Ritbhatmarathi

Search
Close this search box.

तेथे कर माझे जुळती

रेडिओवर गाणं लागलेलं..

दिव्यत्त्वाची जेथे प्रचिती

तेथे कर माझे जुळती

ओ आजोबा,आमच्या वर्गात करमरकर आहे नं त्याला डूडायडू म्हणतात.आपण म्युन्सिपालटीलाही कर भरतो नं.मग या गाण्यातला ‘कर’ कुठचा ओ?

अगदी बरोबर आहे तुझं पमे.बरं डोकं चालवतेस हो.तू म्हणतेस ते मराठीतले कर हो.हा जो या गाण्यातला ‘कर’ आहे नं तो तत्सम शब्द आहे.

आजोबा तत्सम म्हणजे ओ काय?

पमे,संस्कृत भाषेतून बरेच शब्द मराठीत जसेच्या तसे आले आहेत.अशा शब्दांना तत्सम शब्द असं म्हणतात.कर हा तत्सम शब्द आहे.त्याचा अर्थ हात.हात जुळणे म्हणजे आपसूक  नमस्कार घालणे.

तू तिन्हीसांजेला म्हणतेस नं

दिव्या दिव्या दिपत्कार

कानी कुंडल मोतीहार

दिव्याला पाहून नमस्कार.

पमे, हा इवलासा दिवा,रातीच्या अंधारात लावला की अंधाराला झाकोळून टाकतो व प्रकाश पसरवतो.त्याच्या बुडाशी अंधार असतो,तरीहीतो इतरांना प्रकाश देतो.असं प्रकाश देत देत दिव्याची वात झिजत जाते व दिवा विझतो.तो कुणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवत नाही.

अशा या परोपकारी दिव्यापुढे आपण नतमस्तक होतो व 

याला हात जोडून नमस्कार करतो.

पमे तुला ते गाणं माहितीय नं,

दिवे लागले रे दिवे लागले

तमाच्या तळाशी दिवे लागले

दिठींच्या दिशा खोल तेजाळताना

कुणी जागले रे कुणी जागले

बरं या दिव्यांसारखंच आणखीन परोपकारी कोण सांग  बघू.

थांबा हं आठवते.आठवलं! झाडं,..आपल्याला सा्वली देतात.ऊन,वारा,पावसापासून आपलं रक्षण करतात. झाडांपासून डिंक,कागद,जळणासाठी लाकूड मिळतं.काही वाईट माणसं जीवंत झाडही त्यांच्या  हव्यासापोटी तोडतात.तरी झाडं त्यांच काम करतच रहातात.ती कोणावर रागवत कशी  नाहीत?

अगं तेच तर त्यांचं दिव्यत्व ,मोठेपण.

दिव्यत्वाची जेथे प्रचिती

तेथे कर माझे जुळती.

ही बागेतली फुलं आपल्याला सुगंध देतात.रातराणीचा दरवळ येतोय नं खिडकीतून. पैसे घेतात का ती या दळवळाचे? मुळीच नाही.ती फक्त देतात.

नदी सतत प्रवाही असते. वहाताना आपल्या आजूबाजूच्या प्रदेशात गाळ टाकते. दोन्ही काठांवर सुख, सम्रुद्धी आणते.अशारितीने निसर्ग आपल्याला भरभरून देतो. हे डोंगर,ही हवा,ही माती..

मातीतून आपण किती पीकं घेतो.त्या धान्यावर जगतो.अशा या मातीपुढे माझे कर जुळतात.पमे,ती खळ्यातली कोंबडी बघ.या रिमझिम पावसापासून आपली पिलं वाचावी त्यांना सर्दीपडसं होऊ नये म्हणून आपले पंख पसरवून साऱ्या इटूकल्या पिलांना उबेला घेऊन बसली आहे. 

गोठ्यातली कपिला गाय तिच्या वासराला चाटते आहे.वासरु तिचं दूध पितय.या वात्सल्याला पाहून या मातांपुढे माझे कर जुळतात.

माता आपल्या पिलांना त्यांचं सर्वस्व देतात.

ते गाणं ठाऊक आहे नं तुला,

देव जरी मज कधी भेटला

माग हवे ते माग म्हणाला

म्हणेन प्रभू रे माझे सारे

जीवन देई मम बाळाला

ऊनपावसाची तमा न बाळगता ट्रेफिक पोलिस त्यांची ड्युटी करतात.सणवाराला घरी न थांबता पोलीस आपले कर्तव्य बजावतात. फौजी भारतमातेचे रक्षण करण्यासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देतात.महिनोन्महिने त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची गाठभेट होत नाही. अशा या भारतमातेच्या वीर पुतांपुढे माझे कर जुळतात.

सकाळी उठून घंटागाडीवाले आपल्या घरातला कचरा नेतात.काही श्वानप्रेमींच्या श्वानांनी रस्त्यावर मलविसर्जन करुन रस्त्याची हागणदारी करुन ठेवलेली असते.

हे कचरेवाले काका श्वानप्रेमींच्या लाडक्या श्वानांची विष्ठा स्वतःच्या हातांनी उचलून तो रस्ता निर्मळ करतात.

काही सफाईकामगार अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत गटारांमध्ये उतरून तुंबलेली गटारे साफ करतात.अशा या स्वच्छतादुतांपुढे माझे कर जुळतात.

कुठे आग लागली की जीवाची बाजी लावून होरपळणाऱ्या लोकांना वाचवणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांपुढे माझे कर जुळतात.माणसातल्या माणुसकीपुढे माझे कर जुळतात.

आपल्याला विदयेचं दान देणाऱ्या शिक्षकांपुढे,वडीलधाऱ्यांपुढे माझं शिर झुकतं व माझे कर जुळतात.

कळलं आजोबा, उपकार करणाऱ्या दयाळू माणसांना,परोपकारी माणसांना हात जोडून नमस्कार करायचा नं.

अगदी बरोबर पमे.आपणही गरजूंना आपल्यापरीने मदत करायची.कधीच कुणाला दुखवायचं नाही.टोचून बोलायचं नाही. होता होईल तो सद्विचारांचं दान वाटत जगायचं.आनंद वाटत जगायचं.

मनुष्यजन्म हा एकदाच मिळतो बरं का पमे.तो आपल्याला देणाऱ्या ईश्वराची हात जोडून प्रार्थना करायची.

—–गीता गजानन गरुड.

===========

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *