Ritbhatmarathi

Search
Close this search box.

आज जिथं माणसं सत्तर दिवस काय सत्तर तास देखील गुण्यागोविंदाने एकत्र राहू शकत नाहीत तिथं माधवरावांनी आणि माईंनी सत्तर वर्षाचा संसार अगदी सुखासमाधानानं आणि आनंदाने केला.एक मुलगा एक मुलगी असं माधवरावांच सुखी चौकोनी कुटुंब होतं.माधवराव एका बँकेतून तर माई एका शाळेतून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. मुलगा आणि मुलगी दोघेही उच्चशिक्षित. आपापल्या संसारात सुखी. दोन्ही मुलांचे सगळे जिथल्या तिथे करून माई आणि माधवरावांनी
संसारातूनही निवृत्त व्हायचं ठरवलं. मुलांना तसं सांगून त्यांनी जवळच असलेल्या आपल्या गावी शेतावर जाऊन राहायची तयारी केली.

मुलांना वाईट वाटलं पण त्यांचं काही चाललं नाही. दोन दिवसांनी अत्यावश्यक अशा लागणाऱ्या काही गोष्टी औषध पाणी थोडीफार वाचण्यासाठी पुस्तक, जुने अल्बम, रेडिओ असा सारा लवाजमा घेऊन माई आणि माधवराव गावाकडे रवाना झाले.वयाच्या नव्वदीतही माई आणि माधवरावांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. माईंनी घरातली तर माधवरावांनी अंगणातली साफसफाई केली आणि सुरू झाला त्यांचा सेकंड इनिंग मधला नवा संसार.आता फक्त दोघेच दोघांनीच आणायचं,दोघांनीच करायचं आणि दोघांनीच खायचं.

एकमेकांच्या आवडी-निवडी जपण्यात अन् एकमेकांची पथ्यपाणी पाळण्यात दोघांचा वेळ कसा जायचा ते त्यांचं त्यांनाच कळायचं नाही.भजन कीर्तन, कधीतरी गावात एकदा फेरफटका, कधी जोडीने भाजी आणायला जाणं, तर कधी एकदा रोमँटिक सिनेमा लावून मस्त गरमा गरम भजी खात तो पाहणं असं साध सरळ सोपं आयुष्य माधवराव आणि माई जगत होते. उद्या लग्नाचा ७१ वा वाढदिवस माई खूप खुश होत्या काय काय करायचं माधवरावांच्या आवडीचे पदार्थ बनवायचे म्हणून त्यांच्या नकळत तयारी करत होत्या माधवरावांनी देखील शेजारच्या राजुला मला सकाळी सकाळी ताजी सोनचाफ्याची फुलं आणि अबोलीचा गजरा आणून दे असं बजावून ठेवलं होतं.उद्याच्या दिवसाची स्वप्न रंगवतच माई अन् माधवराव झोपी गेले.

सकाळी जाग आली तिचं चिमणी पाखरांच्या किलबिलाटाने. दार उघडून पाहतात तर समोर मुलं आणि नातवंड. सारं सुख दारात उभं. उभ्या उभ्या माईंनी सारं सुख डोळ्यात साठवून घेतलं. आल्याबरोबर सूनबाईंनी आणि लेकीने स्वयंपाकघराचा ताबा घेतला.आज तिथं सगळं माई आणि माधवरावांच्या आवडीचं बनणार होतं. पुरणपोळी, कटाची आमटी, उकडीचे मोदक, आळु वडी आणि बरच काही. नातवंडांनी घर आणि अंगण कधीच दणाणून सोडलं होतं. जेवणाची तयारी झाली. सुनेने आणि लेकीने केलेला साग्रसंगीत स्वयंपाक पाहून दोघं तृप्त झाले. आज कितीतरी दिवसांनी दोघंही जरा जास्तच जेवले. जेवणं उरकून माई आणि माधवराव गप्पा मारत बसले आज दोघांच्याही चेहऱ्यावर वेगळंच तेज झळकत होतं.

माधवरावांनी माईंना डोळे झाकून ओंजळ पुढे करायला सांगितली .माधवरावांनी सोनचाफ्याने भरलेली ओंजळ माईंच्या ओंजळीत रीती केली. घरभर सोनचाफ्याचा सुगंध दरवळला. माई मनोमन सुखावल्या. भरभरून प्रेम करणारा नवरा,जीवापाड जपणारी मुलं, दुधावरल्या सायीसारखी नातवंड यापेक्षा वेगळं सुख असतं काय.गप्पा मारता मारता माधवराव म्हणाले उमा थकलीस का गं.सगळ्यांचं सगळं काही विनातक्रार केलंस ,कधीही कुठल्या गोष्टीचा हट्ट नाही की त्यावरून भांडण नाही समजूतदारपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहेस तू.आता या सगळ्यातून तुला सुट्टी द्यावी म्हणतोय,

माझं आजारपण, माझं पथ्य-पाणीआणि घरातलं करून दमली असशील. माधवरावांना आपली जाण्याची वेळ आली हे जणू कळलं होतं म्हणूनच आज ते अशी निर्वाणीची भाषा करत होते.यावर माई हसत हसत म्हणाल्या इतक्यात कुठली सुटका व्हायला माझी आणि दोघही खळाळून हसले अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत. माई डोळे पुसतच उठल्या.

माधवरावांना, तुम्ही थोडा वेळ आराम करा मीही पडते जरा असं म्हणून माई ती सोनचाफ्याची ओंजळभर फुलं घेऊन देवघरात गेल्या. सोनचाफ्याची ओंजळ त्यांनी देवापुढे रीती केली. समईची वात सरकवली आणि तेवढ्यात माधवरावांनी उमा अशी मोठ्याने हाक मारली.कोणास ठाऊक पण माईंना कळलं होतं ती शेवटची हाक होती. माईंनी देवासमोर हात जोडले आणि शांतपणे डोळे मिटले. तिकडे माधवरावांनी आणि इकडे माईंनी एकाच वेळी जीव सोडला होता. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन त्यांनी आयुष्यानंतरही निभावलं होतं.लग्नाच्या वाढदिवशीच माई आणि माधवराव अनंताच्या प्रवासास निघून गेले,सोनचाफ्याच्या साक्षीने…

-सुरेखकन्या..
अश्विनी सचिन जगताप

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *