात का दाबून पाहतोय….ती वाईटच होती रे…

माधव – ठीक आहे…मग या मुलींना आपल्या पैशाचा,संपत्तीचा मोह आहे…आपल्या हा बडेजाव पाहून कुठलीही मुलगी लग्नाला तयार होईल…माझ्यावर प्रेम करणारी मुलगी मिळणं अशक्य आहे…

आईसाहेब – मुलगी नेहमी आपलं आई-वडिलांचं घर सोडून आपल्या नवऱ्यासाठी….ज्याला आपलं सर्वस्व देऊन टाकलंय त्या मुलासाठी आपला सगळा गोतावळा मागे सोडून येते…आणि सगळ्याच मुली प्रेमळ नाही हे समीकरणच बनवून टाकलंय तू…ते मनातून आधी पुसून टाक….
आईसाहेब आपल्या मुलाच्या केसांमधून प्रेमाने कुरवाळत होत्या…तसा माधव आईला म्हणाला-

माधव – ठीक आहे आईसाहेब….मी लग्न करेल पण जी माझ्यावर प्रेम करेल…तुला जीव लावेल…अशा मुलीबरोबर जी या संपत्तीसाठी नाही….तर माझ्यासाठी इकडे येईल…अशाच मुलीशी मी लग्न करेल…[ जांभई देतो…आणि डोळे अलगद मिटून घेतो ]

आईसाहेब – ठीक आहे तर मग तयार राहा…अशी एक मुलगी मी पाहून ठेवलीय…जी तुझ्यावर प्रेम करेल या संपत्तीवर नाही…तुला माहितीय ती भयंकर हुशार आहे…मी चांगलीच ओळखते….अगदी सुखात ठेवेल बघ तुला…या घराला कितीतरी वेळा पाय लागलेले आहेत तिचे…आणि हे काय माझा मुलगा म्हणून बोलतोय तर मला अगंतुग तरी म्हण की….सारखं

आईसाहेब….आईसाहेब म्हणायलाच पाहिजे काय…

माधवचे डोके आईसाहेब मालिश करत होत्या म्हणून माधवला पटकन झोप लागली…हम्म…ह्म्म्म…असं फक्त माधव न ऐकताच म्हणत होता म्हणून माधवला कळले नाही की आपली आई नेमकं काय आणि कुणाबद्दल बोलतेय ते…आईसाहेबांना कळलं की माधव झोपी गेलाय…तसेच जमिनीवर आईसाहेबांनी माधवचा बिछाना टाकला आणि तिथेच त्याही आपल्या पाडसाला घेऊन झोपी गेल्या…कितीतरी दिवसांनी मायलेकांचा असा संवाद झाला होता….आईसाहेबांना एका दृष्टीने बरं वाटलं की ‘ आपला मुलगा निदान लग्नाला तरी तयार झाला ‘ म्हणून ओझं हलकं झाल्यासारखं आईसाहेबांना वाटलं…

दुसऱ्या दिवशी सकाळी आईसाहेब पूजाअर्चा उरकून नाश्ता करायला बसल्या तेवढ्यात माधव जांभई देत आपल्या आईशेजारी जाऊन बसला…
आईसाहेब – काय मग…झोप झाली का…?

माधव – हो गं आई…एवढी शांत झोप मला कुठेच मिळाली नाही या आठ वर्षात तरी…शिवाय तुझं माझ्यावरच प्रेम मी कालच रात्री पाहिलं आणि अनुभवलं…

आईसाहेब – तेव्हा त्या प्रेमाखातर एका गोष्ट करशील माझ्यासाठी…?

माधव – होय आई…तू बोल फक्त…एका ठोक्यात नारळ फोडायचंय,आपल्या शेतात दारं धरायचीत,तू सांग फक्त….काय करू तुझ्यासाठी…कालच मी तुझ्यातलं प्रेम पाहिलं मी त्या प्रेमाखातर नक्कीच काहीतरी करेल गं…तू बोल तर फक्त…!

आईसाहेब – अरे हो हो….मला बोलू तर देशील….या पैकी काहीही करू नकोस…फक्त लग्न कर….एवढंच पाहिजे मला…

माधव – आई…मी कालच म्हण्टलंय तुला…जी मुलगी तू सून म्हणून आणशील तिच्याशी मी लग्न करेल…फक्त तीच माझ्यावर आणि तुझ्यावर प्रेम असेल…या संपत्तीवर नाही….

आईसाहेब – अगदी तशीच आहे…[ हळूच म्हणतात ]

माधव – काय….? पाहून बिहून तर नाही ना ठेवलीस…कुणी…?

आईसाहेब – नाही…रे तशीच मुलगी पाहते असं म्हणाले…चल अंघोळ करून घे पटकन…आज उपमा केलाय तोही साजूक तुपातला…खाणार ना…?

माधव – म्हणजे काय आई…तुझ्या हातचा उपमा म्हणजे एका प्रकारचं टॉनिकच आहे की…

आईसाहेब – माझ्या उपम्याला…भलत्या सलत्या उपमा देऊ नकोस…टॉनिक काय नि काय…जा थंड होतोय उपमा अंघोळ उरकून ये पटकन….आज मीच वाढणार तुला…

माधव पटकन अंघोळ करून येतो…आणि उपमा खात असताना आपल्या आईशी बोलतो…

माधव – आई…ते साखर कारखान्यावर जायचंय…खूप पगार थकलेत तिथल्या कामगारांचे…

आईसाहेब – पगार थकतातच कसे काय तू बोलला नाहीस का तिथल्या मॅनेजर बरोबर…

माधव – तिथल्या मॅनेजर ला मी कोण आहे हेच ठाऊक नाहीय…म्हणून टाळाटाळ करत आहेत…मला काय आयती संधी मिळालीय सगळ्यांचं खरं रूप उघडकीला आणायची…माहिती नाहीय तर जाऊ देत मी…पण पाहतो काय करायचं ते…

आईसाहेब – हे मला आत्ताच समजतंय…मी बोलू का थेट..

