Skip to content Skip to sidebar Skip to footer

दहावा पाहुणा

चिंतामणीला बरेच दिवस झाले दिवाकर सहपरिवार घरी बोलवत होता. पण चिंतामणीला आज कुठे सवड मिळाली होती. चिंतामणीचे बायको पोरं माहेरी गेली होती.  ह्याचंच औचित्य साधून दिवाकरने चिंतामणीला २-३ दिवस राहायला बोलावलं.  तो एकटाच दिवाकरच्या घरी गेला.

चिंतामणी दिवाकरच्या घरी पोहोचला. त्याने दारावरची बेल वाजवली. दार लोटलेलच होतं. दाराच्या फटीतून दिवाकरची बायको मंजिरी चिंतामणीला दिसली. मंजिरी सोफ्यावर चिंताग्रस्त अवस्थेत बसली होती.

समोर चिंतामणीला पाहताच तिने स्वतःला सावरलं आणि दार उघडलं.

“या भाऊजी!!!!कसे आहात? तुमचीच वाट बघत होते बघा. हे आताच सांगून गेले कि तुमची यायची वेळ झाली आहे म्हणून स्वयंपाक बनवून ठेव….वहिनींनाही आणायचं होतं कि हो….”

दिवाकर – “अहो वहिनी, ती माहेरी गेली आहे…आणि मला बोलावून हा दिवाकर कुठे गायब झाला?

मंजिरी – “हे जवळच गेले आहेत..येतीलच इतक्यात…तुम्ही बसा निवांत मी चहा ठेवते.”

असं म्हणत मंजिरी गेली किचन मध्ये

इतक्यात दिवाकर आला , “अरे चिंत्या आलास का तू …किती दिवसातून तुला बोलावतोय मी आणि तुला आज सवड मिळाली…बरं इतक्या दिवसातून आलास आणि वहिनींनाही घेऊन नाही आला .”

चिंतामणीशी चुटकुल्या करत दिवाकरही किचन मध्ये गेला.

दिवाकर मंजिरीला , “अगं एकलंस का? आणखी ४-५ कप चहा ठेव माझे मित्र येतायेत…”

काही वेळातच दिवाकरचे मित्र आले.

दिवाकर ,” यारे मोरोपंत, बंडोपंत…बसा बसा….कसं काय चालू आहे? सगळं  मजेत ना? “

“अरे हो मी तुम्हाला माझ्या मित्राची ओळख करून देतो….हा आहे चिंतामणी माझा बालपणीचा मित्र….मुंबईला असतो.”

दिवाकरांच्या मित्रांपैकी मोरोपंत म्हणाले, “अहो तुमच्याबद्दल तर दिवाकरकडून खूप ऐकलं आहे आणि आज काय योगायोगच म्हणा ..तुमच्याशी प्रत्यक्षात भेट झाली.”

दिवाकर – “हो मलाही फार बरं वाटलं माझ्या मित्राचा एवढा गोतावळा पाहून!”

मंजिरीने चहा दिला सगळ्यांना…पण ती अजूनही चिंताग्रस्त दिसत होती. चिंतामणीने ओळखलं कि काहीतरी गडबड आहे.

चहा येताच मोरोपंत मंजिरीला ,” वहिनी आज फक्त चहाच? चहासोबत थोडे भजे मिळाले असते तर काय मज्जा आली असती”

मंजिरी तोंडावर पडल्यासारखी बघत होती ….तिला नाही म्हणता येणार नव्हतं म्हणून ती गपचूप आतमध्ये भज्यांची तयारी करायला निघून गेली.

चिंतामणी – “मी येतोच आतमध्ये जरा बघून येतो वहिनींना काही मदत हवी का?”

असं म्हणून दिवाकरच्या काही बोलण्याच्या आत चिंतामणी आत पळाला. तसा दिवाकर आणि चिंतामणी खूप घनिष्ठ मित्र होते….आणि सतत त्यांचं एकमेकांकडे जाणं येणं असायचं….त्यामुळे एकमेकांच्या बायकांसोबत दोघे तेवढेच फ्रॅंक होते.

चिंतामणीने आत जाऊन मंजिरीला विचारलं – “वहिनी मी आल्यापासून बघतोय…तुम्ही सतत कसलातरी विचार करताय…काही झालंय का?आमचा दिव्या!! तर काही बोलला नाही ना?”

मंजिरी – “नाही हो भाऊजी….त्यांच्या बोलण्यातून नाहीतर त्यांच्या कृतीतून आमची भांडणं होतात….तुम्ही पाहिलं ना कि ते आता त्यांच्या मित्रांना घेऊन बसले…. आणि हे आजचं नाही ….रोज ह्यांचं हेच नाटक…..रोज ३-४ वेळा तरी आपल्या मित्रांना घेऊन बसतात..आणि सारखं आपलं माझ्या मागे लागायचं..कधी हे बनव कधी ते बनव….आणि मित्र पण काही कमी नाही ह्यांचे. … रोजच असं चाललं तर मुलांना कधी वेळ देणार हो….नुसती नेता होयची लहर आली आहे ह्यांना ….”

तेवढ्यात दिवाकरही तिथे आला , “मंजिरी तू उगाच त्रागा करतीयेस….हे सगळे माझे मित्रच आहेत गं आणि तुझ्या हातची चव कळू दे कि माझ्या मित्रांना…कळू दे अक्ख्या जखणगावाला कि भावी सरपंचांची बायको किती सुगरण आहे म्हणून.”

मंजिरी – “अहो, माझ्या हातच्या चवीचा गावभर डंका वाजवायची काय गरज आहे. आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी करा की ..”

दिवाकर – “आता तुला माझ्या मित्रांसमोर भांडणं काढायची आहे का? चिंत्या तू जाऊ दे रे रोजचंच आहे हिचं मी जरा बाहेरची कामं आटोपून येतो..तोवर तू जेवण करून घे मग आपण बाहेर जाऊ.”

बराच वेळ झाला दिवाकर न आलेला पाहून चिंतामणीने मंजिरीला विचारलं , “वहिनी दिवाकर कसा नाही आला अजून…”

मंजिरी – “येतील ते भाऊजी…नक्की येतील आणि सोबत २-४ मित्रांनाही घेऊन येतील..बघाच तुम्ही….”

थोड्याच वेळात दिवाकर आला आणि वहिनीने सांगितलेलं खरं ठरलं..दिवाकर सोबतच आपल्या दुसऱ्या मित्रांना घेऊन आला होता.

दिवाकर – “मंजिरी ताटं वाढ गं…चिंत्या तू जेवलास ना….अरे मला जरा उशीरच झाला जरा….”

चिंतामणीला आता खरंच मंजिरीची कीव येत होती…तिने बिचारीने सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि मुलांनाही वेळ नव्हता दिला….बिचारी मुलं २-३ दा तिच्याकडे येऊन गेली कि अभ्यास घे म्हणून सांगायला पण मंजिरीला दिवाकरमुळे किचनमधून सवडच नव्हती मिळत.

चिंतामणी लागलीच आत गेला आणि मंजिरीला म्हणाला , “वहिनी मी जसं सांगतो तसं करा.”

मंजिरी चिंतामणीच्या सांगणावरून बाहेर आली आणि दिवाकरला म्हणाली , “अहो ऐकलंत का आज मी म्हटलं तुमचे मित्र आली आहेत जेवायला तर आमरस बनवते….पण एकच आंबा शिल्लक राहिला आहे…जरा गंगू मावशीकडून आंबे घेऊन येता का?”

मंजिरीचा त्याच्या मित्रांबद्दल आदर पाहून दिवाकरचे डोळेच चमकले…खुश होऊन तो आंबे आणायला गेला.

दिवाकर बाहेर गेल्यावर , मंजिरी दिवाणखान्यात आली आणि मित्रांना म्हणाली, “चला भाऊजी जेवायच्या आधी आमच्या देवांपुढे हात जोडून घ्या.”

मित्रांमध्ये कुजबुज सुरु झाली,”अरे वाह्ह!आज काय साग्रसंगीत भोजन दिसतंय. “

मस्त सगळेजण देवघरात गेले. देवघरातील दृष्य पाहून सर्वजण अचंबित झाले. देवघरात एक मोठी काठी ठेवली होती. आणि तिची पूजा करून तिच्या पुढे नैवेद्य ही ठेवला होता.

एकाने विचारलं ,” वहिनी हा तुमचा देव होय?”

मंजिरी – “हो हा आमचा मानलेला देव आहे…आणि ह्याने आम्ही  घरात आलेल्या दहाव्या माणसाचं डोकं फोडतो.

एकजण म्हणाला , “क…क…काय?”

मंजिरी – “असं केल्याने माझ्या पतींना जास्त मतं मिळून ते सरपंच बनतील. आमच्या कुलपंडितांनी सांगितलं आहे तसं….”

सगळे बुचकळ्यात पडले कि आपल्यापैकी दहावा पाहुणा कोण असावा….सगळे जण काहीना काही कारण सांगून तिथून पळून गेले….

वाटेत त्यांना दिवाकर दिसला…सगळे पळताना पाहून त्याला आश्चर्य वाटले ,”अरे अरे पळता कशाला….थांबा कुठे चाललात ?”

दिवाकर सामान घेऊन घरी आला, “काय गं मंजिरी काय झालं सगळे असे पळत का सुटले….तू त्यांना काही बोलली का? “

मंजिरी – “छे हो…मी कशाला काय बोलेन…मोरोपंतांना  हि काठी हवी होती…मी हि काठी द्यायला नाही म्हटलं त्यामुळे मोरोपंत नाराज झाले आणि मोरोपंत भाऊजी निघून गेले…ते गेल्यावर वर मग बाकीची पण मंडळी ताण ताण करत निघून गेली. ….”

दिवाकर – “तू पण ना मंजिरी , दे इकडे ती काठी …एका काठीसाठी तू सगळ्यांना नाराज केलंस..मी आताच देऊन येतो… ” 

असं म्हणून दिवाकर काठी घेऊन सगळ्यांच्या मागे गेला…. त्याला असं मागे येताना पाहून सगळी मंडळी गोंधळली आणि सैरावैरा पळू लागली.

दिवाकरला काय होतंय काही कळेनाच…शेवटी सगळेजण पळत गेली आपल्या घरात आणि दारं बंद करून ठेवली. थोड्याच वेळात गावभर ह्याची चर्चा पसरली आणि त्या दिवसापासून दिवाकरच्या घरी जायचं सगळ्यांनी बंद केलं. 

दुसऱ्याच दिवशी चिंतामणी परत आपल्या घरी जायला निघाला तेव्हा दिवाकरला म्हणाला, “दिवाकर, अरे असं खायला घालून कधी कुणी पुढारी झालंय का? त्यासाठी समाजकार्य करायला लागतं आणि समाजकार्याची सुरुवात आधी घरातून झाली पाहिजे…घरच्या स्त्रीला मदत करणं, तिला आदर देणं, मुलांना घडवणं हे एक समाजकार्यच समज.”

दिवाकरलाही त्याची चूक समजून आली आणि त्याने स्वतःमध्ये बदल करायचा निश्चय केला.

पण दिवाकरला अजूनही उमजलं नाही कि त्या दिवशी त्याचे मित्र जेवण न करताच का पळाली आणि आपल्याकडे आता पाहिल्यासारखे मित्रमंडळी का येत नाहीत.

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.