सून जेंव्हा आई होते..

–©️®️सौ.गीता गजानन गरुड.
“का बरं भात सांडलात अण्णा ताटाबाहेर? किती म्हणून आवरायचं मी ?” मुग्धा मनातल्या मनात अण्णांवर चरफडली.
अण्णा..सहा फुट उंच, वय सत्तरी पार केलेलं, वयोमानानुसार थकलेले..मुग्धाचे सासरे. सव्वीस वर्ष झाली मुग्धाला या घरात येऊन.
अण्णांना पत्नीची साथ तशी अल्पकाळच लाभली. त्यांचा लेक, वैभव लहान असल्यापासनं त्यांनी त्याचा एकहाती सांभाळ केला होता.
काळाची पानं उलटत गेली. वैभव मोठा होत गेला..उमदा,सुशिक्षित तरुण झाला. नोकरीधंद्याला लागला.
अण्णांच्या दोस्ताची लेक मुग्धा, अण्णांना सून म्हणून पसंत पडली आणि वैभवनेही अण्णांच्या पसंतीवर शिक्कामोर्तब केलं. अवघ्या महिनाभरात मुग्धा व वैभवचं लग्न झालं.
मुग्धा घरात आली आणि कित्येक वर्ष बाईच्या स्पर्शाला आसुसलेल्या त्या घरानेही जणू कात टाकली. मुग्धा गोरीगोमटी,काळ्याभोर डोळ्यांची,सगळ्यांना आपलंस करणारी. अण्णांशीही तिचं छान सूत जमलंं.
सूनेला सकाळी उठल्यावर घाई व्हायला नको म्हणून अण्णा आदल्या दिवशी ताज्या भाज्या आणून,निवडून फ्रिजमधे ठेवून द्यायचे. दळण घेऊन यायचे. लाईटबील,मेंटेनन्स,दुधाचं बील,पासबुकवर एन्ट्री करुन आणणं,..ही आणि अशी बरीच कामं हातावेगळी करायचे.
एकेका रुमची साफसफाई करणं,कोळीष्टकं काढणं, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवणं हे सारंच न कंटाळता करायचे.
मुग्धा अण्णांवर खूष होती. तिला कधी माहेरी जायचं झालं तर अण्णांच्या हाती नवऱ्याला व लेकाला सोपवून ती खुशाल जायची कारण अण्णांना कुकर लावणं,भाजी आमटी करणं व्यवस्थित जमायचं.
अण्णांचा नातू मयंक बारावीत जाईपर्यंत त्याचं खाणंपिणं, त्याच्या शाळेच्या वेळा..सगळ्याकडे अण्णांचं काटेकोर लक्ष असायचं. अगदी तो होस्टेलला रहायला गेला तेंव्हा तिथे त्याचं बस्तान बसवण्यासाठीही वैभवने अण्णांना सोबत न्हेलं होतं..
मयंक होस्टेलला गेल्यापासनं रिकामा वेळ अण्णांना खायला उठायचा. नाही म्हणायला मित्रांची सकाळसंध्याकाळ सोबत असायची.
मुग्धाला वरची पोस्ट मिळाल्याने ती तिच्या कामात अधिकच व्यस्त झाली होती. वैभवही नोकरीसोबतच काहीतरी वेंचर सुरु करण्याच्या प्रयत्नात होता. यात साताठ महिने झाले,या दोघांनी अण्णांना ग्रुहितच धरलं होतं. सकाळी जाताना दोन चार शब्द नि झोपण्याअगोदर दोनचार शब्द..एवढंच काय ते अण्णांशी बोलत.
अण्णा सकाळ,संध्याकाळ दोस्तांसोबत फिरुन यायचे खरे पण गेल्या महिन्यात त्यांचा जीवश्च कंठश्च मित्र त्यांना सोडून गेल्यापासनं ते बाहेर फिरायचेच बंद झाले. तासनतास घरातच बसून राहू लागले. बोलणार कोणाशी घराच्या चार भिंतींशी? त्या भिंतीही त्यांना त्यांच्या अंगावर येताहेतशा वाटायच्या.
