
सगळ्या जणी टिंगल टवाळक्या करत कॉलेज मध्ये येऊन पोहोचल्या खानविलकर बाईंचा तास असल्याने वर्गात चिडीचूप शांतता होती तरीही गणपतीमध्ये काय काय करायचं याच्या गप्पा वर्गात रंगात येत होत्या…अगदी दबक्या आवाजात मुलींची बोलणी चालू होती…
कमला – [ आपल्या तोंडावर हात ठेऊन बोलत होती ] काय गं शमे…काय तयारी करणारे मग या गौरी गणपतीत…
शमा – काही खास नाही गं…सजावट आपली साधीच असणार आहे…
कमला – मी डेकोरेशन बद्दल नाही बोलत आहे…तू कुठला ड्रेस घालणारेस कुठल्या बांगड्या घालणारेस त्याबद्दल म्हणजेच तुझ्या डेकोरेशनबद्दल बोलतेय….
शमा – ते होय…अजून ठरवलं नाहीय गं…बघू अजून माझ्याकडे साड्या मस्त आहेत त्यातली एखादी नेसेल…
मुग्धा – काही अकली आहेत कि नाहीत तुम्हाला…[ हळूच दबक्या आवाजात बोलते ] मॅडमनी ऐकली हि असली बोलणी तर काय होईल माहित आहे ना तुम्हाला…!
कमला – बाई…तू ऐक शब्द नं शब्द आम्हाला नाही रस ते रटाळ ऐकण्यात…
मुग्धा – [ मुग्धा रागाने पाठमोरी होऊन शमा कडे पाहते ] मग येता कशाला गं कॉलजमध्ये…?
तेवढ्यात खानविलकर बाईंची नजर पाठमोऱ्या मुग्धाकडे पडते आणि मॅडम रागाने मुग्धाला आणि मुग्धाच्या सगळ्या ग्रुप ला फैलावर घेतात…
खानविलकर मॅडम – कसली कुजबुज चालू आहे कोपऱ्यात…[ आपल्या हातातला खडू फेकून मॅडम जोरात मुग्धाला मारतात ] चल उठ लवकर…
मुग्धा – मॅडम…मी तर या पोरींना गप्प राहा असंच सांगत होते…
खानविलकर मॅडम – साळसूदपणाचा आव आणू नको…तू एवढी हुशार विद्यार्थिनी पण तू या चांडाळचौकडींसारखी नको गं वागूस…इकडं लेक्चर अटेंड करायला येता कि गप्पा मारायला…
मुग्धा – माफ करा मॅडम….
खानविलकर बाई – ते काही नाही…माफी मागून प्रश्न सुटणार नाहीय…इथून पुढचे राज्यशास्त्राचे लेक्चर्स होणार नाहीत….या मुलींच्या चुकीची शिक्षा सगळा वर्ग भोगेल…
सगळेजण कुजबुजू लागतात ‘ या मुलींमुळे आपलं नुकसान होणार असं ‘ हि कुजबुज ऐकून मुग्धा म्हणते-
मुग्धा – ठीक आहे मॅडम…आमच्या चुकीची शिक्षा आम्हालाच मिळू देत ना…त्यामुळे सगळ्यांचं नुकसान का करायचं…काय करायला पाहिजे आम्ही…
खानविलकर बाई – वर्गाबाहेर राहायचं आहे तू मुग्धा आणि तुझी सगळी चांडाळचौकडी….