माधव – नाही गं….रंगेहात पकडायचं त्याला…मग मी तुला घेऊनच जातो तिथे…मग तर झालं…

आईसाहेब – ठीक आहे…
माधव पटापट आपला ब्रेकफास्ट संपवून घरातून बाहेर पडतो आणि काही वेळातच साखर कारखान्यात जाऊन पोहोचतो…पोचल्या-पोचल्या माधव ला तो मग्रूर मॅनेजर कामगारांवर रुबाब गाजवताना दिसतो माधव येताच कामगारांचं लक्ष माधवकडे जातं….
मॅनेजर – काय….हात चालवा पटापट…कुणी मामलेदार आलाय का त्याच्याकडे पाहताय एवढं…

माधव – मॅनेजर साहेब….कामगारांचा पगार थकलेला असताना कसे काय त्राण राहतील त्यांच्या हातात आणि मनगटात…

मॅनेजर – सूट-बूट घातले म्हणजे लगेच मालकाच्या आवाजात बोलायचं नाही इथं…काय समजलात…

माधव – नाव काय तुमचं सर…

मॅनेजर – का….? तक्रार करणार माझी….माझी तक्रार करणारा अजून जन्माला यायचा आहे…करायची असेल तक्रार तर कर….सत्यवान पाठक….नाव आहे माझं…

माधव – अरे वाह…नावातले थोडेसे गुण वागण्यात आणि बोलण्यात दाखवले असते तर फार बरं झालं असतं…
काहीही करून माधवला मॅनेजरला रंगेहात पकडायचं होतं म्हणून थोडासा बोलण्यात गुंतवून मॅनेजर कडून सगळं वदवून घेतो…त्या वेळी माधव आपल्या आईला फोन करत असतो…आणि माधव फोन हातात घेताच मॅनेजर म्हणतो…

मॅनेजर – हे बघ….हा महागडा फोन…चार चाकी…अंगात भारी कपडे या सगळ्याचा मला रुबाब दाखवू नकॊस….

माधव – हे पहा तुम्ही कामगारांचे पगार थकवत आहात…किती जणांचे शिव्या शाप खाणार आहात तुम्ही…

मॅनेजर – हे बघ….तुला काय माहिती नाहीय…या कारखान्याचा खर्च किती आहे…आणि तो खर्च वजा करून यांचे पगार करावे लागतात…

माधव – खर्च कोण करतं…तुम्ही करता का तुमच्या पगारातून…निंबाळकर करतात सगळा खर्च…

मॅनेजर – ह्म्म्म….काय करणार तू….माझ्या खात्यात जातात सारे पैसे…कारण खर्चच तेवढा आहे या कारखान्याचा…
फोन चालूच असल्याने आईसाहेबांच्या कानावर सगळ्या बातम्या जातात….त्यावेळी नेमकी मुग्धा तिथे आलेली असते…आईसाहेब मुग्धाला घेऊनच कारखान्यावर तातडीने येतात…

मुग्धा – आईसाहेब….माझं काय कामं आहे तिथं…

आईसाहेब – अगं तुलाच एखादं कामं मिळतंय का त्याची चौकशी करायचीय…तू फक्त चल…

मुग्धा – पण माझं कॉलेज त्याच काय करू…

आईसाहेब – देसाई बाई ओळखीच्या आहेत माझ्या….मी सांगेन त्यांना…तू चल फक्त…तू होतकरू आणि कष्टाळू आहे म्हणून तुझा विचार करतीय….बघ तू पदवीधर होण्याआधीच तुझ्या हातात नोकरी आहे…

मुग्धा आईसाहेबांबरोबर लागलीच निघते आईसाहेबही तातडीने कारखान्यावर येऊन पोचतात….आईसाहेबांना पाहताच मॅनेजर सत्यवान हाताने घाम पुसत गडबडीत आपले हात पुढे बांधून उभा राहतो आणि म्हणतो….

मॅनेजर – आईसाहेब…तुम्ही इथे अशा अचानक कशा….

आईसाहेब – तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत….गरीब कामगारांच्या घरच्या कुटुंबाचा प्रश्न आहे….प्रश्न त्यांच्या जबाबदारीचा आहे म्हणून आम्ही इथे आलो आहोत…आमच्या अपरोक्ष काय काय कारनामे केले आहेत तुम्ही….

मॅनेजर खाली मान घालून सुम्भासारखा उभा राहतो नकळत रागाने माधवकडे पाहून म्हणतो ….

मॅनेजर – आईसाहेब…तुम्ही कुणाच्याही सांगण्यावरून असे आरोप नाही करू शकत…

आईसाहेब – कुणीही…म्हणजे कुणाबद्दल बोलताय तुम्ही…

मॅनेजर – या मुलाबद्दल बोलतोय…नवीनच आलाय…. तुम्ही अपॉईंट केलं का त्याला….

आईसाहेब – तो कोण आहे याची कल्पना आहे का तुम्हाला…माझा मुलगा आहे तो…जरा अदबीनं बोला….
माधव आईसाहेबांचा मुलगा आहे हे समजताच मॅनेजर च अवसान गळून पडत…खरंच आईसाहेब मॅनेजर ला नोकरीवरून काढून टाकतील….माधवची ही गोष्ट तरी मुग्धाला आकर्षित करून घेईल का….उत्सुकता अशीच असू द्यात भेटूयात पुढच्या भागात….

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.