उन्हाळ्यात उष्णतेपासून थंडावा मिळण्यासाठी आहार कसा असावा | summer diet plan

summer diet plan :
ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा. उन्हाळा म्हटलं की कडाक्याचे ऊन, उकाडा, गरमी, आणि तहानेने व्याकुळ झालेले जीव हे सगळं समोर येते. त्यामुळे उन्हाळा कोणाला आवडत नाही. उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे त्वचा खूप सेन्सिटिव्ह होते. तसेच कपडे घालताना सुद्धा काळजी घ्यावी लागते. म्हणजे अंगभर पण सैलसर कपडे घालावे. तसेच त्वचा काळी पडू नये किंवा उष्णतेचा त्वचेवर विपरीत परीणाम होऊ नये म्हणून अनेक क्रीम वापराव्या लागतात.
याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाताना पिताना बऱ्याच गोष्टींचे पालन करणे गरजेचे ठरते. कारण उष्णतेमुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी झालेले असते. त्यामुळे सतत तहान लागते. शिवाय जठराग्नी म्हणजेच पचन शक्ती मंदावलेली असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते.
उन्हाळा सगळ्यांनाच सुसह्य करणारा जाण्यासाठी आहारातील काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण लक्षात घेणार आहोत.
उन्हाळ्यामध्ये कोणता आहार आवर्जून घ्यावा?
आहारात इतरवेळी आपण पॉलिश केलेला तांदूळ खात नाही, पण उन्हाळ्यात मात्र चांगला पॉलिश केलेला तांदूळ अवश्य खावा.
रात्री झोपताना म्हशीचे दूध प्यावे. कारण यात स्निग्धता असते. असे आयुर्वेद सांगते. साखर ज्यांना चालते त्यांनी साखर घालून प्यावे.
पुरेसे पाणी :
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते. त्यामुळे dehydration होऊ शकते. म्हणून दिवसभरात ८-९ ग्लास माठातील थंड पाणी प्यावे. फ्रिज मधील पाण्याचा वापर टाळावा. कारण हे पाणी तात्पुरती तहान भागवते आणि शरीरातील उष्णता वाढवते.
आरोग्यदायी पेये :
आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, फळांचा रस, ताक, लस्सी तसेच नाचणीचे अंबिल असे पेये प्यावित. यामुळे तहान तर भागेलच शिवाय शरीराला थंडावा ही मिळेल.
नक्की वाचा
उन्हाळ्यात उष्णतेपासून राहत मिळण्यासाठी कोणती शीतपिये प्यावी.
चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा.
दूध व दुधाचे पदार्थ :
उन्हाळ्यात दूध, दही, ताक, तूप असे पदार्थ आहारात वापरावेत. ताक पिताना सोबत त्यात हिंग, सैंधव मीठ आणि जिरेपूड घालून प्यावे. त्याने पचन व्यवस्थित होते.
उन्हाळी फळे :
यात द्राक्षे, टरबूज, कलिंगड, करवंद, फणस, आंबे, डाळिंब अशी रसदार आणि भरपूर पाणी मिळेल अशी फळे खावीत. यात अनेक पोषक घटक म्हणजेच व्हिटॅमिन, प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.
पालेभाज्या आणि फळभाज्या :
उन्हाळ्यात फारशा पालेभाज्या उपलब्ध नसतात. तरीही ज्या असतील त्या सगळ्याच पालेभाज्या आणि फळभाज्या खायला हव्यात. शिवाय आहारात काकडी, बीट, गाजर आणि कांदा यांचा सलाड म्हणून अवश्य वापर करावा.
उन्हाळ्यात पचन शक्ती मंद असते. त्यामुळे शक्यतो हलका आहारच घ्यावा. ज्वारी,नाचणी, मुग अशी थंड गुणधर्माची धान्ये खावीत. वरणभात, खिचडी असे पदार्थ पातळ करून म्हणजे सरबरीत करून सूप प्यायल्या प्रमाणे घ्यावे. फ्रिज मधील अन्न किंवा शिळे अन्न खाऊ नये. रोज ताजेच अन्न खायला हवे. मांसाहारी पदार्थ शक्यतो सकाळी किंवा दुपारीच खावेत.
उन्हाळ्यामध्ये काय टाळावे?
मसाला :
जेवण बनवताना मसाल्यांचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करावा. सगळेच मसाले उष्ण गुणाचे असल्याने मसाले वापरणे टाळावे.
मांसाहार :
आधीच सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यात जठराग्नी मंद असल्याने जड पदार्थ कमीच खावेत. त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळी मांसाहार टाळावा. या पदार्थात मसाल्यांचा वापर टाळावा.
मद्यपान :
दारू, बिअर,अल्कोहोल हे उष्ण गुणांचे आहेत. त्यामुळे शरीर कोरडे पडण्याची शक्यता असते. तसेच dehydration आणि उष्माघाताचा धोका वाढतो.
आईस्क्रिम :
आईस्क्रिम सगळ्यांनाच खूपच आवडते. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात तर उन्हामुळे सतत काहीतरी थंड खावेसे वाटते. पण आईस्क्रिम सातत्याने खाणे टाळावे. कधीतरीच खाणे योग्य.
कॉल्डड्रिंक आणि इतर पेय :
ही कृत्रिम शीतपेय थंडावा जरी देत असली तरीही शरीरास अपायकारक असतात. यामुळे किडनीचे आरोग्य धोक्यात येते.
चहा, कॉफी यांचे सततचे प्रमाण उन्हाळ्यात कमी करावे. यामुळे उष्णता वाढते आणि गरमी वाढते. यामुळे उष्णता वर्धक पेय टाळालेलेच बरे.
आपण एरवी २-२ तासाला काहीतरी खात रहावे असे ऐकतो. पण हा नियम उन्हाळ्यात लागू होत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार खाऊ नये. तसेच हलका आहार घ्यावा.
झोपण्यापूर्वी तीन तास आधी आहार घ्यावा.
तर अशा काही ठराविक गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर तब्येतीवर चुकीच्या सवईंचा विपरीत परिणाम होणार नाही आणि उन्हाळा सुसह्य होईल. सगळ्यांनीच याचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या.
===============