Skip to content Skip to sidebar Skip to footer

जाणून घ्या तुळशीचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे

tulsi plant benefits: आपल्या हिंदू संस्कृतीत तुळस ही अत्यंत वंदनीय, पुजनीय आहे. तुळस ही श्रीहरीविष्णु, श्रीकृष्ण, विठ्ठलाला अत्यंत प्रिय आहे.

विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीचा  हिरवागार हार शोभून दिसतो. तुकाराम महाराजांनी म्हंटलेलं आहे..

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान..

अगदी जुन्या काळापासून घराच्या अंगणात तुळशी वृंदावन  बांधण्याची प्रथा आहे. तुळशीचं रोप या तुळशी वृंदावनात लावतात. पहिली मातीची तुळशी वृंदावनं बनवून त्यांना शेणाने सारवलं जात असे. त्यांवर गंधबोटांनी नक्षी काढत असत.

आता सिमेंटची तुळशी व्रुंदावनं बांधून घेतात. संध्याकाळी तुळशी वृंदावनाच्या चौथऱ्यावर बसून खेळण्याची मौज औरच होती. या तुळशीवृंदावनावर चहुबाजूंनी लक्ष्मी, गणेश, विष्णु आदि देवीदेवतांची चित्रे कोरलेली असतात. ऑइलपेंटने या व्रुंदावनांना  रंगवले जाते.

घरातील स्त्रिया तुळशीच्या रोपाला रोज स्नान केले की पाणी घालतात, हळदकुंकू वाहून तुळशीची पूजा करतात. तिला नैवेद्य अर्पण करतात. तुळशीभोवती प्रदक्षिणा घालून घरादारात सौख्य नांदूदे अशी तुळशीकडे प्रार्थना करतात. तुळशीत माता लक्ष्मीचा वास असतो व तुळशीच्या नित्य पुजनाने माता लक्ष्मीची घरादारावर घरातील सदस्यांवर क्रुपा रहाते अशी श्रद्धा आहे.

खेडोपाड्यात भोळ्याभाबड्या बाया जातं ओढताना, ताक घुसळताना ओव्या गातात. या ओव्यांमधे त्यांनी आपल्या सखीला तुळशीला जागा दिली आहे. तुळशीची थोरवी त्या वेळोवेळी गात आल्या आहेत.

माझी गं तुळस रानातवनात
जागा देते तुला माझ्या अंगणात..

या अशा ओवींतून तुळशीशी बायांच असलेलं सख्य दिसतं. बाई म्हणते, माझ्या या वाड्याचं अंगण ऐसपेस आहे त्यात तुला जागा देते. तू इथे बहर, मला तुझी नित्यनेमाने सेवा करूदे.

अशा या तुळशीला ग्रुहिणी आपली मुलगीच मानते. तिला नित्य पाणी घालते, तिची जोपासना करते. ती जरा जरी वाळू लागली तर हिचं मन दु:खी होतं.

चार महिन्याच्या दीर्घ निद्रेनंतर प्रबोधिनी एकादशीला प्रभु श्रीहरीविष्णु जेंव्हा जागे होतात त्यादिवशी त्यांच्या शाळीग्राम रुपाशी तुळशीचे लग्न लावले जाते. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो.

लग्न काही साधेसुधे नसते बरं. तिच्या लाडक्या लेकीचं लग्न ते.

अंगणात सडासारवण केलं जातं. रांगोळीने अंगण सुशोभित केलं जातं. वृंदावन मातीनं लिंपलं जातं, सिमेंटचं असेल तर त्याला रंगवलं जातं. बाजारातनं बाशिंग, हिरव्या बांगड्या, काळेमणी सारं काही श्रुंगाराचं साहित्य आणतात.

तुळशीला साडीचोळी नेसवली जाते. लाल चुनरी चढवतात. सोन्याच्या बांगड्या, हार,नथ,जोडवी असा श्रुंगार करून नटवलीथटवली जाते. तुळसीची खणानारळाने ओटी भरतात. चिंचा, आवळे, बोरं तुळशीच्या मुळाशी ठेवतात.
तुळशीमागे उसाचा दांडा म्हणजे तिचा मामाच उभा करतात. करंज्या, लाडू, चकल्या, चिवडा सारं काही हौसेने केलेलं तुळशीला नैवैद्य म्हणून ठेवतात.

समोरच्या पाटावर विष्णुचे प्रतिक शाळीग्राम ठेवून दोघांमधे अंतरपाट धरून भटजीकाका गोरजमुहुर्तावर मंगलाष्टका म्हणतात. जमलेल्या चिल्यापिल्यांना कुरमुरे, बताशे दिले जातात. लहान्यांची नुसती चंगळ असते. दरवर्षी प्रबोधिनी एकादशीला तुळशीचं लग्न तेवढ्याच उत्साहात साजरं केलं जातं.

तुळशीला जेवढं आध्यात्मिक महत्त्व आहे तितकंच आर्युवेदातही तिचं स्थान अनमोल आहे.
तुळशीची पानं, मंजिऱ्या, मुळं, काष्ठ..या प्रत्येक भागाचा आयुर्वेदिक औषधांत उपयोग केला जातो (tulsi plant benefits).

●उचकी लागत असल्यास तुळशीचा रस थोडा मध घालून चाटल्यास थोड्या वेळात उचकी थांबते.

●दम्यावर तुळस अत्यंत गुणकारी आहे. दमा लागत असल्यास तुळशीचा रस खडीसाखर घालून पिल्यास आराम मिळतो.

● ताप येत असल्यास तुळशीचा काढा पिल्याने घाम येऊन ताप उतरण्यास मदत होते.

● अंगाला खाज उठत असल्यास अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने टाकतात. त्या पाण्याने नियमित अंघोळ केल्यास तुळशीत असणाऱ्या एंटीब्याक्टेरीयल गुणांमुळे अंगाची खाज नाहीशी होतेच शिवाय त्वचाही तजेलदार होते.

● चेहऱ्यावर तारुण्यपिटीका येत असल्यास तुळशीची पाने वाटून त्यात थोडी चंदन पावडर मिसळून तो लेप चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसांत मुरमे/तारुण्यपिटीका येणे बंद होते. तुळशीचा रस नियमित प्राशन केल्यानेही रक्तशुद्धी होते व त्वचा निरोगी रहाते, केसांची गळती थांबते.

● गांधीलमाशी, मधमाशी अगर एखादा किडा, मुंगी चावल्यास त्वचेची आग होते. त्याजागी तुळशीचा रस चोळल्यास दाह शमतो.

● खोकला येत असल्यास तुळशीची पाने ठेचून गरम करुन फडक्यात गुंडाळून त्या पोटीसने  छाती शेकल्यास  कफ सुटतो व खोकला कमी होतो.

● सर्दीपडसे झाले असल्यास चार मिरी, दोन लवंगा, बोटभर ठेचलेले आले, तुळशीची पाने, बेलाची पाने यांचा काढा करून सकाळसंध्याकाळ घेतल्यास पडशात आराम मिळतो.

● डोके दुखत असल्यास तुळशीच्या पानांचा लेप करून लावल्यास डोकेदुखी शांत होते.

● वजन कमी करण्यासाठीही तुळशीचा काढा नियमित पितात. तुळशीत असलेल्या औषधी घटकांनी शरीरात साचलेली विषारी द्रव्ये निघून जातात व मेदव्रुद्धीस अटकाव होतो.

● तुळस लावल्याने डासांपासून सुटका होते.

● तुळशीत असलेल्या सकारात्मक उर्जेमुळे ती Antidepressant म्हणून वापरतात.

● तुळशीच्या मंजिऱ्यांतील बी जमा करुन ठेवतात. हे बी स्त्रियांच्या अनियमित मासिकपाळीवर गुणकारी आहे. तुळशीबीज पाण्यात भिजत ठेवून रोज सकाळी घेतल्यास पाळी नियमित येण्यास मदत होते. मुतखड्यावरील इलाजासाठीही या बीयांचा वापर करतात.

●शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दुधात खडीसाखर व तुळशीच्या बिया भिजत घालून ते दूध प्यावे.

● तुळशीमधे Antioxidants  असतात. तुळशीच्या पानांचा चहा करून घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. अनेक विषाणूजन्य आजारांपासून दूर रहाण्यास मदत होते.

जाणून घ्या करवा चौथ व्रत, पूजा विधी आणि उद्यापन कसे करावे?

जाणून घ्या महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तिपीठे (sadetin shaktipeeth) आणि त्यांचा इतिहास

विठुरायाला तुळशी प्रिय आहे. तर वारकऱ्याला तुळशीमाळ प्रिय आहे. विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीमाळ असते. तुळशीच्या लाकडापासून 108 मण्यांची तुळशीमाळ बनते. ही माळ परिधान करणाऱ्यास मात्र बरेच नियम पाळावे लागतात..जे त्याच्या हिताचेच असतात उदा. वाईट विचार मनात येऊ न देणे, संसारात राहुनही सतत परमेश्वराचे मनन, चिंतन करणे, वारीला जाणे,..वगैरे.

एकदा श्रीकृष्णाची तुला करत होते. एका पारड्यात
श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात सोनं, हिरे, माणके पण श्रीकृष्णाचंच पारडं जड होत होतं तेंव्हा रुक्मिणीने श्रीकृष्णाला प्रिय तुळशीचं पान त्या दुसऱ्या पारड्यात टाकताक्षणी दोन्ही पारडी बरोबर झाली. म्हणून तुला वरून ‘तुळस’ हे नाव रुढ झालं असं म्हणतात.

