Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“आईसाहेब येते मी,” सगळी कामं आटोपून कमरेला खोचलेली साडी सावरत मनीषा ताईसाहेबांचा निरोप घ्यायला देवघरात येते.

आईसाहेब म्हणजे आशाताई देवघरात माळ जपत असतात.

आशाताई माळ जपता जपता, “हो बरं….आणि उद्या लवकर ये ग बाई….उद्या माधव येणार आहे. एवढ्या वर्षांनी अमेरिकेहून येणार आहे….मी म्हणतेय उद्या सगळं कसं त्याच्या आवडीचं बनवून ठेवेन….”

“मनीषा उद्या सकाळी येता येता थोडा ताजा भाजीपाला आण गं बाई “

मनीषा – “होय आईसाहेब…माधव साहेबांना अळूची वडी लय आवडते ना….मग सकाळीच अळूची पान घेऊन येते बघा. अजून काय काय आणायचं सांगा मला? “

आईसाहेब – “तू फक्त अळूची पान आणि कारली आण बाकी सामान मी बंड्याला सांगते आणि हो कारली लहान आणि कोवळी बघून आणशील गं बाई….माझ्या माधवला भरली कारली फार आवडतात”

मनीषा – “बरं आईसाहेब निघते मी..उद्या ८ वाजता येते.” मनीषा आईसाहेबांचा निरोप घेऊन निघाली.

आईसाहेब म्हणजे सोलापूर मधील करमाळा जिल्ह्यातील एक उमदं व्यक्तिमत्व. राजकारणात मानाचं पद होतं त्यांच्याकडे. दोन्ही किडनी निकामी होण्याचं निमित्त झालं आणि निंबाळकर काका कायमचे निघून गेली. काकांना जाऊन १५ वर्षे झाली होती आणि तेव्हापासून राजकारणाची आणि घरच्या व्यवसायाची जबाबदारी आईसाहेबांवर पडली. माधव अवघा १५ वर्षांचा होता पण आईसाहेबांनी राजकारण सांभाळून माधवची जबाबदारी चोख पार पाडली होती.

८ वर्षांपूर्वी माधव अमेरिकेला शिक्षण घ्यायला गेला आणि तिथेच स्थायिक झाला होता. आईसाहेबांनी एवढी वर्षे स्वतः सगळं सांभाळलं होतं पण आता एवढा मोठा पगडा सांभाळण्यासाठी आईसाहेबांना माधवची गरज भासत होती. खरंतर माधवला राजकारणात किंबहुना व्यवसायात जराही रुची नव्हती पण फक्त आईसाहेबांच्या शब्दाखातर अमेरिकेहून माधव भारतात परतणार होता.

माधव आईसाहेबांवर जीव ओवाळून टाकायचा. आईसाहेबांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द होता त्याच्या साठी.

आईसाहेबांचं म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं होतं. अगदी साधं राहणीमान….पैशाला काही कमी नाही पण तो पैसा जनकल्याणासाठी कसा वापरायचा हे चांगलंच माहित होतं आईसाहेबांना. अक्खा करमाळा आईसाहेबांना मानत आणि का नाही आईसाहेबांचं कार्य आणि दबदबाच होता तसा. कारमाळ्याच्या जनतेची माया होती ती म्हणून लोकं त्यांना आईसाहेबच म्हणत.

माधव येणार म्हणून निंबाळकरांचा अख्खा बंगला फुलांनी सजलेला होता. माधवच्या स्वागताची जोरदार तयारी चालू होती. आईसाहेबांनी तर सकाळपासून अक्ख घर डोक्यावर घेतलं होतं. आपल्या कामाच्या व्यापामुळे आईसाहेब कधी स्वयंपाकघरात पाऊल ठेवत नसायच्या आणि घरात डझनभर नोकर असताना तशी गरजही कधी पडली नाही. पण आज सकाळपासून त्यांची लगबग चालू होती स्वयंपाकघरात.

सकाळी ८ वाजता मनीषा आली. पण मनीषा आली तोवर आईसाहेबांनी चिंच गुळाची आमटी, आमसुलाचं वरण, भात, अळूच्या वड्यांसाठीचं कालवण आणि कारल्यासाठीचा मसाला करून ठेवला होता.

आईसाहेबांना स्वयंपाकघरात पाहून मनीषा लगबगीनं आपला पदर खोचत आली, “अहो आईसाहेब तुम्ही काय करताय इथं, मी सांगितलं होतं ना सकाळी ८ वाजता येईन म्हणून….आणि माधव दादा १२ वाजता येणार आहे ना अजून अवकाश आहे त्यांना यायला….तुम्ही जावा मी आता करते स्वयंपाक….”

आईसाहेब – “अगं हो हो बाई सावकाश….अगं….बघ अशी घाई नको व्हायला म्हणून मी आधीच तयारीला लागले….आणि तसही आज माझा माधव येणार गं मग मी नको का त्याच्या साठी बनवायला….बरं चहाचं अधान ठेवलंय मी तेवढा उकळला कि सांग मला तोवर देवघरात दिवा लावून येते मी मग सोबतच घेऊ या चहा.  आणि हो जवसाची चटणीही करून ठेव”

“हरे रामा हरे कृष्णा….” आईसाहेब माळ जपत देवघरात गेल्या.

देवघरातून पूजा करून आईसाहेब माधवला फोन लावतात.

“हॅलो अरे माधवा कुठे पोहोचलास रे तू….”

माधव – “आईसाहेब आताच ड्राइवर काकांनी पुण्याच्या एअरपोर्ट वरून पिक केलं आहे…पोहोचतो…४-५ तास लागतील”

आईसाहेब – “बरं बाबा सावकाश ये”

१२ वाजेपर्यंत सगळी कामं आटोपली होती. आज आईसाहेब माधव येणार म्हणून घरीच होत्या. त्यामुळे “निंबाळकर निवास” मधेच सगळ्या राजकारणी लोकांची रेलचेल आज चालू होती. दुपारी १२:३० वाजता माधव करमाळ्यात पोहोचला. आईसाहेब तर रोज माधवशी विडिओ कॉल वर बोलायच्या पण कारमाळ्यातली लोकं इतक्या वर्षांनी माधवला पाहत होती त्यामुळे त्याला पाहण्यासाठी बरीच लोकं जमा झाली होती. त्यातचं लोकांच्या गर्दीमध्ये एक व्यक्तिमत्व सुद्धा माधवला पाहायला आली होती ती म्हणजे मुग्धा.

मुग्धा आणि तिच्या मैत्रिणींनी माधव बद्दल फार ऐकलं होत. आईसाहेबांचं एवढं सुंदर व्यक्तिमत्व असेल तर त्यांचा मुलगा किती “हँडसम” असेल आणि त्यातही अमेरिका रिटर्न म्हटल्यावर तर अजूनच उठावदार व्यक्तिमत्व असणार माधवरावांचं. त्यामुळे लोकांच्या घोळक्यात मुग्धा आणि तिच्या मैत्रिणींनीही गर्दी केली होती.

शमा – “मुग्धे कसा असेल गं आईसाहेबांचा माधव”

मुग्धा नाक मुरडून  – “कसा का असेना आपल्याला काय….आपल्या साठी शोभेची मूर्तीच ती….ना कधी आपला त्याच्याशी संबंध येणार आणि ना आपल्या सोबत तो कधी बोलणार…तसही कार्ट्यानो तुम्ही मला इथं हाथ खेचून आणलं….चांगलं नाही केलं….मला जराही रस नाही त्या माधवला बघायला….तिकडे देसाईबाई चिडल्या असतील….लेक्चर बंक करून आपण सगळ्या जणी इकडे आलो म्हणून…”

कमला – “तू गप्प गं मुग्धे….तुला काही कळत नाही….अगं तो माधव आपल्यासाठी एखाद्या पिक्चर च्या हिरो पेक्षा कमी नाही बघ….ए शमे मी कशी दिसतेय?”

शमा स्वतःचे केस सावरत – “ठीकच दिसतेय गं….मी ठीक आहे ना….धर आज मी ताईचा लीप बाम आणलाय चोरून….तुला पाहिजे का…लाली लावल्यासारखे दिसतीं बघ ओठ”

कमला – “अगं येडी का खुळी तू….दे इकडे लवकर….एवढ्या वेळची लपून ठेवली होती….तो माधव येईलच एवढ्यात”

मुग्धा कंटाळून – “ए बायांनो बास करा ना तुमचं नटन थटणं….तो काय तुमची लाली बघून तुम्हाला प्रोपोज करणार आहे का?माणसानं अंथरून पाहून पाय पसरावं….स्वप्नात सुद्धा त्याच्यासोबत लग्न करायची लायकी नाही आपली….आणि अख्या करमाळ्यात लग्न करायला तेवढा एकच पोरगा दिसला का तुम्हाला….बी.ए. चं शेवटचं वर्ष आहे….माधवापेक्षा अभ्यासात लक्ष द्या….”

शमा – “ओ फिलॉसॉफर बंद करा तुमचं भाषण…. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला कॉलेजात भाषण देता तुम्ही ते काय कमी आहे का?आणि तुमचं काय हो …देवाने सुंदर ध्यान दिलंय तुम्हाला…कॉलेजात पोरांची लाईन लागलीये तुमच्या मागे….कॉलेजातली सगळी पोरं तुमच्या मागे असताना आम्हाला निदान माधव तरी भेटू द्या कि”

शमा आणि कमला दोघीही खिदीखिदी हसायला लागल्या.

मुग्धा दिसायला फार सुंदर….असं वाटायचं कि देवाने फावल्या वेळेत मुग्धाला कोरली असावी. सुंदर गोरा पान रंग….लांब सडक केसांचा बांधा….पाणीदार मोठे डोळे….आणि डोळ्यांच्या मध्ये कोरलेले टोकदार नाक…अभ्यासातही हुशार….बिना आई बापाची होती….लहानपणीच आई वडील एका अपघातात गेले आणि मुग्धाला पोरकी करून गेले….त्या नंतर मामा मामीने तिचा सांभाळ केला. मामा तर जीव ओतायचा मुग्धावर. पण मामी मात्र फार खउटी स्वभावाची.

रोज रोज काही कारण सांगून कटकटी करायची. मुग्धा मामीच्या पोरींपेक्षा सुंदर आणि अभ्यासातही हुशार त्यामुळे रोज तिच्या अभ्यासात कसा व्यत्यय आणता येईल ह्याचे किडे नेहमीच तिच्या डोक्यात असायचे. मुग्धाला दिवसभर घरच्या कामांना जुंपून द्यायची. पण त्यातूनही मुग्धा थोडा वेळ अभ्यासासाठी काढायची. मामीचीही मोठी मुलगी मुग्धा बरोबरच होती शिकायला. त्यामुळे मुग्धा जरा कुठं मैत्रिणीसोबत कॉलेज मधून बाहेर पडली कि लागलीच तिची मामेबहीण (रेश्मा) आईजवळ मुग्धाबद्दल काडी करायची.

त्यामुळे आजही मुग्धाला धाकधूक लागली होती.

मुग्धा – “चला गं मी निघतेय…तुम्ही बघत बसा त्या माधवला….जरा उशीर झाला कि मामी धाडेवर धरील मला”

कमला – “काय गं मुग्धे तुझी नेहमीच घाई असते….त्या काळवंडी रेश्माला जाऊ देत सांगू देत तुझ्या मामीला….थांब तो गावच्या वेशीवर आलाच आहे म्हणतायेत लोक…येईलच इतक्यात बघ”

मुग्धा – “नको गं बाई….तसही मला काही हौस नाही त्याला बघायची….मला जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे….रात्रीच्या जेवणाला जरा उशीर झाला कि मामी ताणताण कारेन माझ्या नावाने….तुम्ही नीट निरखून बघा त्याला…..त्या माधवची चर्चा उद्या कॉलेज मध्ये करू आपण….चला बाय….येते मी….”

मुग्धा घोळक्यातून बाहेर पडली आणि शमा कमलाकडे बघतच होती….समोर तिचं लक्ष नव्हतं….ती त्या दोघींकडे पाहून त्यांचा निरोप घेत होती….तेवढ्यात माधवची गाडी आली आणि मुग्धा अचानक माधवच्या गाडी समोर आली….तिला बघताच ड्राइवर काकांनी अचानक ब्रेक लावला…आणि ब्रेकचा आवाज सगळीकडे पसरला….माधवने गाडीची खिडकी खोलून समोर कोण आहे ते पाहिलं….

क्रमश:

तुम्हाला हेही वाचायला आवडेल
hospital bg checklist for delivery india