Skip to content Skip to sidebar Skip to footer

तुझं माझं जमेना भाग १२

मुग्धाचं रडणं थांबवणं अवघड होत होतं रडून रडून मुग्धाला चक्कर येऊ लागली…मुग्धाला सावरायला आईसाहेब आणि रमेशमामा पटकन पुढे सरसावले…त्यानंतर मुग्धाला एका खोलीत आराम करण्यासाठी नेले…तशा आईसाहेब बोलू लागल्या…

आईसाहेब – अहो…तुमच्या भाचीच्या मनातलं ओळखायला शिका…किती दिवस सांभाळत आलाय तुम्ही तिला…आमच्या इथं काही दिवसच झालेत कामानिमित्त तीच येन-जाणं आहे पण मी मुग्धाला चांगली ओळखू लागलीय…तिच्या भाषणामधनंच मला समजून गेलं कि मुग्धाच्या मनात काय आहे….कुणी राजकुमार येणार मला घेऊन जाणार लग्न करून अशा कल्पना मुळी तिच्या मनात येऊच शकत नाहीत…कारण काहीतरी बनायचं स्वप्न उराशी घेऊन ती जगतेय…माझी भाची आली होती नीलिमा तिची काही दिवसातच मैत्री जमली कारण दोघीही सारख्याच विचारसरणीच्या…तुम्ही जर कुणाशीही तीच लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावून दिलंत तर तो एक प्रकारचा व्यभिचारचं ठरेल….तुम्हाला ती आयुष्यभर दूषण देत बसेल…ते आवडेल का तुम्हाला…?

रेखामामी – सगळं ठीक आहे…मला लग्न नाही करायचं एवढं जरी आम्हाला सांगितलं असत तरी चाललं असतं ना घर सोडून पळून जायची काय गरज होती…कुठं शेण खाल्लंय कुणास ठाऊक…!

आईसाहेब – तिच्यावर दबाव होता…नाही दबाव अजूनही आहे म्हणून तिने तडकाफडकी असा निर्णय घेतला…

रेखामामी – अहो पण असं परपुरुषाबरोबर गाडीवरती बसून येन शोभत नाही…कोण अशी मुलगी करून घेतील..? तुम्ही घेतली असती का…

रमेशराव – रेखा….तुला कळतंय का तू काय बोलतेय ते…नाही माझंच चुकलं इथं आणायलाच नको होतं मी…रेश्मा आत्ताच्या आत्ता तुझ्या आईला इथून घेऊन निघून जा…अगदी कायमचं…माझ्या भाचीच लग्न जरी ठरलं ना तरी सुपारी ठेऊन कन्यादान करेन मी तुझी गरज नाहीय काहीच…

रेश्मा – पप्पा…आई काहीच चुकीचं बोलत नाहीय…माझा तरी विचार करायला हवा होता हिने….

रमेशराव – कार्टे….तुला तुझ्या आईचीच फूस आहे ना…नीघ इथून…[जवळचाच चाबूक हातात घेतात…रेखा आणि रेश्मावर उगारतात…]

आपल्या नवऱ्याचा असा रुद्रावतार पाहून दोघीही तिथून पळ काढतात…आईसाहेबांना मात्र खूप हायस वाटत कारण रेखामामी आईसाहेबांच्या मनातलं बोलून गेल्या होत्या म्हणून आईसाहेबांनी

तातडीने माधवला आतमध्ये जाण्यास सांगितले…माधवही आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणे आतल्या खोलीत जाऊन बसतो…

आईसाहेब – रमेशराव…शांत व्हा तुम्ही…पाणी प्या…

रमेशराव – काहीही बोलत सुटलीय ही…मी माफी मागतो…गैरसमज नको आपल्यात….तुमची आणि आमची बरोबरी नाही होऊ शकत…रेखा पण ना…

आईसाहेब – पण रमेशराव…मी विचार करू शकते मुग्धाचा माझी सून म्हणून…

रमेशराव – नाही….आईसाहेब…तुम्ही मोठी माणसं…तुमच्या जोड्यापाशी बसायची लायकी आमची…तुमच्यासोबत बसायची औकात नाही आईसाहेब आमची…

आईसाहेब – पण काय हरकत आहे…एकदा विचार तर करून पहा…माझ्या म्हण्याचा…

रमेशराव – आईसाहेब…लहान तोंडी मोठा घास घ्यायला लावताय तुम्ही….मी निघतो घरी…या विषयावर आपण नंतर बोलूयात…[ आपला चेहरा घामाने पुसत रमेशराव तिथून निघून जातात ]

