Skip to content Skip to sidebar Skip to footer

तिची गाऱ्हाणी…पण ऐकणार कोण…?

वल्लभ खूप लाडाकोडात वाढलेला मुलगा…वसुधा ताईंनी मुद्दाम तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलाला जपलं कारण उतारवयात आपली हेळसांड होऊ नये म्हणून….असो…वल्लभ लाडका एवढा की कामासाठीचा ऑफिसमधून फोन आला आणि वल्लभ नाश्ता करत आहे आता हे दृश्य वसुधा ताई पाहतायत…आपला मुलगा नाश्ता सोडून फोन अटेंड करतोय…हि गोष्टही आईच्या जिव्हारी लागतेय म्हणून वल्लभला चक्क नाश्ता भरवत वसुधाताई तिथेच उभ्या आहेत आता हे दृश्य वल्लभची बायको असणारी नेहा कशी काय पाहू शकेल नक्कीच वाटणार ना…आपला नवरा अजूनही कुकुल्या बाळासारखा आहे…आता हि गोष्ट प्रत्यक्ष नवऱ्याला कशी काय निदर्शनास आणून देणार कारण आपण सांगितलं तर पटणार थोडीच…मनातील अढी तर निघालीच पाहिजे ना…नवऱ्याला चुका दाखवून देणं म्हणजे नवरोबांचा पुरुषी अहंकार आडवा येतो…बरोबर ना…मग आपली मतं कुणापाशी मोकळी करणार….? नक्कीच आपल्या एखाद्या चांगल्या मैत्रिणीशी बोलून आपलं मन मोकळं करणार…किंवा मग आपल्या आईशी बोलणार…बरं गाऱ्हाणी केलीत तरी यांना खुपतं…कुचंबणा कुणाची होते तर …मधल्या मध्ये आम्हा बायकांचीच ना…म्हणून गाऱ्हाणी कुणापाशी करायची…समोरच्याच्या ज्या गोष्टींचा त्रास आपल्याला होतोय त्या चुका किंवा त्या गोष्टी दाखवून दिल्याच पाहिजेत…असंच एक दिवस वसुधाताईंनी घर आवरायला काढलं…नेहाचा कामाचा उरक खूप वेगाने असल्याने पटापट नेहा कामे आवरत होती तर वसुधाताई म्हणजे अशा कि सगळं व्यवस्थित असूनसुद्धा काहींना काहीतरी चूक काढणारंच…आपण काहीच चुकत नाही असा आवेश असणाऱ्या वसुधाताई….तर वसुधाताईंनी नेहाला बाथरूम घासून काढण्यास सांगितले…नेहा पटकन उरकून घ्यावं म्हणून बाथरूम अगदी स्वच्छ घासून धुवून काढलं…तरीही बाथरूम फिनाईल ने का नाही घासलं म्हणून वसुधाताईंनी परत बाथरूम घासून काढलं…तर हा सगळा प्रकार नेहाने पाहिला आणि पटकन वसुधाताईंना म्हणाली…

नेहा – आई…अहो मी घासून काढलं होत कि बाथरूम तरीही परत का घासलत अशाने तुम्हाला त्रास होईल की…

वसुधाताई – अगं बाई….मी पाहिलं तू घासलेले बाथरूम…पण फिनाईल ने घासायला काय झालं होत तुला…बघ बरं सगळे डाग तसेच दिसतायत…माझा हात काम करत नाही म्हणून गं…नाहीतर मी खूप स्वच्छ ठेवत होते…

नेहा – राहू द्यात आई…स्वयंपाक करायला घेऊ का…?

वसुधाताई –   नको राहू देत…आता वल्लभ येईल…त्याच्यासाठी चहा पाणी कोण देणार…?

 काही मिनिटातच वल्लभ येतो…पत्नीधर्म म्हणून नेहा त्याला पाणी घेऊन जाते…पाण्याचा ग्लास रिकामा केल्यावर वल्लभ फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला…बाथरूम नेहमीपेक्षा जास्त चकाकत होतं म्हणून कौतुकाने नेहाला विचारलं…

वल्लभ – नेहा…काय गं नेहा…केवढं स्वच्छ बाथरूम आहे आज….तू स्वच्छ केलंस…[ नेहाने प्रामाणिकपणे खरं सांगितलं ]

नेहा – मी नाही…म्हणजे मीही आधी केलं होतं पण आईंना आवडलं नाही…म्हणून त्यांनीच परत स्वच्छ केलं…

वल्लभ – काय…तुला काय झालं होतं स्वच्छ करायला…तुझे हात काय झडले होते की काय…? कुठलंही काम असो व्यवस्थितच केलं गेलं पाहिजे…हे तुला समजायला पाहिजे की नको…

आपल्या नवऱ्याच्या अशा सुरावर नेहा रडवेली झाली आणि रडणं आवरत म्हणाली…

नेहा – मी पुढच्या वेळेपासून सगळं व्यवस्थित आवरून ठेवत जाईल…

 नेहाला पुढे बोलणं शक्यच होतं नव्हतं कारण लग्नाला फक्त तीनच महिने झाले आणि आपल्या नवऱ्याकडून बोलण्याची अशी पद्धत नेहाला अपेक्षित नव्हती म्हणून नेहा मनामधून खूप दुखावली होती म्हणून रात्रभर रडत होती…रडून रडून डोळे सुजून गेले होते म्हणून नेहाने दुसऱ्याच दिवशी आपली सगळी कामे आटोपून बसली होती इतक्यात नेहाच्या आईचा फोन आला नेहाची आई म्हजेच सीमा ताई खूप मनमोकळ्या स्वभावाच्या सीमा ताई म्हणाल्या…

सीमाताई – नेहा…अगं येतोस का आज माझ्याबरोबर तुझ्या मावशीची तबियत बिघडलीय…आम्ही तिथूनच क्रॉस होतोय…येत असलीस तर बघ…म्हणजे तुला जमलं तर म्हणतेय मी…

आपली आई येतेय म्हणून नेहाला खूप आनंद झाला होता कसाही करून नेहाला मावशीला भेटण्यासाठी जायचंच होतं…म्हणून नेहा म्हणाली….

नेहा – आई…येतेय मी…पण आईंना विचारून पाहते…सगळ्यात आधी यांना कॉल करून परमिशन काढते…

सीमाताई – पण नेहा बाळा मी काही घरात येऊ शकत नाही तुला जेव्हा परत तुझ्या घरी सोडेन ना तेव्हा घरी येते तसं वसुधाताईंना कळव…

नेहा – हो आई… [ नेहा लगेच वल्लभला कॉल करते आणि आईबरोबर जायचंय असं सांगते ]

वल्लभ – नेहा…तुला अक्कल कशी नाहीय…काय गरज आहे आत्ता जायची…मावशीचा पत्ता घे आपण सगळे जण जाऊयात….

नेहा – माझ्या आईबरोबर मला जायचंय यात काय अडचण आहे…

वल्लभ – तुला एकदा सांगितलेलं समजत नसेल ना तर तुझ्या मनाला येईल ते कर आणि परत गेलीस तर येऊ नकोस…

आपल्या नवऱ्याच्या अशा उत्तरावर नेहाने रागाने फोन ठेऊन दिला आणि वसुधा ताईंची परवानगी घेऊन आपल्या आईबरोबर नेहा निघाली…सीमाताईंनी सांगितल्याप्रमाणे नेहा बाहेरूनच आईसोबत निघून गेली…गाडीमध्येच नेहा रडू लागली आणि रडून रडून आपलं मन आपल्या आईबरोबर मोकळं केलं…

नेहा – आई….मला जर तुझ्याबरोबर यायचं असेल तर या लोकांचं काय जातंय गं…तुझ्या बरोबर मला येऊ द्यायचं नाहीय यांना…एवढं काय मोठं पाप केलंय मी…

सीमाताई – तू काळजी करू नकोस…मी बोलते जावई बापूंशी…

नेहा – आई नको परत मी चुकीची ठरवतील ते लोकं…त्यापेक्षा मला असच्या असं घेऊन चल…

सीमाताई – एवढं…रागवायचं नाही…असं निघून कसं चालेन…आहे त्या परिस्थितीशी लढलं पाहिजे ना…बी…ब्रेव्ह…!

आपल्या आईच्या मानसिक दिलास्याने नेहा सावरली…आणि मावशीला भेटून झाल्यावर आपल्या घरी निघाली…वल्लभ ऑफिसामधून आलेलाच असल्याने दारात नेहाला पाहून त्याला प्रचंड राग आला…आणि म्हणाला-

वल्लभ – कशाला आलीस…माहेरी का नाही गेलीस….मनासारखं राहता आलं असत ना तुला…इथं आमची कसली मर्जी सांभाळणार आहेस तू…

वसुधाताई – वल्लभ जरा शांत हो तू….इथं वडीलधारी आम्ही आहोत ना…आम्ही बोलूत तिच्याशी…या सीमाताई…बसा…पहिल्यांदाच आलात ना…या…नेहा जा पाणी घेऊन ये आईसाठी….

वल्लभ – आई….अहो…असं बोलायला शिकवलं का तुम्ही नेहाला…

सीमाताई – जावईबापू….तुमचा राग मी समजू शकते…तुम्ही जर नेहमी चिडक्या स्वरात बोलला तर ती अशीच बोलणार ना…

वसुधाताई – चिडक्या स्वरात म्हणजे…केले आमचे गाऱ्हाणे…बाई गं बाई…आम्ही नाही केले कधी असे गाऱ्हाणे…

सीमाताई – ताई…यात गाऱ्हाणे कसले…तिने तिचे प्रॉब्लेम्स मला सांगणं म्हणजे  गाऱ्हाणे नव्हे…तुमच्याशी ती तितकी मनमोकळ्या प्रमाणे बोलू शकत नाहीय…कारण तुम्ही सगळे जण तिच्यावर तोंडसुख घेताय…मग कशी करेल ती तुमच्याबरोबर आपलं मन मोकळं….आणि मला सांगा विहीणबाई….गाऱ्हाणे कुणासमोर मांडतात…तर देवासमोर गाऱ्हाणे घालायचोत आपण….का बरं तर भरभराट व्हावी म्हणून हो ना…नेहा सांग बरं तुझा संसार सुखात व्हावा असं वाटत ना तुला…?

नेहा – हो आई…देवासमोर गाऱ्हाणे मांडतात हि गोष्ट तितकी खरीय पण माझ्यासाठी तूच देव आहेस गं…मग एक देव समजून मी माझं मन तुझ्यासमोर मोकळं केलं तर यात काय चुकलं माझं…मला अशा चिडक्या आवाजात बोललेलं नाही आवडत…

सीमाताई – नाही बोलणार आता ते असं चिडून…

नेहा – आई…जस मी तुला देव समजून तुझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करू शकते तसं यांनाही देव मानायला तयार आहे मी पण देव ऐकून तरी घेतो…हे ऐकून घेत नाही…

सीमाताई – नेहा…वेळ दे त्यांना थोडासा बदलायला वेळ द्यावा लागतोच…बरं वसुधाताई निघते मी…

वसुधाताई – या परत मग तुमच्या मुलीचे गाऱ्हाणे घेऊन…[ मस्करी करत म्हणतात ]

सीमाताई – नमस्कार करते….नाही हो…त्यापेक्षा तुम्हीच या कधीतरी…

असं म्हणून सीमाताई आपल्या लेकीच्या घरून निघतात…आणि जाताना आपल्या लेकीचा निरोप घेऊन जातात….वसुधाताई आणि वल्लभ त्यादिवशीपासून नेहाशी अगदी हसून खेळून वागू लागतात. खरं म्हणजे नवऱ्याच्या दोषांवर टीका करणं अतिशय कठीण काम…कोणत्याच व्यक्तीला स्वतःवर केलेली टीका सहन होतं नाही…जगात असे फार कमी लोकं असतात जे स्वतःवर केलेली टीका फार मोकळ्या मनाने स्वीकारून त्यानुसार आपल्या वागण्यामध्ये बदल करतात…परंतु पुरुष तो खासकरून नवऱ्याच्या स्वरूपात असेल तर,स्वतःला इतरांपेक्षा बुद्धिमान समजतो त्यामुळे कुणी केलेली टीका त्याला सहन होतं नाही…जर टीका करणारी व्यक्ती आई…बहीण किंवा प्रेयसी असेल तर तो पुरुष ती टीका ऐकून घेतो आणि त्यानुसार बदल करण्याचा प्रयत्न करतो…पण हीच टीका त्याच्या पत्नीने केल्यास बरीच नवरे मंडळी चिडताना दिसतात स्वतःची चूक काबुल करण्याऐवजी बायकोच्या चुका दाखवताना दिसतात…यासाठी दोन पण महत्वाचे मुद्दे आपल्या आचरणात आणावे…

बोलण्याची पद्धत – खरं म्हणजे गोष्ट साधीच असते परंतु चुकलेली गोष्ट जर प्रेमाने सांगितली तर पत्नीला सहज पटू शकते…ती आपली चूक सहजपणे कबूल करते हीच गोष्ट जर तुम्ही तिचा अपमान करून किंवा टोमणे मारून सांगतात तेव्हा वातावरण सुधारण्याऐवजी बिघडण्याची शक्यता जास्त असते.

आत्मपरीक्षण करा – टीका हि कधी कधीच चांगली वाटते…कुणावर टीका करण्याऐवजी एकदा तरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा आता नेहाचं उदाहरण पाहिलं तर यात आपल्या नवरोबांचे गुणदोष त्यांना सांगायचे आहेत पण समोरचा आपल्या चुका मान्य करतच नाहीय…कधी कधी तर आपल्या चुका मान्य करण्यात आपली भलाई असते…टीका करताना आपण सौम्य भाषा वापरतोय की नाही याची दाखल घ्यावी.      

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.