Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ गीता गरुड.

प्राथमिक शाळेत ती शिक्षिका होती. शाळेतलं बाई हे नाव घरीसुद्धा प्रत्येकाच्या ओठी झालं, अगदी तिच्या माहेरी नि सासरीदेखील. सासूबाईही ‘बाई’ अशीच साद घालायच्या. बाईचा नवरोबा, श्रीनिवास मात्र तिला प्रिया म्हणायचा तेही कोणी नसताना.

बाई फारच महत्वाकांक्षी होती. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती येनकेनप्रकारेण तिला तडीस न्यायचीच असे. बाईला एकच मुलगी झाली, आपल्या मुलीचं नाव इतरांच्या मुलींहून वेगळंस युनिक तिने निवडलं, पारोल. 
त्यांच्याकडील रिवाजांनुसार पारोलच्या आत्याचा, बेबीचा खरं तर भाचीचं नाव ठेवायचा हक्क पण बाईपुढे बोलायची कोणाची टाप होती!

पारोलला अगदी शिस्तीत वाढवायचं बाईने ठरवलं. उठ म्हंटलं की उठ, बस म्हंटल की बस, हस म्हंटलं की हस नि रड म्हंटलं की रड असं. सासूबाईही अगतिक होत्या बाईपुढे.

श्रीनिवास तर नोकरीनिमित्त बाहेरगावी असायचा. घरावर त्याचा वचक फारसा नसायचाच. बायकोच्या हाती घरातला कारभार देऊन तो त्याच्या दुनियेत मश्गूल असायचा.

भटकंती आवडायची श्रीनिवासला. बाईला मुळीच फिरणं पसंत नसे, तो तिला वायफळ खर्च वाटे मग श्री एकटाच मित्रगणांसोबत ट्रेकींगला जायचा. इतकं असलं तरी बाईशी तो अगदी एकनिष्ठ होता. बाईमुळे आपण हे असे स्वच्छंदी जगू शकतो या वास्तवाचं श्रीला भान होतं. आईच्या पावलावर पाऊल ठेवणारी पारोलही अतिशय महत्वाकांक्षी बनत होती.  शाळेत इतर विद्यार्थिनींसमोर आपला ताठा मिरवायची एकही संधी ती सोडत नसे.

पारोल शिकली मात्र न अडखळता. एम. कॉम करता करता ती बँकेच्या परीक्षांनाही बसत होती.  तिची एका अग्रगण्य बँकेत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तिथेही तिचा अहंगंड हाताखालच्या कर्मचाऱ्यांना दुखवत असायचा. बँकेचे क्याशिअर असणाऱ्या हसबनीसांना ती एका क्षुल्लक चुकीवरनं अद्वातद्वा बोलली होती आणि हसबनीसांना जागीच कापरं भरलं होतं. त्यांना बसवायचं, पाणी देण्याचंही सौजन्य तिने दाखवलं नव्हतं.

पारोलच्या आजीला सुनेचं व नातीचं हेकट वर्तन मुळीच आवडत नव्हतं. घरातली नोकरमंडळी केवळ पारोलच्या आजीमुळे त्या घरात टिकून होती नाहीतर बाईच्या घालूनपाडून बोलण्यामुळे कधीची नोकरी सोडून पळाली असती. आपल्या सासूबाई नात्याचा, रुबाब दाखवणं बाईच्या सासूला कधी जमलंच नाही. लेकाची भेट तर महिनोनमहिने दुर्लभ असायची तर मुलगी सुनेच्या अरेरावीपणामुळे माहेरपण उपभोगण्यापासून कधीची लांब गेली होती.

एका रविवारी पारोलला बघायला मुलाकडची येणार होती. मुलगा सर्जन होता. हे स्थळ हातचं जाता नये बाई स्वतःला नि पारोललाही समजावीत होती.

मदतीसाठी तिने नणंदेला बोलावलं.होतं. नणंदेची थोरली मुलगी मायाही तिच्यासोबत आली होती.मायाच्या डोळ्याखाली नि गालाच्या किंचीत वर काळा डाग होता . सावळ्या रंगावर तो काळा डाग अगदीच कसासा दिसायचा.

बाई मायाला बघून नेहमी म्हणायची,”कशी उजवायची पोर, तोच जाणे!” मायाला मामीचं हे बोलणं सवयीचं झालं होतं.

बेबीही वहिनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून घरातली कामं आवरत होती. कुंडीतला ताजा रसरशीत कडीपत्ता तिने जिरामोहरीच्या फोडणीत टाकला. घरभर बेबीच्या हातच्या फोडणीचा गंध पसरला, पाठोपाठ पोह्यांचा दरवळ. कोथिंबीर, खोबरं लेवून प्लेटीतले पोहे सजले.

