Ritbhatmarathi

Search
Close this search box.

टॉर्न हायमन की विश्वास!!

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

मी धनंजय निवाते,प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ. माझी आईही स्त्रीरोगतज्ज्ञ.मी स्त्रीरोगतज्ज्ञ झाल्यावर तिने वरळीच्या आमच्या मेटर्निटी होमचा चार्ज माझ्याकडे दिला नं स्वतः माझ्या बहिणीच्या खेड्यातील इस्पितळात सेवा देण्यास रुजू झाली.

माझी बहीण व माझे भाओजी दोघेही एम. डी. शहरात राहून खोऱ्याने पैसा ओढणं सहज शक्य होतं त्यांना तरीही भाओजींनी आपल्या खेडमधल्या खेड्यात इस्पितळ उभारलं. माझ्या बहिणीनेही नवऱ्याच्या या कार्यास पाठिंबा दिला. माझ्या आईस त्यांच्या या सेवाव्रताचं कोण कौतुक म्हणूनच तीही आयुष्यातील उरलेले  दिवस ग्रामीण जनतेच्या सेवेत घालवू इच्छित होती.

तिथे गप्प बसेल ती आई कसली! म्हणतात नं घार हिंडते आकाशी,.चित्त तिचे पिल्लापाशी तसं माझ्याकडे लक्ष असायचं तिचं. आता मला चतुर्भुज करण्याचा मातोश्री व भगिनीने चंग बांधला होता, त्याकरता मला गावी बोलावलं होतं.

आई सतत बिझी असल्यामुळे लहानपणी मला आईचा पुरेसा सहवास लाभला नव्हता. माझ्या पत्नीचा तरी माझ्या होणाऱ्या मुलांना पुरेसा सहवास लाभावा या हेतुस्तव  मी डॉक्टरी पेशातली सहचारिणी नको म्हणून सांगितलं.

“अरे मग काय घरी बसून रहाणारी बायको हवी तुला? तिला नोकरी वगैरे करु देणार नाहीस?” बहीण रागावत म्हणाली.

“हे बघ शोभा, मी असं मुळीच म्हंटलं नाही. मुलगी सुशिक्षित, सोज्वळ हवी. तिला नोकरी करायची असेल तर खुशाल करुदेत पण तुझ्यासारखं, आईसारखं चोवीस तास डॉक्टरीपेशाला वाहून घेतलेली नकोय मला.”

“बरं, तू म्हणतोस तशी मुलगी आहे माझ्या बघण्यात. यांच्या चुलत मामाची लेक आहे. पदवीधर आहे. बघायचा कार्यक्रम ठरवू.” आई म्हणाली.

आणि मी, आई,ताई,भाओजी अशी सगळी मंडळी त्या मुलीच्या घरी गेलो. मुलगी रत्नागिरी शहरातली. तिलाही मुंबईची ओढ होती. दिसायला नाकीडोळी नीटस,गव्हाळ रंग..पहाताक्षणी आवडेल अशीच होती, यामिनी. मला सतरा ठिकाणी कांदेपोहे हादडायचे व मुलींना नकार देत फिरायचं हे मान्य नव्हतं. मी माझा होकार कळवला. यामिनीकडूनही होकार होता.

लग्न धाटामाटात झालं नं यामिनी..सौ. यामिनी धनंजय निवाते बनून माझ्यासोबत माझी सहचारिणी बनून राहू लागली. आता आईला माझी विशेष काळजी वाटत नव्हती. माझी काळजी करण्यासाठी तिची सूनबाई जी आली होती.

प्रणयाच्या रात्री माझ्या लक्षात आलं की यामिचं hymen already torned आहे. यामि सायकलिंग करायचीस का गं? मी विचारलं तर हो म्हणाली होती. तरीच..तरीच काय..काही नाही म्हणत मी तिला बाहुपाशात घेतलं होतं.

मी यामिनीला म्हंटलं,”यामि, तुला पुढं शिकायचं असेल तर जरुर शीक. नोकरी करायची असेल तर ती कर.” पण तिला घरी रहायचं होतं. यामिनीला नवनवीन गोष्टींची आवड होती.

यामिने आमच्या घराचा चेहरामोहरच बदलून टाकला. उंची पडदे,अद्ययावत किचन, नवनवीन अप्लायंसेस, भिंतींना सुरेख रंग..घरी आलं की मन कसं पसन्न व्हायचं. यामिला खरेदीचीही प्रचंड आवड होती . कोणतीही नवी फेशनची साडी बाजारात आली की ती आवर्जून खरेदी करायची, त्याला मेचिंग पर्स, सँडल,लिपस्टीक,नेलपेंट सगळंच.
असते एकेकची आवड. मीही यामिचं हे नटणंथटणं एंजॉय करत होतो.  तिच्या रसिकतेची दाद देत होतो.

ठराविक वर्षानंतर आम्ही मुलासाठी प्रयत्न करु लागलो नं वर्षभरातच आमच्या घरी छोट्या पाहुणीचं आगमन झालं. या प्रोफेशनमधे असताना इतक्या नवजात बालकांना हातात घेतलं होतं पण तरीही स्वत:चं मुल पहाताना मला विलक्षण आनंद झाला होता. दाटलेल्या कंठाने मी यामिला थँक्स म्हणालो.

आमची बाळी, विभुती भरभर मोठी होत होती. ती व तिची मम्मा दोघी आजोळी गेल्या की मला इकडे चेन पडत नसे. वाटायचं, जाऊन घेऊन यावं दोघींना, सांगावं घर खायला उठतय.

मध्यंतरी यामिचे वडील आमच्याकडे येऊन राहू लागले होते. त्यांच्याशी बोलायला मला आवडायचं. विविध विषयांचं सखोल ज्ञान होतं त्यांना. वयाची सत्तरी ओलांडली तरी सतत वाचन करुन त्यांनी स्वत:चं ज्ञान अद्ययावत ठेवलं ह़ोतं. लेकीलाही ते नको त्या गोष्टींवर पैसे खर्च केले की ओरडायचे. घरात मोठं माणूस असणं म्हणजे आधारवडाची छाया लाभणं. मला त्यांचं असणं आवडत होतं. कदाचित त्यांच्यात मी माझ्या काही वर्षांपुर्वी निवर्तलेल्या वडिलांना शोधत होतो.

सगळं काही सुरळीच चालू असताना काहीतरी बिनसत होतं. आजकाल यामि मला भेदरल्यासारखी वाटू लागली होती. तिचा नेहमीचा खेळकरपणा लुप्त झाला होता. चेहऱ्यावरचे मिश्कील भाव जणू वारा घेऊन गेला होता.

“काही होतय का तुला,यामि?” मी आपुलकीने विचारलं.

“न नाही तर.”

“मग कसल्या तरी चिंतेत दिसतेस नेहमी. वाटल्यास आपण काही दिवस थंड हवेच्या ठिकाणी जाऊ. फ्रेश होशील तू.”

ती यावर कसनुसं हसली.

युनियन बँकेतआमचं जॉइंट अकाऊंट होतं. यामि सगळा बाजारहाट,शॉपिंग करण्यासाठी बँकेतून पैसे काढायची. तिचा नीटनेटका हिशेब मला ठाऊक होता त्याकारणाने मीही तिला कधी एवढे पैसे का काढलेस तेवढेच काढायला हवे होतेस असं बोलंलो नाही.

यामिवर माझा पुर्ण विश्वास होता. मी माझ्या आयुष्यातली यामि येण्यापुर्वीची प्रत्येक घटना तिच्यासोबत शेअर केली होती. माझं भित्रेपण, उंचीला घाबरणं,पोहायची भिती वाटणं, कोणाचातरी मानसिक आधार हवासा वाटणं, एवढ्यापासनं ते लहानपणी मांजराला पोत्यात घालून दूर न्हेऊन टाकून येणं, फुलपाखरु,काजवे पकडून सच्छिद्र बाटलीत भरुन त्यांना बघत रहाणं,

अभ्यासासाठी खाल्लेला मार, नोकरी मिळवण्यासाठी काढलेल्या खस्ता, कॉलेजमध्ये असताना मुलींकडे पहाताना ह्रदयात भिरभिरणारी फुलपाखरं..अगदी सगळं शेअर केलं होतं. In fact I was an open book for Yami. मला यामिनेही तिच्या लहानपणीच्या   गमतीजमती सांगितल्या होत्या.

मी तिला माझ्यापुर्वी कुणी आवडलं होतं का असंही विचारलं होतं  ज्यावर ती मंद हसली होती. मी नंतर ती गोष्ट विसरुनही गेलो होतो.

हल्ली ओपीडी संपवता संपवता दोन अडीच वाचायचे.  कधी इमरजन्सी असली की दुपारी लंचसाठी घरी जाता येत नसायचं.अशीच एक हेक्टीक दुपार. मी डब्याचं झाकण उघडलं. आत पोळ्या नि माझ्या आवडीचं भरलं वांग होतं. यामिला मनोमन थँक्स म्हणत मी डबा खाऊ लागलो. डबा संपतासंपता मोबाइलस्क्रीनवर मेसेज झळकला. One lakh rupees  debited from your account. मला कळेना..एवढे पैसे ..का..कशासाठी.

रात्री मी यामिला पैशांविषयी विचारलं. तिने मला सांगितलं की तिच्या वडिलांना जमिनीबाबत एक व्यवहार करायचा आहे, त्यासाठी पैसे दिले. तिचे वडील त्यावेळी त्यांच्या गावी होते. मला यामिचं बोलणं खरं वाटलं. मी म्हणालो,”अजून गरज लागली तर देऊ आपण. पैशाची चिंता करु नका सांग त्यांना.” यामि माझ्या खांद्यावर रेलली. माझ्या खांद्याचा, माझ्या बोलण्याचा तिला आधार वाटावा हे मला आवडत होतं कारण मी यामिवर प्रेम करत होतो. सर्वार्थाने तिला अर्धांगिनी मानत होतो.

त्यादिवशी यामिच्या वडलांचा माझ्या क्लिनिकमधे फोन आला. मला सांगत होते,”हायवेलगतची  जमीन विकत घ्यायची इच्छा आहे. जागा मोक्याची आहे. थोडी मदत केलात तर बरं होईल. मी दिवाळीपर्यंत तुमचे पैसे पोचते करेन.”

“मधे दोनदा तर तुम्हाला पैसे दिले यामिने,”ओठावर आलेले शब्द मी महत्प्रयासाने गळ्यात ढकलले.

घरी आलो तर छोटी रडत बसली होती. तिने शू केली होती, त्या तळ्यात ती भिजली होती. मी छोटीला उचलून घेतली. तिची चड्डी बदलली नि यामिला साद घालू लागलो तर फोनची रिंग वाजू लागली..मी फोन घेतला,”पलिकडचा आवाज छद्मी हसत होता. यामि डार्लिंग मला फक्त दीड लाख हवेत यावेळी..उद्या दुपारी तयार ठेव. मी येईन घ्यायला. कुणाला सांगितलस तर तुझेमाझे फोटो, आपली प्रेमपत्रं..तशी शहाणी आहेस तू..उद्या येतोय मी.”

माझ्यामागे यामि उभी होती. ती थरथर कापत होती. मी काही बोलणार इतक्यात ती अक्षरश: एखादं घर जमीनदोस्त होतं तशी खाली कोसळली. मला कळेना काय करायचं ते. मी मित्राला फोन लावून बोलावलं. यामिला एडमिट केलं. यामिचे वडील दुसऱ्या दिवशी पहाटेच आले. मी त्यांच्याकडे या फोनविषयी चौकशी केली. शेवटी त्यांनी तोंड उघडलं, यामिचे व त्या इसमाचे प्रेमसंबंध होते, ते कितपत होते त्यांना ठाऊक नव्हतं म्हणे.

दुपारी पोलिसांनी सापळा रचून त्या इसमाला पकडलं. मी यामिला घरी आणलं. यामि माझी क्षमा मागत होती.
मी पुरुष होतो. नववधु यामिचे torned hymen व तिचे लग्नापुर्वीचे प्रेमसंबंध..शारीरिक मर्यादा ओलांडलेले तर नसतील? संशय घ्यायला बरीच जागा होती. संशयाने हाती काय येणार होतं! यामिवरचा अविश्वास..यामिने लग्नानंतर कधीच गैरवर्तन केलं नव्हतं. तिचा भूतकाळ खोदून काढून आम्हा तिघांचाही वर्तमान, भविष्य जमीनदोस्त करायचं का यामिला पुन्हा उभं करायचं सर्वस्वी माझ्याच हातात होतं.

समाप्त

==============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *