
कीर्ती खूप शांत स्वभावाची मुलगी आणि विशेष म्हणजे खिलाडूवृत्तीची मुलगी म्हणजे कुठेही अन्याय झाला की कीर्तीला खपत नसे मग आपलं म्हणं पटवून देण्यासाठी इकडचा डोंगर तिकडे करणारी,आपल्या कामाशी काम ठेवणारी आणि मैत्रिणीही हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या.. मुळातच शांत स्वभाव असल्याने गप्पिष्ट स्वभावाची कीर्ती नव्हती म्हणूनच तिची काळजी आई आणि वडिलांना खूप लागून राहत असे…एके दिवशी असंच कीर्तीच्या आई आणि वडिलांचं बोलणं चालू होत..
आई – अहो…ऐकताय ना…आपली कीर्ती केवढी शांत स्वभावाची आहे…कसं होईल तीच कोण जाणे..चांगलं घर मिळालं तर बरं होईल..कारण खूपच मनमोकळी आहे हो ती…आता बोलत नाही जास्त म्हणून स्वभाव खटकत असेलही तिचा पण तिचीही काही तत्त्व असतील आपल्या जीवनाविषयी..ऐकताय ना…आणि पेपर मध्ये का डोकं खुपसून बसलात तुम्ही…परीक्षा आहे का उद्या…घरातला प्रश्न सोडवा आधी आपल्या कीर्तीच्या लग्नाचा….
वडील – अहो….मनोरमाबाई…सगळं आपल्या हातात असत का वरती आहे ना बसलेला त्याला सगळी काळजी..आपण फक्त कार्य करायचं…
आई – अहो…निमकर पण…असं घरात बसून हात–पाय न हलवताच होणार आहे का सगळं…कार्य करायला तर हात –पाय हलवणार की नाही की ते देवालाच हलवावे लागतील…
वडील – मनोरमाबाई…अहो बरं उद्याच घेऊन येतो मुलाच्या वडिलांना..मग तर झालं…
आई – खरंच मग आज अचानक सांगताय तुम्ही…नशीब तेवढे तरी कष्ट घेतले नाहीतर डायरेक्ट काहीही न कळवताच भेटायला आणला असत त्यांना…आता खडीसाखर ठेवते देवापुढं
वडील – मनोरमाबाई…अहो अजून बोलणी तर होऊ देत की…आपला काहीही ठरलंही नाही आणि तुम्ही मात्र मनात मांडे भाजत बसलात…
आई – असू देत हो…निमकर..खूप मस्त वाटतंय बातमी ऐकून म्हणून आपलं दाखवला नैवेद्य…
ठरवल्याप्रमाणे कीर्तीच्या वडिलांनी त्यांच्या मित्राला घरी चहा–पानासाठी बोलावलं…मग फक्त दाखवण्याचा कार्यक्रमही झाला नाही तिचा फक्त मिस्टर निमकरांचे मित्र कीर्तीला पाहून आणि तिच्याशी बोलून निघाले..मग मुलाला विचारून कळवतो असं त्यांनी सांगितलं आणि आपल्या मित्राचा निरोप घेऊन निघाले..
आणि तेही मनोमनी खूप खुश होते आणि नंतर परत आपल्या मुलाला घेऊन येतो असं आश्वासनही त्यांनी कीर्तीच्या वडिलांना दिलं…चार–पाच दिवसांनी दोघेजण कीर्तीच्या घरी भेटायला म्हणून आले आणि कीर्तीला पसंत केलं..आणि पसंत करून गेल्यावर मनोरमाबाई आणि मिस्टर निमकरांची झालेली चर्चा—
आई – अहो…निमकर ऐकलंत का…स्थळ अगदी उजवं आहे हो आपल्या कीर्तीसाठी…नाव पण अगदी साजेसं आहे…जावईबापूंच…यश मोहिते…आपल्या मुलीचं नाव कीर्ती आणि जावईबापूंच यश…खरंच कीर्ती आणि यश…
वडील – नावाचं काय घेऊन बसलात तुम्ही…मी यांची नोकरी पाहून पसंत केलंय त्यांना सी.ए. आहे माझा जावई..महिन्याला कमावतात की लाखभर रुपये…तुम्हा बायकांना काय नावाचं पडत काय माहिती…!
आई – स्वभाव कसा आहे काय माहिती … मला तरी काही वाईट नाही वाटले हो…आपल्या मुलीच्या हेकेखोरपणाबद्दल काळजी वाटते बस्स…
वडील – अहो…झाली का शंका काढायला सुरुवात..तुम्ही बायका म्हणजे ना कहर आहात नुसत्या…आणि आता नाही का तुम्हाला…गोडाचा नैवेद्य करायचा…जा आणि चांगला शेवयाच्या खीरीचा नैवेद्य दाखवा
आई – अगदी सांगायची गरज नाही हा…आम्हा बायकांना तेवढ कळत बरं…
अगदी थाटामाटात कीर्ती आणि यशचा लग्नसोहळा पार पडला आणि कीर्ती स्वभावाने शांत असल्याने सगळीकडे मिसळायला आणि वावरायला जरा वेळच लागला लग्न झाल्यावर सुपारी आणि हळद खेळताना याचा प्रत्यय सर्वांनाच आला….कारण मुलीचा स्वभाव ओळखण्यासाठी म्हणून हे खेळ खेळले जातात याची कल्पना सासरकडच्यांना होती परंतु कीर्तीला याबाबतीत काहीच माहिती नव्हती…सुपारी खेळतानाचा एक प्रसंग…
कीर्तीच्या नणंदबाई सकाळी लवकर उठूनच तयार होत्या..मग कीर्ती उठली आणि पंकजा ताईंनी म्हणजेच नणंदबाईनी कीर्तीला जुनी वापरातली साडी नेसायला सांगितली…आणि कीर्तीही साडी नेसून आली आणि सुपारीचा खेळ खेळायला बसली…दोन मस्त पाट मांडले होते..आणि एका खोलगट मोठ्या भांडयात कुंकवाचं पाणी होतं आणि यश आणि कीर्ती दोघांनाही पाटावर बसायला सांगितले तसे नंणंदबाईनी आपल्या बोटातली अंगठी पाण्यात टाकली आणि दोघानांही पाण्यातून काढायला सांगितली ज्याला पहिली अंगठी सापडली तो जिंकला आणि ज्याला नाही सापडली तो हरला आणि मग यश तीनही वेळेस जिंकला मग मात्र कीर्तीची खिलाडूपणा जागा झाला…त्यानंतर सुपारीचा खेळ कीर्तीला काहीही करून जिंकायचा होता मग तिने तसा प्रयत्न करायचं ठरवलं मग मात्र कीर्ती अगदी पदर खोचून तयार होती…मग सुपारी कशी पकडायची आणि हातातून कशी काढायची हे दोघांनाही समजावले की, मुलीने दोन हातानी सुपारी सोडायची आणि मुलाने फक्त एका हाताने सुपारी सोडायची मग कीर्तीला आधी अंगठी शोधता आली नाही म्हणून ती कसर या सुपारीच्या खेळात भरून काढणार होती,
पंकजा – कीर्ती…अगं काढ सुपारी दादाच्या हातामधून…बघ बाई संसार तुझ्या हातात आला पाहिजे,सुपारी नाही काढलीस तर गेला संसार यशच्या हाती…[कीर्तीला खिजवत नणंदबाई म्हटल्या]
यश – हम्म…काढा…[आपली पकड घट्ट केली ]
कीर्ती – [खूपच आवेशात तिने पकड सोडली आणि सुपारी काढली असं तीनही वेळा कीर्तीने सुपारी काढली ] अय्या….! जिंकले मी…माझ्या हाती संसार…
सगळी मंडळी पाहत होती ती आश्चर्याने कारण नवरी मुलगी खूपच डॅशिंग वाटली सगळ्यांना.. त्याचबरोबर जमलेल्या पाहुणे मंडळीतही कुजबुज झाली…‘बाई ग ..यश पेक्षा कांकणभर जास्तच आहे ही मुलगी,यशच काही खरं नाही….’ नणंदबाई म्हणजे पंकजाताई ही सगळी कुजबुज ऐकत होत्या…आपल्या भावजयीची सगळ्यांनी एवढ्या लवकर पारख केली म्हणून…थोड्या ओशाळल्या होत्या…परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन उलट भावजयीला म्हणजेच कीर्तीला त्या प्रोत्साहन देत म्हणाल्या
पंकजा – चल…कीर्ती…आता तुझी टर्न…सोडू नकोस…पकड के रख…! [कीर्तीने सांगितल्याप्रमाणे पकड घट्ट ठेवली तितक्यात यश म्हणाला]
यश – हम्म….सोड की मूठ…काय घट्ट पकडलीस मूठ… हात दुखतोय माझा
तरीही कीर्तीने खूपच आपली मूठ आवळून पकडली होती काही केल्या यशला मूठ सुटेना कारण एका हाताने सोडायची होती ना..मग खूपच कष्ट घ्यावे लागले पण तरीही कीर्ती मूठ सोडत नव्हती मग बऱ्याच प्रयत्नाने तीनही वेळा यश ला मूठ सोडता आलीच नाही..आणि कीर्ती ला खूप आनंद झाला कारण ती या वेळेला जिंकली होती…मग काय सुनबाईंचं कौतुकच आला बाई संसार हातात..असं लोक हसत हसत म्हणू लागले आणि कीर्ती पण हसू लागली.. .. मग पूजा झाल्यावर घ्यायला पाचपरतवणे साठी कीर्तीच्या माहेरून काही नातेवाईक आले आणि चार दिवसांसाठी कीर्तीला माहेरी पाठवण्यात आले..मग माहेरी आल्या आल्या सासरच्या गमती जमती सांगू लागली–
कीर्ती – आई …तुला काय सांगू…काय मज्जा आली काल खेळ खेळताना..
आई – मज्जा…सांग बरं तुझी मज्जा..?
कीर्ती – अगं..आई मला अंगठी पहिल्या खेळात सापडली नाही…पण दुसऱ्या खेळात मात्र माझीच बाजी
होती..मीच जिंकले नंतर…काय त्रास झाला त्यांना माझी मूठ उघडताना त्यांना काही केल्या उघडताच नव्हती माझी मूठ…हा…हा..[असे म्हणून मोठ्याने हसू लागली]
आई – काय ? तू असं वागलीस तिथं..काय वाटलं असेल त्यांना…अगं संसार सांभाळायचा म्हणजे असं करून नाही चालत..
कीर्ती – आई….इट्स अ गेम यार….सो लिव्ह इट…!
आई – लिव्ह इट काय…अगं तू किती हट्टी आणि खुनशी आहेस हे कळलं सगळ्यांना…अगं संसार म्हणजे काय स्पर्धा असती का? हार काय जीत काय सगळं माफ असतं गं…आणि घरातल्यांशी कसली स्पर्धा करतेस…किती त्रास झाला असेल जावईबापूंना हात दुखत असतील किती…त्रास झाला असेल त्यांना..अगं बाळा मुलीचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्यासाठी असले खेळ लग्नानंतर खेळावे लागतात किंवा खेळायला लावतात…
कीर्ती – मला माहिती नव्हतं गं आई…काय करू आता मी…
आई – काही करू नकोस…फक्त संसारात स्पर्धा करू नकोस एकमेकांशी…आणि नीट वाग आपला हेकेखोरपणा आणि खुनशी स्वभाव सोड…आणि दुसर्यांना त्रास होऊ नये हे ही संसारात पाहावं लागत तू तर खेळातच आपली चमक दाखवलीस…
कीर्ती – आई…बरं झालं मला सांगितलंस सगळं…मी काळजी घेईल इथून पुढे…
असं चांगले विचार सांगून…मनोरमाबाईंनी चार दिवसांनी आपल्या लेकीची बोळवण केली…आणि कीर्तीही आपल्या संसारात एकदम रमली.
तात्पर्य – संसारात एकमेकांशी स्पर्धा करून चालत नाही..एकमेकांची काळजी घेण्यातच आपलं हीत असतं,खुनशी स्वभाव गरज असलेल्या ठिकाणीच वापरावा…
प्रिय वाचक मित्रहो आजच्या पिढीतल्या मुलींना आपल्या चाली-रीती,परंपरा माहिती नसतात…लग्नानंतर हळद फेडताना सुपारीचा खेळ हमखास खेळला जातो,खेळ खेळताना कोण हरतं आणि कोण जिंकत हे महत्वाचं नसतं…महत्वाचं असत ते फक्त एकमेकांना त्रास होऊ न देणं…पण आपल्या मुली अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीमुळे किंवा अल्लड स्वभावामुळे.. महत्व कशाला द्यावं ही गोष्ट विसरूनच जातात…कथेतील नायिका कीर्ती अशाच स्वभावाची म्हणून सासरी हळद फेडताना तिची नेमकी कुचंबणा होते म्हणून..सासरकडच्यांच्या नजरेत तिचा स्वभाव लवकर कळतो…हेखेखोरपणा,स्पर्धा या सगळ्या संसारातल्या डाव्या बाजू आहेत हेच या लेखाद्वारे सर्वांना सांगण्याचा छोटासा प्रयत्न…
==============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.