आत माया पारोलला आवरण्यात मदत करत होती. तिच्या केळीच्या गाभ्यासारख्या कांतीचं कौतुक करत होती. तिचं मेकअपचं सामान कौतुकाने पहात होती. तिला क्षणभर वाटलंही, यातलं एखादं प्रसाधन वापरून हा डोळ्याखालील चवलीएवढा दिसणारा काळा डाग लपवावा पण असा किती काळ लपेल तो!

ढगाआड गेलेला चंद्रमादेखील बाहेर येतोच की. वरली प्रसाधनं उडून गेली की तो अजूनच बिभस्त दिसेल या कल्पनेनं तिची तिलाच शिसारी आली.

“माया बघ ना ही लिप्स्टीकची शेड लावू का गं?” या पारोलच्या प्रश्नाने ती भानावर आली. पारोलचा पदर नीट करत “हो छान दिसेल” म्हणाली.

“बघ गं मी किती गोड दिसते ना. कोणाची टाप लागलेय मला नकार द्यायची,” आरशातील आपल्या आरसपानी देहाकडे पहात पारोल उद्गारली. मानेवरील केस तिने दोन्ही बाजूंना पुढे घेतले. त्यांवर उगाचच एक कंगव्याचा हात मारल्यासारखं केलं.

एव्हाना पाहुणेमंडळी येऊन दिवाणखान्यातील सोफ्यावर बसली होती. नवरामुलगा, त्याची आई, मामा व मध्यस्थी म्हणून आलेले गुरुजी अशी ती चौघंजणं बसली होती. पारोलच्या आजीशी इकडचं तिकडचं बोलत होती. तिच्या तब्येतीची आस्थेने चौकशी करत होती.

पोह्यांच्या प्लेटी रचून ठेवलेला ट्रे घेऊन पारोल दिवाणखान्यात गेली. साडेपाच फुट उंचीची सडसडीत बांध्याची, धारदार नाकाची पारोल पोपटी रंगाच्या साडीत उठून दिसत होती.

लाल रंगाच्या स्लिव्हजलेस ब्लाऊजमुळे उघडे असलेले तिचे घोटीव दंड  सर्वांच लक्ष वेधून घेत होते. ओठही अगदी गुलाबाच्या पाकळीसारखे नाजूक आणि काजळ भरलेले पाणीदार डोळे, वक्षस्थळांवर विसावलेले काळेभोर केस.

प्रत्येकजण आपापल्या नात्याच्या कक्षेतून तिच्याकडे पहात होता. नवऱ्यामुलाला त्याच्या अपेक्षेपेक्षा ती दहा काकणं अधिक सरस वाटली नि एकांतात तिच्याशी ओळख करून घेण्याचा मोहही त्याला झाला.

प्रत्येकाच्या हाती पोह्याची प्लेट देऊन उभ्यानंच तिनं सर्वांना नमस्कार केला. तिचं लक्ष नवऱ्यामुलाच्या उजव्या बाजूस बसलेल्या हसबनीसांकडे गेलं. हो तेच ते तिच्या बँकेतले क्याशिअर ज्यांच्यावर ती एवीतेवी ओरडायची. हसबनीसांना तिला पहाताच कापरं भरलं. तिच्या जाचाला कंटाळून त्यांनी लांबच्या शाखेत बदली करून घेतली होती. पारोलने हसबनीसांशी काही ओळख आहे असं मुळीच दर्शवलं नाही.

हसबनीसांनी कापऱ्या हातांनी कसेबसे पोहै संपवले. नवरामुलगा बोलका होता. त्याचे वडील बेड रिडन असल्यानं मामाच त्याच्या लग्नात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं, तसंच मामाने त्यांच्या घरावर धरलेल्या क्रुपाछत्राविषयीही अगदी आत्मियतेने सांगत होता.

बाईला नि पारोललाही त्याचं मामापुराण ऐकण्यात काडीमात्र रस नव्हता. पारोलने मग सर्वांना चहा दिला. चहा देताना तिने हसबनीसांच्या कापऱ्या हातांकडे नि चेहऱ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला,

हसबनीसांना मेल्याहून मेल्यासारखं झालं. नवऱ्यामुलाच्या नजरेतून पारोलने मामाचा केलेला अपमान सुटला नाही.

हातातला चहा अव्हेरू नये म्हणून तो घशाखाली ढोसत राहिला पण ते वातावरण, त्या मायलेकींचा अहंमन्य स्वभाव एकंदरीतच उबग आणणारा होता. तो अगदीच अनकम्फरटेबल झाला.

इतक्यात कशी कोण जाणे हसबनीसांच्या कापऱ्या हातातून बशी निसटली आणि मग भितीने कपही त्यांच्या बोटांतून गळाला. पांढऱ्याशुभ्र सदऱ्यालेंग्यावर चहाचे ओघळ सांडले. हसबनीस अगदीच गलितगात्र झाले.

पडद्याआडून हे पहात असणारी माया चटकन ओलं पोतेरं घेऊन धावत आली. तिने पोतेरं लादीवर सांडलेल्या चहाच्या ओघळांवर दाबलंं नं हसबनीसांच्या हाताला धरून त्यांना मोरीत घेऊन गेली.

त्यांच्या सदऱ्यावरचे, लेंग्यावरचे डाग तिने ओल्या फडक्याने पटापट पुसले. टर्किशटॉवेलने तो ओलेपणा शोषून घेतला नि परत त्यांना जागेवर आणून बसवलं. पोतेरं धुवून दोनदा फिरवून फरशी चकाचक केली.

एव्हाना बाई नवऱ्यामुलास व त्याच्या आईस त्यांची गावची प्रॉपर्टी, इथली प्रॉपर्टी, पारोलचं शिक्षण, आवडीनिवडी हे सारं दिमाखात सांगत होती.

मुलाकडची मंडळी निघून गेली. पारोल म्हणाली,” उद्याच फोन येईल बघ त्यांचा..मुलगी पसंत आहे म्हणून पण मीही जरा ऐट दाखवेनच. त्याच्या बेडरिडन वडलांसोबत कोण राहील! स्वत:चं घर घेणार असशील तर बोल..असंच सांगणार आहे मी त्याला. “अगदी बरोबर बोललीस पारोल तू. वेगळं रहाणंच श्रेयस्कर. हेच तर दिवस असतात मौजमजेचे, ते का त्या म्हाताऱ्याच्या आजारपणात घालवणारैस!” बाईने लेकीची री ओढली.

दुसऱ्या दिवशी बाईंना फोन आला,”हेलो, मी नंदन बोलतोय. काल तुमच्या पारोलला बघायला आलो होतो.”

“हं, बोला. कधीची तारीख ठेवायची बैठकीची!”

“मावशी, जरा ऐकाल माझं. मला ती, तुमची भाचीच ना ती फरशी पुसत होती ती..”

“अं हो. तीचं काय!”

“ती पसंत केलीय मी.”

“अहो. कसं शक्यय. ती माया, तिच्या डोळ्याखालचा तो ओंगळवाणा डाग पाहिलात ना. शिवाय नोकरीही नाही धड. कसल्याशा पतपेढीत कामाला जाते. वडील कर्जबाजारी आहेत तिचे. आमची एव्हढी संपत्ती..पारोल आमची एकुलती एक. ही संपत्ती शेवटी तुम्हालाच मिळणार नि त्या मायाशी लग्न केलात तर त्यांचं कर्ज नि आजारपणं फेडावी लागतील तुम्हाला आयुष्यभर. जाणूनबुजून कशाला आगीत उडी घेताय!”

“मावशी, तसं म्हणा हवं तर. पण माझी आई भारावून गेली मायाच्या वागणुकीने. तिचा आपलेपणा, जिव्हाळा स्पर्शून गेला मनाला. अशी सोन्यासारखी पोरच सून म्हणून घरात येऊदे असा आग्रह करतेय आई शिवाय माझ्याही मनात भरलं तिचं माणूसपण. सोन्याचांदीहून ते अधिक महत्वाचं नाही का! “

“अहो पण तिच्या डोळ्यांखाली, गालाच्या किंचीत वर तो चवलीएवढा काळा डाग पाहिलात ना.” बाई आपली भिंत लढवत होती. सहजासहजी हार मानायची नव्हती तिला. हाती आलेलं सावज अनाहूतपणे गेल्यावर पारध्याची जी विमनस्क अवस्धा होते तसंच काहीसं होत होतं बाईचं जे ती स्पष्टपणे बोलून दाखवूही शकत नव्हती.

“हो पाहिला. नीट निरखून पाहिला. डागाचं काय घेऊन बसलात, चंद्रावरही डाग आहेतच की. बाहेरच्या सोंदर्याहून मला अधिक भावलं ते मायाचं हळवेपण, तिचं आंतरिक सौंदर्य. त्यांचा नंबर द्या मला. या महिन्यातच लग्नाचा मुहूर्त फिक्स करायचाय. आई म्हणाली, एवढी सोन्यासारखी पोर हातातून निसटायला नको. बरोबर नं.”

“अं हो,” म्हणत बाईने इच्छा नसतानाही त्या मुलाला नणंदेचा भ्रमणध्वनी क्रमांक शेअर केला.

समाप्त

=====================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *