Skip to content Skip to sidebar Skip to footer

तो सध्या काय करतो?

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

आज तब्बल वीस वर्षांनी मी त्या बिल्डींगमध्ये परत प्रवेश केला. आजुबाजूच्या परिसरात बरीच सुधारणा झाली होती. दुसऱ्या मजल्यावरच्या एकशेचार नंबरच्या फ्लेटजवळ आले न् पावलं तिथेच थबकली.

दरवाज्यावरच्या पाटीवर श्री. आनंद वि. साठे व त्याखाली सौ. विनया आ. साठे ही अक्षरं कोरली होती. मला पुर्वीची पाटी आठवली श्री. आनंद वि. साठे व सौ.आनंदी वि. साठे. हो मीच ती आनंदी साठे. झर्रकन भुतकाळ माझ्या डोळ्यासमोरून सरकू लागला.
मी लहानपणापासून लाडाकोडात वाढलेली मुलगी होते. वयात आले तशी एकेक स्थळं येऊ लागली. मी काहीतरी खोट काढून स्थळं नाकारत होते. माझं वय वाढत होतं.

तिशीत आले तेंव्हा आजुबाजूच्या मैत्रिणींची मुलं शाळेत जाऊ लागली होती. मला लग्नाची चिंता प्रकर्षाने जाणवू लागली. मी नापसंत केलेल्या मुलाशी माझ्याच मावस बहिणीने लग्न केले होते. त्यांचा चिमणचिमणीचा हसताखेळता संसार पाहून माझ्या मनात असुया येत होती. शेवटी हे आनंद साठेंच स्थळ आलं.

आनंदची तिशी पार झाली होती. वडिलांची नोकरी गेल्याने कुटुंबाचा डोलारा आनंदला सांभाळावा लागला होता. त्यात त्याचं लग्न राहून गेलं होतं. आनंदला एक बहीण होती. ती शिकत होती. मी लग्नाला संमती दिली. लग्न यथासांग पार पडले. उंबरठ्यावरलं मापटं ओलांडून मी आनंदच्या घरात प्रवेश केला.

आमच्या घरी नाश्त्याला ब्रेडबटर तर आनंदच्या घरी चहाचपाती. मला सकाळी उठल्याउठल्या बेडटी लागे. आनंदच्या आईला मी तसं सांगितलं. तिने सांगितलं,’हो मिळेल की. तुझंच घर आहे. उठ लवकर . चहा ठेव नी पी बेडवर बसून हवा तेवढा. मी पीठ मळून ठेवते. तू चपात्या करत जा.’

मला चपात्या वगैरे करता येत नव्हत्या असं नाही पण मुळात स्वैंपाक करण्याची मला मुळीच आवड नव्हती. पण न करुन सांगते कोणाला. करु लागले. आनंदची बहीण प्राची घरातला केरवारा काढायची,धुणं धुवायची.

ती आत्ता तेवीसीची झाली होती. तिच्यासाठी वरसंशोधन चालू होतं. यातच सासऱ्यांना अर्धांगवायूचा झटका आला. ते अंथरुणाला खिळले. त्यांच सगळं जागेवर होत होतं. मला किळस वाटू लागली. त्या घरात राहू नयेसं वाटू लागलं.

आनंदकडे शिल्लक काहीच नव्हती. उलटं कर्जच होतं त्याच्या डोक्यावर. मनात विचार केला..आपण नोकरी केली तर बराच वेळ या घरापासून, इथल्या रोगट वातावरणापासून दूर राहू. नशीबाने मला बँकेत नोकरी मिळाली.

सकाळी उठून आमच्या दोघांचा डबा करुन मी बाहेर पडायचे. संध्याकाळी येताना सकाळसाठी पाव किलोच भाजी आणायचे,दोघांना पुरेल अशी.

सासुबाई एका शब्दानेही विचारत नव्हती की तू आमच्या चपात्या का नाही करत किंवा थोडी जास्त भाजी करत जा असं. तिथे मुळी कोणाला कोणाशी भांडायचच नव्हतं.

मी ओट्यावर सगळा पसारा टाकून जायचे. सासुबाई तो आवरायच्या. सासऱ्यांचं सगळं करायच्या. त्यांना न्हाऊमाखू घालणं,जेवण भरवणं..सगळचं. माझी नणंद त्यांना मदत करायची. माझे व आनंदचे कपडेही तीच धुवायची. पण मला त्याबद्दल क्रुतज्ञता वगैरे वाटत नव्हती. मी आनंदला सांगितलही की आपण वेगळं घर घेऊया पण आनंदने ऐकलं न ऐकल्यासारखं केलं. टाळी दोन्ही हातांनी वाजते. इथे मी भांडणासाठी अनंत कारणं काढायचे पण मला प्रतिसादच मिळत नव्हता.

