Tea आणि मी (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)


#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२
©️®️ मिथून संकपाळ
आज इतक्या वर्षांनी सुध्दा ते दिवस आठवत असतो, जेव्हा आपली नवीनच ओळख झाली होती. आज सुध्दा चहा बघितला की तुझी आठवण येते आणि ते सारे क्षण डोळ्यासमोर तरळतात.
त्या दिवशी मला कॉलेज ला पोहचायला उशीर झाला होता, पहिला तास सुरू झाला होता आणि बाहेर पाऊसही. तास संपेपर्यंत काय करायचं हा प्रश्न डोक्यात घोळत होता अन् इतक्यात तू येताना दिसलीस. एरव्ही वेळेत येणारी तू, त्या दिवशी मात्र उशिरा.. कसे काय? बहुधा तू पण छत्री आणायला विसरली होतीस.
दुरूनच तुला ओळखलं होते, काळा पंजाबी ड्रेस, पावसापासून वाचण्यासाठी ओढणीचा पदर करून डोक्यावर घेतलेला, बॅग भिजू नये म्हणून दोन्ही हातांनी घट्ट पोटाजवळ पकडलेली, उशीर झाला म्हणून थोडे धावतच येत होतीस आणि त्यामुळे पायातील पैंजनांचा होणारा मंजुळ आवाज अगदीच लक्ष वेधून घेत होता तर चेहऱ्यावर ओघळणारे पावसाचे थेंब तुझे सौंदर्य अजूनच खुलवत होते.
इतकं सौंदर्य भरभरून पाहत होतो तोवर तूच पुढ्यात येवून उभी, “तास सुरू झाला का?”
मी फक्त होकारार्थी मान हलवली, तू मात्र अस्वस्थ होतीस, तुझी ती घालमेल समजत होती कारण तू कधीच उशिरा आली नव्हतीस याआधी. मला काय बोलावं हे समजत नव्हतं, शांत उभा होतो अन् तू ही माझ्या शेजारी.
“आपण चहा घेऊया का?” – तुझा तो प्रश्न ऐकून मी थबकलोच. पावसात भिजल्याने तुला चहाची तलफ आली होती आणि मला तो प्रश्न अगदीच अनपेक्षित होता.
दोघेही कॅन्टीन च्या दिशेने चालू लागलो, मनात खूप काही चाललं होतं.. तुझ्या सोबत चालण्यात एक वेगळाच आनंद मिळत होता (खरं तर सप्तपदिची इच्छा होती)
कॅन्टीन मध्ये आपण सामोरा समोर बसलो आणि तू पट्कन ऑर्डर पण दिली चहाची. मस्त गरमा गरम वाफाळलेला चहा समोर आला,
“घे ना रे चहा”
“हो हो” खरं तर त्या चहा पेक्षा तुझ्याकडे माझे लक्ष जास्त होते.
तू चहाचा पहिला घोट घेतला, “आ हा.. मस्त, छान असतो इथे चहा, मला खूप आवडतो”
मी पुन्हा एकदा फक्त होकारार्थी मान हलवली आणि चहा पिऊ लागलो, तू ही चहाचा आस्वाद घेत होतीस.
मला पहिल्यांदाच तुला इतक्या जवळून पाहता येत होतं आणि म्हणून मी तुला मनसोक्त न्याहाळत होतो. गोरे गोरे गाल, रेखीव नाक, निळसर डोळे, कोरीव काम केल्यासारख्या भुवया, गुलाबी ओठ.
आता मात्र मला प्रश्न पडला होता – गालावरून ओघळणारा पावसाचा थेंब, ओठांना स्पर्श करणारा तो चहा, तुझ्यासमोर बसून तुला न्याहळणारा मी.. यातला नेमका नशीबवान कोण? खरं तर इतर दोघांचा मला हेवाच वाटत होता.
डोक्यात असे विचारांचे थैमान सुरूच होते आणि तशातच आपल्या दोघांचा चहा संपला. आम्ही पुन्हा वर्गाकडे जायला निघालो.
त्यानंतर आपण बऱ्याचवेळा वेगवेगळ्या कारणांनी भेटलो, अर्थात आपल्या दोघांत तो तिसरा ही असायचा – “चहा”. तूझ्या ओठांना स्पर्श करत तो चहा मला कायम चिडवायचा, पण तरीही चहा पितानाचा तुझा आनंद, तो ताजा तवाना चेहरा, डोळ्यांमधले भाव.. हे सर्व पाहायला मला खूप आवडायचं..!!
खरी गंमत तेव्हा आली, जेव्हा आपण चहा पित होतो आणि माझ्या मित्राने आपल्याला पाहिले..
“अरे यार, आहेस कुठे? आजकाल भेटत नाहीस जास्त” या त्याच्या प्रश्नावर काय उत्त्तर द्यावे कळत नव्हते इतक्यात त्याचं पुढचं वाक्य
“हे काय, चहा कधी सुरू केला तू? आयुष्यात चहा कधी पिणार नाही अशी शपथ घेतली होतीस म्हणे. बरं असो, नंतर भेटू” असं म्हणत तो निघून गेला खरा पण तो जो बॉम्ब त्याने टाकला होता त्याची सारवासारव आता कशी करायची हा मोठा प्रश्न पडला होता. तुझ्याशी नजर मिळवण्याची हिम्मत आता होत नव्हती.
खरंच मी कधी चहा घेत नव्हतो, पण जेव्हा पहिल्यांदा तू चहासाठी विचारले, मी नकार नाही देवू शकलो. इतरांसाठी मी चहा वर्ज्य केला होता, पण आपल्या भेटिंचा तो अविभाज्य घटक होता.
मी स्वतःहून काही बोलण्याची हिम्मत होत नव्हती, तू काही बोलावे आणि मी उत्तर द्यावे याच अपेक्षेत होतो.
“तू चहा पित नाहीस..? म्हणजे पित नव्हतास..? मला तर काहीच बोलला नाहीस कधी”
“ते.. मी.. चहा.. घेतो..म्हणजे नाही.. म्हणजे कधीतरी…म्हणजे आपण..” बोबडी वळली होती माझी.
“अरे इतकं काय घाबरतोस, पोलीस आहे का मी?”
आता तर मला काहीच कळत नव्हतं, काही बोलाव की नको, जावं निघून की थांबावं…
आणि मग, कोरड्या जमिनीवर जसा पावसाचा शिडकाव व्हावा तसा तुझा तो प्रश्न –
“किती दिवस असा बाहेरचा चहा प्यायचा आपण? दोघांनी एकत्र स्वतःच्या घरी बसून चहा प्यायला आवडणार नाही का तुला?”
©️®️ मिथून संकपाळ
==================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/