
केतकी खूप लाडाकोडात वाढलेली मुलगी आपलं लग्न होऊन जेव्हा आपल्या सासरी जाते तेव्हा आपल्या बोलघेवड्या स्वभावाने सासरच्या माणसांच्या मनात आपलं घरचं करून ठेवते…माहेरी असतानाही सगळ्यांची अत्यंत लाडकी आणि मनमोकळ्या स्वभावाची असल्याने कुणीही केतकीला बोलून कधीच दुखावले नव्हते म्हणून ती स्वतः कुणाची निंदा-नालस्ती करत नसे आणि स्वतःबद्दल जरी कुणी काही बोलले तरी पटकन राग येत असे…म्हणून सगळ्यांना जणू शिस्तच लागून गेलेली असे…’की कुणीही केतकीशी बोलताना जपून बोलले पाहिजे ‘ सासरकडचे समजूतदार असल्याने केतकीला कुणीही बोलून दुखावणारे नव्हते…केतकी स्वतः इंग्रजी या विषयात MA ची डिग्री संपादित केली होती,नोकरीसाठीही हात-पाय हलवणारी होती म्हणून एखाद्या सरकारी ठिकाणी नोकरीसाठी धडपडत होती…केतकी आपला नवरा चिराग…त्याचे आई-वडील नीलिमा ताई आणि विश्वासराव यांच्याबरोबर एका प्लॉट मध्ये राहत असे…एकूण काय मस्त चौकोनी कुटुंब होत…संपूर्ण सदनिकांमध्ये नजर फिरवाची म्हटल्यास….चिराग आणि केतकी जोडी खूप मस्त वाटायची ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना ‘मेद फॉर इच अदर’ अगदी तसेच…आपल्या बोलक्या स्वभावामुळे केतकी सासूबाईंची विशेष लाडकी होती. म्हणजेच सासू-सुनेच्या नात्यात कधीच वादाची ठिणगी पडत नसे…तरी काही बुद्धीला गंज चढलेली लोकं आजूबाजूला असतात असं म्हणतात तसंच…काहीस केतकीच्या बाबतीत होत होतं…
एक दिवस चिरागबरोबर बाहेर फिरायला जात असताना फ्लॅट मध्ये सगळ्यात पार्किंगच्या प्रवेश द्वारापाशी राहणाऱ्या बर्वे काकू केतकीला म्हणतात-
बर्वे काकू – काय मग…मिस्टर अँड मिसेस…आज नाटकाला गेला होतात की काय ?
केतकी – नाही हो काकू…नाटकाला नव्हतो गेलो…मस्त हॉरर मुव्ही पाहायला गेलतो…तुम्हाला सांगते… काय मज्जा आली क्लायमॅक्स होताना…मला चिरागने परत पाहायला नेला ना मुव्ही तरी चालेन …हो की नाही चिराग…
चिराग – हो…पाहायचं तेव्हा पाहुयात…पण आता चालायला पाहिजे पटकन..उशीर झालाय…
केतकी – चला काकू येते…बोलूयात मग निवांत…[बर्वे काकू स्वतःशीच पुटपुटत घरात जातात]
बर्वे काकू – आम्ही नाही लग्न केलीत…असं हातात हात घालायला मुभा नव्हती आम्हाला…काय पण एकेकाचे थेरं असतात…लोकप्रदर्शनचं जणू…कशाला हवंय प्रदर्शन…खूप प्रेम असल्याचा आव आणायचा…
बर्वे काका – अगं…बाई तू कशाला तुझी जीभ चालवतेस…ते दार लावून घे..आत ये आणि मला जेवायला वाढ…
बर्वे काकू – हो हो….तुम्ही आपल्या मला ऑर्डरी सोडा…आम्ही आहोत तुमच्या मागे मागे करायला…तेवढं करून तरी काय मिळतंय आम्हाला…? आणि पाहिलंत का तुम्ही…कसले कपडे घातले होते…नुसतं अंगप्रदर्शन…
बर्वे काका – [मस्करीच्या स्वरात ] तू का ग नाही घातले असे कपडे…मस्त दिसली असतीस…
बर्वे काकू – तुमच्या जिभेला काही हाडं…शोभतं का असलं बोलणं..म्हंटलं नातवंड आहेत आपल्याला आता…
बर्वे काका मात्र विषय बदलून बोलत होते म्हणून काकूंचं लक्ष मूळ विषयातून बाजूला सरकलं. अशाच साधी माणसं असणाऱ्या लोकवस्तीत केतकी आपल्या नवरा आणि सासू यांच्याबरोबर राहत होती…काही दिवसांनी केतकीला नोकरीसाठी कॉल आला…केतकी सकाळी उठून जी ऑफिसमध्ये आत ती संध्याकाळी पाच वाजता घरी येत असे…आता आपली बायको नोकरीला लागली याचा आनंद चिरागला होताच त्याचबरोबर नीलिमा ताई आणि विश्वासरावानंही आपल्या सुनेबद्दल अभिमान वाटत असे…केतकीची दमछाक होऊ नये म्हणून नीलिमा ताई जमेल तशी मदत आपल्या लाडक्या सुनेला करत असे…एक दिवस असंच संध्याकाळच्या वेळी फ्लॅटमधल्या सगळ्या बायका पार्किंगमध्ये असणाऱ्या चेयर वर बसून गप्पाष्टक करत असतात…बायकांचा नेहमीचा विषय म्हणजे सुनेचं वागणं…त्या बायकांच्या गप्पांमध्ये नीलिमाताईही बसलेल्या असतात…काही मिनिटातच केतकी ऑफिसवरून येते…
बर्वे काकू – अगं…केतकी ये बस कि इकडे..तुझ्या सासूबाईही आहेत इकडेच…
केतकी – अय्या…आई…तुम्ही इकडे…! चिराग आला वाटत…
नीलिमाताई – अगं नाही ग…बस इथे थोडावेळ त्याला यायला अजून अवकाश आहे…चिराग आला कि जाऊयात दोघी…ये बैस इथे…
जोशी काकू – अगं …केतकी बस की सासू सांगतेय तर…का सासूचं ऐकायचं नाही…
नीलिमाताई – नाही हा…केतकी सगळं ऐकते माझं..
बर्वे काकू – नाही हा वाटत नाही असं केतकी तुमचं ऐकत असेल असं…
निलिमाताई – नाही हो …ऐकते ती सगळं…आणि कशावरून केतकी माझं ऐकत नाही असं वाटत तुम्हाला…?
जोशी काकू – नाही हो….त्या पलीकडच्या सोसायटी मधल्या लीना काकू आहेत ना त्यांच्या सुनेबद्दल बोलत आहे त्या..त्यांनी ना त्यांच्या सुनेला म्हणजे नेहाला अशीच मोकळीक दिली…मग काय गेली ना पहिल्या प्रियकरासोबत पळून…काय नाचक्की झाली त्यांची…
निलिमाताई – अगं बाई…मग आता कुठे आहेत त्या…
बर्वे काकू – गेल्या महाबळेश्वरला…त्यांच्या गावी…सुनेनी पळून जाऊन नाचक्की केली…आता गेले आपल्या गावी
केतकी – अहो…पण आपल्याला काय करायचंय त्यांच्या चौकशा…खरं काय आहे ते कुणाला माहिती आहे..?
जोशी काकू – तू ग केतकी खूपच बाजू घेतीय तिची…जशी काय तुझी मैत्रीणच आहे…
केतकी – [थोडीशी चिडून बोलते ] काकू…मी बाजू घेत नाहीय मी फक्त एवढंच सांगतेय…पूर्ण माहिती असल्याशिवाय काही बोलू नये..
निलिमाताई – केतकी…हे बघ चिराग आलाय ऑफिस मधून…आपण जाऊयात घरी..तू पण दमली असशील ना ?
[निलिमाताई विषय बदलून बोलतात ]
केतकी – आई…मी जाते पुढे…चहा वैगेरे ठेवते ..तुम्हाला बसायचं असेल तर बसा…चिराग येईल इतक्यात
जोशी काकू – बाई…बाई…बाई…केवढा तो राग…पळून गेलीय लीना काकूंची सून हिला का राग यावा…ते म्हणतात ना ‘ लेकी बोले सुने लागे’…
बर्वे काकू – हे बाकी खरं हा…नीलिमाताईंना मानायला पाहिजे…कसं राहत असतील काय माहिती…
निलिमाताई तोपर्यंत तिथून निघून जातात…निलिमाताई निघून गेल्यानंतर बायकांना बोलण्यासाठी रान मोकळं होत…चिराग येतोय हे त्या बायकांना माहिती नसतं…डोक्यात हेल्मेट असल्याने चेहरा कुणाला दिसत नाही…बोलण्याच्या ओघात भान विसरलेल्या असतात सगळ्याजणी…
जोशी काकू – बाई ग…नीलिमावहिनींचं काही चालू देत नसेल हो घरात हि बया…
बर्वे काकू – हो ना…मी चांगलीच ओळखून आहे तिला…कसले कसले कपडे घालते…पाहवत नाही ग बाई…आमच्या याना भारी पुळका त्यांचा…
देशपांडे काकू – अगं…पण आता तर नोकरीला लागलीय…सुनेचा पगार,चिरागचा पगार,शिवाय विश्वासराव काय फक्त आयते बसून खात नाहीत…चांगले पेन्शनर आहेत…बिचाऱ्या निलिमाताई घरी राबत असतील…
चिरागने सगळं बोलणं ऐकलं पण एकही शब्द न बोलता तडक आपल्या घरात आला…केतकी आपल्या सासुपाशी रडत बसलेली दिसली…आणि निलिमाताई केतकीला मायेने समजावत होत्या…चिराग येताच केतकी त्याच्यासाठी पाणी घेऊन आली चिराग पाणी पिऊन फ्रेश होण्यासाठी गेला…तशी केतकीही आपलं मन सासूबाईंपाशी मोकळं करू लागली..
केतकी – आई…मी कधी असं वागेल काहो आई…त्या बायका दुसऱ्यांच्या लेकी-सुनांचं कसं नेमकं मलाच सांगत होत्या…म्हजे मीही तशीच वागेल का आई…
निलिमाताई – बाळा…असं काहीही नाहीय…त्यांना बोलू देत ना काहीही…मी काही बोलले आहे का तुला…तेव्हा तू नको ग विचार करुस…तू जेवढा जास्त विचार करशील ना त्यांचा तेवढाच जास्त त्रास तुला होईल हे लक्षात ठेव..याचा परिणाम तूझ्या कामावर होईल मग तू चिडचिडी होशील…
केतकी – आई पण…मी कधी काही बोललेसुद्धा नाही हो त्यांना एवढं तोडून…
निलिमाताई – बाळा…तू नाहीसच बोलली कारण तू खूप चांगली आहेस…तू चांगली आहेस मग सगळं जग थोडीच तुझ्यासारखं निरागस आणि चांगलं असणार…ते चांगल्या माणसांना नाव ठेवायलाच टपलेल असतं हे विसरू नकोस…चिरागने मला आधीच सांगितलं होत तुझ्याबद्दल…खूप मनाला लावून घेतेस तू छोट्या छोट्या गोष्टी…एवढ्या छोट्या गोष्टींवर आपली शक्ती खर्च केलीस तर पुढे कसं होणार…
एवढ्यात चिराग अंघोळ आणि आपल्या बायकोला आणि आईला म्हणतो–
चिराग – अगं…आई त्या बायका कधी स्वतःच्या घरात काय चाललंय याकडे लक्ष देत नाहीत…दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय याकडे भारी लक्ष देतात…त्या बर्वे काकूंचा मुलगा आणि सून दोघेही परदेशात स्थायिक झालेत…ते कुणामुळे…कारण बर्वे काकू कधीही आपल्या स्वतःच्या सुनेबद्दलही चांगलं बोलत नव्हत्या…
निलिमाताई – स्वतःच्या सुनेचं गाऱ्हाणं त्या माझ्यापाशी करायच्या…कंटाळून गेली ती लंडनला…आता सून-सून करतीय…तर यांच्या स्वभावामुळे तीही ढुंकून पाहत नाही…आपण आपलं चांगलं राहायचं…जास्त विचार करायचा नाही…ते म्हणतात ना ‘ निंदकाचे घर असावे शेजारी ‘…..
चिराग – खरं सांगायचं झालं ना…..आपल्यावर जे लोक निंदा करतात ना एका दृष्टीने चांगलंच असत ते…आपलं भलंच होत त्याने…
केतकी – ते कसं काय…?
चिराग – हे बघ उदाहरण द्यायचे झाल्यास…माझ्या अंजु दीदींचं देतो…
केतकी – अंजु दीदी कोण…?
चिराग – अगं अंजु दीदी सध्या कोकणात असते…ती मुळातच खूप स्मार्ट…सगळ्या कामात हुशार पण सासरी गेल्यावर तिच्या सासूबाई नेहमी तोंडसुख घेत असे…कारण तिच्यात चूक काढण्यासारखं काहीच नव्हतं…तरीही काहीतरी चुका त्या काढताच असायच्या…म्हणजे तुला साधे कपडे धुता येत नाहीत,तू साडी नीटच नाही नेसत,तुला मिठाचा अंदाजच येत नाही…अशा खूप चुका त्या काढत असत…पण अंजु काही बोलत नसे….एकदा आमच्या समोर तिची काहीच चूक नसताना अंजुला फाडफाड बोलल्या…तेव्हा आम्ही अंजुला विचारलं…अगं त्या तुझी काहीच चूक नसताना केवढ्या बोलल्या तुला…यावर तू एकही शब्द बोलली नाही त्यांना…
केतकी – पण काय झाल होत नेमकं…?
निलिमाताई – अगं…दारात उभी राहून शिंकली ती…तिच्या सासूबाईंचा समज की तसं कारण म्हणजे अपशकुन होतो…चांगलं नसतं…पण तसं काही ते कारणही नव्हतं…बोलण्यासारखं…पण उलट उत्तर देते का हे चाचपडून पाहायचं होत त्यांना…तिने काही उलट उत्तर दिल नाही…म्हणून अंजु समजूतदारपणामध्ये उजवी ठरली…
चिराग – म्हणूनच तर…जे आपली कुचेष्टा करतात,आपल्याला घालून-पाडून बोलतात,आपली निंदानालस्ती करतात त्यांचं नेहमी ऐकून घ्यावं…ते तर आपल्याला बळकट बनवतात…म्हणूनच तर आपल्याकडं म्हण आहे ना…‘निंदकाचे घर असावे शेजारी‘….
केतकीही मस्त गोष्ट ऐकल्यासारखं आपल्या गालावर हाताचा तळवा ठेऊन ऐकत होती.
==============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.