Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® गीता गजानन गरुड.

आज सकाळीच दोघांच बिनसलं. सोहमने सोफ्यावर टाकलेल्या ओल्या टॉवेलावरून दोघांच फिसकटलं. सारा म्हणाली,”कितीदा रे तुला सांगायची एकच गोष्ट?” सोहम म्हणाला,”तु ही का अडतेच एकाच गोष्टीवर. नेहमी टांगतोना दोरीवर. आज विसरलो तर बरी तणतणत आलीस. नुसती किटकिट करत असतेस माझ्यामागे.” झालं साराही त्याला बरंच बोलली..ऑफिसातून आल्यावर बॅगेतला डबा, बॉटल न काढू देण्याबद्दल, इथे तिथे पसारा करून ठेवण्याबद्दल, शेव करुन झाली की बेसिन स्वच्छ न करण्याबाबत.

तुझ्या घरातल्यांनी तुला अगदी बाबू करुन ठेवला आहे, काडीचे संस्कार केले नाहीत तुझ्यावर असंही म्हणाली. बाकी तुझ्या आईला वेळच कुठं होता म्हणा चार गोष्टी निगुतीच्या शिकवायला.. समाजसेविका न् तुझी आई न् घरादारावर का म्हणतात ते तुळशीपत्र. हा आईवरुन मारलेला वाग्बाण मात्र सोहमच्या जिव्हारी लागला. तोही मग बरंच बोलला,”तुझ्या आईने जसं काय तुला अगदी संस्कारांच्या मुशीत घडवलंय.

एवढंस बनवायचं तिथे चार जणांच बनवते नि मग फेकून देते. इति तिथे केस पडलेले असतात तुझे. स्वतःचे गळालेले केसही तुला उचलता येत नाहीत आणि म्हणे हिच्यावर संस्कार केलेत मोठे!” झालं,दोघांनीही एकमेकांच्या माहेराचा जाहिर उद्धार केला. त्यानंतर सुरु झाली ती गंभीर शांतता, कुजकट अबोला. पुढची कामं मग अबोल्यातच झाली.

भरल्या डोळ्यांनी साराने उपमा केला. चहाचं आधण ठेवलं. रात्री बटाटे उकडून ठेवले होते. ते सोलून त्यांत मिरची,आलंलसणाची पेस्ट घालून मिश्रण एकजीव केलं नि आधीच मळलेल्या कणकेचे उंडे करुन त्यात ते मिश्रण भरलं न् पराठे बनवू लागली. जरा गार झाले तसे तिने दोघांचा डबा भरला. डायनिंग टेबलवर सोहमचा डबा,उपम्याची डिश,कॉफी,त्याचा टाय,त्याची बनियन,रुमाल,पाण्याची बॉटल सगळं नेहमीप्रमाणे ठेवलं.

वास्तविक यातलं थोडंबहुत सोहम रोज करायचा पण आज त्याला साराचा राग आला होता. ‘समजते काय ही स्वतःला. तोंडाला येईल ते बोलत सुटते..ब्ला..ब्ला.’ त्याच्या मनात चालू होतं असं सगळं.

भूक तर लागलेली. शिवाय उपमा तोही वरती शेव भुरभुरलेला त्याचा विक पॉईंट होता. त्याने उपम्यावर छान लिंबाची फोड पिळली व आवडतं गाणं ऐकत तो उपमा खाल्ला.

डबा,बाटली बेगेत भरली व बाय न करताच गेलाही.

साराचं आज प्रेझेन्टेशन होतं. ती गुलबक्षी रंगाची साडी नेसली. त्यावर शोभतील असे ऑक्सिडाइजचे झुमके घातले. ही साडी तिच्या आईची. साराला आईची आठवण आली की सारा हमखास ही साडी नेसायची. असं छान नटल्याथटल्यावर तिला जरा बरं वाटलं. सोहमचा राग आलेलाच पण तरी डोकं जरा शांत झालं. इतक्यात आईचा फोन आला.

आईशी दोन शब्द बोलता बोलता तिने प्रेझेंटेशनचे पेपर्स सॅकमधे सरकवले व लेच लावून निघालीसुद्धा. रिक्षा पकडली. आधीच दोन जाड्या माणसांनी भरलेली. ही कशीबशी अंग चोरून बसली. स्टेशनवर आली तर गाडीची अनाऊंसमेंट कानी आली तशी अगदी झाशीची राणी अंगात शिरल्यासारखी निऱ्या हाताने चिमटीत पकडून जिना चढू लागली.

इकडे घरी रमाक्का नेहमीप्रमाणे लेच उघडून सारा,सोहमच्या घरात आली. रमाक्का या सोसायटीत दहाएक ठिकाणी घरकाम करायची. त्या घरमालकांच्या घराच्या चाव्या तिच्या कनवटीला असायच्या. रमाक्कावर साऱ्यांचा विश्वास होता. रमाक्काची काम करताकरता स्वतः शीच गप्पा मारणं चालू असायचं. आल्याबरोबर तिने टिव्हीवर मराठी गाणी लावली.
नको चंद्र तारे फुलांचे पसारे..

“अगंबयाबया किती पसारा करुन ठिवलाय हा. पोरीला येळ तरी कुठं असतो आवरायला. सैपाक करील काय घर आवरील.” सोफ्यावरचा ओला टॉवेल दोरीवर टांगत म्हणाली,”हे सायेब लोक असेच. काडीची शिस्त नाय. पोरीन आपला पंचा कसा वाळत घातलाय. येकबी चुनी न्हाई. नी हे महाराज. पोरीला चार दिससुदीक आराम भेटत न्हाई. म्हायेरी जाईल तर लय लांब हाये म्हनी ते. ते कनचं ते गाव..करनाटकमंदी. लव मेरेज क काय ते केल्याकारनानं सासूसासऱ्यांचाव आधार न्हायी.

पाळणा हलल्यावर हुतील येक तवसर ह्या बाबानच समजावून घितलं पायजेल की नाय पोरीला. हे आपलं र्हात तंगड्या वर करुन नि बायकोला लावतं कामाला. नोकरीवाली बायको पायजे हेस्नी पन बुटातले मोजेबी काडून धुवायला टाकत न्हायत. पोरी शिकल्यासवरल्या..कर्त्याधर्त्या झाल्या त्या सावित्रीबाई नी महात्मा फुलेंच्या आशिरवादानं.  त्या मायमाऊलीची किरपा. पन चूल नि मुल काय चुकत न्हाई बाईमानसाच्या जातीला.

आता ही सारा सकाळी उठूनशान पोळीभाजी करती,जमल तसं आवरती नी गाडीला पळती. कंपनीत काय चुकी झाली काय त्यो सायिब तिला खाऊ की गिळू करत्यो. या पुरुषमानसास्नी बायामानसं निसती पगार खायाला हाफिसात येत्यात असं वाटतंया. सकाळी उठून पोटच्या पोरांना पाळनाघरात,कलासाला सोडून येताना तेंचा जीव काय म्हनीत आसलं हेच कुणाला काय पडलं न्हाई. सनाच्या दिसी चार दागिने अंगभर घालून, ठेवनीतली साडी नेसून गेल्या काय बाजुच्या डब्यातली कायकाय सरकाटं निसती लाळ गाळत रहात्याती.

हे एवढे गारगोटीसारे डोळे भायेर काडून टकामका बघत्याती नि घरात जावबिव आसलं तर तिला वाटतं ही बया मुरडायलाच जाती भायर माज्या जीवावर संसार टाकून. म्हंजी सगळ्याच बाजूनी ह्या सर्विसवाल्या बायांचा बँड वाजिवत्यात नी तेंच्या पगारावरबी डोळा. किती कमिवत्यात नि किती नाय.”

हा असा रमाक्काचा तोंडाचा पट्टा नेहमीसारखाच चालू होता. रमाक्का कळव्याच्या झोपडपट्टीत रहायची. ती नि तिचा लेक दोघंच. लेक कामाला गेला की त्याच्यापाठोपाठ रमाक्का घराबाहेर पडायची.  रेल्वेने ठाण्याला यायची. तिथून मग बसने मनोरमा सोसायटीत. गेली वीस वर्षे ती या सोसायटीत घरकाम करत होती. केर काढताना रमाक्काची नजर डायनिंग टेबलवरच्या डब्याकडे गेली. रमाक्काच्या लक्षात आलं की साराताई डबा विसरुन गेली कारण साहेबांचा डबा स्टीलचा तर साराचा टपरवेअरचा हे रमाक्काला ठाऊक होतं. रमाक्काच्या मोबाईलमधे सोहम साहेबांचा फोन नंबर नोंद केलेला होता.  तिने त्यांना फोन लावून डब्याविषयी सांगितलं.

एव्हाना सोहमचाही राग शांत झाला होता. परागने खुणेनेच विचारलं तेव्हा त्याला म्हणाला,”मी पण ना यार. काही सवयी अंगवळणी पडल्याहेत. जातच नाहीत. त्यावरुन आज सकाळीच सारा वैतागली. ती चिडली मग मीही चिडलो. झालं शब्दाला शब्द वाढत गेला. ती तर डबाही विसरुन गेली. आताशा लंच टाईमही होऊन गेला. चुकलंच माझं.”

यावर पराग म्हणाला,”अरे भांडणं काय होतच असतात पण तुझ्या वाईट सवयी हळूहळू सुधारायचा प्रयत्न कर. घरातल्या कामात वहिनीला मदत कर मग बघ तिचा त्रागा कमी होईल व तुम्हा दोघांना क्वालिटी टाईम मिळेल. आमच्या घरचच बघ.

मी मुलांना आंघोळी घालतो,संध्याकाळी त्यांचा अभ्यास घेतो, सकाळी भाजी चिरुन देतो,कणिक तिंबून देतो. तिलाही घाई असते रे वेळेवर ऑफिसला पोहोचायची. आता मुलंही पानं घेणं,पसारा आवरणं अशी हलकीफुलकी कामं करु लागली आहेत. शेवटी काय मुलं आपलच अनुकरण करत असतात मित्रा आणि गोड बातमी कधी देताय रे.

ते जाऊदे आधी वहिनीला आज कुठेतरी फिरायला घेऊन जा. बरं वाटेल तिला. रागाचा पारा झरकन उतरेल बघ. तुझ्या पेंडींग कामाचं माझ्याकडे लागलं” होय मित्रा, असं म्हणून सोहम बॉसच्या केबिनकडे वळला.

सोहमने बॉसची परगावनगी घेतली व बाईक स्टार्ट करुन अर्ध्या तासात साराच्या ऑफिसजवळ पोहोचला.

साराचं ऑफिस सुटलं तसं गेटजवळ सोहमला पाहून तिच्या मैत्रिणींनी मस्करी करुन तिला भंडावून सोडलं. त्यांचा निरोप घेत ती बाईकवर येऊन बसली खरी पण नाकावरचा राग तसाच होता. सोहमने मुद्दामहून आडवाटेचा ओबडधोबड रस्ता निवडला तसं साराला नाईलाजाने का होईना त्याच्या खांद्यावर हात ठेवावा लागला. तो स्पर्श दोघांनाही हवाहवासा होता. इंग्रजीत टू ब्रेक द आइस म्हणतात तसा. आगीजवळ लोणी नेताच ते वितळतं तसं गार वारा अंगाशी झोंबू लागल्यावर सारा त्याला अधिकच बिलगली व राग कुठच्याकठं पळाला.

लग्नाआधी दोघेजणं भेटायचे त्या पार्कजवळ सोहमने गाडी पार्क केली. दोघे सवयीच्या बाकावर जाऊन बसले. अजुनही पहिलं कोण बोलणार होतच. इतक्यात नेहमीची गजरेवाली छोकरी गजऱ्यांची गुंडाळी घेऊन आली. बाजुला बसलेल्या आजोबांनी आजीसाठी एक लहानसा सायलीचा गजरा घेतला व आपल्या थरथरत्या हातांनी तिच्या इवल्याशा वेणीत माळला.

सोहमनेही त्या छोकरीला बोलावलं व चांगला दोन फुटभर गजरा घेतला व आजोबांच अनुकरण करत साराच्या केसांत माळू लागला तशी गजरेवाली छोकरी म्हणाली,”साहब गजरा पहननेके बाद दीदी और भी खुबसुरत दिख रही है।”

हे ऐकून साराकडे पहात मिश्किल हसत सोहम म्हणाला,” तेरी दीदी हैही खुबसुरत।” छोकरी म्हणाली,”साहब,दीदी का नाम क्या है?” यावर सोहम साराच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला,”इनका नाम है..चौधवी का चाँद।”

यावर ती छोकरी म्हणाली,”साहब दीदी तो चाँद से भी ज्यादा खुबसुरत दिखती है।” यावर सारा सोहमला लाडिक हसत म्हणाली,”तुझं आपलं काहीतरीच हं सोहम!”

समाप्त

=============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *