Skip to content Skip to sidebar Skip to footer

तुझं माझं जमेना भाग १५

माधवचीही तयारी जॊरात चालू होती…मुग्धा मस्त पैकी साडी नेसून तयार होती…जांभळ्या रंगाच्या साडीत मुग्धाचा गोरा रंग आणखीनच खुलून दिसत होता…लांबसडक केस मोकळे सोडलेले त्यातल्या त्यात केसांच्या बटा मागच्या बाजूला मस्त एका ब्रूच मध्ये खोवलेल्या होत्या म्हणून मुग्धा आणखीनच सुंदर दिसत होती येणाऱ्या सर्व पाहुण्यात मुग्धाबद्दल उत्सुकता असणार होती म्हणून मुग्धा अगदी माधवला साजेशी अशी तयार झाली होती…पार्टीच्या अगदी सुरुवातीलाच माधव लवकर घरी आला तस त्याला येन भागच होतं येताच क्षणी माधवची नजर स्वयंपाक घरात असलेल्या मुग्धावर पडली….माधवचा थकवा एका मिनिटात गायब झाला…मुग्धाला पाहताच माधवच्या तोंडून नकळत… ” वॉव ” असं आलं…पण मुग्धच लक्ष माधव कडे जाताचक्षणी माधवच्या चेहऱ्यावरचे हावभाव अचानक बदलून गेले…आणि माधव म्हणाला…

माधव – मनीषा मावशी…जरा पाणी घेऊन याल…आणि कॉफीही घेऊन या…!

मनीषा – मुग्धाताई…जावा तुम्हीच घेऊन जा…हि घ्या कॉफी तयारच आहे…

मुग्धा – नको…मी नाही जात…पाहिलंस ना तू मावशी…मला पाहिलं आणि तोंडाचा रंगच बदलला एकदम…एवढी का मी वाईट आहे…

मनीषा – मुग्धाताई जावा हो तुम्ही…नाहीतर साहेब चिडतील…
मुग्धाही दुसरीकडे पाहत कॉफीचा मग आणि पाण्याने भरलेला ग्लास ग्लास घेऊन माधवच्या पुढ्यात जाते…माधवच्या हातात पाण्याचा ग्लास देतातच…नकळत माधवच्या हाताचा स्पर्श मुग्धाच्या नाजूक हाताला होतो…मुग्धा एकदम चटका लागल्याप्रमाणे आपला हात बाजूला घेऊन ट्रे घट्ट पकडून ठेवते…आणि लाजत पटकन किचनमध्ये निघून जाते…लग्नाच्या पहिल्याच रात्री मुग्धा हिरमुसलेली होऊन बसलेली असते हा राग त्या एकाच स्पर्शात मुग्धाच्या मनामधून चटकन निवळुनही जातो…याला कारण फक्त एकच तो म्हणजे….आपल्या माणसाचा एक हवाहवासा वाटणारा स्पर्श…जो त्या संध्याकाळी मुग्धाला जाणवला…मुग्धा खूपच प्रसन्न अंतःकरणाने किचनमध्ये जाते आणि मनातलं हसू चुकून ओठांवर येतं ही गोष्ट आईसाहेबांच्या नजरेमधून सुटत नाही…आईसाहेब म्हणतात…

आईसाहेब – काय मग…आलं कि नाही हसू कुणाच्यातरी चेहऱ्यावर…

मुग्धा – आईसाहेब…तसं काही नाही…ते माझी मैत्रीण आहे ना शमा म्हणजे

शमिका…आम्ही लाडाने तिला शमा असं म्हणतो…तिनं सांगितलेला विनोद आठवला…म्हणून हसू आवरता आलं नाही…

आईसाहेब – नेमकं आताच आठवला बरं विनोद…जरा आम्हालाही सांग ना…आम्हीही हसू…हसण्याचा ठेका काय फक्त तू एकटीनेच घेतलाय…[ आईसाहेब अगदी चेष्टेने म्हणतात पण मुग्धा खूप गंभीरतेने घेते आणि म्हणते ]

मुग्धा – आईसाहेब…माफी असावी…परत अशी चूक नाही होणार…

आईसाहेब – [ मायेने केसांवरून हात फिरवतात ] पोरी…अगं मी तुला जन्म दिला नसला ना तरीही…माझ्या लेकाइतकंच ओळखू लागलेय ग मी तुला…

मुग्धा – आईसाहेब…! [ लाजून आईसाहेबांच्या मिठीत जाते ]
पार्टीची वेळ जवळ येते…तर्हेतर्हेच्या खाद्यपदार्थांची रंगत….नानाविध फुलांची फ्लॉवर अर्रेंजमेंट लाइटींचा झगमगाट या सगळ्याने बंगल्याचं आवार खूप आकर्षक दिसत होतं…हळू-हळू माधवचे मित्र जमू लागले…या मित्रांमध्ये कॉलजमधले मित्र…बालपणापासूनचे मित्र…परदेशातले ऑफिस कलिग्स असे सगळे मित्र आणि त्यांच्या बायका जमू लागतात…सगळे कसे उंची कपडे परिधान केलेले जशी काय सिनेमातली नट नट्या आलेल्या आहेत की काय असं भासू लागतं….काही वेळातच माधवही मस्त सूट आणि बुटामध्ये येतो…त्यावर मस्त शोभणारा ब्लेझर असं परिधान करू माधव येतो…मुग्धाला माधवच्या या वेशाची भुरळ पडते आपण काही तरीच दिसतो आहोत या सर्वांमध्ये असं मुग्धाला पहिल्यांदाच वाटू लागतं…कधीच मेकअप न करणारे मुग्धा या वेळी मात्र राहून राहून आपल्या ड्रेससिंग रूममध्ये जाऊन स्वतःला अगदी निरखून पाहू लागते…काही कमी वाटतं असेल तर पटकन ती कमी भरून काढावी असं सारखं सारखं मुग्धाला वाटू लागतं…कारण हे सर्व तिच्यासाठी नवीनच असतं…

सगळीकडे माधवचे मित्र गप्पा करण्यात गुंग असतात…माधवने खास आपल्या मित्रांसाठी वेगवेगळ्या गाण्यानी सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी काही गायक मंडळीही बोलावलेली असतात…वेटर्स लोक सर्वांना कोल्ड ड्रिंक आणि हॉट ड्रिंक सर्व्ह करण्यात व्यस्त असतात…या सर्वांमध्ये आईसाहेबही आपल्या मुलाची धावती भेट घेऊन जातात त्यांच्यासोबत त्यावेळी मुग्धाही असते…आईसाहेबांपाठोपाठ मुग्धा स्टेजवरती येते…आईसाहेब सर्वात आधी आपल्या सुनेची ओळख सर्वांना करून देतात…

आईसाहेब – शुभ संध्या….सर्वांना…[ सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटात आईसाहेबांचं स्वागत करतात ] आज मला विशेष असा आनंद होतं आहे…आनंदाचं कारणही अगदी तसंच आहे…माझ्या मुलाने म्हणजेच माधव ने याच महिन्यात दोनाचे चार हात केलेय…म्हणजे लग्न नावाच्या एक सुंदर बंधनात अडकलाय…आज मला माझी सून म्हणून… सौ.मुग्धा माधव निंबाळकर असं नाव घ्यायला खूप अभिमान वाटतोय…कारण माझी सून खरंच एक खूप कष्टाळू आणि मेहनती मुलगी आहे…माझ्या माधवचे भाग्य खूप चांगले आहे कि मुग्धासारखी मुलगी त्याची अर्धांगिनी झालीय…तरीही सर्वांनी आज निंबाळकरांच्या घरातला यथेच्छ पाहुणचार घेऊनच जावं ही सर्वांना नम्र विनंती…धन्यवाद…!

आईसाहेबांचं बोलणं संपतं तसं बहारदार गाण्यानं पार्टीला सुरवात होते…पार्टीची सुरुवात मस्त रोमँटिक गाण्याने होते…’ छुपाना भी नही आता…जताना भी नही आता…हमे तुमसे मोहोब्बत है…बताना भी नही आता…’ अगदी मुग्धाला आणि माधवला साजेसं असं गाणं सुरु असतं…मुग्धा खूप मंत्रमुग्ध होऊन गाण्याचा आनंद घेत असते… गाणं ऐकता ऐकता मुग्धा कॉकटेल ड्रिंक ज्या बाजूला आहेत त्या बाजूला जाते आणि तिच्या मनात सहज एक विचार येतो…की… ‘ आपणही आपल्या नवऱ्याच्या मित्रांबरोबर थोडं बोलून पाहावं…’ म्हणून स्वतः कॉकटेल ड्रिंक माधवच्या मित्रांना सर्व्ह करण्यासाठी जाते…कारण मिळून मिसळून राहावं ही गोष्ट कित्येकदा मुग्धाने आपल्या मामांकडून ऐकलेली असते आणि आता फक्त ती गोष्ट अमलात आणावी असा विचार मुग्धा करते…तर कॉकटेल ड्रिंक चे ग्लास खूप नाजूक आणि सुबक असे दिसत असतात…मुग्धा न राहवून बळेच वेटरच्या हातून कॉकटेल ड्रिंक चा ट्रे घेते आणि…लगबगीनं माधवच्या मित्रांना ड्रिंक घेऊन जाते…माधवला हे पाहून खूप ऑकवर्ड वाटू लागतं…त्यात भरीसभर म्हणून मुग्धाचा पाय पेन्सिल हिल्स चे सॅंडल घातलेले असल्याने साडीमध्ये पाय अडकतो आणि मुग्धा कॉकटेल ड्रिंकच्या ट्रे सकट माधवच्या अंगावर पडते…सगळं कॉकटेल ड्रिंक अंगावर सांडतं…हे पाहून माधव मुग्धावर चांगलाच भडकतो…

माधव – काय हा बावळटपणा आहे…तुला काय गरज होती ड्रिंकचा ट्रे इकडे घेऊन यायची…उकिरड्यात राहणाऱ्यांना काय कळणार सभ्यपणा कशाला म्हणतात ते…

मुग्धा – माधव…मला फक्त तुमच्या मित्रांबरोबर कॅसुअली बोलायचं होतं हो…तुम्हाला काही लागलं तर नाही ना…?

माधव – लागलं ना लग्न झालं ना माझं त्याच दिवशी जोरात ठेच लागलीय मला…तू आयुष्यात आलीस हीच सगळ्यात मोठी ठेच माझ्यासाठी…जा इथून आणि परत या पार्टीत माझी शोभा करण्यासाठी येऊ नकोस…

एक मित्र – अरे माधव…एवढं काय त्यात…एवढा कशासाठी चिडतोस…!
माधव असाच फाड-फाड मुग्धाला बोलत राहिला…आईसाहेब मात्र माधवच्या मागे उभं राहून सगळं ऐकत होत्या आणि दुसरीकडे मुग्धा खाली मान घालून एकसारखी रडत होती…आणि माधवचे सगळे मित्र मुग्धाकडे पाहत होते…आपल्या नवऱ्याने सर्वांसमोर केलेला आपला अपमान मुग्धाच्या खूप जिव्हारी लागला…मुग्धा आहे तशीच त्या पार्टीमधून धावत बंगल्याच्या बाहेर वाट सापडेल तिकडे पळत सुटली…पळता पळता…मुग्धा गावाच्या वेशीबाहेर येऊन पोचली…मुग्धा अशी रागाने निघून गेल्याने आईसाहेबांना खूप वाईट वाटलं…माधव मात्र सारखं बडबडत होता…आईसाहेब एकदम रागाने अंगात वीज संचारावी तशा माधवसमोर आल्या…माधवच्या कॉलरच्या एका बाजूला आपल्या हाताने पकडलं…आणि एक जोरात सणदिशी पाच बोटांची चपराक माधवच्या गालावर उमटवली….आईसाहेबांनी मारलेल्या चपराकीमुळे माधवचा गोरा चेहरा एक सेकंदात लालभडक दिसू लागला…माधव कावरा बावरा झाला…आणि माधवची बोबडी वळली…माधवला भीतीने एक शब्दही बोलण्यासाठी सुचत नव्हता…एवढ्यात आईसाहेब म्हणाल्या….

आईसाहेब – नालायक मुला…तुला जन्माला घातलं हीच माझी चूक….घरच्या लक्ष्मीला असं चारचौघात बोलणं शोभत नाही तुला

माधव…कितीही झालं तरी माझी सून आहे ती…या घराची लक्ष्मी आहे…

माधव – आईईईईई….परत मलाच बोल तू….तिला चारचौघात माझी शोभा करता आलीय फक्त…म्हणून मी तिला चारचौघात बोललो…

आईसाहेब – अरे….कसली शोभा…असं काय केलं तिने…तू लहान असताना किती कप फोडलेस ठाऊक आहे का तुला….आणि फक्त असले हे ग्लास चुकून फुटले तर एवढं बोललास तिला…एक लक्षात ठेवशील आपल्या बायकोला सर्वांसमक्ष अपमानास्पद बोलणं एक ब्रह्महत्येचं पातक समजलं जातं…

माधव – हे नसत्या शंका कुशंका काढत बसू नकोस आता…

आईसाहेब – तुला नसेल वाटत याच काही…तुझ्या बाबांनी माझा कधीही असा चारचौघात अपमान केल्याचा तुला आठवतोय का…कुठं गेली असेल काय माहिती…तुला चांगलंच माहितीय…ती तिच्या मामांकडे असताना अशीच चिडून निघून गेली होती तर तू मुग्धाला परत या घरात आणलीस…आताही तुला तेच करायचंय….जा जिकडे कुठे गेली असेल तिथून घेऊन ये परत या घराच्या लक्ष्मीला….नाहीतर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल…निघ आताच्या आत्ता…
माधव आहे त्या स्थितीत तिथून पार्टी अर्धवट सोडून निघतो…माधवला थोडी नशा चढलेली असल्याने बडबडतंच तिथून निघतोही…अर्ध्या वाटेत माधव येऊन पोचतो खरा…पण याची खबर रेश्माला लागते…माधव या असल्या अवस्थेत तिथून जाताना रेश्मा पाहते…तसेच रेश्मा लागलीच आपल्या वडिलांना सांगतेही…

रेश्मा – पप्पा…पहा तुमचे जावई…मी त्यांना आताच गावाच्या वेशीच्या दिशेनं जाताना पाहिलंय….

रमेशराव – काय झालंय आणि या वेळी गावाच्या वेशीच्या दिशेनं…मी आत्ताच आईसाहेबांना फोन करतो…म्हणजे नेमकं समजेल तरी काय झालंय ते…
रमेशराव आईसाहेबांना कॉल करतात…त्यावेळी मुग्धा रागाने आपल्या घरामधून गेल्याच त्यांना सगळ्यांना समजत…खरंच माधव आणि आईसाहेब मुग्धाला परत सापडू शकतील का…कि मुग्धाला कायमच गमवावं लागेल…पाहुयात पुढच्या भागात…

1 Comment

  • ConoDwece
    Posted Oct 26, 2022 at 5:47 am

    cialis with dapoxetine levitra zoloft adderall serotonin syndrome Douglas Carswell, MP for Clacton one of the areas highlighted in the hard hitting report Гў Turning the TideГў yesterday said the Government needs to act to protect the Essex resort and others like it

    Reply

Leave a Comment

error: