Skip to content Skip to sidebar Skip to footer

सोनपरी आणि रुपपरी

©® गीता गजानन गरुड.

परीच्या राज्यात खूप साऱ्या पऱ्या होत्या. गोडगोडुल्या, साजिऱ्यागोजिऱ्या पऱ्या, छानछान पायघोळ फ्रॉक घालून फिरणाऱ्या,बागडणाऱ्या पऱ्या.

या छोट्या पऱ्या वयात आल्या तसं प्रत्येक परीला पऱ्यांच्या राणीने जादूची छडी दिली व जादूच्या छडीचा उपयोग कुणा गरजूला मदत करण्यासाठीच करायचा, वाईट कामासाठी मुळीच करायचा नाही अन्यथा छडीतली जादुई शक्ती लोप पावते असे समजावून सांगितले.

या छोट्या पऱ्यांना परीराणीने पंखही दिले. आता पऱ्या कधीही भूलोकावर उडू शकणार होत्या. तिथल्या गरजूंना मदत करू शकणार होत्या.

सोनपरी नं रुपपरी दोघी बहिणीबहिणी होत्या खऱ्या पण सोनपरीच रुपाने उजवी होती आणि सोनपरीला आपल्या रुपाचा अहंकारही होता. ती बाकीच्या मैत्रिणींना इतकंच काय आपल्या सख्ख्या बहिणीलादेखील तुच्छ मानायची.

सोनपरी व रुपपरीच्या आईने त्यांना भूलोकावर जायची पंरवानगी दिली पण बजावून सांगितले,”ठाऊक आहे नं परीराणीने सांगितलेलं. आपापल्या छडीचा उपयोग योग्य त्या ठिकाणीच करा. उगा कुणा गरीब, दीनदुबळ्याला त्रास देऊ नका बरे.”

आईचा आशीर्वाद घेऊन दोघी बहिणीबहिणी पांढुरक्या ढगाच्या रथावर बसून निघाल्या. ढगाचं सारथ्य करत होते, दोन पांढुरके ससे. आकाशाच्या पडदयांतून ढगाचा रथ हळूहळू खाली उतरु लागला नि क्षितीजावर विराजमान झाला तशा पऱ्या रथातून उतरल्या नि आकाशात विहार करु लागल्या.

खाली बागेत मुलं खेळत होती. पकडापकडीचा डाव रंगात आला होता. सोनपरीने छोट्या जगूला मुद्दामच पाडलं. जगूला सोनपरी दिसत नव्हती. अद्रुश्य होती नं ती पण जगू घाबरला. रडू लागला. रुपपरीने त्याच्या दुखऱ्या ढोपरावरनं जादुची कांडी फिरवली. जगूला बरं वाटलं. तो पुन्हा खेळू लागला.

घसरगुंडीवर मुलं बसली होती. ती खाली घसरत जाणार इतक्यात सोनपरीने त्यांना मागून जोरदार धक्का दिला. सगळी मुलं गडगडत खाली आली, पडणार इतक्यात रुपपरीने जादूच्या कांडीने त्यांचा वेग कमी केला. सोनपरीला रुपपरीचं हे ऐऱ्यागैऱ्याला मदत करणं मुळीच आवडलं नाही. तिने नाक मुरडलं.

सोनपरी व रुपपरी थोडं पुढे गेल्या. तिथे एक म्हातारी भिकारीण बसली होती. ती अंध होती, उपाशी होती. तिच्यासमोरच्या डब्यात कुणी दयाळू माणसाने दहा रुपयाचं नाणं टाकलं.

नाण्याची किणकिण कानी पडताच, म्हातारीच्या चेहऱ्यावर आनंदी भाव उमटले. त्या दहा रुपयातून ती वडापाव घेऊन खाऊ शकणार होती, इतक्यात सोनपरीने ते नाणं गायब केलं.

म्हातारी बिचारी डब्यात चाचपत राहिली. रुपपरीने म्हातारीच्या डब्याभोवती जादूची कांडी फिरवली. डब्यात भाजीपोळी आली. आता रोज त्या डब्यात भूकेच्या वेळेला भाजीपोळी येणार होती. म्हातारीने मनोमन तिला खाऊ घालणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद दिले.

त्या दोघी पुढे जाऊ लागल्या. रस्त्यात एक कुत्र्याचं पिल्लू पडलं होतं. कुणा गाडीवाल्याने त्याला ठोकर मारली होती. ते गरीब बिचारं कण्हत होतं. सोनपरी तिथनं पुढे गेली नं क्षितीजावर येऊन ढगांच्या रथावर बसली. ढगाला म्हणाली,”चल चल रे ढगा. परीराज्यात जाऊ.”

ढग म्हणाला,”थांब की जरा. रुपराणीला येऊदेत” पण सोनपरीने त्याला थांबण्यास मनाई केली. तिला रुपराणीची फजिती करायची होती.

इकडे रुपराणीने त्या कुत्र्याच्या पिल्लाच्या रक्तबंबाळ पायावर जादूची कांडी फिरवली. ते पिल्लू उठून उभं राहिलं तसं त्याच्या आईने आनंदाने शेपटी हलवली. ती गोल गोल फिरू लागली.

रुपराणी आता क्षितिजापाशी आली पण ढगांचा रथ तर नव्हता तिथे. ती आपल्या इवल्याइवल्या पंखांनी हळूहळू उडत, थांबत, उडत संध्याकाळपर्यंत परीराज्यात पोहोचली. आईपरीला जादुई आरशातनं सारं काही दिसत होतं. आईपरीने रात्री रुपपरीच्या पायांवर चांदण्यांची शीतल चादर पांघरली. तिला खूप शांत झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दोघीजणी भूलोकावर जायला निघाल्या पण सोनपरीची छडी कामंच करेनाशी झाली होती. तिच्या वाईट वागण्याने तिच्या जादूच्या छडीतील जादुई शक्ती काही दिवसांकरता लोप पावली होती. इतकंच काय, तिचे पंखही काम करीनासे झिले होते. पण रुपपरीची जादुची कांडी मात्र अधिक तेजाने तळपत होती. रुपपरीचे पंख छान फडफडत होते.

सोनपरीला कळून चुकलं, आपण इतरांशी वाईट वागलो म्हणून आपल्या कांडीतली जादू कमी झाली. आपले पंख कमजोर झाले. आता सोनपरीनेदेखील रुपपरीसारखं छानछान वागायचं, गरजूंना मदत करायचं ठरवलं.

–समाप्त

=====================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.