
मुग्धा तणतण करत कॉलेज सुटल्यावर घरी येऊन थडकते…आल्या आल्या मामींना जाब विचारणार पण तेवढ्यात मुग्धाची मामी अगदी नरमाईने आणि प्रेमाने मुग्धाबरोबर वागत असते…
रेखा – मुग्धा बाळा…आलीस तू…ये बैस इथे..किती वाट पाहायची तुझी…! सांग बरं तुला काय पाहिजे खायला…
रमेश राव – अगं आज अचानक एवढं का उफाळून आलंय तुला…चांगलं वागतीयस तर भाची आहे तुझी मग अहो-जाहो तरी घालावं माणसाने….
रेखा – अहो…मुलीसारखीच आहे ती माझ्या…म्हणून तर आज सगळं तिच्या आवडीनुसारच स्वयंपाकाचं नियोजन आहे…कोथंबीरीच्या वड्या केव्हाच उकडून ठेवल्यात…फक्त कुरकुरीत तळ्याच्या बाकी आहेत…ए रेश्मा जा बरं पीठ मळून ठेव चांगलं…म्हणजे पोळ्या करेपर्यंत चांगलं भिजेल…
रेश्मा – जा गं आई….मी नाही मळून ठेवत पीठ…कारण तूच नेहमी म्हणते मुग्धासारखं पीठ तुला मळता येत नाही असं….मुग्धाच करेल ते काम…
रेखा – काडीचं काम करायला नको…नवऱ्याच्या घरी गेल्यावर काय मी येणार नाहीय स्वयंपाक करायला…जमायला नको सगळं…!
रमेशराव – रेखा…आलीस ना आपल्या मूळ पदावर…फळीत घाला नाहीतर नळीत,कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडंच….आणि काय गं रेश्मा तुला जमायला नको का सगळं…शिकून घ्यायचं हेच तर वय असतं…
मुग्धा – मामी…राहू देत मी भिजवते पीठ… नको रागावूस रेश्मावर…
मुग्धा लगबगीने पीठ भिजवायला पुढे सरसावते…पण मामीची बडबड चालूच असते…
रेखा – योग्य वयात लग्न झालेलं बरं असत बाई…म्हणजे कसं सगळं व्यवस्थित होऊन जातं…
मुग्धा – हो ना…पण का बरं…रेश्मासाठी कुठलं स्थळ पाहताय का तुम्ही…?
रेखा – नाही गं…ती लहान आहे तुझ्यापेक्षा…
मुग्धा – मामी अगं…फक्त ६ महिन्यांनी लहान आहे ती…
रेखा – ते काही असलं तरी…तू मोठीच आहे ना तिच्यापेक्षा…मग तुझ्यासाठी स्थळ पाहून आलेय मी…
मुग्धा – पण मला इतक्यात लग्न नाही करायचं…
रेखा – चांगला कमावतोय मुलगा जास्त नखरे करू नकोस…
मुग्धा – मामा….मामा…तुम्ही मला न विचारता माझ्या लग्नाचा घाट कशासाठी घातला…[मुग्धा पीठाने बरबटलेला हात घेऊन दिवाणखाण्यात येऊन बोलू लागते ]
रमेशराव – कुणी घातलाय घाट लग्नाचा तुझ्या…
मुग्धा – मामी काय म्हणतेय मग…तरी म्हटलं…माझी एवढी सरबराई कशासाठी चालू आहे…माझ्या आवडीचं जेवण या घरात पहिल्यांदाच बनतेय…एवढा वेळ मी गप्प बसले पण आता विषय मामीनेच काढलाय म्हणून बोलतेय…तुम्हाला जर जास्तच हौस असेल ना तर रेश्माला बोहल्यावर चढवा माझ्याअगोदर…
रेखा – ज्याचं करावं भलं…ते म्हणत माझाच खरं…नाही आम्ही नाही तुझ्या भल्याचा विचार करत…हो ना…आता चांगला कमावतोय मुलगा…दिमतीला नोकर-चाकर…सगळं काही अलबेल आहे…आता वय पाहता नाही सगळ्या गोष्टींचा मेळ बसत…पण सगळ्याच गोष्टी थोडीच उजव्या असतात…आहे पहिलं लग्न झालेलं…म्हणून काय झालं…
रमेशराव – काय बोलतेयस तू रेखा…थोडं भान ठेऊन वागत जा जरा…कुणी सुचवलं तुला असलं स्थळ…. ….एकुलती एक भाची आहे माझी मग काय रस्त्यावर पडलीय की काय ती… अगं जशी रेश्मा तशीच मुग्धा गं..
रेखा – तुम्ही थांबा जरा…मी उद्याच पत्रिका घेऊन जाणार आहे गुरुजींकडे…दोघांचीही…
रमेशराव – दोघांची कुणाची…
रेखा – अहो…मुग्धाची आणि सचिनची….
रमेशराव – हे बघ…तुला एवढी अडगळ वाटत असेल ना मुग्धाची तर मी आणि मुग्धा दोघेही दुसरीकडे राहायला जाऊ…इथे या घरात राहणं शक्य नाहीय आता…मग रेश्मा आणि तू दोघीही मोलमजुरी करून कमवून खा…
रेखा – एवढे चिडताय कशासाठी…स्थळ अगदी उजवं आहे…शोधून सापडणार नाही…
मुग्धा – स्थळ अगदी उजवं आहे ना मग…रेश्मासाठी विचारून पहा ना…
रेखा – चुरुचुरु बोलू नकोस…तुझ्या सल्ल्याची गरज नाहीय मला…इकडं आश्रित कोण आहे…एकतर आईबापांना गमावून बसलीस…आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटू नको म्हणजे झालं…
रमेशराव – आश्रित आहे का ती…तुम्ही दोघी आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहात…तिनं तर कमवून आणलंय घरात…बोलताना जरा विचार करून बोलत जा…
आपल्या मामीच्या तोंडून ‘ आश्रित ‘ हा शब्द ऐकला तशी मुग्धाच्या डोक्यात प्रचंड संतापाची तिडीक गेली…मामा आणि मामी दोघांचीही चांगलीच खडाजंगी चाललेली होती मुग्धा रागारागाने मामीच्या घरामधून आपलं जेमतेम आणि गरजेपुरतं सामान घेतलं आणि अनवाणी पायाने तणतणत संध्याकाळच्या वेळेला घर सोडलं…मुग्धा संतापाने एवढी लालबुंद झाली होती की आपण कुठे जातोय आणि काय करतोय हे तीच तिला समजत नव्हतं…म्हणून गावामध्ये असलेल्या वावरात एक गवताची गंजी दिसली तर त्या गंजीच्या आजूबाजूला बसण्यापुरती जागा होती…काळ्याकुट्ट अंधारात मुग्धाला समजलं नाही की आपण निंबाळकरांच्या गवताच्या गंजीपाशी येऊन थांबलोय ते…त्या काळ्यामिट्ट अंधारात मुग्धा घामाने डबडबलेली तशीच मुग्धा झोपी गेली तेवढयात गवताच्या गंजीपाशी काहीतरी खुडबुड चालू असलेली मुग्धाला जाणवली पण घामाने डबडबलेली मुग्धा झोपेत असल्याने त्या खुडबुडीकडे दुर्लक्ष करू लागली…तेवढ्यात मुग्धाचा पाय जोरात कुणीतरी ओढला…मुग्धा खाडदिशीन झोपेतून जागी झाली आणि आपल्या तळहाताची चपराक त्या मुलावर बसणार इतक्यात तिचे दोन्ही हात पकडून ठेवले गेले….त्या इसमाने आपल्या हातामध्ये असलेल्या मोबाईल टॉर्च लावला ….त्या टॉर्चच्या उजेडात त्या इसमाने निरखून पाहिलं कोण आहे ते…त्या इसमाला ओळख पटताच क्षणी त्याने तिला सोडले…पण मुग्धाचे तोंड कुठं थांबतंय…
मुग्धा – कोण आहे….रे…आया…बहिणी न्हाईत की काय तुला….जास्त लाडात येऊ नकोस…
तो इसम – आय….बाई….लाडात यायला काय स्वतःला अप्सरा समजतेय की काय तू…की माधुरी दीक्षित…
मुग्धाला आवाज ओळखीचा वाटला म्हणून मुग्धा पटकन अंगावरची ओढणी नीट करते आणि म्हणते…
मुग्धा – तुम्ही इथं कस काय आलात….तुम्ही आईसाहेबांच्या सुपुत्र नाही का…?
माधव – होय…मी माधव… पटली का नाही ओळख अजून की अजूनही झोपेतच आहात…
मुग्धा – पण तुम्ही इथे कसे काय आणि एवढ्या रात्री इथं कशासाठी आलात…?
माधव – आमच्या शेतात मी यायचं की नाही हे तू सांगू नकोस मला…मी इथे रोज याच वेळेला येत असतो…
मुग्धा – लोकांना घाबरवायला का…?
माधव – इथं लोक येत नाही सहसा…पण तू इथं काय करतेयस…
मुग्धा – मी तुला कशासाठी सांगू…
माधव – मग तुला वेड लागलंय असं मी सांगेन सगळ्या गावभर…सांगायचं नाही तर नको सांगू…हि जागा खतरनाक आहे खूप…दारू पिणारे बेवडे लोक फिरतात या बाजूला…
मुग्धा – उगाच भीती दाखवू नकोस…सांगून ठेवते…माझ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस…
माधव – ये बाई…तू सांग तर इथं काय मुजरा करायला आली होती का काय मग…
मुग्धा – सांगण्यासारखं खूप काही आहे पण तू कोण…माझी अन तुझी तेवढी ओळख बी नाही…[ तिथेच खाली बसून सांगू लागते ] माझ्या मामीशी माझं भांडण झालं…म्हणून मी रागारागाने घर सोडून निघून आलेय…
माधव – ह्म्म्म…नक्की तूच काहीतरी कुरापत काढली असणार नाही का…?
मुग्धा – नाही हो…माझ्या लग्नावरून बोलत होती मला…आला राग आणि आले निघून…
माधव – हे एक बरं केलंस…निदान त्यांच्या मागची पीडा तरी गेली म्हणायची…
मुग्धा एकदम भावुक होते आणि म्हणते…
मुग्धा – ह्म्म्म….पीडाच आहे नाही का मी….आई-बापांना वाटलं मी पीडा आहे मग मला कुठेतरी सोडून देण्यापेक्षा स्वतःच गेले मला सोडून कायमचे…कुणीच नाही माझं इथं…
माधव – रडणं थांबवं…तुला शोभत नाही ते….नौटंकी बंद कर आणि पहिली घरी जा तुझ्या…चल मी सोडतो नाहीतर तुला…
मुग्धा – नाही…नाही…मी त्या घरात परत जाणार नाही…नको मला त्या घरात लाउस…
माधव – अगं पण असं राग धरून घर सोडून येन बरं दिसत नाही…सभ्य घरातल्या मुलींना…
मुग्धा – तू काहीही करायला सांग पण मी त्या घरात आश्रितासारखं राहायला जाणार नाही…एवढे दिवस राहिले तेच चुकलं माझं…पण आता नाही…
माधव – ठीक आहे आमच्या घरी चल मग…तसंही आईची आणि तुझी मस्त जोडगोळी आहे…
मुग्धा – अरे पण आमची फक्त कामापुरती बोलणी चालू असतात…त्यात जोडगोळीचं काय ते…पण या अशा अवस्थेत नको…
माधव – अशा अवस्थेत म्हणजे…मी काय तुझ्यावर जबरदस्ती करत नाही आहे…
मुग्धा – अरे तसं नाही म्हणायचं मला…आत्ता साडेदहा होत आले आहेत….मग गावामधून जाताना कितीतरी लोकं पारावरती बसलेली असतात ते काय काय म्हणतील…जाऊ देत ना त्यापेक्षा इथेच बसते…
माधव – लोकांचा कधीपासून विचार करू लागली…आणि अशी एकटी दुकटी इथे बसू नकोस…इथे चांगली माणसं येत नाहीत एवढी…
मुग्धा – मग तू काय करतोस इथे…
