Ritbhatmarathi

Search
Close this search box.

स्वर्गसुख (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा _जाने_२२”

©️®️ मधुस्मिता ढेकणे

आई माझी फाईल बघितलीस का ग काल रात्री कामाला बसले होते तिथे ठेवली होती. माझी एक महत्वाची मिटींग आहे आज देवा आता कुठे शोधू ए शौनक तू बघितलीस का? नाही हं ताई मी माझं काम करतोय. जरा ते बाजूला ठेवून मला शोधायला मदत करशील का? बर करतो. एवढे मोठे झालात तरी कसं ग असं वागणं तुमचं आई म्हणाली. सापडली ग ड्रॉवरमध्ये होती. एका फाईलसाठी केवढा पसारा घातलाय. आल्यावर आवरते, निघते उशीर होतोय. सावकाश जा ग आणि उशीर झाला म्हणून गाडी जोरात जोरात चालवू नकोस आणि डबा विसरलेच थँक्यू आई अच्छा. ए शौनक टाटा. राधिका सगळ्यांना अच्छा करून घराबाहेर पडली.

           राधिका गाडी चालवताना या सगळ्याचा विचार करत होती. खरच आपण भाग्यवान आहोत. आपल्याला भरलेलं कुटुंब मिळालं. पण जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे सगळं असून त्यांना त्यांची किंमत नाही खरच दुर्दैव अजून काय. राधिका ही एका श्रीमंत घरात जन्माला आलेली मुलगी. घरात पाण्यासारखा पैसा वाहत होता.

राधिका चे वडील हे खूप मोठे उद्योगपती होते. शौनक ला आपल्या वडिलांबरोबर काम करायची इच्छा होती, आणि राधिकाला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होतं. श्रीमंतीत वाढलेल्या मुलांना मात्र त्या पैशांचा हव्यास नव्हता.या जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांना दोन वेळचे अन्न देखील मिळत नाही त्यामुळे आपला पैसा हा स्वतःसाठी वापरताना त्या बरोबरच समाजासाठी पण वापरायचा ही घराशी शिकवण होती. सांगून पटणार नाही असंच साध रहाणीमान सगळ्यांच होत.  

          राधिकाच्या वडिलांनी एक व वृद्धाश्रम चालू केला होता. राधिका स्वतः डॉक्टर होती. त्यामुळे तिथल्या आजी-आजोबांची तब्येतीची काळजी ती स्वतः लक्ष देऊन घेत होती. त्या आश्रमातच त्यांनी स्वतःचा दवाखाना चालू केला. त्यातल्या उत्पन्नाचा एक भाग ती आश्रमासाठी द्यायची.तिचं तिथल्या आजी-आजोबांशी एक प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं. एक डॉक्टर म्हणून नव्हे तर एक नात म्हणून ती सगळ्यांची काळजी घ्यायची. राधिकाच्या कॉलेजचे मित्र मैत्रिणी अधून मधून सगळ्यांना भेटायला यायचे. त्यांना पण सगळ्यांचा लळा लागला होता. ज्यांना आज्जी आजोबा नव्हते त्यांची कमतरता त्यांनी आश्रमात येऊन भरून काढली होती. त्यामुळे जीव्हाळा निर्माण होणे खूपच स्वाभाविक होतं. 

           असेच हळूहळू दिवस जात होते. अशाच एके दिवशी राधिका आश्रमात आली. सगळे जण एकमेकांशी गप्पा मारत होते. ती पण त्यांच्यात जाऊन बसली. परंतु आजच्या गप्पा या रोजच्या सारख्या हसून खेळून नव्हत्या. काहीतरी गंभीर विषय चालू होता. काय झाले तुम्हाला राधिकाने विचारलं. विशेष असं काही नाही ग बाळा आज फाटक आजोबांच्या मुलाची मनिऑर्डर आली. पैसे भरपूर आलेत पण पैसे म्हणजे प्रेम नाही ना गं. आपला माणूस बरोबर असणं हे सुख काही निराळाच असत. तू आहेस त्यामुळे थोडा आधार आहे पण शेवटी आई वडिलांची मुलासाठीची माया अशी उफाळून येतेच ना ग. 

           नको मला हे पैसे. राधिका काही कमी पडू देत नाही. शिवाय इथले सगळे कर्मचारी आपलेच आहेत. ज्या प्रेमाचे अपेक्षा होती ते प्रेम हे देतच आहेत की. आई वडील म्हणजे खेळणं वाटलं? कंटाळा आला टाकून दिलं. बरोबर आहे तुमचं देशपांडे आजोबा म्हणाले. आम्हाला दोघांना इथे सोडलं का तर म्हणे महागाई वाढली, खर्च वाढलेत. नोकरीच्या ठिकाणी ताण तणाव. म्हणे गैरसोय नको म्हणून. आम्ही काय पैसे मागितले नव्हते. आता या वयात हवा होता तो आधार. आम्हाला खर्च नव्हते का? स्वतःचा विचार सोडून यांच्यासाठी तेव्हा कष्ट केलेच ना. महागाई आहे म्हणून यांना आम्ही सोडून दिलं असतं तर काय झालं त्यांचं? आणि मारे गप्पा मारतात राष्ट्रीय विकासाच्या. आपल्या आई-वडिलांना सांभाळता येत नाही आणि म्हणे असो……..

          गोसावी आजी म्हणाल्या कर्माचे भोग दुसरं काय. पण माया आडवी येते. ज्यांना जन्म दिला त्यांची आठवण येणारच ना. मुलांच्या फोटो वर हात फिरवत फिरवत या मुलांच्या लहानपणात हरवून गेल्या. चौधरी काका बराच वेळ हे सगळं ऐकत होते. चौधरी काका आश्रमासाठी चा ट्रस्ट सांभाळायचे. कधी कधी लोक तिथे देणग्या द्यायचे. लोक सेवा म्हणून आपणहून तीथे यायचे. सगळ्यांची चार प्रेमाचे शब्द बोलायचे. काका म्हणाले निराश होऊ नका. तुम्हाला त्रास होणे स्वाभाविक आहे.पण तुमच्याशी ओळखही नसलेले लोक इथे येतात त्यांना तुमचा मुलगा मुलगी तुमची नातवंडं समजा जरा दुःख हलकं होईल. 

         असं कोणतं पाप घडले पूर्वजन्मात म्हणून या जन्मात वाट्याला हे दिवस आले देव जाणे, देसाई आजी डोळे पुसत म्हणाल्या. सगळ आयुष्य पाप पुण्या वर आहे. पाप केलं तर नरकात आणि पुण्य केले तर स्वर्गात. असं काही नसतं राधिका म्हणाली. अग राधिका जीवंतपणी नरक यातनाच भोगतोय आम्ही. स्वर्गसुख मात्र मेल्यावरच दिसतं. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात तेच खरं आहे. हो ग बाई खर आहे बघ तुझ. आपल्याला जिवंतपणी स्वर्गसुख कुठलं! पाटकर आज्जी म्हणाल्या. आयुष्याच्या उत्तरार्धात राधिका आहे हाच काय तो आधार. बरोबर आहे तुमचं सगळे एकदम म्हणाले.

          तो दिवस तसाच गेला. संध्याकाळी राधिका घरी गेली. घरी जाऊन सगळा प्रकार सांगितला. तेव्हा तीचे आजोबा म्हणाले, खरे बाळा इथे आपलं सगळं कुटुंब आपण सुखात आणि महत्त्वाचं म्हणजे एकत्र आहोत म्हणून जाणवत नाही. पण त्यांचं दुःख मी समजू शकतो. त्यांना त्यांचा वेळ दे बाळा होतील ते बरे, बाबा म्हणाले. सगळे दिवस सारखे नसतात बाळा उद्या ते छान असतील बघ आई म्हणाली. परंतु असे काहीच घडले नाही. राधिकाच्या मनात असंख्य विचार येऊ लागले. की अचानक यांना काय झालं? हा विषय खूप वेळा निघतो पण दुसऱ्या दिवसापर्यंत सगळे शांत होतात. आज आठ दिवस झाले तरी वातावरण निराश उदास आहे. आणि मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे वाक्य सगळ्यांच्या तोंडी आहे. त्यांना जगण्याचा कंटाळा आला आहे का? मरण एवढ्या जवळ हवय का?हे काही उलटसुलट करणार नाहीत ना? माझं प्रेम माझी काळजी अपुरी पडते का? की माझं चुकतय काहीतरी? राधिका बिचारी पुरती खचून गेली. यांना जिवंतपणी स्वर्ग दाखवता येईल का असा विचार करत बसली.  

           राधिका घरी आली परंतु तिचे कशातच लक्ष लागेना. त्यांना काहीही करून स्वर्ग दाखवायचा हा निश्चय करून राधिका झोपून गेली. दोन दिवस असेच विचारात गेले. पण तिला उत्तर मिळेना. तिसऱ्या दिवशी सायली तिला भेटायला तिच्या क्लिनिक मध्ये गेली. राधिका शून्यात बघत बसली होती. काय ग काय झालं या सायलीच्या वाक्याने ती भानावर आली. व तिने सगळा प्रकार सायलीला सांगितला. मग सायली म्हणाली तू त्यांना घेऊन चार दिवस फिरायला जा. अगं पण स्वर्गाच काय? अग जरा फिरून आले की विसरतील. असे पण मी तुला विचारायला आले आपल्या कॉलेजचा ग्रुप चार दिवस कोकण ट्रिप प्लॅन करतोय. तर मला काय वाटतं आपण मोठी गाडी करू आणि ह्या सगळ्यांना पण घेऊन जाऊ आम्हालाही त्यांची सवय आहेच की. आता कुठे राधिकाला थोडं हायसं वाटलं. राधिकाने आश्रमात सगळ्यांना सांगितलं आणि ठरल्याप्रमाणे सगळे कोकणात जायला म्हणून गाडीत बसले. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नव्हता. सुरवातीला सगळे शांत बसले होते. मग हळू हळू बोलायला लागले. गप्पा मारता सगळे कोकणात पोहोचले. आणि एखाद्या चित्रकाराने चुकलेले चित्र पुसून टाकावं आणि नव्या कल्पनेने नव्या उत्साहाने ब्रश धरून पुन्हा चित्र काढाव असे सगळ्यांचे चेहरे झाले. त्यांच्या वागण्या-बोलण्यात आलेला वेगळेपण राधिकाला जाणवलं. 

         “कोकण” त्या परमेश्वराने मोठ्या आनंदाने, प्रेमाने, प्रसन्न मनाने रेखाटलेले चित्र. लाल मातीची कौलारू घरं, नारळ-पोफळीच्या बागा, आणि समुद्र ही कोकणाची खास वैशिष्ट्ये. हे जिथे उतरले होते त्यांची खूप मोठी वाडी होती.वाडी च्या मागच्या बाजूला खूप मोठी बाग होती. आणि वाडीच्या समोर पसरला होता अथांग समुद्र. आज तुम्ही दमले असाल,  थकले असाल जरा जेवण वगैरे करून विश्रांती घ्या. संध्याकाळी समुद्रावर जाऊन या आणि उद्या सकाळी सूर्योदयाला आवरून बागेत जायला तयार व्हा अस नाना म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकर उठले आवरलं आणि बागेत गेले. नाना म्हणाले चला बागेतच चहा घेऊ. 

         नारळी पोफळीची सुंदर बाग होती. नारळ, केळी जांभूळ, कोकम अशी विविध झाडे होती. निरनिराळ्या रंगाचा, चविष्ठ  रानमेवा होता. आणि तिथे आत एक ओसरी बांधली होती तिथे सगळे जणं बसले. नानानीं चहा मागवला. अवतीभोवती वेगवेगळे पक्षी होते हे पक्षी बघायला नानांनी सगळ्यांना पहाटे बागेत आणलं होतं. वेगवेगळे पक्षी बघत त्या थंडगार हवेत झाडांची आरास असलेल्या ओसरीवर बसून गरम गरम चहा पिण्याची मजाच निराळी.नाना म्हणाले चला आता पुढे जाऊ. पुढे आम्ही फुलझाडे लावलीत ती दाखवतो. सगळेजण ते निसर्ग सौंदर्य बघत बघत पुढे पुढे जात होते. त्यांचा मुलगा विलास तिथे पाणी घालण्यासाठी पंप सोडत होता.बागेत पाच पंप आहेत. दर चार दिवसांनी पाणी सोडतो. विलास सांगत होता. नुकत्याच पाणी प्यायलेल्या मातीचा सुगंध वाऱ्याबरोबर बागेत फिरत होता.

           आता हे बघा म्हणून नानाने समोर बघायला सांगितलं.  नानांनी विविध रंगाची फुलझाडे लावली होती. फुलांच्या पायघड्या घातल्या प्रमाणे रंगीबिरंगी सडा पडला होता. सगळ्या फुलांचा एक अनामिक वास आसमंतात भरून राहिला होता. त्या फुलांवर निरनिराळ्या रंगसंगतीची फुलपाखरे लहान मुलांप्रमाणे बागडत होती. सूर्याची कोवळी किरणे त्यावर पडली होती. नुकताच पाणी घातल्यामूळे त्यांच्या पानावर दवबिंदू साचल्या प्रमाणे दिसत होत. तो प्रत्येक थेंब सूर्य किरणात न्हाऊन निघत होता. अद्भुत! वर्णन करायला शब्दच नाहीत रोहन म्हणाला.

गेले आठ-दहा दिवस उदास असलेल्या आज्जी आजोबांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. राधिका आणि तिचे मित्र झाडांचे, फुलांचे फोटो काढण्यात गुंग होते. ते सगळे आज्जी आजोबा राधिका जवळ आले आणि म्हणाले बाळा कोकण सौंदर्य आहे त्या परमेश्वराने निर्माण केलेलं भूतलावरचा स्वर्गच.  अजून सुंदर याहून सुंदर स्वर्ग असा काय असणार. तुझ्या आणि तुझ्या मित्रींमुळे आम्हाला जिवंतपणी स्वर्गसुख मिळाले. या वाक्याने सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. राधिकाला तर जग जिंकल्यासारखा आनंद झाला. 

          तिने सायलीला कडकडून मिठी मारली. न बोलताच ती सायलीला खूप काही बोलून गेली. तिच्या भावना सायलीला उमगल्या. सगळेजण चेहऱ्यावर स्वर्गसुखाचा तृप्तीचा आनंद आणि ते कोकण सौंदर्य मनात, डोळ्यात साठवून परतीच्या प्रवासाला निघाले. स्वर्गात परमेश्वर असतो आज जणू त्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले ,फाटक आजोबा म्हणाले. खर आहे सगळे म्हणाले. भावविभोर स्वरात फाटक आजोबा अभंग म्हणु लागले आणि सगळ्यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला. 

                ||आता कोठे धावे मन

                          तुझे चरण देखलिया||

@ मधुस्मिता.

=====================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *