Skip to content Skip to sidebar Skip to footer

सुख म्हणजे नक्की काय असतं?

®️©️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

समता लोळत पडली होती. कधी पुस्तक हातात घेई तर कधी मोबाईल, पण कशातच मन लागत नव्हतं. मोबाईलमधल्या ढीगभर शुभेच्छांना धन्यवाद म्हणता म्हणता ती थकून गेली होती. खरंतर आज तिच्या आयुष्यातील सोनेरी दिवस होता. आज तिचा चाळिसावा वाढदिवस होता. आपल्याला चाळीस वर्षं पूर्ण झाली. तिच्या मनात विचारांचं जाळं पसरत होतं. काय केलं आपण आयुष्यात? एक मन खिन्नपणे म्हणालं.
काय नाही केलंस? दुसरं मन त्यावर शिरजोरी करत म्हणालं. ऐश्‍वर्य उपभोगलंस, आराम केलास, हाताखाली दहा नोकर आहेत. म्हणशील ती गोष्टं मिळतेय आणि काय हवं? लग्नाआधी एकेका ड्रेससाठी पैसे साठवणारी तू आज बाजारात जाऊन सहज 10-12 ड्रेस घेऊन येऊ शकतेस? आणि हवं तरी काय? खरंच काय हवंय आपल्याला? समता विचारात पडली.
तेवढ्यात साकेतचा फोन आला, ‘‘हॅलो डिअर,’’
‘‘हॅलो ऽऽ’’
‘‘का गं अशी उदास का आहेस?’’
‘‘नाही नाही उदास कुठे?’’
‘‘ओके मग ठिक आहे. झाली ना संध्याकाळच्या पार्टीची तयारी? ड्रेस मी घेऊन येतो.’’
‘‘हां…’’
‘‘ओके बाय! लव्ह यू’’
‘‘बाय!’’
इतकं प्रेम करणारा नवरा मिळालाय आपल्याला, फक्त…
खरंच साकेतचं आपल्यावर खूप प्रेम आहे. समता विचारात रमली. वयाच्या 21 व्या वर्षी साकेत आणि समतानी पळून जाऊन लग्नं केलं. साकेत तेव्हा 25 वर्षांचा होता. ना साकेतचे घरचे लग्नासाठी तयार होते ना समताच्या घरचे. साकेत एक उत्तम परिस्थिती असलेल्या घरातील मुलगा होता, तर समता मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. साकेत एका उत्तम कंपनीत नोकरीला होता त्यामुळे आर्थिक टेंशन काहीच नव्हते. त्याची दिवसेंदिवस प्रगतीच होत गेली. यशाची शिखरे तो चढत गेला. दोन गुणी मुलं होती. तीही हुशार आणि सुंदर होती, तीही आता आपल्या आवडीचं शिक्षण घेत होती. सगळं अगदी दृष्ट लागण्यासारखं होतं. मुलांची आठवण येताच समता उठली समता उठली, आज मुलंही लवकर घरी येणार होती.
तरी तिच्या मनात विचार सुरूच होते. आजची पार्टी तरी आपल्या मनासारखी हवी होती. कोणी बाहेरची लोकं नसली तरी चाललं असतं. आपलं आपण चौघं, आपण दोघं नी आपली मुलं. बास एवढीच चालली होती. समताला वाटलं. म्हणजे आपले आई-वडील, साकेतचे आईवडील चालले असते, पण ते येणार नाहीत, अजून त्यांचा राग गेला नाही. काय करणार?
पण आजही त्या साकेतच्या ऑफिसमधल्या फ्रेंडबरोबर जायचं, तिथं उगाच गुडीगुडी बोलायचं. हाय हॅलो, अगदी फॉर्मल बोलायचं, एकही शब्द चुकूनमाकून इकडचा तिकडे झाला की मुलं आणि नवरा ऑड नजरेने आपल्याकडे बघणार कारण समता बाहेरच्या जगात फार कमी वावरत होती. आणि कंपनीतील इतर स्टाफच्या बायका किंवा ऑफिसमध्ये काम करणार्‍या मुली सर्वच एकदम उत्तम एटीकेटस्ने वागणारे आणि समताला मात्र असं वागणं आवडायचं नाही. तिची भाषा चांगली होती, तिला इंग्रजी येत होतं, पण तिला आपल्या मातृभाषेचा अभिमान होता पण तिचं वागणं साळढाळ होतं. तिला असं मोजूनमापून वागणं कधी जमलंच नव्हतं. एकप्रकारचं विचित्र दडपण यायचं तिच्या मनावर! घरातल्या काम करणार्‍या माणसांशी सुद्धा ती प्रेमाने बोलायची. मुलं तिला म्हणायची,
‘‘आई, त्या काकूंशी तू अगदी मैत्रिणीसारख्या गप्पा काय मारतेस?’’ समता म्हणायची,
‘‘त्यांच्यामुळेच तर आपण सुखाने जगतोय ना?’’ मग मुलं गप्प बसायची.
तिचा या सो कॉल्ड हायफाय वातावरणात जीव गुदमरायचा, त्या पार्ट्या, ती ड्रिंक्स, फॅशनेबल कपडे तिला आवडायची नाहीत. तसंच ड्रींक्स घेतल्यानंतर काहींच्या नजरा तिला बोचायच्या, कारण ती होतीच तशी सुंदर… म्हणून तर साकेतला तिची भुरळ पडली होती. पण नवर्‍याचं मन जपायचं म्हणून ती न बोलता, मनाविरुद्ध त्या पार्ट्यांना जात होती. बरेचदा ती त्याबद्दल कुरकूरही करायची, पण या वेळी चल पुढच्या वेळी नको असं साकेत म्हणायचा.