आपली भाची तिथेच निंबाळकरांच्या घरात आहे याचेही भान रमेशराव यांना राहत नाही…तसेच मुग्धाला तिथे विसरून जातात घरी पोचल्यानंतर रमेशराव घरात जाऊन पाहतात तो घरात कुणीच नाही आपल्या जवळच्या डुप्लिकेट चावीने मामा घराचं कुलूप उघडतात घड्याळात पाहतात तर साडेअकरा वाजलेले…रेखा आणि रेश्मा दोघींची आजूबाजूला चौकशी करतात…तर शेजारी चौकशी केल्यानंतर रमेशराव यांना कळते कि दोघीही घरापाशी येऊन गेल्या होत्या…कारण मुग्धा घरातून पळून गेलीय ही बातमी दोघीनीं सगळ्या गावभर केली होती.. …निंबाळकरांच्या घरापासून ते स्वतःच्या घरापर्यंत येत असताना आजूबाजूचे सगळे जण मामांकडे एका संशयित नजरेने पाहत होते…तर का संशयित नजरेने पाहत होते याचा अर्थ मामांना कळू लागला…तेवढ्यात मामांच्या लक्षत आलं की, मुग्धा तर आईसाहेबांच्या घरीच बेशुद्धावस्थेत राहिली आहे… .मुग्धाचा विचार येताच क्षणी रमेशराव आपल्या भाचीला आणण्यासाठी निघतात पण बाहेर लोक काय म्हणतील असा विचार मनात येतो परत मागे घराकडे वळतात…काही मिनिटातच रमेशराव उपाशीपोटी झोपी जातात…सकाळी कोंबड्याच्या बांगेमुळे रमेशरावांना जाग येते…दाराची कडी उघडताच घरापाशी सगळ्या बघ्यांची गर्दी जमलेली असते…आणि दुरूनच मुग्धाला घेऊन मनीषा येत असते…बघ्यांची गर्दी पाहून मुग्धाचा चेहरा आणखी घाबराघुबरा होतो…मुग्धा गर्दीमधून वाट काढत येते…त्या बघ्यांच्या गर्दीमध्ये रेखा मामी आणि रेश्मा अशा दोघीही असतात आणि जमलेल्या लोकांना अगदी तिखट मीठ लावून सांगत असतात…

रेखा – पाहिलंत…आल्या आमच्या तोंडाला काळं फासून…वन्संचा शब्द म्हणून सांभाळलं ह्यांना…पण चांगले गुण उधळले मुग्धा तू…हुशार…हुशार म्हणून डोक्यावर घेतलंय सगळ्यांनी…तर अतिहुशारीच केली की…

मनीषा – अहो…रेखाताई…फक्त गाडीवर बसून आल्याने काय तुमची भाची चारित्र्यहीन होत नाही… उगीच चिखलफेक करताय तुम्ही…

मुग्धा आपल्या मामीच बोलणं जिव्हारी लागेल अशी गुडघ्यावरती जमिनीवर बसून राहिली….रमेशराव मुग्धाला घरात घेऊन जातात आणि समजावतात…

रमेशराव – मुग्धा…मनाला लावून घेऊ नको गं…सोडून दे तो विषय….

मुग्धा – [ आपल्या मामाचे दिलासादायक शब्द ऐकून मुग्धा मनातून सुखावते ] मामा पण माझ्यामुळं तुम्हाला किती सोसावं लागतंय…माझ्या लग्नाचं अवघड होऊन बसलंय माझ्या लग्नाचं सोड रेश्माची काही चूक नसताना तिलाही हे सगळं सोसावं लागतंय…

रमेशराव – नाही गं पोरी…तिला कसं बरं सोसावं लागेल…काहीही तसला विचार करू नकोस…माझं म्हणणं ऐकावं लागेल तुला…

मुग्धा – हम्म…सांग तू काय सांगशील ते मी करेल…

रमेशराव – तू आईसाहेबांचा मुलगा आहे ना माधव त्याच्याशी लग्न करून टाक…

मुग्धा – [ रागाने उठते ] मामा…नाही…मी त्याच्याशी लग्न नाही करू शकत कारण मला तो नाही आवडत…

रमेशराव – न आवडायला काय झालंय…तुझ्या मामीला तरी मी कुठं आवडत होतो…

मुग्धा – मग कुठे तुमचं तरी जमतंय…

रमेशराव – मग तयार राहा होणाऱ्या परिणामांचा सामना करायला…दे त्या जमलेल्या लोकांना बोलायला संधी…प्रत्यक्ष आईसाहेब मागणी घालत आहेत तुला हे विसरू नको…हे बघ असं स्थळ शोधूनही सापडणार नाही तुला…आणि तुला त्याच्याशीच लग्न करावं लागेल कारण…तुम्ही दोघेही गाडीवर बसून आलात ह्या गोष्टीचा खूप डंका पिटवलाय तुझ्या मामीने…मी तर काल  रात्रीच घरी आलोय पण मी निंबाळकरांच्या घरापासून ते आपल्या घरापर्यंत कसा आलोय हे माझं मलाच माहिती कारण सगळे लोक माझ्याकडे संशयास्पद असे पाहत होते…

मुग्धा – मामा…अरे मी फक्त गाडीवर बसून आलेय त्याच्या….तर लगेच माझं चारित्र्यहनन करू नका तुम्ही सगळे…गाडीवर बसले मी फक्त तर लगेच लग्न करू का त्या मुलाशी मी…तुम्हा लोकांच्या विचारसरणीचा प्रॉब्लेम आहे तो माझा नाही…

रमेशराव – ठीक आहे मग…लोकांच्या रोषाला सामोरी जायची तयारी ठेव…बाहेर गेलीस तर लोक घाणेरड्या नजरेने तुझ्याकडे बघतील एवढं लक्षात ठेव म्हणजे झालं…

बाहेर आईसाहेबांच्या इथे काम करणारी मनीषा थांबलेली असते रेखा मामी सारखं मुग्धाच्या चारित्र्यावर चिखलफेक करतच असते ते पाहून मनीषा तातडीने निंबाळकरांच्या बंगल्यावर जाऊन आईसाहेबांना घेऊनच येते…जमलेल्या लोकांकडे पाहून आईसाहेब म्हणतात…

आईसाहेब – इथं काय जमलेत सगळे…काम-धंदे नाहीत का कुणाला…

रेखा – बरं झालं तुम्ही आलात…सांगा इथं सगळे जमलेल्यानी…मी कालच यांना एक प्रश्न विचारला होता…असं रात्री अपरात्री कुणाच्याही बरोबर येणारी मुलगी तुम्ही सून करून घेतली असती का…?

आईसाहेब – होय केली असती मी माझी सून….केली असती….आज त्याचसाठी मी आलीय इथं…मुग्धा…मुग्धा बाहेर ये लवकर किती दिवस अशी लपून बसणार आहेस…याला भेकडपणा म्हणतात…

आईसाहेबांचा आवाज ऐकताच मुग्धा बाहेर येते….थरथरत असलेल्या आवाजात म्हणते…

मुग्धा – आईईईईईसाहेब…मला कोण्तत्त्तीही शिक्षा द्या मला मंजूर आहे…

आईसाहेब – होशील का माझ्या माधवची बायको …निंबाळकरांची सून…होशील का…?

 प्रत्यक्ष आईसाहेब आपल्याला विचारत आहेत…स्वतःच्या मुलासाठी मागणी घालत आहेत हे पाहून मुग्धाला आणखीनच दडपण येत…मुग्धा काहीच बोलत नाही…दबक्या पावलाने एक पाऊल मागे जाते…खरं तर मुग्धाला नाही असं सांगायचं असत पण जमलेल्या लोकांच्यापुढे आपली शोभा होतीय म्हणून मुग्धा होकार देते…

मुग्धा – होय आईसाहेब…[ एवढेच मुग्धा बोलते आणि घरात निघून जाते ]

दुसरीकडे रेश्माचा जळफळाट होऊ लागतो कारण जो मुलगा कॉलेजच्या सगळ्या मुलींच्या गळ्यातला ताईत होता…आज तोच मुलगा आपल्या बहिणीशी लग्न करणार…हि गोष्ट रेश्माला पाहवत नव्हती म्हणून आपल्या आईवर या सगळ्याचा राग काढत होती…रेश्मा सगळे लोक जिकडचे तिकडे झाल्यावर आपल्या आईला बोलू लागते…

रेश्मा – आई….गरज होती तुला धिंडोरा पिटवायची…जेवढं आपण तीच वाईट करायला जातोय…त्याहीपेक्षा जास्त तीच चांगलं होऊ राहिलंय…खरंच सगळे आपले डाव आपल्यावरती उलटत आहेत…

रेखा – अगं….जाऊ देत गं…तेवढीच आपल्या घरातली ब्याद जाईल दुसऱ्याच्या घरी…तू आणि मी या घरात…आपलंच राज्य…

रेश्मा – आता पप्पा घरात घेतील का आपल्याला….तिथून पुढे असणार आपली सत्ता…

रेखा – खरंय…चल तर आतमध्ये…बघू घेतील गं…आता भाचीच लग्न आहे का नाही घेणार…

खरंच मामी ला आणि रेश्माला रमेशराव घरात स्थान देतील…आणि मुग्धा तर कशीबशी लग्नाला तयार झालीय…माधव होईल लग्नाला तयार…की आईसाहेबांना इथेही राजकारण खेळावं लागेल…पाहुयात पुढच्या भागात….उत्सुकता अशीच असू द्यात…..

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.