सौदागर

©® सौ. गीता गजानन गरुड
निलाक्षीचं लग्न ठरलं, त्याच दरम्यान तिच्या जिवलग सखीचं,शुभदाचंही लग्न ठरलं. नदीकाठी बसून दोघींच्या गप्पा चालायच्या. लग्नातली खरेदी,सोनंनाणं एकूणच.
शुभदाच्या बोलण्यावरनं निलाक्षीच्या लक्षात आलं की शुभदाची जणू लॉटरीच लागलीय. मोठा टुमदार बंगला, समोर दिमतीला दोन गाड्या, शोफर. लग्नात सासरकडचे सोन्याने मढवणार होते तिला.
याविरुद्ध निलाक्षीचा होऊ घातलेला पती हा एक सामान्य नोकरदार माणूस होता. घरी लहान बहीण, कष्टाळू आई. गरीबीला सरावलेलं नं त्यातच समाधानी असलेलं ते कुटुंब.
शुभदाचं लग्न आठवडाभर आधी झालं..निलाक्षी इतर मैत्रिणींसोबत शुभदाच्या लग्नाला गेली होती. मंगल कार्यालयाबाहेर चार चाकी गाड्यांची रांगच रांग होती. खूप मोठमोठ्या आसामी उपस्थित होत्या.
शुभदा तर जणू सोनपरी वाटावी अशी नटली होती. गळाभर,हातभर सोनं, वेणीतही सुवर्णफुलं नि पायात सोन्याचे पैंजण..सगळ्या मैत्रिणी तिच्या भाग्याची स्तुती करत होत्या. निलाक्षीला दोन दिवसांपुर्वीची सोनं खरेदी आठवली. तिच्या सासूने गुंज गुंजभर सोनं साठवलेलं, जे मोडून निलाक्षीसाठी अडीच तोळ्याचं मंगळसूत्र नि अर्ध्या तोळ्याची अंगठी घेतली. शालूही अगदी ठीकठाक. निलाक्षीला शुभदाचा हेवा वाटला खरा पण तिनं तसं चेहऱ्यावर जाणवू दिलं नाही.
शुभदा तिच्या नवऱ्याला घेऊन आली होती, निलाक्षीच्या लग्नात. शुभदाची भरजरी साडी, मेकअप, राजलक्षणी रुबाबदार नवरा पाहून निलाक्षीला भर मांडवात कसंसच झालं. आपल्याच माथी हे काळंसावळं, मध्यमवर्गीय ध्यान का आलं..अशी खंत तिच्या मनाला लागून राहिली.
शुभदा, मधुचंद्रासाठी म्हणे काश्मिरला जाणार होती. असा मधुचंद्र वगैरे निलाक्षीच्या नवऱ्याच्या, सत्यजीतच्या गावीही नव्हता. निलाक्षीची सासू तिला, मेंदीच्या हाताने काही काम करु देत नव्हती, तिचं कौतुक करत असे. नणंद सावलीसारखी आजूबाजूस घिरट्या घालायची. नव्या वहिनीला काय हवं नको ते पहायची..पण तरीही निलाक्षीचा जीव तिथे गुदमरत होता.
रात्री पलंगावर बाजूला शय्यासोबत करणारा तो काळसावळा पती तिला नकोसाच वाटला. ती खुलतच नव्हती. सत्यजीत मात्र निलाक्षीवर मनापासनं प्रेम करत होता. तिला समजून घेत तो म्हणाला,”निलू, तू तुझा वेळ घे. मी तुझ्यावर अजिबात जबरदस्ती करणार नाही,”
तो पलंगाच्या एका कडेला तोंड करुन हाताची गच्च घडी करुन निजला, मग त्याचं ते तसं निजणं नित्याचंच झालं. बाहेर मात्र दोघं पतीपत्नीसारखी वावरत होती पण रात्री एकाच छताखाली अनोळखी जशी निजायची.
