ती आई होती म्हणुनी

©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
“यांना आधी न्हेऊन सोडा कुठेतरी. माझ्याच्याने होत नाही यांचं,” सरिता मोठमोठ्या आवाजात नवऱ्याशी भांडत होती.
हॉलमधे दिवाणावर पहुडलेल्या जीजीला तिचं कर्कश्य बोलणं ऐकू येत होतं नि गरम टिपं तिच्या डोळ्यातनं ओघळत होती.
जीजीने भिंतीवरल्या तिच्या यजमानांच्या फोटोकडे पाहिलं..स्थितप्रज्ञ मुद्रा..जीजी म्हणाली,”स्थितप्रज्ञ असायला काय झालं, फोटोत गेल्यावर मीही होईनच स्थितप्रज्ञ, तेंव्हा कुठे पोट भरावं लागणारै..”
तसं जीजीचं काही कमी नव्हतं. छान सुखवस्तू कुटुंब..एक मुलगी नं एक मुलगा,यजमान विश्वासराव.
साठवगाठव करुन चिमणाचिमणीचं घरकुल उभं राहिलं होतं..एक वनरुमकिचनचं घर घेतलं होतं..छान सजवलं होतं ते जीजीने, दाराला लोकरीची तोरणं, भिंतीला लाकडाची शोकेस, त्यात मण्यांचे मोर,ससे,हत्ती,खुर्च्या,..प्लास्टीक रोपचे फ्लॉवर वास त्यातली ती रंगीत फुलं..जोडीला मुलांनी मिळवलेली छोटीमोठी पदकं..
दोन्ही मुलं..संजना व सागर या वनरुमकिचनमधे लहानाचे मोठे झाले होते.. सगळं बरं चाललं होतं..विश्वासराव वयोमानापरत्वे सेवानिवृत्त झाले. संजनाचं लग्न करुन दिलं. ती गेली दिल्लीला रहायला. सागरही इंजिनिअर झाला. त्याच्या पसंतीस पडलेल्या मुलीशीच विश्वासरावांनी त्याचं लग्न करुन दिलं.
सागरला ब्लॉक घ्यायचा होता तो वडलांशी बोलला..”भलेमोठे कर्जाचे हफ्ते भरत बसण्यापेक्षा वनरुमकिचनचं आपलं घर विकू..संजनालाही तिचा वाटा देऊ. उरलेले पैसे बिल्डरला दिले की लोन कमी घ्यावं लागेल, पर्यायाने हफ्ता कमी बसेल. तुम्ही दोघं एकटी इथे रहाण्यापेक्षा आपण एकत्र राहू.”
विश्वासरावांना सागरचं म्हणणं पटलं पण जीजीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली..तिने नन्नाचा पाढा लावला..घरात संध्याकाळी रोज परवच्यासारखा तोच विषय घोळला जाऊ लागला..जुनं घर विकायचं.जुनं घर विकायचं..जीजीचा ठाम विरोध होता पण विश्वासराव व सागरपुढे तिचं काहीएक चाललं नाही. ते घर विकलं तेव्हा जीजीच्या डोळ्याला अविरत धार लागलेली..सुनबाई विजयी मुद्रेने नवीन घरात वावरत होती.
जीजी मात्र कोपऱ्यात एखादं जुनं फर्निचर ठेवतात तशी त्या घरात जमा झाली. विश्वासरावांची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. त्यांच्या औषधपाण्याचा खर्च आता वाढला होता. तुटपुंज्या पेंशनमधनं तो भागत नव्हता.
सुनबाईला सगळं चकचकीत लागायचं. म्हाताऱ्या जीवांकडून नाही म्हंटलं तरी हेळसांड व्हायची. कधी हातातनं कप निसटायचा..त्याचं नाक फुटायचं..मग सुनबाई त्या क्रोकरीची किंमत सांगायची. विश्वासरावांना अपराध्यासारखं व्हायचं.
नात तशी बरी होती पण हल्ली मोठी होत होती तशी आईच्या पावलावर पाऊल ठेवून आजीआजोबांना अडगळ मानू लागली होती. एकदा तिने मैत्रिणींना बोलावलं होतं. विश्वासराव बंडी व पायजम्यावर पेपर वाचत बसले होते. नातीला त्यांचं तसं बसणं रुचलं नाही.
“आजोबा..प्लीज आत जा.”
“अगं पण का?” जीजीने विचारलं.
“अगं आज्जी,कपडे बघ नं त्यांचे. माझ्या फ्रेंड्स हसतील मला.” नात आजीच्या कानात म्हणाली. विश्वासरावांना ऐकू गेलं ते. ते बेडरुममधे गेले. कानकोंडे होऊन बसले.
“दुखलं ना!” जीजीने विचारलं.
“काय?”
“मन..मन दुखावलं नं तुमचं.”
विश्वासराव हातावर हात ठेऊन उगीचच समोरच्या निंबोणीवरच्या चिमणपक्षांचा खेळ पहात बसले. इवलंसं घरटं बांधलं होतं त्यात ते चिमणेजीव चोचींचा आ करुन बसले होते नं आईचिऊ,बाबाचिऊ कुठूनकुठून दाणा,किडा आणून त्यांच्या मुखी घालत होती..स्वतःच्या पोटाआधी आपल्या पिलांचं पोट भरायचं एवढंच काय ते कळत होतं त्या चिमणपाखरांना.
जीजीही बसली त्यांच्या शेजारी..म्हणाली,”पाहिलत नं कसे दाणे भरवताहेत जोडीने..पण कायमचे धरुन नाही ठेवणार पिलांना..मुक्या जीवांनाही किती कळतं..पुस्तकी ज्ञान न शिकता. पिलांच्या पंखात ताकद आली की ठेवत नाहीत ती पिलांना स्वत:सोबत..घेऊ देतात भरारी..पडत अडखळत पिलं मग भरारी घेतात..टेकू देत नाहीत चिमणाचिमणी पिलांना मग आपणच का बरं आपलं घरटंच देऊन बसलो नं पोरके झालो या उतारवयात. का नाही ऐकलत तेंव्हा माझं. बायकांची अक्कल गुडघ्यात..असंच म्हणायचा ना.”
“चुकलो गं साफ चुकलो..इतके दिवस इमानेइतबारे नोकरी केली पण हे पुढचं गणित नीट जमलं नाही मला. मुलावर आंधळा विश्वास ठेवला..घर विकू दिलंच शिवाय पीएफच पैसेही..”
“हे नव्हतं मला सांगितलत.”
“तुझी अक्कल गुडघ्यात समजत होतो नं माझी अक्कल गहाण ठेवून बसलो होतो. आता डॉक्टरांनी एपेंडिक्सचं ऑपरेशन वेळेत करा म्हणून सांगितलय. लेकाकडे विषय काढला तर हात वर करुन मोकळा झाला.”
“संजनाला सांगुया का? तिलाही दिलात नं तिचा वाटा.”
“हो गं, बोललो तिच्याशी पण तो विषय सोडून बोलत होती.”
“द्या बघू मला फोन लावून. मी बोलते तिच्याशी. आम्ही दिलेलेच दे म्हणते..झालेच तर व्याजाने.”
विश्वासरावांनी फोन लावून दिला.
“हं. संजना..मी आई बोलतेय.”
“बोल नं आई..बरे अहात नं दोघे. तब्येतीला सांभाळा,बरं का. मी येणारच होती मधे पण हलायलाच मिळत नाही इथून..यांचं वेळीअवेळी येणं ठाऊकच आहे नं तुला.”
“बाकी चिमणी काय म्हणतेय आमची.”
“मजेत गं. तिचेही प्रिलियम्स चालुहेत. इतका अभ्यास असतो नं..रात्ररात्र जागावं लागतं..तिच्यासोबत.”
“तुझंही तसंच होतं हो. तुझा परीक्षेचा अभ्यास म्हणजे रात्रभर ट्युबलाइट जाळत ठेवायचीस आणि स्ट्राँग कॉफी..तिही यांच्याच हातची हवी होती तुला. आठवतय का बाळा..”
“हो गं आई..अगदी लख्ख आठवतय..रात्री एकदिडलाही कॉफी बनवून द्यायचे बाबा.”
“संजू,अगं तुझ्या बाबांचं एपेंडिसचं का कसलं ऑपरेशन करायचं आहे..पैसे वाटून मोकळे झाले. आता सागरपुढे हात पसरले तर सध्या जमणार नाही म्हणतो. तू सोय केलीस तर..म्हणजे आम्ही दिलेल्यातलेच दे आम्हाला..तेही व्याजावर.”
“आई, असं गं काय म्हणतेस. मी हा विषय काढला यांच्याकडे पण पैसे सगळे दिर्घमुदतीवर इनव्हेस्ट केलेत..असे काढता येणार नाही म्हणे..आता त्यांच्याशी का हुज्जत घालू मी!”
“नको गं बाई..आम्ही बघतो दुसरा मार्ग..उगा आमच्यामुळे तुमच्यात बेबनाव नको.”
“अहो..अहो..ऐकलं का..”
“फोन स्पीकरवर होता..सगळं ऐकलय मी.”
“आता ओ काय करायचं? कोणाकडे मागायचे पैसे?”
“काढायचे असेच दिवस..तो बघेल काय ते.”
म्हणता म्हणता एकदा एपेंडिस फुटलं नि विश्वासराव गेले.. जीजी एकटी पडली..काही दिवस तिची धाकटी बहीण येऊन राहिली तिच्यासोबत. तिनेही घरातला रागरंग बघितला. “आक्का, अगं येतेस का आमच्याकडे रहायला? आम्ही दोघंच तर असतो..सुदैवाने का दुर्दैवाने कोण जाणे पण मुल नाही आम्हाला..नाही ते एका अर्थी बरंच असं वाटतय आता. निदान आमची पुंजी तरी आमच्याजवळ टिकून आहे. असेपर्यंत वापरता येईल..कोणाकडे याचना करावी लागणार नाही.”
