Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️सायली

आमची पहिली भेट पावसाच्या साक्षीने झाली होती. मी चिंब भिजले होते आणि हे नुकतेच गावाहून आले होते. आमची नजरा भिडल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात ओलावा होता..प्रेमाचा. कुणी आसपास नाही हे बघत त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि पावसाचं कोसळण जरा जास्तच वाढलं. ‘किती आश्वासक मिठी होती ती!’ त्या मिठीत मी पुन्हा एकदा चिंब भिजले.
लग्नानंतरची आमची ही पहिली भेट.

लग्नानंतर पाच परतवणीसाठी माहेरी गेले आणि चार एक दिवसांनी सासुबाई आणि छोटे दिर मला न्यायला आले. ‘मला वाटले, हे येतील सासरी न्यायला.’ माझ्या मनाचा ठाव घेत सासुबाई म्हणाल्या, “अगं तुझा नवरा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी गेला आहे आणि जाताना सांगून गेला आहे की, माझ्या बायकोला मी येण्याआधीच इथे घेऊन या.” हे ऐकून मी गोरीमोरी झाले.
हे पाहून सासुबाई हसू लागल्या आणि पुढे म्हणाल्या, “तो येईल चार दिवसांत, काळजी करू नको.”

सासरी आल्यावर पुन्हा माझं छान स्वागत झालं. यांची कमी जाणवत होती, पण आमचं एकत्र कुटुंब असल्याने ती कमी थोडी सुसह्य झाली.
चार दिवसांनी हे आले, पण आमची भेट झाली, ती एका विलक्षण वेळी झाली.

एक दिवस दुपारची जेवणे आटोपल्यानंतर सगळे आपापल्या खोल्यात पळाले. मग मीही थोडी विश्रांती घ्यावी म्हणून आमच्या खोलीत गेले. थोड्याच वेळात अचानक आभाळात ढग दाटून आले आणि बघता -बघता धो पाऊस सुरू झाला. ‘तशी पावसाची आणि माझी गट्टी अगदी
लहानपणापासूनची.’
मी सासरी आहे हे विसरून भिजायला गच्चीवर धावले.
अगदी मनसोक्त भिजले आणि बऱ्याच वेळाने माझे लक्ष गेले तर काय! गच्चीवरच्या दारात उभारून हे मला न्याहाळत होते. किती वेळ झाला कुणास ठाऊक? हे आल्याची चाहूल देखील लागली नाही मला. फार अवघडल्यासारख झालं.
थोड्या वेळाने माझ्या मनातलं ओळखल्या सारखे हे म्हणाले, “मी आलो त्यावेळी तू आपल्याच विश्वात दंग होतीस. तुझं मनसोक्त भिजणं मी पाहत होतो.
तसा मला पाऊस फारसा आवडत नाही, पण कदाचित आता आवडू लागेल.”
हे ऐकून मी लाजून आणखीनच अवघडून उभी राहिले. कोणी येत नाही ना.. पाहत हे मला अचानक बिलगले. आम्ही दोघेही प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघालो.

हे आले ते आनंदाची बातमी घेऊनच. ऑफिसने यांना प्रमोशन दिले होते. पण बदली होऊन, परगावी जावे लागणार होते. मोठया जाऊबाई मिश्कीलपणे यांना म्हणाल्या, “भाऊजी तिथे तुमच्या बायकोला घेऊन जायला परवानगी आहे ना?”
“वहिनी, अहो महिन्याभरात सोय होती का पाहतो. तोवर ती राहील इथेच.” कसेबसे हे म्हणाले.

मी अस्वस्थ मनाने यांच्याकडे पाहिलं. यांचीही अवस्था काही वेगळी नव्हती.
लग्नाला अजून दहा दिवसही झाले नाहीत, तोवर हा दुरावा! माझ्या डोळ्यात हसू होत आणि आसू ही.
आठ दिवसांत हे बदलीच्या ठिकाणी गेले. तसे आमचे रोज फोनवर बोलणे व्हायचे. पण यांची आठवण तितकीच यायची. पाऊस वाढला की इथे आठवणींचा जोरही वाढायचा.

रोज आमचे दिर, जाऊबाई, नणंदा मला चिडवायच्या. त्यात आता सासुबाईही सामील झाल्या. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे. पण गंमतही वाटायची. जाऊबाई गमतीने म्हणायच्या, “या विरहातही प्रेमाची फार ताकद असते. तिथे गेल्यावर कळेल तुम्हाला बरं का!”

महिन्याभराने तिथे यांना रेंटवर घर मिळाले. जरुरीपुरती सोय करून यांनी मला बोलावणे धाडले. कोण आनंद झाला मला! जायचा दिवस निश्चित झाला आणि मी तयारी सुरू केली. “कधी यांना डोळे भरून पाहते असे झाले होते.”
सासूबाईंनी चटण्या, लोणचे, मसाले असे
स्वयंपाकाचे बरेचसे सामान भरून दिले आणि त्याच बरोबर खुप साऱ्या सूचनाही केल्या. “परगावी दोघेच राहणार तर सांभाळून राहा. काही वाटलं तर आम्ही आहोतच.”

निघताना मी साऱ्यांच्या पाया पडले. जाऊबाईंनी मला पोटाशी धरलं आणि म्हणाल्या, “लवकर इकडे या. वाट पाहतो आहोत आम्ही.” डोळ्यात पाणी आणून सर्वांनी मला निरोप दिला. निघताना मला आनंद झाला होता आणि दुःखही.

तीन एक तासांचा प्रवास एकटीने कसा करायचा?शिवाय पाऊसही बरसत होताच, म्हणून गावी सोडायला धाकटे दिर, सासुबाई आणि सासरे आले.
नवे गाव फारच सुंदर होते! निसर्गाने अगदी मुक्तहस्ताने उधळण केली होती. हिरवीगार वनराई, उंच डोंगर, भिरभिरणारी पाखरे आणि साथीला पाऊस.. माझा सखा! मन कसं प्रसन्न झालं. दुसऱ्याच दिवशी सासुबाई सासरे आणि दिर आपल्या गावी निघून गेले.
आम्हा दोघांना एकमेकांशी काय बोलावे हेच सुचेना. जवळ जवळ महिन्या दीड महिन्यानंतर आम्ही भेटत होतो.
बराच वेळ शांततेत गेल्यावर हे म्हणाले, “तू इथे नव्हतीस तेव्हा पाऊसच माझा सोबती होता. वारंवार ‘त्या क्षणाची ‘आठवण करून देत होता. तू कधी येतेस या दिवसाची किती वाट पाहत होता, तुला ठाऊक नाही.”
हे ऐकून मी बावरले. क्षणभर माझी नजर यांच्या चेहरऱ्यावर स्थिरावली आणि…बाहेर पावसाने जोर धरला. ‘वाटलं सुखाचा पाऊस खऱ्या अर्थाने सुरू झाला.’

==================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *