सुनेचा पायगुण

सौ.गीता गजानन गरुड
गोरासा कुरळ्या केसांचा रवी पंचवीसेक वर्षाचा होता. त्याची आईही गोरीगोमटी, गोल चेहऱ्याची होती. कपाळावर भलं मोठं कुंकू लावायची. तिचं विशेष म्हणजे अगदी टापटीप रहायची. चापूनचोपून नेसलेली साडी,तिच्यावर अगदी शंभर टक्के मेचिंग रंगाचा ब्लाऊज ..यामुळे ती ओळखीच्यांव्यतिरीक्त आजुबाजूच्या चार पाच कॉलनींतही परिचयाची होती.
रवीचं लग्न ठरलं. रवीचं मित्रमंडळ खूप होतं. पुऱ्या बिल्डींगला लाइटीच्या तोरणांनी सजवलं होतं. बिल्डींगमधल्या बायकांना बांगड्या भरण्यासाठी खास कासार बोलावला होता. बिल्डींगच्या भोवतालच्या जागेत मोठा मंडप उभारला होता. जागाही छान ऐसपेस होती. बिल्डींगमधील सारीजणं घरचं कार्य असल्यासारखी वावरत होती. आदल्या रात्री हळदीचं जेवण होतं. जेवणात दोन्ही शाकाहारी,मांसाहारी बेत होते. शाकाहारी थाळीत वेज पुलाव,बासुंदीपुरी तर मांसाहारी थाळीत वझरी,मटण,वडे असा सगळ्यांच्या आवडीचा बेत होता. रवीची आईही छान नटलीथटली होती. यजमान,यजमानीण दोघं जोडीने पाहुण्यांना पोटभर जेवण्याचा आग्रह करत होते.
त्या रात्री रवी व रवीचं मित्रमंडळ अगदी बेभान होऊन नाचलं. आखिर यार की शादी जो थी. मैत्रिणीही मस्त शरारा वगैरे घालून मुरडत होत्या.
दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळी पाहुणेमंडळी,बिल्डी़गमधले रहिवाशी पहाटे लवकर आवरून मंगल कार्यालयात गेले. वधूकडच्या मंडळींची व्यवस्था कार्यालयातच केली होती. ती मंडळी आदल्यादिवशी संध्याकाळी आली होती व पहाटे सगळं आवरून तयार झाली होती. बारा वाजून पाच मिनिटांनी लग्न लागलं. रवीच्या आईला थोडं अस्वस्थ वाटत होतं. तिला जरा पंख्याखाली बसवून पाणी वगैरे दिल्यावर ती सावध झाली व पुन्हा कामाला लागली. लग्नाला आलेल्या सुवासिनींच्या ओट्या भरणं,त्यांचा मानपान करणं..अशी बरीच कामं होती.
चारेक वाजता वधुने तिच्या माहेरच्यांना साश्रु नयनांनी निरोप दिला व वरात घराकडे चालू लागली. रवी व रेवाला मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेल्या रथात बसवले होते. वाजंत्री,वरातीत नाचणारं उत्साही मित्रमंडळ यांनी वरातीला रंगत आली होती. सुर्य आग ओकत होता पण कुणाला त्याचं भान नव्हतं. थंडा पीत, ठराविक अंतरावर फटाके वाजवत वरात चालली होती. वरात बिल्डींगच्या जवळ आली तसं बिल्डींगमधील बायकांनीही मन भरुन नाचून घेतलं. कुणीकुणी फुगड्याही घातल्या.
रेवानं मापटं ओलांडलं व सासरच्या घरात प्रवेश केला. नातेवाईकांच्या आग्रहास्तव नाव घेऊन झालं. रवी व रेवा,दोघांनाही रवीच्या आईने जोडीने जेवायला बसवलं. साधंच जेवण..वरणभात,मेतकूट,लिंबाची फोड,बटाट्याची भाजी..रवी व रेवा दोघांनाही रुचकर लागत होतं. करवल्यांच्या आग्रहात्सव एकमेकांना घासही भरवण्यात आले.
माहेर सोडून आल्यामुळे रेवाचा चेहरा अगदी उतरला होता. रवीच्या आईने तिच्या केसांवरून हात फिरवला,तिला जवळ घेतलं तेंव्हा रेवा मुसमुसू लागली. रवीची आई म्हणाली,”शहाणी ना तू रेवा. मग असं मुळूमुळू रडायचं नाही. तू असं रडत राहिलीस तर तिकडे तुझ्या आईबाबांना कसं करमणार.”
रवीच्या मावशी,काकीसोबत रवीच्या आईने घरातलं सारं आवरलं. रेवाला रवीच्या आत्तेबहिणीजवळ अंथरूण घालून दिलं. फार दमल्यामुळे रेवाचा लगेच डोळा लागला.
साधारण अडीच वाजले असतील,रवीच्या आईला कसंतरी होऊ लागलं. तिच्या छातीत दुखू लागलं. तिने आजुबाजूच्यांना साद घातली. रवीचे बाबा पटकन जागे झाले. रवीला उठवलं. रवीच्या आईला खूप घाम फुटला होता. रवीने लगेच रुग्णवाहिकेला फोन लावला. रुग्णवाहिका बिल्डींगच्या दारात उभी राहिली तसं रवी व रवीच्या बाबांनी दोघांनी तिच्या दोन्ही खांद्यांना धरुन तिला जिन्यातून खाली न्हेऊ लागले. एक जिना उतरला असेल..दुसऱ्या जिना उतरत असताना रवीची आई धाडकन खाली बसली. रवी आई आई हाका मारु लागला पण सगळं संपल होतं.
आनंदाच वातावरण क्षणात दु:खात बदलून गेलं. लग्नावरून आपापल्या घरी निघालेले पाहुणेसोयरे परत रवीच्या घरी आले. जे झालं ते आक्रित होतं. रवीची आई पंचतत्वात विलीन झाली. रवी सैरभैर झाला. धाय मोकलून रडत होता. त्याचे मित्र,आप्तस्वकीय त्याला धीर देत होते. एकमेकांना सांभाळा सांगत होते.
रेवाचं माहेर सोडल्याचं दु:ख बोथट झालं होतं कारण हे सासूविरहाचं दु:ख तिच्यापुढे आवासून उभं होतं. काहीजणी तिला धीर देत होत्या तर काही विक्षिप्त बायका मात्र आपापसात खुसपुसत होत्या,”आत्ताआत्तापर्यंत अगदी धडधाकट होती रवीची आई. असं अचानक काय झालं..पायगुण वगैरे म्हणतात तसं तर नाही..”
रेवाच्या कानावर हे शब्द गेले तसं तिला अगदीच उन्मळून पडल्यासारखं झालं. तिचं जेवणखाणही बंद झालं. रवीचे बाबा थोडे सावध होताच सुनेची घालमेल त्यांना जाणवली. ते अगदी रवीच्या आईप्रमाणेच रेवाच्या शेजारी जाऊन बसले. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले,”रेवा बेटा, झालं ते झालं. त्यात आपला कोणाचाही काहीही दोष नव्हता. लोकं दहा तोंडाने बोलणार. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. तुझा पायगुण खरंच शुभ आहे. या घरात यापुढे तुझ्या पावलांनी सगळं शुभ होणार याचा मला विश्वास आहे बाळा.”
त्या दिवसापासून रेवाने संसाराची धुरा तिच्या खांद्यावर घेतली. आलागेला,पैपाहुणा,रवी,रवीचे वडील सगळ्यांच मायेने करु लागली. रेवाच्या प्रेमळ वागण्याने ते घर लवकरच दु:खातून सावरलं.
रेवाच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं. तिच्या हनुवटीवरही रवीच्या आईच्या हनुवटीवर जसा तीळ होता तसाच होता. रवीच्या बाबांनी नातीकडे पाहिलं,तिला उचलून घेतलं,पत्नीच्या फोटोकडे नेत म्हणाले, सुनेचा पायगुण तुझ्या..मला सोडून गेलेली तू नातीच्या रुपात परत आलीस हो.
फोटोला घातलेल्या चाफ्याच्या हारातील एक फुल नातीवर हलकेच ओघळले.
——सौ.गीता गजानन गरुड.