कमला – मॅडम…नका ना असं करुत…पाहिजे तर आम्ही सगळ्या जणी इथं वर्गात पायाचे अंगठे धरून उभे राहू…पण वर्गाबाहेर नको…
खानविलकर मॅडम – लाज वाटते ना बाहेर उभं राहायची…मग इथं बोलताना लाज नाही वाटली का…? काहीही कारण सांगायची नाहीत…उठायचं आणि बाहेर जाऊन उभं राहायचं…
मुग्धा आणि तिचा ग्रुप अशा सर्व वर्गाबाहेर जाऊन उभ्या राहिल्या…उभ्या राहिलेला आता दहा मिनिट झाली होती…तेवढ्यात माधव चेक देण्यासाठी म्हणून कॉलजमध्ये येतो…आपल्या आईसाहेबांचं काम म्हंणून स्वतः कॉलजमध्ये माधव आलेला असतो…आपली फोर व्हिलर कॉलेजच्या गेट बाहेर पार्क करून माधव कॉलजमध्ये येतो….कॉलजमध्ये येताच आपल्या व्यक्तिमत्वाने सर्वांना आकर्षित करणारा माधव मुग्धाला आणि तिच्या मैत्रिणींना दिसतो…तशा मुग्धाला सोडलं तर सगळ्या जणी आपला चेहरा लपवत असतात…मुग्धा म्हणते…
मुग्धा – काय थोबाड लपवताय…तो काय हिरो नाही लागून गेला…
शमा – नाही बाई…आमच्यासाठी हिरोच हाय त्यो….बाकी तू राहा अशीच…
मुग्धा – त्याला पाहून तोंड लपवायचं कशासाठी…ओह्ह्ह…आता आलं लक्षात लिपबाम….पावडर लिपस्टिक काही नाही ना आता म्हणून लपवताय तोंड तुम्ही…
कमला – मुग्धे…तुला बाई मेक अप ची गरज नाही…आता मेकअप च काही नाही तर निदान थोबाड लपवू दे कि आम्हाला…
शमा – बापरे कसला हँडसम दिसतोय गं हा…बघतच राहावं असं वाटतंय…नुसतं
माधव…मुग्धाकडे आणि त्या आपला चेहरा लपवणाऱ्या मुलींकडे हसत हसत पाहू लागला आणि चालत असतानाच म्हणाला…
माधव – काय पण पोरी आहेत…चांगलीच शिक्षा भेटलीय…नक्कीच काहीतरी कुरापत केली असेल…
मुग्धा – ओ….साहेब उगाच काही बोलू नका तुम्ही…माहिती नाहीय काही तुम्हाला…काम झालं असेल तर निघा की…
कमला – गप्प…बस की जरा त्याची आई कोण आहे माहिती आहे ना तुला…!
मुग्धा – हो….मग काय झालं असेल कुणीबी त्याची आई….पण काय काहीही बोलायचं लायसन दिलंय का काय या लोकांना
एवढं ऐकून माधव तिथून निघूनं गेला तोपर्यंत खानविलकर मॅडमचे लेक्चरही संपत आले होते म्हणून मॅडम वर्गाबाहेर येऊन मुग्धा आणि तिच्या मैत्रिणींना ताकीद देऊन निघून गेल्या ..मुग्धा आणि तिच्या मैत्रिणी वर्गामध्ये गेल्या काही मिनिटातच १५ मिनिटांची सुट्टी होणार म्हणून मुग्धा आणि शमा दोघीही कॉलेजच्या आवारात फिरत होत्या….फिरत असताना शमा ने माधवचा विषय काढला…
शमा – खूपच डॅशिंग आहे बाबा माधव…
मुग्धा – तुम्हा पोरींना येऊन-जाऊन फक्त माधवच दिसतो…बरोबर आहे नावाप्रमाणेच किशन कन्हैया आहे…पण मला त्याच्यात कौतुक करण्यासारखं काहीच वाटलं नाही…अजूनतरी…
शमा – कसं वाटेल दोघे जेव्हा केव्हा भेटलात ना तेव्हा फक्त आणि फक्त वादच झालेत तुमच्यात….वाद आणि भांडण बाजूला ठेव जरा बाकी ओके वाटतो यार मला तो…
मुग्धा – विषय बदल यार जरा…चोवीस तास माधव….माधव….आणि माधव दुसरं काहीतरी बोल…[ वैतागून ]
शमा – हो…अगं गौरी आणि गणपतीचं आमंत्रण आहे ना तुमच्या घराला…
मुग्धा – हो आहे ना…पण कुणाच्या इथे…
शमा – जाऊ दे…तू परत वैतागशील…
मुग्धा – शमे….आता सांग हा बऱ्या बोलाने…नाहीतर एक बुक्का मारील…
शमा – कुणाच्या गौरी गणपती….अगं आपल्या हिरोच्या इथल्या गणपती आणि गौरी…म्हणजे माधवच्या घरच्या गौरी आणि गणपती….
मुग्धा – आता म्हणाले होते ना विषय बदल म्हणून…फिरून त्याच विषयावर येतीय तू…
शमा – मुग्धा…विषय बदलेलाच आहे…मला आईसाहेबांकडून तुला आमंत्रण असणारच असं म्हणायचं होतं…
मुग्धा – हो आहे आमंत्रण…
असे बोलून दोघीही आपल्या वर्गात जाऊन बसल्या…साधारण ३ दिवसांनी गणपती बसणार म्हणून आईसाहेबांची लगबग चालली होती म्हणून मुग्धाला जाणूनबुजून बोलावून घेतले होते घरातली काहीशी बारीकसारीक काम करून घेण्यासाठी…तसेच आईसाहेबांनी सणासाठी म्हणून खास आपल्या भावाच्या मुलीला म्हणजेच नीलिमा ला बोलावलं होतं…हाताशी दोघी तिघी असल्या म्हणजे कसं कामाचा उरक आणि पसारा वाटत नाही …निलीमाला बोलावण्यामागचं खास कारण होतं…आईसाहेब एक राजकारणी असल्याने आपल्या मनातली गोष्ट कुणापाशी बोलून गेल्या नाहीत तर त्या यावेळी एक गनिमी कावा करणार होत्या…नीलिमा ला आपली सून करून घेण्याच्या उद्देशाने आईसाहेबांनी बोलावून घेतलं…ही गोष्ट थेट माधवलाही माहिती नव्हती…गणपती असल्याने ‘ मोदक करणं ‘ या कामातून फक्त आईसाहेबांना आपल्या सुनेची निवड करायची होती…‘ काही मदत लागली तर अवश्य सांगा… ‘ असा शब्द मुग्धाने आईसाहेबांना दिलेला होता म्हणून आईसाहेबांनी मुग्धाला निरोप धाडून बोलावून घेतले…मुग्धाला खास मोदक बनवण्यासाठी बोलावलंय हे समजताच मुग्धा हात-पाय धुवून मगच स्वयंपाकघरात गेली…याउलट कृती निलीमाची होती ती हात-पाय नं धुताच स्वयंपाकघरात आली हे आईसाहेबांनी पहिले…मुग्धाने लगेच उकड काढण्यासाठी लागणार पीठ काढलं…पटकन उकडही काढून घेतली…त्याआधी सारणासाठीची तयारी उरकून घेतली…ओलं खोबर चांगलं खवलूनं घेतलं त्यात गूळ बारीक करून टाकला…जायफळ,खसखस घालून सारण तयार केलं…आता मोदकाच्या पाऱ्या वळण्याची महत्वाची कृती होती म्हणून नीलिमावर ही कामगिरी आईसाहेबांनी मुद्दाम सोपवली…
आईसाहेब – नीलिमा…घे मोदकाची पारी बनवायला घे…सारण चांगलं ठासून भर त्यात…नाहीतर मोदक फुटेल म्हणून भरायची नाहीस…
नीलिमा – आत्या…तुम्ही नका काळजी करुत मी अगदी व्यवस्थित पाऱ्या करून घेते…
खूप आत्मविश्वासाने नीलिमा मोदक बनवायला घेते पण काही केल्या निलीमाला मोदकाची पारी जमत नाही…सगळे सारण मोदकाबाहेर जात होते…मुग्धाने घडला प्रकार पहिला आणि मोदकाच्या पाऱ्या बनवायला पुढे सरसावली…अगदी आखीव रेखीव पद्धतीने मुग्धाने पाऱ्या बनवल्या आणि त्यात अगदी ओतप्रोत सारण भरले…काही वेळासाठी उकड काढायला ठेवले…आईसाहेब मुग्धाकडे पाहताच राहिल्या….खरंच आईसाहेबांनी मनोमनी ठरवलही…’ निंबाळकरांची होणारी सून….’ आपला मनसुबा मुग्धाला किंवा मुग्धाच्या घरच्यांना सांगू शकतील का आईसाहेब….पाहुयात पुढच्या भागात…
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.
1 Comment
सौ. उषा शिरीष कुलकर्णी.
खुपच छान.