आजही तीच पार्टी, त्यापेक्षा आपण मस्त साध्याशा रेस्टॉरंटमध्ये गेलो असतो. मनसोक्त जेवलो असतो. इथे म्हणजे खायचं तेही अगदी अलगद आजूबाजूचा अंदाज घेत आणि त्यापेक्षाही आज का कुणास ठाऊक घरच्यांची खूप आठवण येतेय. आईच्या हातचा वरण-भात, मुद्दाम घरी केलेलं श्रीखंड, बटाट्याची भाजी अगदी टीपिकल मेनू असायचा सणावारी. आज राहून राहून घरच्या सर्वांचीच तिला आठवण येत होती. कधीतरी आईचा आणि तिचा फोन व्हायचाही हल्ली. पण फार कमी वेळा भेटी-गाठी व्हायच्या. अजून म्हणावी तशी मनातली अढी गेली नव्हती आणि आईला कितीही वाटलं तरी बाबांच्या रागापुढे तिचं काहीच चालायचं नाही. समताने उसासा टाकला.
बेल वाजली. संथ पावलांनी तिने दार उघडलं.
‘‘समू, किती वेळ लावलास दार उघडायला?’’ साकेतने अधीरतेने विचारलं.
तिचा सुकलेला चेहरा पाहून त्याच्या हृदयात कालवाकालव झाली. पण तसं जराही न दाखवता त्याने हातातलं पॅकेट तिच्या हातात दिलं. समताला आश्‍चर्याचा धक्काच बसला. चक्क सुंदर साडी होती. तिला फॉल-पिको केलेलं होतं त्याला मॅचिंग ब्लाऊज पण शिवलेला होता.
‘‘आज ही साडी नेसायचीय मी पार्टीत?’’ तिनं आनंदानं विचारलं.
‘‘हो मग! तुला आवडते ना साडी म्हणून आणली.’’ तिच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून समाधानी झालेला साकेत म्हणाला.
तेवढ्यात मुलं आली. सर्वांची आवडायची लगबग झाली. मुलांनी पण आईसाठी सुंदर ग्रिटींग, गिफ्ट आणली होती. समता सर्वांच्या प्रेमात न्हाऊन निघाली होती. अशा आनंदाच्या क्षणी त्या पार्टीत नको जाऊया असं सांगुया का साकेतला तिच्या मनात विचार येत होता, पण सर्वजण आपल्यासाठी इतकं करतायत आपण त्यांच्या आनंदावर विरजण नको घालायला म्हणून ती सर्व विसरून सुंदर तयार झाली.
साकेतने तिच्या कानामागे काळी तीट लावली. ‘‘दृष्ट नको लागायला माझ्या बायकोला.’’ तो हसत म्हणाला.
सर्व जण गाडीत बसून निघाली. छोटीशी इरा चिवचिवली, ‘‘अरे पप्पा, असा कसा तू वेंधळा?’’
‘‘काय झालं?’’ त्याने प्रश्‍नार्थक नजरेने विचारलं.
‘‘अरे साडी घातल्यावर गजरे घालायचे असतात.’’ इरा म्हणाली.
‘‘साडी घालत नाहीत नेसतात..’’ सर्वेशने आपले ज्ञान पाजळले.
‘‘तेच ते’’ इरा गाल फुगवून म्हणाली.
साकेतने लगेच गजरेवाल्याकडे गाडी वळवली आणि त्याच्याकडे होते नव्हते तेवढे सर्व गजरे घेतले.
‘‘इतके गजरे कशाला? तिथे पार्टीत कोण घालणार गजरे?’’ समताने हसत विचारले.
त्याने त्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केलं. मोगर्‍याच्या सुगंधाने गाडी भरून गेली होती.
एका छोट्याशा साध्यासुध्या हॉलसमोर गाडी थांबली. समताला काहीच कळत नव्हतं. इतक्या साध्या हॉलमध्ये पार्टी कशी काय? तेवढ्यात सर्व लाईट घालवण्यात आले. समताला हाताला धरून स्टेजवर नेण्यात आलं ती स्टेजवर पोहोचताच लाईट लागला. समोर आई आणि सासूबाई हातात आरतीचं ताट घेऊन. बाबा आणि सासरेबुवा हाता फुलांचा गुच्छ घेऊन होते. समताला काहीच कळेना. त्यांच्या मागे समताच्या शाळेतल्या किंवा जवळच्या मैत्रिणी, तिच्या घरात कामाला असणार्‍या सर्व बायका, नोकरचाकर उभे होते. समताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आई-बाबांना, सासू-सासर्‍यांना तिने वाकून नमस्कार केला. तिला आवडतो तसा अगदी घरगुती मेनू होता. आजचा वाढदिवस अगदी समताच्या मनासारखा झाला. सर्वांना गजरे वाटले. आई-वडील, सासू-सासर्‍यांचा राग दूर करण्यात नातवंडांनी खूप मेहनत घेतली आणि एका दुरावलेल्या कुटुंबाला जवळ आणलं.
आता समता खूप खूष होती. अगदी मनापासून तिला हवं होता तसा तिचा वाढदिवस साजरा झाला होता आणि पुढील सर्व दिवसही सुंदर जाणार होते आता सर्व सुख आता तिच्या पदरात होतं.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

====================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.