स्वामी चरित्र सारामृत अध्याय १ भावार्थसहित

श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय | swami charitra saramrut 21 adhyay pdf
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥ श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥
ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद़्गुरुं तं नमामि ॥
जयजय श्री जगरक्षका । जयजयाजी भक्तपालका । जयजय कलिमलनाशका । अनादिसिद्धा जगद्गुरु ॥१॥ जयजय क्षीरसागर विलासा । मायाचक्रचालका अविनाशा । शेषशयना अनंतवेषा । अनामातीता अनंता ॥२॥ जयजयाजी गरुडवाहना । जयजयाजी कमललोचना । जयजयाची पतितपावना । रमारमणा विश्वेशा ॥३॥ मेघवर्ण आकार शांत । मस्तकी किरीट विराजित । तोच स्वयंभू आदित्य । तेज वर्णिले न जाय ॥४॥ विशाळ भाळ आकर्ण नयन । सरळ नासिका सुहास्य वदन । दंतपंक्ति कुंदकळ्यांसमान । शुभ्रवर्ण विराजती ॥५॥ रत्नमाला हृदयावरी । जे कोटी सूर्यांचे ते हरी । हेममय भूषणे साजिरी । कौस्तुभमणि विशेष ॥६॥ वत्सलांच्छनाचे भूषण । चेति प्रेमळ भक्तिची खूण । उदरी त्रिवळी शोभायमान । त्रिवेणीसंगमासारखी ॥७॥ नाभिकमल सुंदर अति । जेथे विधात्याची उत्पत्ती । की चराचरा जन्मदाती । मूळ चननी तेचि पै ॥८॥ जानूपर्यंत कर शोभति । मनगटी कंकणे विराजती । करकमलांची आकृति । रक्तपंकजासमान ॥९॥ भक्ता द्यावया अभय वर । सिद्ध सर्वदा सव्य कर । गदा पद्म शंख चक्र । चार हस्ती आयुधे ॥१०॥ कांसे कसिला पीतांबर । विद्युल्लतेसम तेज अपार । कर्दळीस्तंभापरी सुंदर । उभय जंघा दिसताती ॥११॥ जेथे भक्तजन सुखावती । ज्याच्या दर्शने पतीत तरती । ज्याते अहोरात्र ध्याती । नारदादि ऋषिवर्य ॥१२॥ ज्याते कमला करे चुरीत । संध्यारागा समान रक्त । तळवे योग्य चिन्हे मंडित । वर्णित वेद शीणले ॥१३॥ चौदा विद्या चौसष्ट कला । ज्याते वर्णित थकल्या सकळा । ऐशा त्या परम मंगला । अल्पमती केवि वर्णू ॥१४॥ नारदादि मुनीश्वर । व्यास वाल्मिकादि कविवर । लिहू न शकले महिमांवर । तेथे पामर मी काय ॥१५॥ जो सकळ विश्वाचा जनिता । समुद्रकन्या ज्याची कांता । जो सर्व कारण कर्ता । ग्रंथारंभी नमू तया ॥१६॥ त्या महाविष्णूचा अवतार । गजवदन शिवकुमार । एकदंत फरशधर । अगम्य लीला जयांची ॥१७॥ जो सकळ विद्यांचा सागर । चौसष्ट कलांचे माहेर । रिद्धि सिद्धीचा दातार । भक्त पालक दयाळू ॥१८॥ मंगल कार्या करिता स्मरण । विघ्नें जाती निरसोन । भजका होई दिव्य ज्ञान । वेदांतसार कळे पां ॥१९॥ सकल कार्यारंभी जाणा । करिती ज्याच्या नामस्मरण । ज्याच्या वरप्रसादे नाना । ग्रंथरचना करिती कवी ॥२०॥ तया मंगलासी साष्टांग नमन । करूनी मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । निर्विघ्नपणे होवो हे ॥२१॥ जिचा वरप्रसाद मिळता । मूढ पंडित होती तत्त्वता । सकळ काव्यार्थ येत हाता । ती ब्रह्मसुता नमियेली ॥