
रेखा आणि रेश्मा दोघीही घराच्या आतमध्ये येऊ लागतात तेवढयात रमेशराव मोठ्याने ओरडून बोलतात..
रमेशराव – खबरदार घरात पाऊल ठेवलं तर…या घरात तुमचं स्थान केव्हाच नाहीस झालंय…आणि या सगळ्याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात…
रेखा – आमचं खरंच चुकलं…आम्ही असं नको करायला हवं होत…
रेश्मा – आई…माफी कसली मागतेय..जाऊ देत ना त्यांना नाही घ्यायचंय आपल्याला घरात…मग कशाला आपण पुढं पुढं करतोय…चल आपण शेतघरात जाऊयात राहायला….
रेखा – [ नाटकीपणाने ] रेश्मा…चल बघू माफी मागायला हवी ना…आपण चुकलोय मग कसली लाज वाटतीय तुला..[रेश्माला बकोटीला पकडून बाजूला नेते आणि हळू आवाजात म्हणते ] अगं बावळट मान-पान नको का तुला…चांगलं उकळता येईल त्या आईसाहेबांकडून…काय कमी आहे त्यांना…तू जरा गप्प राहा…होऊ देत त्यांच्या मुलाशी लग्न तिचं…
कसंबसं रेश्माला शांत करून दोघी मायलेकी परत रमेशमामांच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला सज्ज राहतात…भाचीच लग्न म्हणून इच्छा नसतानासुद्धा रमेशराव दोघीना घरात राहू देतात…पण निंबाळकरांच्या मात्र मुग्धाशी लग्न करावं लागेल या विषयावरून माधव भयंकर आकांडतांडव करतो….
माधव – आई…तुला मी किती वेळा सांगितलं…लग्नाबद्दल माझ्या काही अपेक्षा आहेत…मला ती मुलगी नाही आवडत…
आईसाहेब – मग कशा मुली आवडतात तुला…शार्ली सारख्या…?
माधव – आई….नको ना मागचं सगळं उगाळत बसूस…
आईसाहेब – आत्ता त्या मॅनेजर ला तू चांगलंच सुनावलंय…त्या एका कामामुळे मी तुझ्यावर खुश होते…पण परत तू असा वागतोयस की मला तुझा मत्सर करावासा वाटतोय…घरंदाज आहे मुग्धा आणि तितकीच समंजस…तुही माझ्यासाठी तरी समंजसपणाने वाग…आपल्या गावच्या मुलीच्या इभ्रतीचा प्रश्न आहे तुझं आणि मुग्धाचं पटत नाही हे काही मला पटत नाही…
माधव – घरंदाज तर तिला चुकूनही म्हणून नकोस…बोलण्याचे आणि वागण्याचे मॅनर्स नाहीय तिला…कसं होणार आपल्या घरात तीच…
आईसाहेब – तू सर्वात आधी चूक केलीस माधव…तिला आपल्या वावरामधून स्वतःच्या गाडीवर बसून आणायला नको होत…मुग्धा गाडीवर बसत नव्हती ना…तरीही तू सक्ती केलीस तिच्यावर…काय गरज होती…?
माधव – आई…मी आपलं मुलगी आहे म्हणून काळजीपोटी तिला घेऊन आलो….
आईसाहेब – तिच तर काळजी नको होती करायला…तेव्हा तुला खूप काळजी वाटली तिची आणि आता खरंच तिच्या आणि तिच्या घरच्यांच्या इभ्रतीचा प्रश्न आहे तर तुला नाटकं सुचत आहेत….आणि विसरू नकोस मला तू वचन दिलंय….त्या दिवशी मी तुझ्या डोक्याची मस्त मालिश करून देत होते तेव्हा तू लग्नाला तयार आहे असं म्हणूनही गेलास…तेही मी सांगेल त्या मुलीशी लग्नाला तयार आहे यालाही तू संमती दिलीस…
माधव – आईसाहेब…पण ती मुलगी मुग्धाचं होती हे कशावरून….मी बोललोही असेल त्यावेळी कारण माझं तुझ्या बोकण्याकडं लक्ष नव्हतं…मी कदाचित झोपीही गेलो असेल…
आईसाहेब – मला कदाचित….किंतु आणि परंतु असे शब्द ऐकायला आवडत नाहीत हे लक्षात ठेव…
आपल्या आईचा असा आवाज ऐकताच क्षणी माधव लगेच बोलायचं थांबतो…आणि म्हणतो…
माधव – तुम्ही ऐकणार नाही हे मला चांगलं ठाऊक झालंय…ठीक आहे आईसाहेब…मी लग्न करेल पण एका अटीवर…’ तिचं आणि माझं नातं नवरा बायकोच असणार नाही…नातं असेल ते फक्त नावापुरतं…गावापुरतं आणि तुमच्यापुरतं…यापलीकडे जाऊन आमच्यात काहीही संबंध असणार नाही…
आपला मुलगा मुग्धाबरोबर लग्नासाठी तयार झाला हीच आईसाहेबांसाठी फार मोठी गोष्ट होती…म्हणून आईसाहेब एका तणावामधून आणि मनातल्या इच्छेमधून मुक्त झाल्या…आता वेळ होती ती लग्नाची तयारी आणि लगबग करण्याची…लग्नाचा प्रस्ताव घेऊन दोन दिवसातच आईसाहेब रमेशरावांकडे जातात….मुग्धाही लग्नासाठी इच्छा नसतानाही लग्नासाठी बोहल्यावर उभी राहिलेली असते तेही आपल्या माणसांच्या इभ्रतीसाठी तर माधवचीही तशीच परिस्थिती असते एकूण दोघांनाही बळेच बोहल्यावर उभे राहायला लावलेलं असत म्हणून दोघांचं जमतंय की नाही यावर खूप मोठी शंका आईसाहेबांच्या आणि रमेशरावांच्या मनात घर करून राहत असते…जशा आईसाहेब मुग्धाच्या मामांकडे
लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातात तशी गावभर मुग्धा आणि माधवच्या लग्नाची चर्चा सुरु होते …आईसाहेब मोठ्या मनाच्या असल्याने फक्त मुलगी आणि नारळ एवढं मागतात…तरीही रमेशराव भाचीच लग्न थाटामाटात लावून देऊ अशी आर्जव करत असतात…
रमेशराव – आईसाहेब….असं कसं होईल…माझी एकुलती एक भाची आहे…तिचं लग्न थाटात लावून देऊ असा शब्द दिलाय मी तिच्या आईला…रीतसर कन्यादान तरी करू आम्ही म्हणजे तेवढी अपेक्षा आहे आमची….
आईसाहेब – रमेशराव…तुमच्या दुसऱ्या लेकीच्या लग्नासाठी राहू देत तुमची जमापुंजी…आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ हवाय बस्स…एवढी गुणांची पोर असताना बाकीचं देणं-घेणं कसलं घेऊन बसलात…तुमच्या भाचीपुढे सोनं-नांण आणि पैसे फिके पडतील…
रमेशराव – मग हे नातं पक्क समजायचं का आम्ही…
आईसाहेब – हे नातं पक्क…मुग्धा माझी सून पक्की…एकदम पक्क…मुग्धा कुठे आहे…?
रेखा – मुग्ध्ये…मुग्ध्ये…[ रमेशराव रागाने एक कटाक्ष रेखा कडे टाकतात आणि म्हणतात ]
रमेशराव – जरा अदबीनं नाव घ्यावं आपल्या भाचीचं…काही दिवसात पाहुणी होणार आहे एवढं ध्यानात घ्या म्हणजे झालं…
आपल्या मामीचा असा आवाज ऐकून मुग्धा आपलं आवरून येत असते…रेखा मामी मुग्धाला थोडंसं रागावून म्हणते…
रेखा – मुग्धा…साडी नेसून आली असतीस तर फार बरं झालं असतं…रेश्मा जा साडी नेसून घेऊन ये तुझ्या ताईला..
रेश्मा – होय आई…
रेश्मा मुग्धाला घेऊन आतमधल्या खोलीत जाते आणि खूप डार्क मेकअप करू पाहते…
रेश्मा – मुग्धा…ऐक ना ही डार्क रंगाची लिपस्टिक लाव ना…तुला मस्त दिसेल…
मुग्धा – तसंही मला मेकअप करायला आवडत नाही…मी अशीच साधी जाते त्यांच्यापुढं…आणि काय गं एवढे दिवस मला या मेकअप किटला हातही लावू देत नव्हतीस…आता कशाला लाव म्हणतेय…नको माझं तोंड रंगवूस..
रेश्मा – एवढा राग धरशील का…माझ्यावर…अगं मागचं सगळं विसरून जा…कर ना आज थोडा मेकओव्हर…
मुग्धाचा एकदम रंगीला करूण टाकते…मुग्धा फारच वैतागलेली असल्याने तीसुद्धा कशीबशी साडी सावरत आईसाहेबांना नमस्कार करते आणि आईसाहेब आणलेला पेढ्यांचा पुडा आणि काही पैसे मुग्धाला देतात…एकूण लग्न ठरल्यात जमा असतं फक्त लग्नाची तारिक पक्की कारण बाकी असतं…मुग्धा आपलं नेहमीच कॉलेज आणि घर असं रुटीन सुरु करू लागते…कॉलजमध्येही मुग्धाच्या आणि माधवच्या लागनची जोरदार चर्चा सुरु होते…एक दिवस असंच कॉलजमध्ये मुग्धा आपल्या मैत्रिणींबरोबर चाललेली असते…
कमला – मुग्धा…यार कसली नशीबवान निघालीस तू…!
