महिलांसाठी नवे उखाणे….

नेसून पैठणी मिरवत होते ताईच्या लग्नात
पहाताक्षणी भरले मी … रावांच्या मनात
पाटावर रुमाल
रुमालावर डबी
डबीत अंगठी
अंगठीत बसवलाय
मौल्यवान हिरा
… माझे कृष्ण नं
मी त्यांची राधा

वर्षाचे असतात तीनशेपासष्ट दिवस
दिवसाचे असतात चोवीस तास
… राव भरवतात मला लाडवाचा घास
बागेत फुलला गावठी गुलाब
… रावांचा आहे खासा रुबाब
पैठणीच्या पदरावर शोभतो जरतारी मोर
… संगे लग्न लागले भाग्य माझे थोर
राखेतून झेप घेतो फिनिक्स पक्षी
… नि माझ्या प्रेमाला ईश्वर साक्षी

सासूबाई प्रेमळ सासरे हौशी
दिर उमदा नणंद साजिरी
नणंदेला आहेत दोन मुलं
… रावांना आवडतात गुलाबाची फुलं
पानांच्या आडून डोकावते कळी
…रावांनी साडी आणली सोनसळी
गेलो होतो उपहारगृहात
मागवलं टोमॅटो आमलेट
… राव म्हणे खा की भरभर
घरी जायला होईल लेट
रातराणीचा सुगंध दरवळतो अंगणात
काजव्यांचा खेळ रंगतो अंधारात
… रावांसवे फिरते मी निरव एकांतात
आभाळाचा भार वहातात चार दिशा
रावांना शोभून दिसतात पिळदार मिश्या
सचोटीचा व्यापार, चांगले विचार
रावांचा नि माझा सुखी संसार

आकाशात चांदण्या पाण्यात मासोळ्या
सारणात चारोळ्या घराला पागोळ्या
पागोळीची धार ओंजळीत धरते
… रावांसगे आज देवदर्शनाला निघते
देवाची क्रुपा नारळात पाणी
… राव माझे राजा मी त्यांची राणी
पेढ्यात पेढे सातारचे कंदीपेढे
… रावांचे नाव घ्यायला कशाला आढेवेढे

देवळाला लागून रमणीय तळं
तळ्यात फुललीत लाल कमळं
कमळ वाहतो देवीला जोडीने
… रावांस माझ्या सर्व सुखं लाभोत
प्रार्थना करते भक्तीभावाने
शब्दकोशात असतो शब्दांचा अर्थ
… रावांविना जीवन माझे व्यर्थ
आकाशात चांदण्या पाण्यात मासोळ्या
सारणात चारोळ्या घराला पागोळ्या
पागोळीची धार ओंजळीत धरते
… रावांसगे आज देवदर्शनाला निघते

दारात रेखाटली रांगोळी
तीत भरले विविध रंग
हालचाली माझ्या निरखण्यात
… राव झाले दंग
चौसोपी वाडा वाड्यात दहा खोल्या
दहा खोल्यांना दहा दरवाजे
दहा दरवजांची दहा कुलपं
दहा कुलपांच्या दहा चाव्या
चाव्या गुंतवल्या छल्ल्यात
छल्ला माझ्या कंबरेला
… रावांसोबत चालले मी सिनेमाला