२२॥ मूढमती ती अज्ञान । काव्यादिकांचे नसे ज्ञान । माते तू प्रसन्न होवोन । ग्रंथरचना करवावी ॥२३॥ जो अज्ञानतिमिरनाशक । अविद्याकाननच्छेदक । जो सद़्बुद्धीचा प्रकाशक । विद्यादायक गुरुवर्य ॥२४॥ ज्याचिया कृपेकरोन । सच्छिष्या लाधे दिव्यज्ञान । तेणेच जगी मानवपण । येतसे की निश्चये ॥२५॥ तेवी असता मातापितर । तैसेचि श्रेष्ठ गुरुवर्य । चरणी त्यांचिया नमस्कार । वारंवार साष्टांग ॥२६॥ मी मतिमंद अज्ञ बाळ । घेतली असे थोर आळ । ती पुरविणार दयाळ । सद़्गुरुराज आपणची ॥२७॥ नवमास उदरी पाळिले । प्रसववेदनांते सोशिले । कौतुके करूनी वाढविले । रक्षियेले आजवरी ॥२८॥ जननीजनका समान । अन्य दैवत आहे कोण । वारंवार साष्टांग नमन । चरणी तयांच्या करीतसे ॥२९॥ ब्रम्हा विष्णू महेश्वर । तिन्ही देवांचा अवतार । लीलाविग्रही अत्रिकुमार । दत्तात्रेय नमियेला ॥३०॥ तीन मुखे सहा हात । गळा पुष्पमाळा शोभत । कर्णी कुंडले तेज अमित । विद्युल्लतेसमान ॥३१॥ कामधेनू असोनि जवळी । हाती धरिली असे झोळी । जो पहाता एका स्थळी । कोणासही दिसेना ॥३२॥ चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ॥३३॥ त्या परब्रम्हासी नमन । करोनि मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । होवो कृपेने आपुल्या ॥३४॥ वाढला कलीचा प्रताप । करू लागले लोक पाप । पावली भूमि संताप । धर्मभ्रष्ट लोक बहू ॥३५॥ पहा कैसे दैव विचित्र । आर्यावर्ती आर्यपुत्र । वैभवहीन झाले अपार । दारिद्र्य, दुःखे भोगिती ॥३६॥ शिथिल झाली धर्मबंधने । नास्तिक न मानिती वेदवचने । दिवसेंदिवस होमहवने । कमी होऊ लागली ॥३७॥ सुटला धर्माचा राजाश्रय । अधर्मप्रवर्तका नाही भय । उत्तरोत्तर नास्तिकमय । भरतखंड जाहले ॥३८॥ नाना विद्या कला । अस्तालागी गेल्या सकला । ऐहिक भोगेच्छा बळावल्या । तेणे सुटला परमार्थ ॥३९॥ धर्मसंस्थापनाकारणे । युगायुगी अवतार घेणे । नानाविध वेष नटणे । जगत्पतीचे कर्तव्य ॥४०॥ लोक बहु भ्रष्ट झाले । स्वधर्माते विसरले । नास्तिकमतवादी मातले । आर्यधर्माविरुद्ध ॥४१॥ मग घेतसे अवतार । प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार । अक्कलकोटी साचार । प्रसिद्ध झाला स्वामीरुपे ॥४२॥ कोठे आणि कोणत्या काळी । कोण्या जातीत कोणत्या कुळी । कोण वर्णाश्रम धर्म मुळी । कोणासही कळेना ॥४३॥ ते स्वामी नामे महासिद्ध । अक्कलकोटी झाले प्रसिद्ध । चमत्कार दाविले नानाविध । भक्त मनोरथ पुरविले ॥४४॥ त्यांसी साष्टांग नमोनी । करी प्रार्थना कर जोडोनी । आपुला विख्यात महिमा जनी । गावयाचे योजिले ॥४५॥ तुमचे चरित्र महासागर । पावेन कैसा पैलतीर । परि आत्मसार्थक करावया साचार । मीन तेथे जाहलो ॥४६॥ किंवा अफाट गगनासमान । अगाध आपुले महिमान । अल्पमती मी अज्ञान । आक्रमण केवी करू ॥४७॥ पिपीलिक म्हणे गिरीसी । उचलून घालीन काखेसी । किंवा खद्योत सूर्यासी । लोपवीन म्हणे स्वतेजे ॥४८॥ तैसी असे माझी आळ । बाळ जाणूनी लडिवाळ । पुरविता तु दयाळ । दीनबंधू यतिवर्या ॥४९॥ कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥५०॥ ऐसी ऐकुनिया स्तुती । संतोषली स्वामीराजमूर्ति । कविलागी अभय देती । वरदहस्ते करोनी ॥५१॥ उणे न पडे ग्रंथांत । सफल होतील मनोरथ । पाहूनी आर्यजन समस्त । संतोषतील निश्चये ॥५२॥ ऐसी ऐकोनि अभयवाणी । संतोष झाला माझिया मनी । यशस्वी होवोनी लेखणी । ग्रंथसमाप्तीप्रति होवो ॥५३॥ आतां नमू साधुवृंद । ज्यासी नाही भेदाभेद । ते स्वात्मसुखी आनंदमय । सदोदित राहती ॥५४॥ मग नमिले कविश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर । ज्यांची काव्ये सर्वत्र । प्रसिद्ध असती या लोकी ॥५५॥ व्यास वाल्मिक महाज्ञानी । बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी । वारंवार तयांच्या चरणी । नमन माझे साष्टांग ॥५६॥ कविकुलमुकुटावतंस । नमिले कवि कालिदास । ज्यांची नाट्यरचना विशेष । प्रिय जगी जाहली ॥५७॥ श्रीधर आणि वामन । ज्यांची ग्रंथरचना पाहोन । ज्ञातेही डोलविती मान । तयांचे चरण नमियेले ॥५८॥ ईशचरणी जडले चित्त । ऐसे तुकारामादिक भक्त । ग्रंथारंभी तया नमित । वरप्रसादाकारणे ॥५९॥ अहो तुम्ही संत जनी । मज दीनावरी कृपा करोनी । आपण हृदयस्थ राहोनी । ग्रंथरचना करवावी ॥६०॥ आता करू नमन । जे का श्रोते विलक्षण । महाज्ञानी आणि विद्वान । श्रवणी सादर बैसले ॥६१॥ महापंडित आणि चतुर । ऐसा श्रोतृसमाज थोर । मतिमंद मी त्यांच्यासमोर । आपले कवित्व केवी आणू ॥६२॥ परी थोरांचे लक्षण । एक मला ठाउके पूर्ण । काही असता सद्गुण । आदर करिती तयाचा ॥६३॥ संस्कृताचा नसे गंध । मराठीही न ये शुद्ध । नाही पढलो शास्त्रछंद । कवित्वशक्ती अंगी नसे ॥६४॥ परी हे अमृत जाणोनी । आदर धरावा जी श्रवणी । असे माझी असंस्कृत वाणी । तियेकडे न पहावे ॥६५॥ न पाहता जी अवगुण । ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण । एवढी विनंती कर जोडोनी । चरणी आपुल्या करीतसे ॥६६॥ स्वामींच्या लीला बहुत । असती प्रसिद्ध लोकांत । त्या सर्व वर्णिता ग्रंथ । पसरेल समुद्रसा ॥६७॥ त्या महोदधीतुनी पाही । अमोल मुक्ताफळे घेतली काही । द्यावया मान सूज्ञाही । अवमान काही न करावा ॥६८॥ की हे उद्यान विस्तीर्ण । तयामाजी प्रवेश करोन । सुंदर कुसुमे निवडोन । हार त्यांचा गुंफिला ॥६९॥ कवि होवोनिया माळी । घाली श्रोत्यांच्या गळी । उभा ठाकोनि बद्धांजुळी । करी प्रार्थना सप्रेमे ॥७०॥ अहो या पुष्पांचा सुवास । तृप्त करील आपुले मानस । हा सुगंध नावडे जयास । तेचि पूर्ण अभागी ॥७१॥ आता असोत हे बोल । पुढे कथा बहु अमोल । वदविता स्वामी दयाळ । निमित्त मात्र विष्णुकवि ॥७२॥ वैराग्य प्रत्यक्ष शंकर । तेजे कैसा सहस्त्रकर । दुष्टां केवळ सूर्यपुत्र । भक्तां मातेसमान ॥७३॥ यतिराजपदकल्हार । विष्णुकवि होऊनी भ्रमर । ज्ञानमधुस्तव साचार । रुंची तेथे घालीतसे ॥७४॥ इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आदरे भक्त परिसोत । प्रथमोऽध्याय गोड हा ॥७५॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय भावार्थ
श्री गजाननाला स्मरून , श्री शारदेला स्मरून , श्री दत्तगुरूंना स्मरून , श्री कुलदैवतेस नमन करून , अक्कलकोट याठिकाणी निवास करणाऱ्या पूर्ण दत्त दिगंबराचे स्वरूप असणाऱ्या स्वामी समर्थांसी नमन
जो स्वतः ब्रह्मानंद स्वरूप आहे , जो परमसुख देणारा आहे , जी ज्ञानाची मूर्ती आहे , जो सुख आणि दुःख या द्वंद्वाविरहित आहे , जो आकाशासमान नितळ , अथांग आहे तुझ्यासारखे दुसरे कुणीच नाहीय , जो प्रत्येकाच्या बुद्धीचा साक्षीदार आहे , ज्याच्यामध्ये भाव आहे आणि सत्व , रज आणि तम या त्रिगुणांसहित तो भाव आहे अशा सद्गुरूंना माझा प्रणाम
जगाच्या रक्षणकर्त्या तुझा जयजयकार असो , भक्तांच्या पालनकर्त्या तुझा जयजयकार असो , जगातील अज्ञान दुर करणाऱ्या तुझा जयजयकार असो , हे जगद्गुरू तुझा जयजयकार असो , क्षीरसागरवर विराजमान असणाऱ्या विष्णुदेवता तुझा जयजयकार असो , जो मायेचे चक्र चालवत आहे म्हणजेच या पृथ्वीवरील सर्व क्रियांवर ज्याचे लक्ष आहे. अशा शेषावर आरूढ असलेल्या नारायणा तुझा जयजयकार असो ,
स्वामी चरित्र सारामृत अध्याय २
ज्याचा चेहरा मेघाप्रमाणे शांत आहे , मस्तकावर मुकुट शोभून दिसत आहे , तोच स्वयंभू अर्थात त्यालाच आदित्य म्हणजेच सूर्य असे संबोधले आहे त्याचे कारण असे कि त्याचे तेज सूर्यासमान आहे , मोठे कपाळ पाणीदार डोळे , सरळ नाक आणि सुंदर हास्य , हसताना दिसणाऱ्या सुंदर दंतपंक्ती , गौरवर्ण शोभून दिसणाऱ्या देवतेला मी नमन करतो , ज्याच्या हृदयावर रत्नांच्या माळा शोभून दिसत आहे , सूर्याप्रमाणे तेज असणारे दागिने शोभून दिसत आहे , याठिकाणी कौस्तुभ मण्याचा उल्लेख केलेला आहे हा मणी समुद्रमंथनाच्या वेळी शेष नागाच्या मस्तकी होता म्हणून भगवान विष्णूनी घातलेल्या अनमोल रत्नांमध्ये कौस्तुभ मण्याचा उल्लेख येतो , विधात्यामध्ये असणारे वात्सल्य म्हणजेच एक प्रकारे भक्तीचीच खूण आहे , नाभिकमळ म्हणजे ज्या ठिकाणी साक्षात ब्रह्म देवाची उत्पत्ती झालेली आहे म्हणजेच त्यापासूनच चराचर सृष्टी निर्माण झालेली आहे तेच सर्व व्याप्तीचे मूळ आहे . लांबसडक असणारे हात शोभून दिसत आहे , त्या हातांमध्ये कंकणे शोभून दिसत आहे , म्हणूनच हातांचा आकार जणू कमळाप्रमाणेच दिसत आहे त्याच हातामध्ये भक्तांना धीर देण्यासाठी चारही हातात आयुधे आहे शंख , चक्र , पदम आणि गदा हि आयुधे शोभून दिसत आहे . पितांबर धारण केलेल्या देवतेचे तेज हे अपार आहे , कर्दळीच्या खांबाप्रमाणे उभ्या असलेल्या देवतेची प्रतिमा अगदी मनाला सुखावून टाकते . ज्यामध्ये कमळाचा वास आहे , ज्याच्या सानिध्यात वेद शिणून गेले आहे , ज्याला चौदा विद्या , चौसष्ठ कला अवगत आहे , अशा देवतेपुढे माझ्या अल्पमतीचे वर्णन कसे करू ? ब्रह्मदेवाचे पुत्र असणारे नारद , व्यास वाल्मिकी याठिकाणी लिहून गेले तेथे मी ते काय लिहिणार ? जो सगळ्या जगाचा निर्माणकर्ता आहे , साक्षात समुद्राची मुलगी म्हणजेच लक्ष्मी त्याची भार्या आहे , सर्व गोष्टींचे कारण तो आहे अशा देवतेस म्हणजेच भगवान विष्णूस आपण नमूयात. जो सगळ्या कलांचा देव आहे , चौसष्ठ कला त्यास अवगत आहे , जो रिद्धी सिद्धींचा दाता आहे , मंगलकार्याच्या सुरुवातिला त्याची पूजा सर्वात आधी केली जाते ज्याने कार्य निर्विघन पार पडते ज्याने भक्तास दिव्यत्वाची प्राप्ती होते . कित्येक ऋषी आपल्या काव्याची रचना करण्याआधी गजानना तुझी पूजा करतात . त्याच गजाननास साष्टांग नमन करून स्वामी चरित्र सारामृताची सुरुवात याठिकाणी करतो आणि ते सारामृत निर्विघ्नपणे पूर्ण होवो हि इच्छा मांडतो .
जिचा आशीर्वाद मिळताच अगदी मूर्खही एक विद्वान होतो , जीचे नमन साक्षात ब्रह्मसुताने म्हणजेच नारदाने केलेले आहे , माझी बुद्धी मूढ आहे , मला काव्याचे ज्ञान नाहीय , हे माते माझ्यावर प्रसन्न होऊन तू माझ्याकडून या ग्रंथाची रचना करवून घ्यावी . जो अज्ञानासारखा अंधकार नाहीसा करतो , जो अविद्येचा नाशक आहे , जो सद्बुद्धीचा प्रकाश सर्वदूर पसरवतो अशा गुरुवर्यास माझा नमस्कार . त्यांच्याच कृपेने आपण सर्वांना असणाऱ्या आई वडिलांनाही मी माझा साष्टांग नमस्कार कारण तेही आपले आद्य गुरु आहेत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाहीय . मी एक मतिमंद मूढ बालक आहे . माझे लाड पुरविणारे तुम्हीच एक आहात .
नऊ महिने नऊ दिवस जिने आपल्या पोटात मला वाढवले , माझ्यासाठी कित्येक प्रसव वेदना सोसल्या , पुढे माझे पालन पोषण करून लाडा कोडात मला वाढवले तिच्याशिवाय अन्य कुणी माझे दैवत नाहीय अशा मातारूपी माझ्या देवतेला माझा साष्टांग नमस्कार . ब्रह्म , विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे अवतार असणाऱ्या त्रिमूर्ती दत्त दिगंबरास माझं नमन . ज्यांना तीन मुख , सहा हात आहेत , गळ्यात पुष्पमाळा आणि कानामध्ये कुंडले शोभून दिसत आहे ज्यांचे तेज एका विजेसारखे आहे . जवळच कपिल अर्थात गाय उभी असून खांद्यावर झोळी आहे एके ठिकाणी पाहूनही ती दिसेनाशी आहे . जवळच चार श्वान दिसत आहे याठिकाणी त्या श्वानास चार वेदांची उपमा दिली आहे . ज्यांचा वावर त्रिभुवनात होत आहे . त्या परब्रह्मास मी नमन करतो
कि त्याच्या कृपेने माझे स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो हि सदिच्छा .
या दुस्तर अशा युगात कलीचा अघोरीपणा वाढत चालला आहे , लोक पाप करू लागली आहेत ज्याने धरणीमातेचा संताप झाला आहे , लोकही धर्मभ्रष्ट होऊ लागले आहेत , ,आपल्या धर्मास विसरून नास्तिकतेकडे लोकांचा कल वाढत चालला आहे . ज्याचा परिणाम म्हणून सगळीकडे दुःख दारिद्र्य याची उत्पत्ती होत चालली आहे , होमहवन कमी होऊन नास्तिकतेचे साम्राज्य सगळीकडे वाढत चालले आहे , धर्माचा आश्रय सोडून आर्य समाज वैभवहीन आणि असंपन्न होऊ लागला आहे यामुळे संपूर्ण भारतभूमी नास्तिक झालेली आहे . सर्व कला – विद्या यांचा अस्त होत चालला आहे या कला विद्येची जागा भोग आणि व्यसनांनी घेतली आहे ज्यामुळे परमार्थ करणेही मनुष्याला शक्य होत नाहीय . या सर्वांवर वार करण्यासाठी म्हणजेच धर्म रक्षणासाठी , धर्म संस्थापित करण्यासाठी जगाच्या अधिपतीला साक्षात अवतार घ्यावा लागला , त्याचा जन्म कोठे झाला अद्याप कुणालाही माहिती नाही , त्याची जात ठाऊक नाही ना त्यांचे कूळ माहिती तेच स्वामी समर्थ या नावाने संपूर्ण अक्कलकोटी आपल्या वेगवेगळ्या लीलांनी प्रसिद्ध झाले . त्यांना माझा साष्टांग नमस्कार माझा नमस्कार आपल्यापर्यंत पोचेल म्हणूनच आपला महिमा मी सांगायचे दिव्य हाती घेतले आहे .
तुमचे चरित्र एका महासागराप्रमाणे विस्तीर्ण आहे , चरित्र एवढे विस्तीर्ण आहे कि आम्हास महासागराचा काठ सुद्धा दिसत नाहीय आपले चरित्र समजून घेण्यासाठी मला येथे मासा व्हावं लागलं आहे आपली महती हि गगनापेक्षाही विस्तीर्ण आहे आपल्या महतीपुढे माझी बुद्धी तोकडी पडत आहे . मुंगी पर्वतास म्हणते कि तुला उचलून माझ्या काखेत घालेन आणि सूर्याला खोदून त्याचे तेज लोपवून टाकेन . त्याचप्रमाणे मी या ठिकाणी मला मुंगी समजतो तू मला तुझा लडिवाळ करून घे तुमचे चरित्र हे एका पर्वतासमान आहे माझ्याकडून काही आगळीक झाली तर तुम्ही दयाळूप्रमाणे ती पोटात घालावी . याठिकाणी माझ्याकडून चांगले कार्य घडवून घेणारा कर्ता आणि करविता तुम्हीच आहात येथे मीपणा माझ्यात नको येऊ देत , याठिकाणी आपले असे स्तवन ऐकून स्वामी महाराज सुखावले आणि आशीर्वादरूपी आपले हात भक्ताच्या डोक्यावर अभय स्वरूप ठेवतात आणि म्हणतात तुझ्या लिहिलेल्या आमच्या चरित्रात कसलीच उणीव भासता कामा नये , तुझे मनोरथ याठिकाणी पुरे होवोत आणि समस्त आर्य समाज हे सारामृत वाचून संतुष्ट होतील . स्वामींची अशी अभयवाणी ऐकून भक्ताच्या मनात एक प्रकारचा एक आत्मविश्वास निर्माण होऊन ग्रंथसमाप्ती पर्यंत आपली लेखणी यशस्वी झाली पाहिजे .
आता साधूंना माझा नमस्कार त्या साधुजनांना त्यांना भेदाभेद माहिती नाही , जे आपल्या कामामध्ये जे सुखी आहेत ते सदासर्वकाळ आनंदित राहोत , शब्दसृष्टीचे रचनाकार अशा कवीना माझा नमस्कार , महाभारताचे रचनाकार कवी व्यास आणि रामायणाचे रचनाकार कवी वाल्मिकी यास वारंवार माझा साष्टांग नमस्कार , कवी कालिदास यांचीही रामायण आणि महाभारतावरील काव्य आणि नाट्यरचना संपूर्ण जगात लोकप्रिय आहे . कवी श्रीधर आणि वामन यांची ग्रंथरचना इतकी अद्भुत आहे कि उत्कृष्ट वक्ते आणि सर्व जाणकार असलेले ज्ञातेही आपल्या माना डोलावतात . या सर्व कवीश्वरांच्या चरणी मी नतमस्तक होत आहे . ज्यांचे चित्त सदोदित ईश्वराच्या चरणी आहे असे संत तुकारामांसारखे भक्त आणि कवी ग्रंथाच्या आरंभी आपणास नमितो जेणेकरून आपला वर प्रसाद अर्थात आशीर्वाद माझ्यावर सदैव राहील , आपण सर्व संत जन माझ्यासारख्या गरिबावर कृपा करून , माझ्या हृदयात विराजमान व्हावे जेणेकरून माझ्याकडून सर्व ग्रंथरचना करवून घ्यावी
आता समस्त श्रोत्यांच्या चरणी माझा नमस्कार व वक्त्यापेक्षाही श्रोता कधीही विलक्षण अशा श्रोत्यांनाम म्हणजेच जे महाज्ञानी आणि विद्वान असे आहेत असेच महान आणि ज्ञानी पंडित त्यांच्या समोर मी मतिमंद आपले काव्य कसे मांडू ? त्याच थोरांचे मोठ्यांचे एक लक्षण जे आहे ते असे कि कुठलाही सद्गुण जरी असला तरी त्याचा आदर केला जातो , त्यात मला संस्कृत भाषेची आवड नाही , कुठलेही शास्त्राचा मी जाणता नाही , तितके सुंदर कवित्व मला अवगत नाही तरीही हे सर्व अमृताप्रमाणे मानून त्याचा आदर करावा . माझी बोली असंस्कृतपणा ची आहे , त्यामुळे कुठलाही अवगुण न पाहता केवळ चांगल्या गोष्टींची कदर करावी हीच आपल्या चरणी विनंती आहे .
स्वामींच्या लीला अगाध आहेत आणि त्या सर्वत्र प्रसिद्ध आहे त्या लीलांचे वर्णन करत असता ग्रंथ समुद्राप्रमाणे पसरेल , त्याच महोदधी म्हणजेच मंत्र शास्त्रांची ज्या मध्ये सामाविष्टता असते त्या महोदधीतून काही अनमोल अशी शब्दरूपी फळे मी घेतली आहे त्यास कृपा करून योग्य असा मान द्यावा त्याचा अवमान करू नये . महोदधीला याठिकाणी एका उद्यानाची उपमा दिली आहे कवी म्हणतात , हे उद्यान विस्तीर्ण आहे या उद्यानांमधून काही निवडक पण चांगली शब्दरूपी फुले वेचली गेली आहे य याठिकाणी मी स्वतः कवी म्हणून त्या सर्व शब्दरूपी फुलांचा हार तयार केला आहे आणि सर्व श्रोत्यांच्या गळ्यामध्ये माळला आहे आणि हात जोडून प्रार्थना करतो आहे . या फुलांचा सुवास आपणास तृप्त करेल आणि ज्यांना हा सुवास नाही आवडणार त्यांच्यापेक्षा अभागी कुणीच असू शकत नाही .
आता हे माझे म्हणणे इथपर्यंत कारण पुढे कथा खूप अनमोल अशी आहे या सर्व कथेचे कवी म्हणजे कविराज विष्णू हे एक प्रकारे निमित्तच भक्तांना आईप्रमाणे मानणाऱ्या , वैराग्य म्हणजे साक्षात महादेव , आणि कवी विष्णू याठिकाणी एका भ्रमराप्रमाणे गुंजारव करत आहे जेणेकरून ज्ञानाचे माधुर्य सर्वांपार्यंत पोचवत आहे . म्हणूनच याठिकाणी पहिला अध्याय हा चवीने गोड व्हावा.
===================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.