तरीही जीजी म्हणाली,” नको हं आताच. लोक काय म्हणतील..निघाली फिरायला..त्यापरीस हा उन्हाळा जाऊदे. पावसात येते बघ तुझ्याकडे. तुला माझ्या हातची कांदाभजी आवडतात ना. करुन घालीन पोटभर.” धाकटी बहीण निघून गेली नं जीजी विश्वासरावांच्या वस्तूंत त्यांना आठवत दिवस कंठू लागली.
जीजी, एकदा लग्नाला म्हणून लेकासोबत गेली असता ट्रेनमधून उतरताना पडली. मांडीत नळी घालावी लागली. महिनाभर हॉस्पिटलमध्ये होती. धाकटी बहीण येऊन राहिली होती सोबत. नंतर डिस्चार्ज मिळाला तसं जीजीला घरी आणलं खरं पण जीजीच्या हातून पहिल्यासारखी झाडलोटही होईना तेंव्हा सूनबाई चिडली नं सागरला सांगू लागली..”यांची कुठेतरी व्यवस्था करा.”
जीजीने धाकटीला फोन करुन बोलावून घेतलं. धाकटीच्या गाडीत बसून जीजी गेली तिच्या घरी. धाकटीचं घर कोल्हापुरात..तिथली रांगडी भाषा,आदरातिथ्य..जीजी अगदी सुखावली. बहिणीबहिणी मिळून लहानपणीचे खेळ आठवू लागल्या.. काचापाणी,सागरगोटे खेळू लागल्या..आठवणींची पानं पलटली गेली..चिंचाबोरं..भांडणं..चिडवाचिडवी..किती नं काय काय..धाकटीचे यजमानही यांच्या चिवचिवाटाने खूष झाले.
संजनाचा फोन यायचा अधेमधे,”आई गं मावशीकडे बरं वाटतय नं तुला मग रहा तिथेच म्हणायची.”
सागर विसरलाच होता बहुतेक किंबहुना फोन केला आणि मला येऊन घेऊन जा म्हणाली तर पंचाईत म्हणून फोन करणं टाळत होता. सुनबाईला ती अडगळ घरात नकोच होती.
एकदा सकाळी जीजी नं धाकटी बहीण,तिचे यजमान चहापोह्यांचा आस्वाद घेत होते तोच फोन आला. सागर होता फोनवर.
धाकटीने जीजीकडे फोन दिला.
“हेलो सागर,बराएस ना राजा.”
“आई..आई..नोकरी गेली माझी. कंपनीने तडकाफडकी कामावरुन काढून टाकलं. काय करायचं कळत नाहीए बघ.”
“सागर,असा धीर सोडून कसं चालेल! मी येते. आपण काढू काहीतरी मार्ग.”
आणि जीजी तिचं बोचकं बांधून निघाली..परत लेकाचा संसार सावरायला. धाकटीने म्हंटलं,”अडगळ वाटते नं तू त्यांना, मग कशाला जातेस..त्यांचं ती बघतील.”
जीजी म्हणाली,”आई आहे नं मी!”
घरी परतल्यावर जीजी लेकाला म्हणाली,” नाश्त्याचे डबे देण्याचं काम सुरु करु आपण..तू काय ते एडव्हरटायजिंग कर”..नि ‘आईच्या हातचं’ नावाचं नाश्ता सेंटर सुरू झालं. कॉर्नरवर लोकांना दिसतील असे बोर्ड लावण्यात आले.
जीजी पहाटे उठून कांदापोहे,उपमा,शिरा,इडलीचटणी बनवू लागली. आदल्या दिवशीच ऑर्डर घेऊन ठेवल्याने पदार्थ मागणीनुसारच केले जात होते. सुनेलाही हुरुप आला. तीही अर्धअधिक काम करु लागली..जीजीशी गोड बोलू लागली. नातीच्या मैत्रिणीही नाश्त्याची ऑर्डर देऊ लागल्या.
जीजीने लेकाचा रखडलेला गाडा सुरळीत चालू करुन दिला..कामाला दोन गरजू महिला ठेवल्या नि परत धाकटीकडे निघाली. लेक,सून,नात नको जाऊ म्हणू लागले पण जीजी म्हणाली,”कधीही काही लागलं तर हाक मारा..आई आहे मी. माझी जबाबदारी विसरणार नाही. आता मात्र मला जाऊदेत.”
जीजी द्रुष्टीआड होईपर्यंत ती तिघं जीजीच्या विरत जाणाऱ्या ठिपक्याकडे बघत राहिली. आई होती नं ती..रागरुसवे थोडीच धरणार होती!
(समाप्त)
©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
====================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/