बँकेच्या कर्मचाऱ्यांचे नाटक होते. त्यात मी सहभागी झाले. माझा अभिनय उजवा होता. तालमीसाठी मला संध्याकाळी ऑफीसनंतर थांबावे लगे. मी फार उशिरा घरी जाई. कोणीही रागावत नसे मला. उलट सासुबाई नाटक कोठवर आलंय असं आस्थेने विचारीत.

एका प्रसिद्ध निर्मात्याला माझा अभिनय आवडला. त्याने त्याच्या पुढच्या नाटकात मला संधी दिली. मी घरी सांगताच, सर्वांनी माझं कौतुक केलं.

हळूहळू एकाहून एक सरस नाटकं मला मिळत गेली. माझा अभिनय फुलत गेला. दौऱ्यासाठी आठ दहा दिवस बाहेर राहू लागले. यात शार्दुलशी,माझ्या सहकलाकाराशी माझी ओळख झाली. हा शार्दुल माझ्यापेक्षा पाच वर्षाने लहान होता. आमची जवळीक वाढू लागली.

शार्दुल अविवाहीत होता. एकदा मला त्याने लग्नाची मागणी घातली. शार्दुलची संपत्ती भरपूर होती. दादरला स्वतःचा फ्लेट,दोन चार चाकी गाड्या,फार्म हाऊस. आईवडील बाहेरगावी रहात होते,एकुलता एक..सगळं कसं मला हवं तसं होतं.

इकडे आनंदला मुल हवं होतं. मी त्याला प्रतिसाद देत नव्हते. टाळत होते. मला शार्दुलशी नातं जोडायचं होतं. एके दिवशी मी माझ्या मनातलं सगळं आनंदसमोर मांडलं. आनंदची आई तिथेच थिजली. आनंदही पहिला रागावला. नंतर स्वतःवर ताबा ठेवून त्याने मला जाण्याची परवानगी दिली. मी बेगेत सगळे कपडे भरले व शार्दुलकडे जाण्यास निघाले.

शार्दुलचं घर आलिशान होतं. दिमतीला नोकरचाकर होते. आमच्या काही निवडक मित्रमैत्रिणींच्या सहवासात आमचे लग्न पार पडले. आम्ही दोघं टॉपची जोडी म्हणून गणलो जात होतो.

माझ्या एका द्रुष्टीक्षेपासाठी मुलं तरसत होती. मी अगदी सुखाच्या हिंदोळ्यावर होते पण माझ्या माहेरच्यांनी माझ्याशी संबंध तोडले होते कारण मी माझ्या पहिल्या नवऱ्याला सोडलं होतं. शार्दुल दिसायला हँडसम होता. अनेक मुली,तसंच माझ्या सहकलाकारा त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होत्या.

आमचं दोघांच रात्री पार्टीला जाणं,ड्रिंक्स घेणं चालू होतं. मी मला हवे तसले आधुनिक,महागडे ड्रेसेस घालत होते. जवळजवळ पंधरा वर्षांचा काळ अगदी स्वप्नासारखा गेला. शार्दुलच्या इतर मैत्रिणीही होत्या. त्यांच्याशी माझं देणंघणं नव्हतं. मी त्याला व त्याने मला पुरेशी मोकळीक दिली होती. आम्हा दोघांचीही मुलाची जवाबदारी घ्यायची इच्छा नव्हती.

शार्दुलचं डोकं फार दुखत असे. आम्ही साऱ्या टेस्ट केल्या. टेस्टमध्ये शार्दुलला मेदूचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. तो दिवसेंदिवस खंगत चालला होता. अखेर काही वर्षांत तो मला सोडून गेला.

सहकलाकारांनी सहानुभूती दर्शवली. पुढे पुढे मला भूमिका मिळणेही कठीण होऊ लागले. कर्जाचा डोंगर वाढू लागला. माझ्यासोबत पार्टी,मजामस्ती करणारे मला पार्टीजना बोलविनासे झाले. घर विकावं लागलं. एका इमारतीत रिसेलवर एक फ्लेट घेतला. त्यात राहू लागले. मला आताशा मोठ्या बहिणीची,आईची,मावशीची भूमिका मिळू लागली.

काल या शहरात आले. या शहराशी असलेले पुर्वीचे ऋणानुबंध आठवले. गतकाळाच्या आठवणी डोळ्यांसमोरुन सरकत होत्या. शेवटी मनाचा हिय्या टरुन ‘तो सध्या काय करतो’ पहायचं ठरवलं व या दारापर्यंत पोहोचले.

दारावरच्या पाटीवरून आनंदने दुसरं लग्न केलं हे नक्की. का कोण जाणे मला थोडासा राग आला त्याचा पण त्याला रागावण्याचा मला काय हक्क होता? मीच तर त्याला सोडून गेले होते. मला ऐश्वर्य ,धन,संपत्ती हवी होती. सासुसासरे,मुलं हे सारं लचांड नको होतं मला. मला श्रीमंतीची नशा चढली होती ती उतरायला बरीच वर्षे जावी लगली.

माझ्याही नकळत मी दाराची बेल दाबली. एका गोऱ्यापान मध्यमवयाच्या स्त्रीने दार उघडलं. ‘कोण हवंय आपल्याला?’ असं दोनदा विचारलं तेंव्हा मी भानावर आले.

आनंदचं नाव सांगताच तिने मला आत यायला सांगितलं. मी पाहिलं,सासऱ्यांचा फोटो भिंतीला टांगलेला होता. त्यावर शुभ्र तगरांच्या फुलांचा हार होता. तिने मला बसायला सांगितलं. आनंद आंघोळीला गेलेत म्हणाली.

एका मुलाने मला पाणी आणून दिलं. पंधरा सोळा वर्षांचा होता. सेम आनंदची ड्युप्लीकेट वाटत होता. खाटीवर माझी सासू होती. तिही आत्ता जवळ आली होती. आनंदची दुसरी पत्नी तिला पेज भरवत होती. तिच्या तोंडातून बाहेर सांडणारी पेज ओल्या फडक्याने पुसत होती.

मी सासूजवळ गेले. तिने मला ओळखलं. माझ्या चेहऱ्यावरुन हात फिरवला. ‘कशी आहेस’ म्हणून विचारपूस केली. तेवढ्यात आनंद बाथरुममधून बाहेर आला. आनंद अंगाने भरला होता. पत्नीसुख त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

मी लाथाडून गेलेले सुख मी डोळे भरुन पहात होते. माझे डोळे कधी पाणावले व भरुन वाहू लागले ते मला कळेना. आनंदच्या पत्नीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. आनंद आत जाऊन पांढराशुभ्र सदरा पायजमा घालून आला. त्याने मला पाहिलं. माझी विचारपूस केली. त्याच्या पत्नीशी माझी ओळख करुन दिली. आनंदचा मुलगा क्लासला गेला. विनयाने मला लेमन टी आणून दिला.

मी प्रश्नार्थक नजरेने आनंदकडे पाहिलं. तो म्हणाला,”तुझ्याबद्दल,तुझ्या आवडीनिवडीबद्दल सर्व माहिती आहे विनयाला. विनया माझ्या आत्तेभावाची पत्नी. ऐन मांडवात माझ्या आत्तेभावाला झटका आला. त्यात तो गेला. मी विनयाच्या वडलांना माझा भूतकाळ सांगितला व विनयाचा हात मागितला. विनयाच्या संमतीनेच मी तिच्याशी विवाहबद्ध झालो. माझ्या पगारात भागतं तिचं. आल्यागेल्यांचं बघते. घरी ट्युशन्स घेते. एक वर्ष झालं, आई जाग्यावर आहे. विनया तिचं सगळं मायेने करते. तुझं बरं चाललंय ना?’

मी माझी सगळी हकीगत आनंदजवळ कथन केली. डोळ्यांतल पाणी आटत नव्हतं. पश्चात्तापाचे अश्रु होते ते.
‘तो सध्या काय करतो’ मला जाणून घ्यायचं होतं. मला ते कळलं होतं. तो सुखात होता. त्याच्या पत्नीने मला थोपटलं. मला म्हणाली,”तुम्हाला कधी काही गरज लागली तर सांगा आम्ही तुमचेच आहोत.”

का कोण जाणे मला तिथे जास्त वेळ बसणं जमेना. त्या उभयतांचा निरोप घेऊन,सासुबाईंच्या पाया पडून मी निघाले. परत कधी माझी छाया मी आनंदच्या आनंदी संसारावर पडू देणार नव्हते.

—-समाप्त

==================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.