जालंदर नावाचा राक्षस हा वृंदेचा पती होता. वृंदा पतीव्रता होती. जालंदराने देवांना, साधुंना सळो की पळो करून सोडले होते. शेवटी सर्व देव व साधुगण श्रीविष्णुच्या आश्रयाला आले.

श्रीविष्णु म्हणाले, वृंदेचं पातिव्रत्य हीच जालंदराची शक्ती आहे. ती नष्ट करण्यासाठी विष्णुंनी जलंदरचं सोंग घेतलं व वृंदेकडे गेले.

वृंदेने त्यांना आपला पती समजून आलिंगन दिलं. झालं, वृंदेचं पातिव्रत्य नष्ट झालं. तिकडे देवांनी आपल्या बाणांनी जालंदरचं शीर धडावेगळं केलं जे वृंदेच्या अंगणात येऊन पडलं.

पतीचं शीर पाहून वृंदाने समोरच्या जालंदरला विचारलं,” तू कोण आहेस?”

श्रीविष्णु मुळ रुपात प्रगटले. दु:खाने व्याकूळ झालेल्या त्या नारीने श्रीविष्णुना शाप दिला की तुम्हालाही जोडीदाराचा विरह सहन करावा लागेल. राम अवतारात रामास सीतेचा विरह सहन करावा लागला.

जिथे वृंदेवर अंत्यसंस्कार केले गेले तिथे एक रोप उगवले तेच तुळशीचे रोपटे. श्रीविष्णुंनी तिच्याशी विवाह करण्याचे मान्य केले त्यानुसार दरवर्षी प्रबोधिनी एकादशीला श्रीविष्णुचे प्रतिक आसलेल्या शाळीग्रामाशी तुळशीचे लग्न लावतात त्यानंतरच इतरांची लग्न लावली जातात.

एकदा गणपती, भगिरथी नदीकाठी ध्यानधारणा करत होता. वृंदा तेथून जात होती. ती गणपतीच्या तेजाने मोहीत झाली व गणपतीला म्हणाली,”माझ्याशी विवाह कर.” गणपती म्हणाला,”मी ब्रह्मचर्यव्रताचे पालन करत आहे. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. वृंदेला राग आला. तिने गणेशाला शाप दिला की तू दोन बायकांचा पती होशील. यावर गणेशही चिडला व त्याने व्रुंदेस शाप दिला,”तुझे लग्न असुराशी होईल.” पुढे वृंदेस आपली चूक कळली. तिने श्रीगणेशाची माफी मागितली.

श्रीगणेशाने तिला उ:शाप दिला की पुढच्या जन्मी तू तुळस होशील व विष्णुला प्रिय असशील. मात्र माझ्या पुजेत तुला फक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थीलाच स्थान असेल. इतर पुजेवेळी नाही. त्यामुळेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी वगळता गणेशपुजेत तुळशीला वहात नाहीत.

रविवारी व एकादशीदिवशी तुळस ही पती श्रीहरीविष्णुसाठी निर्जलीव्रत करते म्हणून तिचे व्रत भग्न होऊ नये याकरता रविवारी व एकादशीदिवशी तुळशीला पाणी घालत नाहीत.

लहान घरांमधे तुळस ही मातीच्या कुंडीत लावून कुंडी ग्रीलमधे ठेवावी जेणेकरुन रोपाला पुरेसा सुर्यप्रकाश व हवा मिळेल. तुळशीची कुंडी उत्तर वा ईशान्य दिशेस ठेवतात. आजूबाजूला चपला, अडगळ असू नये कारण तुळशीत लक्ष्मीमातेचं वास्तव्य असतं अशी श्रद्धा आहे.

भारतात तुळशीचे  प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात काळी तुळस (कृष्ण तुळस) आणि हिरवी तुळस (राम तुळस). कृष्ण तुळस औषधी गुणधर्मांत उत्कृष्ट आहे.

वाढदिवसानिमित्ताने, हळदीकुंकू समारंभात वाण म्हणून तुळशीची रोपं जरूर भेट द्यावीत. इतरही फुलझाडं भेट देऊन पर्यावरणास हातभार लावावा.

उठोनिया प्रातःकाळी । तुळस वंदावी माउली ।
तुळस संतांची साउली । मुगुटी वाहिली विष्णूने ।।१।।

तुळस असे ज्याचे द्वारी । लक्ष्मी वसे त्याचे घरी ।
येवोनी श्रीहरी । क्रीडा करी स्वानंदे ।।२।।

तुलासीसी मंजुरा येता । पळ सुटे यमदुता ।
अद्वैत तुळस कृष्ण स्मरता । नासे दुरित चितांचे ।।३।।

जे जे तुलासी घालती उदक । ते नर पावती ब्र्म्हसुख ।
नामा म्हणे पंढरीनायक । तुलसी जवळी उभा असे ।।४।।

Leave a Comment

error: