थोडा है थोडे की जरुरत है

बागेश्रीच्या सासूचा,विदयाताईंचा आज तीळपापड होत होता. तीनेक महिने झाले असतील त्यांच्या माधवाच्या लग्नाला. नाही म्हणजे माधवाने प्रेमविवाह वगैरे काही केला नव्हता. सदा पुस्तकात डोकं घालून बसणाऱ्या,चमचाभर तेल केसांत घालून सरळ रस्त्यासारखा भांग पाडणाऱ्या या तेलीमामाकडे कॉलेजमधली एखादी तितली फिरकलीच तर ती फक्त परीक्षेच्या आधी त्याच्याकडे तयार नोट्स मागायला. नाहीतर त्याचा व मुलींचा काहीच संबंध नव्हता. माधवला एक लहान भाऊ होता पराग नावाचा तो उच्चशिक्षणाकरिता बाहेरगावी होस्टेलमध्ये रहायचा. बहीण नव्हती..अगदी सख्खी चुलत,आत्तेबहिणही नव्हती.
परागला माधव व बागेश्रीच्या लग्नात परीक्षांमुळे यायला जमलं नव्हतं. हां तर आज का खटकलं होतं ते राहिलंच सांगायचं. विदयाताईंच्या मनातलं बरचसं आज पराग आला तेंव्हा खदखदून बाहेर येत होतं. बागेश्री तिच्या माहेरी गेली होती दोन दिवसांसाठी,माधव ऑफिसला तर विद्याताईंचे यजमान ज्येष्ठांच्या हास्यकट्ट्यावर गेले होते.
अचानक सुट्टी मिळाल्याने परागने सकाळीच येऊन आईला सरप्राईज दिलं होतं. गाडीत खूप गर्दी असल्याने परागची झोप झाली नव्हती. त्याचं अंग जाम चेपून निघालं होतं. थोडा शॉवर घेऊन पराग बेडरुममध्ये झोपायला जाणार तोवर त्याच्या डोक्यात आलं की आत्ता बेडरूममध्ये माधवदादासोबत तंगडीत तंगडी घालून झोपता येणार नाही..वहिनी आलेय नं.. त्याने त्याच्या डोक्याला हलकीशी एक टपली मारली व हॉलमध्ये चटई टाकून निजला ते थेट दुपारी दोन वाजता उठला.
पराग उठताच विद्याताईंनी त्याच्या केसांतून हात फिरवला व म्हणाल्या,”किती वाळलास रे बाळा!”
“कुक बदललाय गं आई मेसचा. पहिले रघूकाका आगत्याने वाढायचे. परीक्षेच्या काळात आम्ही रात्री जागत असलो की त्यांची शेगडी तीन वाजेपर्यंत तरी चालू असायची. चहा,कॉफी,सँडविच,..सगळं खाऊ घालायचे, घरातल्यासारखं मायेने. हा नवीन बन्सी भैया आलाय. तो करायचं म्हणून काम करतो. जेवणाला चवच नसते.”
“तुम्ही तक्रार करायची नं प्रिन्सिपलकडे.”
“अगं आई नवीन आहे नं तो. शिकेल हळूहळू. नवोदितांना संधी दिली पाहिजे नं.’
“बरं मी पाणी गरम करत ठेवलय चल आंघोळ करुन घे नी ही दाढी वाढवलैस बुवासारखी ती आधी काढ बघू.”
” आई,दाढी राहू देत गं. ट्रेंड आहे तो सध्याचा” असं म्हणत पराग आंघोळीला गेला.”
ओले केस टॉवेलने पुसत त्याने आईला दादावहिनी व वडिलांबाबत विचारले.
“अरे दादा ऑफिसला गेला. तुला उठवू पहात होता. मीच म्हंटल झोपूदे मग ऑफिसातून आलास की निवांत बोला. ह्यांना आज पार्टी आहे म्हणे देशपांडे भाऊंकडून. त्यांना नातू झाला नं त्याची पार्टी देणारेत म्हणे. तुझी वहिनी गेली तिच्या आयशीकडे.”
“आई,तुला तर आराम असेल नं आत्ता. बाळसं घेतलयस तू.”
“अरे पराग,कसला आराम म्हणतोस. फार एकटं एकटं वाटतं बघ अलिकडे.”
“का गं. वहिनी आहे ना जोडीला!”
“हो रे तुझी वहिनी सगळं काम करते. सगळं म्हणजे कसलं. लादी,भांडी आपल्या राधा मावशी करतात. कपडे वॉशिंग मशीनमध्ये मी टाकते नाहीतर तुझे बाबा टाकतात. भाजी वगैरे माधव आणून ठेवतो आठवड्याची. मग हिला काम उरतच कसलं सांग फक्त स्वैंपाकाच. इनमीनतीन माणसांचा स्वैंपाक पण तोही धड जमत नाही. भजी करायला घेतली की त्याच ओल्या बेसनाच्या हातांनी मीठाच्या डब्याला हात लावते,मसाल्याच्या डब्याला हात लावते. मला नाही आवडत असा अस्वच्छपणा. चहा करायला उठले तर माझ्या आधी उठून चहा करुन मोकळी पण किती कडक करते!
भाताचंही तसंच नुसता गिजगिजीत करुन ठेवते. बरं हिच्या भाज्यांच्या पद्धतीही निराळ्या. आपण तिखट घालतो तिथे हिरवी मिरची घालून ठेवते. आपण उपवासाला साबुदाणा खिचडीत कोथिंबीर घालत नाही नं तसं हिला मी सांगायला जायच्या आधीच ही कोथिंबीर शिंपडून मोकळी. चपात्याही इतक्या जाड करुन ठेवते. माधवाला काय सांगितलं तर म्हणतो तुमचं तुम्ही बघा. मला तुमच्यात घ्यायचं नाही. बरं ह्यांना काही सांगायला गेलं तर टांगायला उठतात.”
अगं आई मग वहिनीशीच डायरेक्ट बोलायचं न तू. बोलते नं.. पण जरा काय बोललं की गंगा यमुना वाहू लागतात डोळ्यातून. बरं नुसतं त्या जळल्या मोबाईलात काय ठेवलं असतं कोण जाणे. स्वैंपाक करतानाही कानात हेडफोन..बरं तो मोबाईल ठेवायला खिसा हवा म्हणून मग दिवसभर टिशर्ट नी थ्रीफोर्थमध्ये. मला सांग,नवी नवरी ही साडीत अवघड वाटत असेल ठीकय निदान ड्रेसतरी घालावा.”
“अगं तिला कम्फरटेबल वाटत असेल त्यात. तुलापण साडीत गरम व्हायचं म्हणून आजी गावाला गेली की गाऊन घालायचीस आठवतय नं. आजी येणार कळल्यावर पुन्हा साड्या बाहेर काढायचीस.”
“तेवढा आदर होता रे मला मोठ्यांचा. ह्या बागेश्रीला म्हंटलं मी या अशा चड्ड्या घालून नको फिरुस घरात तर म्हणते आई मला यात कम्फरटेबल वाटतं. माझ्या महिलामंडळातल्या मैत्रिणी आलेल्या त्यादिवशी हिला अशा वेशात पाहून आपापसात खुसखुसत होत्या.”
“अगं आई,लोकांच कसलं मनावर घेतेस एवढं. जशा काय त्यांच्या सुना डोक्यावर पदर घेऊन फिरतात.”
“ते जाऊदे,नाव बघ नं बागेश्री. माझ्या तर बाई बागचं येतं तोंडात. तरी याला सांगत होते नाव बदल बायकोचं तर म्हणे आमचं ठरलंय,आहे तेच ठेवायचं.”
“तुझं पण कायतरीच हं आई,संगीतातला एक राग आहे बागेश्री. चांगलं नाव आहे ते.”
“हल्ली तिघं मिळून वाळीत टाकतात रे मला. यांच सगळं.चहा,गोळ्या,आवडीनिवडी बागेश्रीच बघते. तिघे मिळून रविवारी पत्त्याचा डाव मांडतात. कधी केरम खेळतात. मी एकटी पडते रे अगदी.”
“तू तुझा छंद जप नं. आई,किती छान भरतकाम करायचीस तू! हल्ली सोडलंस सगळं. त्या रेशमाच्या लडी,रिंग,कापड काय हवं ते लिहून दे. मी आणून देतो तुला. बरं हल्ली कोणतं नवीन पुस्तक वाचलंस सांग बघू.”
“नाही रे डोळ्यांनी नीट दिसत नाही बघ. धुरकट धुरकट दिसतो.”
“संध्याकाळी जाऊ आपण डोळे चेक करायला.”
“पराग,तुलाच रे माझी काळजी.”
“बाकी घरातल्या मेंबर्सना तू बोललीस का धुसर दिसतं म्हणून? मग कसं कळणार त्यांना! तूच तुझ्या मनाचे काहीतरी समज करुन घेतेस झालं. जरा फ्रेश रहात जा. त्या बर्मन आंटी बघ साठी उलटून गेली तरी स्वत:ला कसं फीट अँड फाईन ठेवलंय.”
” कोण ती बर्मन, केसांचा बॉब करुन घेतलाय तीने. या वयात ही थेरं, शोभतं का?”
” अगं आई, तू जरा माझं ऐक. तू आमच्यासाठी खूप जगलीस. अगदी सकाळी पाच वाजता उठून डबे तयार करायचीस,आम्हाला शाळेत सोडायची, टेलरिंग करायची,आमचा अभ्यास घ्यायचीस,आमचा रिझल्ट असला की तुला किती टेंशन असायचं!
आत्ता ह्या साऱ्यातून हळूहळू अलिप्त हो. माझ्या,दादाच्या चुका पोटात घेतेस नं तशाच बागेश्रीच्याही चुका पोटात घे. तिचे कपडे,तीने काय खायचं,काय घालायचं..हा तिचा चॉईस आहे. त्यात तू ढवळाढवळ केलीस तर तिला तू अगदी विलन सासू वगैरे वाटशील बघ. ती बाबांची काळजी घेते याचा तर तुला अभिमान वाटला पाहिजे. हां,थोडं इनसिक्युर वाटेल तुला सुरुवातीला बट आय नो माय मम्मा इज अ ग्रेट ह्युमन बिइंग. तू सांभाळशील स्वतःला व बाहेर पडशील या फेजमधून.
आपल्या चिमा मावशीची पाजूताई असंच सांगायची नं तुला तिच्या सासूबद्दल की तिची सासू तिला तिच्या मनाप्रमाणे किचनमध्ये वावरु देत नाही. हवे ते नवीन फेशनचे कपडे घालू देत नाही तेंव्हा तुम्ही बहिणी तिच्या सासूला खाष्ट,खडूस म्हणायचा. मला माझ्या आईला कुणी खडूस म्हंटलेलं नाही आवडणार. शिवाय आत्ता काही वर्षात दुसरी सून येईल तुझी..ती अजून फेशनेबल वगैरे असली तर मग तुला थंड करण्यासाठी फ्रीजमध्येच ठेवावं लागेल.”
“चल,काहीतरीच बोलतोस. पण पटतय रे तुझं म्हणणं. तुझा दादा मला असं समजावून सांगतच नाही.”
विद्याताईंना धाकट्या लेकाचं म्हणणं पटलं. त्या त्यांचे विस्मरणात गेलेले छंद पुन्हा जोपासू लागल्या. बागेश्रीने काही छान बनवलं की तिची पाठ थोपटू लागल्या. बागेश्रीही पराग भावोजींच्या सूचनेनुसार तिच्या सासूचा सल्ला स्वैंपाकात,इतर घरगुती व्यवहारात घेऊ लागली. नात्याच्या प्रवाहात थोडा गैरसमजुतीचा गाळ साचला होता. तो तसाच ठेवला असता तर नाती दुभंगली असती कायमची पण परागने तो गाळ काढून टाकला व नात्यांचा प्रवाह वाहता केला.
—–©® सौ.गीता गजानन गरुड.
==================
तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============