कधी वाटायचं,तो गेलेला मित्र बोलवतोय आपल्याला. म्हणतोय,ये रे अण्णा इकडे. सोबत होईल तुझी मला मग अण्णांना घाम फुटायचा तर कधी चाळीसेक वर्षांपुर्वी अकाली निधन झालेल्या पत्नीची आठवण यायची. अजुन असेल का ती वेटींगवर का दुसरा जन्म मिळाला असेल तिला? असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात थैमान घालायचे.
अण्णांना खरंच कोणतरी बोलाचालायला हवं होतं असं कोणतरी ज्याच्याशी ते आपल्या मनातलं शेअर करतील असं.
अण्णांचं तंत्र बिघडत चाललेलं. एखादं मशीन बिघडत जावं तसं काहीसं त्यांच्या मेंदूचं होत होतं. वाळलेल्या कपड्यांची घडी करणं सोडा,अण्णा स्वतःचेच कपडे कुठेही अस्ताव्यस्त टाकू लागले होते. बेडवरची चादर अस्ताव्यस्त करुन ठेवायचे. कधी किचनमधे पसारा करुन ठेवायचे. कुठूनसा बेशिस्तपणा आला त्यांच्या अंगात.
बाजारात गेले की तासनतास बाजारात भटकायचे. उगीचच भाजीवाल्याशी वाद घालायचे. सगळंच अतर्क्य..अगम्य.
एकेदिवशी तर बँकमधे चेकबुक विसरुन आले. वैभवने चेकबुकाबाबत विचारलं तर ..”असेल इथेच कुठेतरी.” हे उत्तर. वैभव,मुग्धा दोघंही शोधून दमली. शेवटी दुसऱ्या दिवशी बँक म्यानेजरचा फोन आला..की तुमच्या वडिलांच चेकबुक इथे काऊंटरवर राहिलय घेऊन जा.”
वैभव, मुग्धाला सुचेना..काय करायचं यांच..वैभव,मुग्धाचा मुलगा, मयंक कॉलेजची परीक्षा देऊन आला. अण्णांचं हे रुप पाहून तोही हैराण झाला. एकदा तर दुपारचे दार उघडं ठेवून गेले. मयंकचा डोळा लागला होता. बाजूच्या भाभीने टकटक करुन विचारलं,”दरवाजा क्यों खुला रखा और अण्णा कहाँ है? मैं उनके लिए रबडी लाई हूँ। पसंद है उन्हे मेरे हाथ की।”
मयंकला वाटलं, टॉयलेटला गेले असतील..त्याने दारावर नॉक केलं तर दार सताड उघडलं. ग्यासवर आमटी रटमटत होती. आता मात्र मयंकची पाचावर धारण बसली.
त्याने मम्मीपप्पांना फोन लावला व भर उन्हात अण्णांना शोधायला निघाला. बाजूच्या वडाच्या पारावर लहान मुलं खेळत होती, त्यांना विचारलं तर म्हणाली..थोड्या वेळापुर्वी इथेच होते अण्णा. त्यांनीच आम्हाला लॉलीपॉप घेऊन दिले.
मयंक एवढा तरणाताठा पण आता त्याला रडू फुटायचं बाकी होतं. त्याला त्याचं लहानपण आठवलं. मम्मीपप्पा ऑफीसला जाताना त्याला पाळणाघरात ठेवून जायचे. . अण्णा खास मयंकसाठी लवकर यायचे. त्याला घोडा घोडा लागायचा, मग अण्णा टबडक टबडक करत घोडा व्हायचे. छोट्या मयंकला पाठीवर घेऊन घरभर घोडा फिरवायचे.
मयंकचं वळणदार अक्षर.. अण्णांची देणगी. रोज संध्याकाळी त्याच्याकडून परवचा म्हणून घ्यायचे. मम्मीने कधी रागाने मयंकवर पाच बोटं उमटवली, तर ती अण्णांच्या पाठीलाच लागायची जणू..त्यावेळी काही बोलायचे नैत पण दुसऱ्या दिवशी तिची समजूत काढायचे,”लहान आहे गं आपला मयु, थोडा हुड आहे खरा पण मारुन काही साध्य होत नाही बघ. मी समजावतो त्याला. ऐकेल तो.”
अण्णांनीच तर मयुला बुद्धिबळातले डावपेच शिकवले होते. पाचवीपासून चेकमेट करु लागला होता पठ्ठ्या. त्याचा खेळ,खेळातली बक्षीसं पाहून अण्णांची कॉलर टाईट व्हायची. नातू कोणाचा आहे! आज्जीच्या फोटोकडे बघत अभिमानाने बोलायचे.
मुंग्यांच्या वारुळावर कोणी घाव घालावा न् त्यातून भुसूभुसू मुंग्या बाहेर पडाव्यात तसं मयंकचं झालं. अण्णांच्या सहवासातल्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर फेर धरुन नाचू लागल्या. मयंक वेड्यासारखा शोधत होता..अण्णा.अण्णा..साद घालत होता पण कंठातून शब्द फुटत नव्हते. पांढराशुभ्र सदरा,लेंगा ल्यालेले त्याचे अण्णा कुठेच दिसेनात.
क्षणभर वाटलं..अण्णांचं काही बरं वाईट वगैरे..विचारांच्या तंद्रीत आत्महत्या किंवा अपघात..मन चिंती ते वैरी नं चिंती..त्या अभद्र विचारांनी तो अधिकच कासावीस झाला. व्याकूळ नजरेने इकडेतिकडे पाहत होता.
तितक्यात समोरच्या बसस्टॉपजवळ त्याचं लक्ष गेलं..अण्णा होय अण्णाच बसलेले.. त्या दंडाकार सळीवर बसून कुल्फी चाखत होते. बाजूला मटकाकुल्फीवाला बसला होता. तो धावतच अण्णांकडे गेला. डोळ्यातलं पाणी कोपराने पुसत म्हणाला,”अण्णा..अण्णा बाहेर का पडलात नं सांगता..”
“अरे काय तुझ्या बापाला भितो काय? माझं घर.. विचारायला कशाला हवं..तुझी आज्जी बाजारात गेलीय ना. तिला घ्यायला आलो. दोन पिशव्या दोन हातात घेऊन येणार..त्यापेक्षा म्हंटलं आपणच अर्ध्या वाटेवरुन तिची सोबत करावी. उपवास करते ना मार्गशीर्षातले..सांगून ऐकत नाही. पहिला गुरुवार उद्या..म्हणून फळंफुलं आणायला जाते म्हणाली.”
मयंक सुन्न होऊन ऐकत होता. तिथे बसमधनं काही क्षणापुर्वी उतरलेली मुग्धाही सासऱ्यांचे हे बोल ऐकत होती. तिने वैभवला फोन केला व येताना देवीच्या पुजेसाठी लागणारं सगळं सामान आणायला सांगितलं. वैभवला नेमकं कारण कळत नव्हतं कारण आतापर्यंत कधीही मुग्धाने हे व्रत केलं नव्हतं. व्रतवैकल्य करणं हे तिला तसं कधी पटलच नव्हतं नि अण्णांनी किंवा वैभवनेही कधी जबरदस्ती केली नव्हती.
घरी येताच मुग्धाने न्हाऊन घेतलं. वैभव आला तसं पुजेचं सामान घेतलं. कलश स्वच्छ घासून लख्ख केला, माळ्यावरचा चौरंग काढून घेतला न् महालक्ष्मीची स्थापना केली.
मुग्धा, ओम केशवाय नम:, ओम नारायणाय नम:, ओम माधवाय नम: म्हणत आचमन करु लागली..अण्णा स्वत:च येऊन बाजूला बसले अगदी लहान मुलासारखे. मुग्धाने देवीला दुर्वांकुराने स्नान घातलं. हळदकुंकू,पत्र,पुष्प अर्पण केली..अगरबत्ती व धूप दाखवला..दिपज्योतीने ओवाळलं. नैवद्य अर्पण केला व प्रार्थना केली.
मुग्धा संथ स्वरात पोथीवाचन करु लागली. अण्णा ऐकत होते, हात जोडून, डोळे मिटून. वैभव भरल्या डोळ्यांनी पहात होता..मयंक पहात होता..अण्णांच्यातलं व्रात्य मुल त्या उदाधुपाच्या पवित्र वातावरणात..त्या शब्दांच्या लयीत..अगदी शांत शांत झालं होतं.
मुग्धा देवीच्या पाया पडली व म्हणाली,”देवी, यापुढे तुझं व्रत करत राहीन. माझ्या सासऱ्यांना बरं कर. त्यांना पहिल्यासारखं हसूखेळू दे.”
मुग्धा आता पुर्ण प्रयत्न करणार होती, अण्णांना परत हसतंखेळतं करण्याचा. सासू घरात जी जी व्रतवैकल्ये करायची, ती सर्व ती परत सुरु करणार होती.. अण्णांना ज्या ज्या गोष्टींतून आनंद मिळेल त्या त्या साऱ्या गोष्टी ती करणार होती. त्यासाठीच तिने स्वेच्छानिव्रुत्तीचा निर्णय घैतला.
वैभव बोललाही..अगं कशाला असा तडकाफडकी निर्णय घेतेस..यावर ती म्हणाली,”नोकरी करताना अण्णांकडे हवं तेवढं लक्ष देता येत नाहीए मला. आपल्याकडे पुरेशी पुंजी जमा आहे. मयंकही आज न् उद्या नोकरीला लागेल. अण्णांना मात्र सध्या आपल्या सोबतीची गरज आहे.
माझं मुल लहान असताना अण्णांनी तळहाताच्या फोडासारखं जपलय माझ्या लेकराला. हे अण्णा, मी जेवत असली नि मयंकने शी केली तर स्वत:च्या हाताने त्याला कोदू घालायचे. मला म्हणायचे..तू पानावरनं उठू नकोस. जेव पोटभर. मी आहे ना. मी बघतो त्याच्याकडे. किती आणि काय काय केलय यांनी माझ्यासाठी..आता मला करुदेत यांच्यासाठी.”
देवीची मुर्ती प्रसन्न हसत होती. पैसा हेच सर्वस्व नाही. आपलं माणूस आहे तोवर त्याचा योग्य तो सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य आहे हेच मुग्धाच्या मुखातनं देवी वदवून घेत होती.
आता अण्णा एकटे नसतात. दुपारी सून बसते सोबत जेवायला. ऊन ऊन जेवण करुन वाढते. कधी शिरा कधी पुरणपोळी..खाणं एवढंसच पण जीवाला खावंस वाटतं..सून आईच्या मायेने करुन घालते.
वैभवही कोड्याचा पेपर घेऊन येतो. अण्णांना विचारत विचारत त्यातले उभे,आडवे शब्द भरतो. अण्णांच्या बुद्धीला चालना मिळते..गंजलेली सुरी..धारवाल्याने धार काढून लख्ख करुन द्यावी तसाच अण्णांच्या मेंदूवरची गंज काढण्याचा कुटुंबातील प्रत्येकाचा प्रयत्न यशस्वी होतोय.
कुणाला,असंही वाटेल की वैभवने का नाही घेतली स्वेच्छानिव्रुत्ती..तर तो सर्वस्वी त्या जोडप्याचा निर्णय..नाही का!
अण्णा सुनेला विचारल्याशिवाय मुळीच बाहेर जात नाहीत. त्यांना मयंकने नुकतच घड्याळ आणून दिलय..त्यावरुन अण्णा कुठे भरकटत गेले तर लगेच शोध लागेल पण अण्णांच भरकटणं कमी झालंय..
जुन्या आठवणी सारख्या सारख्या शेअर करता म्हणून कोणी त्यांना बोलत नाही..तितक्याच आवडीने ऐकतात. बाजुची भाभीही येऊन बसते गप्पांना. गतकाळातील स्म्रुतींची पानं उलटताना ते कधी गलबलून येतात तर कधी खळाखळा हसतात, लाळ ओघळते त्या बेभानावस्थेत त्यांच्या ओठांच्या कोपऱ्यातून. मुग्धा ती ओघळती लाळ पुसते आपल्या पदराने तेंव्हा अण्णांना सुनेत त्यांच्या आईचा भास होतो.
अण्णा परत जगायला शिकताहेत..आपल्या अस्तित्वात असलेल्या माणसांसोबत..गेलेल्यांच्या स्म्रुती उजळत..
—-सौ.गीता गजानन गरुड.
====================
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर, RitBhatमराठी घेऊन येत आहे लघुकथा स्पर्धा.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/
3 Comments
Geeta
थँक्यू💕
Varsha Rane- Sawant
खुप रडले मी … अजूनही अश्रू आवरत नाहीत … अशी सुन भेटेल प्रत्येक आई वडिलांना तर किती छान राहतील ना सर्व जण… मस्तच गीता ताई 👌😍
Geeta Garud
Thank You :)