दिवसेंदिवस सत्यजीतची तब्येत खराब होऊ लागली होती. निलाक्षीचं त्याच्यावर प्रेम नसणं हे त्याला खंतावत होतं..न्यूनगंड बळावत होता, त्याच्या मनात..त्याचा आत्मविश्वास खचत चालला होता.
“सत्यजीत,काय चाललय? किती चुका ह्या! कामात लक्ष नाहीए तुमचं,”साहेबांनी दरडावलं.
“सॉरी सर. पुन्हा असं होणार नाही सर.” सत्यजीत खाली मान घालून चाचरत बोलला.
“सत्यजीत, नुकतच लग्न झालय तुमचं..सुट्टी घ्या दहाएक दिवस नं जाऊन या थंड हवेच्या ठिकाणी..मग बघा फ्रेश व्हाल. हेच दिवस असतात, मौजमजा करायचे.”
“न नाही म्हणजे नको सर. सध्या नकोच सुट्टी. मिसेसची तब्येत बरी नाही, नंतर बघतो..सांगतो.”
“ओ के. जशी तुमची इच्छा.” असं म्हणत साहेबांनी खांदे उडवले..सत्यजीत फाईल घेऊन केबिनबाहेर आला. हात हनुवटीखाली घेऊन विचार करत बसला.’च्यामारी, लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं..लोण्याजवळ विस्तवाने रहायचं पण लोण्याने वितळायचं नाही..ही काय रीत झाली म्हणायची!’
संध्याकाळी तो एकटाच समुद्रकिनारी जाऊन बसला. खारा वारा अंगाला चाटून जात होता. आजुबाजूला जोडपी होती..आपल्याच विश्वात रंगलेली, जगाचं भान नव्हतं त्यांना. अंधाराची साय समुद्राच्या पाण्यावर पसरु लागली..तसा उठला तो पँट झाडत.
घरी आला तर मावशी, आई सगळ्या नटूनथटून उभ्या होत्या, त्याच्या स्वागताला.”सत्या, अरे बड्डे नं आज तुझा म्हणून मुद्दाम तुला सरप्राइज द्यायला आलो बघ,” काका म्हणाले.
सत्या कसनुसा हसत आत गेला. वॉशरुममधे जाऊन फ्रेश झाला. बाहेर येऊन बघतो तर निलाक्षी आय मेकअप करण्यात गुंग होती. अंग उघडं असल्याने, त्याला कससंच झालं. पटापट त्याने कपडे चढवले. ती मात्र थंड नजरेने त्याच्याकडे अधनंमथनं पहात होती.
“मेनी ह्याप्पी रिटर्न्स ऑफ द डे, सत्यजीत,”प्रथमच ती त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली. तोही अवघडत थँक्स म्हणाला नं दोघे बाहेर आले. सत्याने केक कट केला नं आईला भरवायला जाणार तोच आईने निलाक्षीला भरव अशी खूण केली.
थरथरत्या हाताने सत्याने निलाक्षीच्या तोंडात केक जवळजवळ कोंबलाच..तिनेही सत्याला केक भरवला..सगळ्यांनी टाळ्या वाजवत बर्थडे साँग म्हंटलं.
सत्याला वाटलं..’चला हेही नसे थोडके. आज बोलुया हिच्याशी. काय कुठे अडतय ते तरी कळेल. साहेब सुट्टी द्यायला तयारच आहे. घेऊन जाईन मस्त कुठेतरी पांढऱ्याशुभ्र बर्फात. सगळं उट्टं वसूल करेन.’
पण कसचं काय..निलाक्षीचे आईवडीलही आले होते. जेवणं झाल्यावर म्हणाले,”जावईबापू, निलाक्षीची आज्जी आठवण काढतेय निलाक्षीची.तिला इथवर आणणं शक्य नाही तेंव्हा काही दिवसांसाठी घेऊन जातो निलाक्षीला.”
सत्याने वळून आईकडे पाहिलं. त्याला वाटलं..आई काहीतरी मार्ग काढेल यातून नं नंतर न्या वगैरे सांगेल पण सत्याची आई म्हणाली,”इश्श, विचारताय काय! लेक तुमची. खुशाल घेऊन जा. हवे तेवढे दिवस राहुदेत तिला. तिच्या मनाने पाठवा तिला. सत्या येईलच न्यायला.” सत्याचा चेहरा बघण्यासारखा झाला.
“सत्या..” आईने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
“अं हो आई..माझी काहीच हरकत नाही.” तो बोलून गेला. निलाक्षी आवरुनसावरुन ब्याग घेऊन वाटेला लागली. ब..बाय वगैरे काहीच नाही. सत्या रात्रभर कुशी वळत राहिला. एकदोनदा तिला फोन करावासा वाटला पण काय विचारायचं? मुळात ती बोलेल का? ह्याप्पी बड्डैवरुन गाडी पुढे सरकेल का…या अशा विचारांत पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला.
रात्री निलाक्षीच्या मैत्रिणीने,वैदेहीने तिला फोन केला ,”निलू, घरी आलीस असं कळलय मला काकूंकडून. अनायासे शुभदाही आलेय तर तू, शुभू, मी नं स्वाती मिळून छोटसं गेटटुगेदर करतोय.”
“अगं पण वैदू..ऐक ना.”
“ऐकण्यासाठी नाही हं कळवण्यासाठी फोन करतेय मी. सगळ्या येणारैत, तुला धरुन. शनिवारी रात्री माझ्याकडे जमायचय. मस्त मज्जा करु. आईला तुझ्या आवडीचा मिसळपाव करायला सांगते. तूही काकूंना सांगून आमच्यासाठी मुरमुऱ्यांचा चिवडा घेऊन ये. रात्री खादडायला मिळेल.”
“काय गं कोणाचा फोन?” आज्जीने विचारलं.
निलाक्षीने प्लानबाबत सांगितलं तशी निलाक्षीची आई म्हणाली,”उद्याच करते चिवडा. घेऊन जा जाताना. बरं वाटतं बघ असं लग्नानंतर मैत्रिणी भेटल्या की.”
संध्याकाळी सगळ्या एकत्र जमल्या. हॉटेलिंग केलं..बाजुच्या तलावात मस्त बोटींग केलं. वैदेही शुभदाला चिडवत म्हणाली,”तुम्ही काय बाबा..काश्मिरला गेला होता मधुचंद्राला..तिथल्या शिकाऱ्यात बसून मस्त आनंद लुटला असेल ना.”
इतक्यात स्वाती म्हणाली,”बर्फाचे गोळे वगैरे मारले असाल ना गं एकमेकांवर. कित्ती थंडी होती असेल ना!”
यावर वैदेही म्हणाली,”छे गं! थंडी कसली आलीय जीजू होते नं सोबत.”
“ए तुम्ही दोघीपण ना..तुमची लग्नं होऊदेत. मग बघू मज्जा.”
” ती तर करावीच लागतील. आफ्टरऑल गोविंदाने सांगितलय नं..
हे सून राजा शादी लड्डू मोतीचूर का मोतीचूर का
जो खाए पछताए जो न खाए पछताए .. मग तर खाल्लेलाच बरा. एक मिनिट..ही नील काहीच बोलत नाहीए..जिजूंची आठवण येतेय का गं? फोन लावून बोलवून घे वाटल्यास.”स्वाती निलाक्षीची मस्करी करु लागली तशी निलाक्षी वरवरचं हसली.
घरी येईस्तोवर खाल्लेलं जिरलं होतं. सगळ्याजणी गच्चीत चटया टाकून बसल्या नं वैदेहीच्या आईने वाढलेल्या मिसळपावचा फन्ना उडवला.
रात्री गप्पामस्करीत बराच वेळ चौघी जाग्या होत्या. निळसर आभाळात लुकलुकणाऱ्या चांदण्या निरखत होत्या. शुभदा तिचं घर,सासू, तिथल्या पद्धती, येणारीजाणारी मान्यवर लोकं याबाबतीत बरंच काही सांगत होती. निलूने मात्र झोपेचं सोंग घेतलं होतं. तिचे कान मात्र शुभदाचं वैभव टिपून घेत होते.
पहाटे निलाक्षीला जाग आली ती शुभदाच्या दबक्या आवाजातल्या हुंदक्यांनी. तिने शुभदाच्या पाठीवर हात फिरवत विचारलं,”नक्की काय झालंय शुभा?” शुभदाने तिच्या खांद्यावर डोकं टेकलं..हलकेच आसवं गाळली..
रडण्याचा आवेग ओसरल्यावर, शुभदा सांगू लागली,”नीलू, काल रात्री मी जे माझ्या सासरच्या वैभवाचं वर्णन करत होते ना तो सगळा दिखाऊपणा आहे.
बडा घर नं पोकळ वासा म्हणतात तस्सं. यांची कंपनी तोट्यात चाललीय. कंपनी काही वर्षांत..कदाचित महिन्यांत बंद होईल. बंगल्यावरही जप्ती येईल. वरवरच्या रंगाला माझी मम्मा भुलली..माझ्या भावाला त्यांनी एका कंपनीत चिकटवलं नि त्याबदल्यात माझं कन्यादान..ते कन्यादान नव्हतं निलू, तो सौदा होता..माझ्या आयुष्याचा..माझ्याच माणसांनी केलेला.
माहेरी माझ्या मताला किंमत नव्हतीच. इकडे सासरीही नाही. फक्त नवऱ्याच्या तालावर नाचणारी कठपुतलीच झालेय मी. तू सुखी आहेस निलाक्षी. निलू, तुझ्या नवऱ्याकडे जे काही आहे ते खरं आहे.
तुझ्या शब्दाला किंमत आहे तशी माझ्या नाही.
रंगरुपपैसा यापलिकडे जाऊन माझ्या आईने मुलाच्या गुणांची पारख केली असती तर कदाचित मी सुखी झाले असते.”
हे सारं ऐकून निलाक्षीला तसंच अंथरुणात पडून ऐकणाऱ्या स्वाती व वैदूलाही फारच वाईट वाटलं.
मैत्रिणींचा निरोप घेऊन निलाक्षी घरी आली. आईला म्हणाली,”आई, मी निघते गं संध्याकाळी.”
“अगं पण रहायला आली होतीस नं..का तिकडून फोन..”
“तसंच काहीसं..”
आईसोबत जेवून निलू बाहेर पडली. आई अंगणात उभी राहून हात हलवत होती.
निलाक्षी घरी पोहोचली तेंव्हा सत्यजीत एकटाच घरी होता. त्याची आई लेकीला घेऊन चार दिवसांसाठी, मैत्रिणींसोबत देवदर्शनाला गेली होती.
टिव्ही चालू होता..त्यावर गाणं लागलं होतं..
सौदागर..सौदागर
दिल ले ले दिल देकर..
निलाक्षीने हलकेच सत्यजीतच्या गळ्यात हात गुंफले. सत्यजीतला काही कळेना. अचानक एवढा बदल..
सत्यजीतच्या प्रश्नार्थक नजरेत आपली नजर मिळवत तिने सत्यजीतच्या गालांवर ओठ टेकवले व त्याच्या कानात कुजबुजली,”खरंच सॉरी. या दिलाच्या सौदागराला ओळखायला अंमळ उशीरच झाला मला.”
सत्यजीतने निलाक्षीला आपल्या मांडीवर बसवलं. तिची गालांवर रुळणारी बट मागे सारत म्हणाला,”बरीच वाट बघायला लावलीस नील..पण मला हा नीलमणी स्वतः माझ्याकडे आलेला हवा होता, ओरबाडून घ्यायचा नव्हता. तुला खरंच सुखात ठेवीन मी, वचन देतो.” असं म्हणत त्याने निलाक्षीचा हात हाती घेतला.
(प्रारंभ नव्या नात्याचा☺️)
==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============