शमा – नाहीतर काय…आपण ज्या-ज्या वेळी दोघांना एकत्र पाहिलंय त्या-त्या वेळी दोघांची भांडणचं झालीय नाही का…कसं जमेल काय माहिती बाई दोघांचं…
मुग्धा – अय बायांनो…मला ना त्या तुमच्या हिरो मध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता…मी तयार झालीय ते फक्त आणि फक्त माझ्या मामाच्या इज्जतीसाठी…रेश्मासाठी…माझ्यामुळं तिला अडसर नको सोयरीक जमायला…उद्या तिचही लग्न होईल…
कमला – तिला आधी पाहायला तर येऊ देत…काळतोंडी कुठली…
शमा – नाहीतर काय…कायम कानोसे देऊन असायची आपल्या ग्रुपमध्ये…आणि सगळं मामींना सांगायची…अन मामी पण छळायची हिला…लई सोसलं बाई मुग्ध्ये तू…
मुग्धा – जाऊ देत गं…काल तर कहरच केला तिने…अगं उगीच माझ्यावर मेकअप थापत होती…एक तर मला आवडत पण नाही मेकअप करायला…जाऊ देत…
शमा – मुग्धा…तू माधव वर असलेला राग सोडून दे जरा….तू म्हणतेस तो वाईट आहे…पण चांगला मुलगाही लपलाय त्याच्यामध्ये हे जाणून घे…तुला रात्रीच एकटीला नाही येऊ दिलं त्याने…बघ…केवढ्या काळजीनं आणि जबाबदारीनं आणलं त्यानं तुला…तू प्रयत्न तर करून पहा त्याच्यावरचा राग कमी करण्याचा…
मुग्धा – मला वाटत नाही का चांगलं बोलावं त्याच्याशी…पण वसकन अंगावर ओरडणं त्याच मला नाही आवडत…जर लग्नानंतरही तो असंच वागला माझ्याशी तर त्याच अन आपलं नाही पटायचं बाबा…आईसाहेब आहेत म्हणून ठीक चालेन सगळं…
कमला – अगं काही नाही होत गं…सगळे सुधारतात लग्नानंतर…आपण फक्त आपल्या मर्यादा पाळायच्या…चढ्या आवाजात बोलायचं नाही….तू काही खालच्या आवाजात बोलत नाही हे माहितीय आम्हा सगळ्या जणींना…भाषणातला वक्तशीरपणा आपल्या नेहमीच्या बोलण्यात आणू नका म्हणजे झालं…
शमा – या मुलांना ना अशी मवाळ बोलणारी…नेहमी आज्ञेत राहणारी मुलगी बायको म्हणूण हवी असते…नाहीतर काय…
लग्न ठरल्यानंतर मैत्रिणी कशा सल्ले देतात अगदी तसेच सल्ले मुग्धाला दिले जात होते…कारण मुग्धा नेहमी एखाद्या विचारवंतासारखं सगळ्या मैत्रिणींना सल्ले द्यायची आणि आज चक्क त्याच मैत्रिणी मुग्धाला खऱ्या आयुष्यात कसे राहायचे याचे धडे देत होत्या…म्हणून मुग्धा प्रेमळ आणि लटकी चिडत होती… ..या सगळ्यात मुग्धाने कधीच कॉलेज मधून बॅकअप घेतला नाही हे विशेष कारण काही दिवसताच मुग्धाची परीक्षा होती…लग्न ठरल असतानाही सुट्टी नं घेतलेली मुग्धा पूर्ण कॉलजमधली अशी एकमेव मुलगी होती…काही दिवसातच मुग्धाचं लग्न पार पडलं…मुग्धा पूर्ण लग्नात फक्त एकाच विचार करत होती…’ माधव या लग्नासाठी कसा काय तयार झाला…?’ या प्रश्नच उत्तर मात्र मुग्धाला पुढच्याच काही दिवसात कळून गेलं…कारण लग्नात माधव एकदम डिसेंट वागत होता…सत्यनारायण पूजा,जागरण गोंधळ सगळे विधी पार पडून गेले…खरंच माधव आपल्या मनातलं मुग्धाला सांगू शकेल का…पाहुयात पुढच्या भागात……

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.