सौभाग्याचे दान

रश्मी कासलीकर
“अगं बाई ! आज बराच उशीर झाला उठायला. ..केंव्हाच उजाडलयं,” असे स्वतःशीच पुटपुटत उमा भराभर सकाळच्या कामाला लागली. आंगण झाडून सडा शिंपडला, त्यावर सुबक अशी रांगोळी काढली. लहानसेच आंगण पण तिथे लावलेल्या मोजक्याच सुंदर फुलझाडांनी ते अधिकच मोहक दिसत होते. तिने जवळच्या विहिरीवरून पाणी आणले, रात्रीची भांडी घासली, झाडांना पाणी देताना ती त्यांच्याशी संवाद देखील साधायची, तो तिचा छंदच होता जणू. मग चुलीवर चहाचे आंदन ठेवून ती नवऱ्याला उठवायला गेली. घर काही खूप मोठे नव्हते कारण आर्थिक परिस्तिथी तशी हलाखीचीच पण उमाला सगळे कसे स्वच्छ आणि नीटनेटके लागत असे. रोज सडा-सारवण, दारात सुबक रांगोळी, जळणाला लागणाऱ्या काड्या पद्धशीरपणे एका कोपऱ्यात रचलेल्या, पाण्याचे भांडे एकावर एक रचलेले, चकाकणारे तांब्या-पितळेचे भांडे असे सगळे कसे शिस्तबद्ध व नेटके. कोणीही तिच्या घरी आल्यावर तिच्या छोट्याश्या पण प्रसन्न घरकुलाची प्रशंसा केल्याशिवाय जात नसे. श्याम, तिचा नवरा गावातल्या पाटलाकडे कामाला होता. हातावर पोट भरणारा माणूस तो. शिवाय ह्या दुष्काळामुळे परिस्थिती आणखीनच खालावली होती. त्यात काही सणवार आले की त्याच्या पोटात गोळाच यायचा.
चहा घेत असताना उमा नवऱ्याला म्हणाली, “अहो, उदयाला भोगी-संक्रांत आहे, काही सामान लागेल ते द्याल की जरा आणून.” त्याने मान डोलावली आणि आपल्या कामाला लागला.
आज संक्रांत, उमा अतिशय उत्साहात होती, पण अजूनपर्यंत घरात सामान काही आलेले नव्हते. आजूबाजूंच्या घरातून तिळगुळाचा सुगंध दरवळत होता. बायकांची सर्वत्र लगबग सुरु होती. शेवटी कसतरी दुपारी नवऱ्याने घरात सामान आणून टाकले. उमाने तोकड्या सामानात पण उत्साहात सण साजरा केला. संध्याकाळी जवळच्या घरी हळदीकुंकवाला गेली असता कळले कि पाटलीनबाई स्वतः हळदीकुंकवासाठी आमंत्रणे करताहेत. हे कळताच ती थेट घरी गेली, तिचे छोटेसे घर आवरले, पाट मांडून ठेवला आणि वाट पाहत बसली, रात्र झाली तरी देखील पाटलीनबाई काही तिच्या घराकडे फिरकल्या नाही. दुसऱ्या दिवशी, सगळ्या बायका नटून-थटून पाटलिन बाई कडे हळदिकुंकुंवाला जायला निघाल्या. काय सुंदर नटल्या होत्या सगळ्या, चंद्रकळा, पैठणी, कांजीवरम एका पेक्षा एक साड्या. दागिने तर विचारूच नका बोरमाळ काय, चापलाकंठी, ठुशी, चिंचपेटी, मंगळसूत्राचे सर आणि या सगळ्या उंची वस्त्र आणि दागिन्यांना खुलवारणारं ठसठशीत कुंकू. अहा !…प्रत्येक स्त्री अगदी लावण्यसुंदरीच जणू! उमा मात्र उदास मुद्रेने दारातूनच हे सगळे बघत होती. “दारिद्रय व्यक्तीला समाजात कधीच स्थान मिळवून देऊ शकत नाही”, या विचाराने खिन्न व अस्वस्थ झाली. “पण मग काय? आपल्याला हौस-मौज कधीच करता येणार नाही? आपले हे दारिद्रय पाचवीलाच पुजलेलं आहे, ते काही नाही! यावेळी मी देखील संक्रांतीचे हळदीकुंकू करेल, किमान आळीतल्या ५-७ बायकांना तरी घरी बोलावेल.” असा सकारात्मक विचार तिच्या मनाला शिवून गेला.
दुसऱ्या दिवशी तिने शामला तिचा निर्णय सांगितला, त्याने तिला थोडा समजवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या हट्टासमोर तो हरला आणि म्हणाला, “बरं बाई, तू काय माझे ऐकणार आहेस? होऊ देत तुझ्या मनासारखे!” श्यामचा होकार मिळाल्यावर उमाची कळी खुलली आणि उद्या काय-काय करायचे याचा विचार करत तिचा डोळा कधी लागला हे कळलेच नाही.
पहाटेच उठून उमा कामाला लागली, आज तिचा उत्साह जणू ओसंडून वाहत होता. सडा-सारवण आणि रांगोळी काढून घर कस अगदी लक्ख केलं. “किती कामं पडली आहेत? अजून आमंत्रण देखील राहिली आहेत, कसे होईल सगळे? ” असं स्वतःशीच पुटपुटत ती एक-एक काम उरकत होती. रघु पटवाऱ्याकडून रंगीत पाट आणले, सौभाग्यचं सारे वाण आणले आणि शेजारच्या बायकांना आमंत्रण केली. विशेष म्हणजे पाटलीन बाई कडे जाऊन आग्रहाचे आमंत्रण देऊन आली.
संध्याकाळी, जपून ठेवलेली एक सुंदर साडी संदूकातून काढली, कधीतरी तिच्या आईने दिली होती तिला. तो गुलबाक्षी रंग तिच्या सावळ्या रंगावर अधिकच खुलून दिसत होता, एकुलता एक दागिना म्हणजे मंगळसूत्र! अंगणातच अबोली होती, तिचा नाजूकसा गाजर केला. अशी नटून जेव्हा ती बाहेर आली तेव्हा श्यामलाही त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही…तिने त्याला डोळ्याच्या भाषेतूनच तो गजरा केसात मळायला सांगितला. त्यानेही अलगदपणे तो तिच्या केसात माळला. त्याक्षणी श्यामला जाणवले कि आपण उमाला सुखात ठेऊ शकत नाही, तिच्या मागण्या किती वाजवी आहेत तरी पण आपण कमी पडतो. आवंढा गिळून तो पाणावलेल्या डोळ्यांनी घराबाहेर पडला.
हळूहळू सुवासिनींचे आगमन सुरु झाले. उमाने प्रत्येकीला पाटावर बसवले, त्यांना हळदीकुंकू लावून संक्रांतीचे वाण आणि तिळगुळ दिला. थोड्यावेळात खुद्द पाटलीनबाई आल्या, उमाने अतिशय प्रेमाने व आदराने त्यांचे स्वागत केले व सौभाग्याचे वाण दिले. उमाच्या अगत्य बघून पाटलीनबाईंना थोडे ओशाळल्यागत झाले कारण त्यांच्याकडून अनावधानाने झालेली चूक त्यांना उमगली. पण त्याचवेळी त्यांनी ठरवले की पुढल्यावेळी उमाला वगळणार नाही. त्यांनी डोळ्यांनीच तिची माफी मागितली आणि उमलाही ते कळले. आज उमा खूप समाधानी होती, तिच्या चर्येवरचे समाधान बघून श्यामलाही जरा बरे वाटले. हा एक दिवसाचा आनंद आणि समाधान तिच्या येणाऱ्या अनेक दिवसांसाठी ऊर्जेचा स्रोतच होता जणू.
असेच काही महिने गेले, उमा पण तिच्या कामात व्यस्त झाली आणि बघता-बघता वर्ष कसे सरले ते कळलेच नाही.
पाटलीन बाई बाळंतपणासाठी माहेरी गेल्या होत्या आणि संक्रांतीच्या काही दिवसच आधी त्या गोड़ बाळाला घेऊन परतल्या. मागीलवर्षीची चूक त्यांना परत करायची नव्हती. त्यामुळे जेव्हा त्या हळदीकुंकुवाच्या आमंत्रणासाठी निघाल्या तेव्हा सर्वप्रथम उमाच्या घरी गेल्या. ज्यावेळी त्या तिथे पोहचल्या तेव्हा उमाचा दरवाजा बंद होता. बराच वेळ कडी ठोठवल्यावरही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यांनी आजूबाजूला चौकशी देखील केली पण काही सुगावा लागला नाही. तान्हे बाळ घरी असल्याने त्या तातडीने इतर स्त्रियांकडे वळल्या. थोड्यावेळाने शेजारच्या आक्कांनी आवाज दिल्यावर उमाने दार उघडले. आक्कांनी तिला विचारले, “अगं असे का केलं, का नाही बोलली तू त्यांच्याशी? त्या इतक्या आठवणीने सगळ्यात पहिले तुझ्याकडे आल्या आणि तू अशी उर्मटासारखी वागली. उमा म्हणाली, “अक्का, मला माहिती होते, त्या यावेळी सगळ्यात आधी माझ्याकडेच येतील म्हणून, पण अश्या या मंगल प्रसंगी, पहिल्याच घरी माझे असे हे पांढरे कपाळ बघून त्यांना अपशकुन नसता का झाला? त्या माहेरी असल्याने या घटनेबद्दल त्यांना जराही कल्पना नव्हती. तीन महिन्यापूर्वीच श्यामचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. उमावर अचानक आभाळ कोसळले. आता जरा कुठे ती धीराने सावरत होती. उर्वरित आयुष्य व्यतीत करण्यासाठी तिच्याकडे होत्या त्या श्यामच्या गोड़ आठवणी आणि सौभाग्याचे दान दिल्याचे समाधान!
===================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============