अत्यंत साध्या पद्धतीने कृपादृष्टी दाखवणारे आणि प्रसन्न होणारे हे करोडो लोकांचे श्रद्धा स्थान…. बघुया कशी करावी नित्यसेवा


१. कोण होते स्वामी समर्थ?
swami samarth nitya seva:मानवी आयुष्य जगत असताना अनेक संकटे, संघर्ष, अडचणी, खडतर प्रवास, चांगले वाईट अनुभव, दुःख, वेदना, त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच वेळा निराश, हतबल आणि अस्वस्थ व्हायला होते. आयुष्यात काय करावे आणि मार्ग कसा शोधावा काहीच समजत नाही. आयुष्यातील संकटे कशी दूर करावी, कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक, आशावादी कसे रहावे लक्षात येत नाही.
कधी कधी कळतंय पण वळत नाही अशीही परिस्थिती येते. अशा वेळी गरज असते ती मन शांत आणि रागावर नियंत्रण ठेवण्याची तसेच सारासार परिस्थितीचा विचार करून शांतपणे निर्णय घेण्याची. पण आपले स्वभावगुण म्हणा किंवा परिस्थिती म्हणा तसे करू देत नाही आणि इच्छा असूनही आपल्याला शांतपणे विचार करता येत नाही.
करोडो लोकसंख्येच्या या गर्दीत सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जात आहेत आणि आयुष्य सरेपर्यंत तर जाणारच आहेत. याचा विचार आपण करतच नाही दुःखात सगळेच विसरून जातो. तर मग अशा वेळी काय करावे ?? तर सरळ आपले श्रद्धा स्थान असलेले दैवत मग ते कोणतेही असेल, गणपती बाप्पा, भगवान शंकर, भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, श्री गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज अगदी कोणीही त्याच्या चरणाशी स्वस्थ बसावे किंवा मग डोळे मिटून त्यांचे नाव घ्यावे.
बस इतकेच करायचे आहे. आपण सगळेच परमेश्वर, दैवीशक्ती आहे हे मानतो. विज्ञान जरी हे मानत नसले किंवा काही नास्तिक लोकं असली तरीही ९० टक्के लोक हे देवाचे अस्तित्व मानतात आणि त्यांची सेवा करतात.
करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि आपण त्यांना नाही तर स्वतः त्यांनीच सेवा करून घेण्यासाठी आपली निवड केली आहे असे मानले जाणाऱ्या आणि हाकेला धावून येणारच हा विश्वास तसेच खात्री असलेल्या, अत्यंत साध्या पद्धतीने प्रसन्न होणाऱ्या, जे अनादी काळापासून आहेत आणि अनादी काळापर्यंत राहतील , हम गया नाही जिंदा है असे स्वतः सांगणाऱ्या करोडो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजेच ” श्री स्वामी समर्थ” महाराज यांची सेवा कशी करावी आणि काय करावी हे आपण बघुया. तसेच सेवा करून कोणत्याही अडचणींवर उपाय कसा मिळवावा ते जाणून घेऊया.
२. नित्य सेवा म्हणजे काय?
नित्यसेवा म्हणजेच रोज केली जाणारी सेवा किंवा पूजा. आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असते, त्यासाठी विशिष्ठ जागा असते आणि घरातील कर्ता पुरुष रोजच देवाची पूजा करत असतात. घरातील पुरुषांना जमत नसेल तर मग त्यांची मुले मुंज झाल्यावर पूजा करतात किंवा मग घरातील स्त्रिया पूजा करतात. पण आपण पूजा, अर्चना करतोच करतो.
तर आपल्याकडे स्वामींची अनेक मंदिरे आहेत शिवाय स्वामींचे अनेक मठ सुद्धा आहेत. अशा मठात काही सेवेकरी सेवा कशी करावी याचे मार्गदर्शन करतात आणि आयुष्यातील अडचणींवर उपाय पण सांगतात. तर सर्वात आधी शक्य असेल तर अशा एखाद्या मठात जाऊन नक्की दर्शन घ्या.
हेही वाचा
भारतातील काही रहस्यमय मंदिरे जिथे रोज काही ना काही घटना होत राहतात
३. शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वामींची नित्यसेवा कशी करावी?
कमीत कमी वेळात शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वामींची नित्यसेवा कशी करावी आणि अनुभूती कशी घ्यावी ते आता बघुया.
- आपल्या घरात स्वामींची छानशी मूर्ती किंवा फोटो घेऊन या.
- मूर्ती पूजा करताना एक फुल वहा शक्यतो झेंडूचे असावे किंवा कोणतेही पिवळे फुल, मनातील इच्छा मागा आणि तारक मंत्र अवश्य ऐका किंवा म्हणा.
- मूर्ती पूजा करताना मूर्तीला किंवा फोटोला कुंकू, हळद न लावता अष्टगंध लावावे.
- स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेत त्याचा वापर नक्कीच करावा. अष्टगंध आणि अत्तर एकत्रित करून स्वामींना टिळा लावून स्वामींना प्रसन्न करून घ्यावे.
- या मूर्तीची स्थापना गुरुवारी सकाळी १०:३० च्या आधी करा. स्थापना करायची म्हणजे मूर्ती किंवा फोटो एखाद्या विशिष्ठ ठिकाणी ठेवा. नैवेद्य ( घरात केलेले अन्न पदार्थ ) किंवा दूध साखरेचा दाखवून आरती म्हणा.
- नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकोन करून अनामिकेने म्हणजेच तिसऱ्या बोटाने कुंकाचे बोट लावून नैवेद्य ठेवावा, नैवेद्य दाखवण्याआधी आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मुजरा करायला विसरू नये. कारण स्वामीना मुजरा खूप प्रिय आहे.
- स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतरच घरातील इतर मंडळींनी तो ग्रहण करावा.
- सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळी नैवेद्य दाखवावा.
- रात्री जर ताजे जेवण बनवले नसेल तर गरम भात करून दूध साखर पोहे किंवा दूध भात ठेवावा.
- नैवेद्य दाखवतना निरंजन तेवत असावे आणि अगरबत्ती लावलेली असावी.
- रोज अकरा माळ “श्री स्वामी समर्थ” हा जप करावा. जपमाळ नसेल तर वीस मिनिटे हा जप करावा किंवा ते ही जमत नसल्यास रोज हिंडत फिरत घरातील कामे करत जप केला तरी चालेल. आपण जप कसा करतो यापेक्षा कोणत्या भावनेने आणि श्रध्देने करतो ते महत्त्वाचे.
- स्वामी चरित्र सारमृत या पुस्तकाचे रोज तीन न चुकता वाचावे. जमत असेल तर कोणतीही एक वेळ ठरवून वाचा किंवा मग जमेल त्या वेळी वाचलेत तरीही चालेल.
- स्वामी चरित्र सारामृतचे अखंड पारायण करा.
- रोज एकदा तरी तारक मंत्र ऐका.
४. नित्य सेवा नाही जमल्यास काय करावे?
आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत. आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामीच घरात वास करत असल्याचा अनुभव येतो. घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असे वाटते. भीती मनात रहात नाही. राहीलच कशी कारण आपल्या स्वामींचे ब्रीद वाक्यच आहे ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”.
मग भीतीला जागाच उरणार नाही ना ?? स्वामी परम दयाळू आणि कृपाळू आहेत. आपल्या हाकेला ते धावून येतातच येतात. अनेकांचे अनुभव आहेत तसे. त्यामुळे स्वामी जवळ जाण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सगळ्यात सोपा, साधा, सरळ, महत्त्वाचा आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचा ” श्री स्वामी समर्थ ” हा षडाक्षरी म्हणजेच सहा अक्षरी मंत्रजप करणे हा होय.
बाकी सेवा जमली नाही तरी चालेल पण सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप मात्र अतिशय श्रद्धापुर्वक करणे गरजेचे आहे. यासाठी जपमाळ हातात असायला हवी किंवा तुम्ही मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसून रहाणे गरजेचे आहे असे काहीही नियम अटी नाहीत. अगदी हिंडत फिरत, कामे करत जरी तुम्ही हा जप केलात तरी चालेल पण त्यासाठी विश्वास आणि श्रद्धा फक्त महत्त्वाची. कारण हा मंत्र म्हणजे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे, संजीवनी आहे आयुष्याची अशी धारणा मनात ठेवून आपण या मंत्राशी एकरूप झालो पाहिजे, गुंतून राहिले पाहिजे.
५. स्वामी समर्थ तारक मंत्राची शक्ती
मग आयुष्यातील कोणतीही अडचण अडचण राहणार नाही, संकटे सहज पेलण्याची ताकद येईल, आत्मविश्वास वाढेल, भीती नाहीशी होईल. कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देईल हा मंत्र. कारण या मंत्रात आहे तेवढी ताकद . फक्त अनुभव घेऊन बघा. जेंव्हा कधी तुम्हाला टेन्शन येईल, मानसिकता नीट नसेल, एखादे संकट आले असेल तर डोळे मिटून फक्त मंत्र जप करा किंवा मग तारक मंत्र ऐकला किंवा येत असेल तर म्हणालात तरी आपोआप मार्ग दिसून येईल. इतकी प्रचंड ताकद आहे या मंत्रात. या मंत्रातील वाक्य “अशक्य ही शक्य करतील स्वामी ” खूप बळ देते.
आपण प्रत्येकाशी जसे बोलतो तसे मोठ्याने जप करणे म्हणजे वैखरी होय.
मनात जे गुणगुणते तो आवाज फक्त आपल्याला ऐकू येतो त्याला मध्यम म्हणतात.
तर आपण घशात जे बोलतो आणि जप करतो त्याला पश्यांती असे म्हणतात.
जप करत करत आपल्याला त्या अवस्थे पर्यंत जायचे असते.
आपले स्वामी हे परम दयाळू आणि कृपाळू तर आहेतच. शिवाय त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी फार कडक नियम, अटी, सोवळे यांची गरजच नाही. फक्त श्रद्धापुर्वक म्हटलेले श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप पण बरीच अनुभूती देणार यात शंकाच नाही. या सोबत आपले कर्म आणि आपली नियती स्वच्छ आणि प्रामाणिक असायला हवी आणि त्याला कष्टाची जोड असेल तर स्वामी कोणतीही गोष्ट मागण्याआधी ते देतील यात वादच नाही. त्यामुळे नेहमी खरे बोला, प्रमाणिक रहा, माणसे आणि माणुसकी जपा आणि म्हणत रहा श्री स्वामी समर्थ.
विजय आपलाच झालेला असेल. कारण स्वामी नेहमीच म्हणतात,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मग काय अशक्य आहे ??
==========