माधव – फार बोललीस…[चिडून म्हणतो ] गुपचूप निघायचंय इथून…बस गाडीवर…चेहरा ओढणीने लपेटून घे…म्हणजे कुणाला समजणार नाही पटकन…तुझ्या काळजीपोटी म्हणतोय मी…
मुग्धा काहीच न बोलता चेहरा ओढणीने लपेटून गाडीवर माधव ला न खेटता बसते…घरी जात असताना माधवच्या बाइककडे सगळी गावातली सगळी माणसं टकमक पाहत असतात…साधारण पंधरा मिनिटांनी दोघेही निंबाळकरांच्या घरी पोचतात…आपली भाची अचानक घर सोडून निघून गेलीय हि तक्रार घेऊन रमेशराव आधीपासूनच आईसाहेबांच्या घरी आलेले असतात…त्यांच्याबरोबर रेश्मा आणि रेखा मामी ही असते ..बाहेरून दुचाकींचा आवाज येताच रेखा मामी घराबाहेर येते…आणि आपल्या नेहमीच्या स्वभावाला आवर न घालता मुग्धाला फैलावर घ्यायला लागते…आता यावेळी अवस्था अशी असते कि रेखा मामीलाही ठाऊक नसत कि माधव हा निंबाळकरांचा एकुलता एक आणि लाडका मुलगा आहे…
रेखा – काय ग सटवे….आली का काळ फासून स्वतःच्या आणि आमच्या तोंडाला…कुठे गेलतीस शेण खायला…
आईसाहेब – असं बोलणार आहात का एका वयात आलेल्या मुलीशी…आवाज खाली ठेऊन बोलायचं…
रमेशराव – रेखा…शांत बस जरा…तुला कुणीही बोलायला सांगितलेलं नाहीय…मोठी माणसं आहेत इथं अजून…
रेखा – अहो…भल्याच सांगत असलो आम्ही तरी असं फुगून घर सोडून जायचं का…
रमेशराव – मुग्धा…घाबरू नकोस…ये इकडं ये…तुला नाही ना करायचं लग्न…नको करुस…मी आहे तुझ्या पाठीशी…
रेखा – एवढं मवाळ आणि मधाळ बोलून नाही चालायचं…आधीच घरातून पळून गेलीस आमच्या नावाला बट्टा लावलायस तू…..कोण करेल आता तुझ्याशी लग्न…स्वतःच नाही पण रेश्माचा तरी विचार करायचं ना…कोण सोयरीक देईल तिला तरी…गेलीस निघून तर एकटीनं यायचं ना…कुना परपुरुषाबरोबर यायचं कशासाठी…
मुग्धा – मामी…..तोंडाला येईल ते काय बोलतीयस…मी काय चकाट्या पिटवायला गेले नव्हते…
रमेशराव – मुग्धा…नीट बोलायचं…
आईसाहेब – काहीतरी कारण असल्याशिवाय ती असं बोलणार नाही…मामी तुम्ही तरी सबुरीने घ्या जरा…
रेखामामी – आईसाहेब…मग हा मुलगा कोण आहे…याला तरी अक्कल नसावी का…पोरीबाळींना गाडीवर फिरवायचे धंदे करतोस कि काय हा सुद्धा…
आईसाहेब – मामी…वाट्टेल ते काय बोलताय…हा माझा मुलगा आहे…या घरात राहून असं बोलायची तुमची हिंमत कशी काय झाली…
रेखा मामी – काय हे तुमचे चिरंजीव आहेत…?
मुग्धा – [ रडत ] होय…मामी…ह्यांनीच मला घरी आणलं…पाहिलंत…[ माधवकडे पाहून ] मी म्हंटल होत ना तुम्हाला…गाडीवर बसून आले ना तुमच्यासोबत कि सगळे मलाच धारेवर धरतील…तसंच झालंय…कशाला मला इथं आणलं…
मुग्धा ओक्सबोक्शी रडत असते…आईसाहेब आणि माधव मुग्धाला समजून घेतील का…पाहुयात पुढच्या भागात…उत्सुकता अशीच असू द्यात……

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.