सोलो ट्रीप

वीणाने फ्लाईटची दोन तिकीट आणि हॉटेलचे बुकिंग करून, राहुलला म्हणजेच आपल्या नवऱ्याला फोन लावला. पंधरा दिवसांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, म्हणून तिकीट बुक करून राहुलला सरप्राइज द्यायचे ठरवलेले तिने. जेव्हा विणाचा फोन आला, तेव्हा राहुल खूपच बिझी होता. तिने न विचारताच परस्पर तिकीट बुक केली म्हंटल्यावर, त्याला खूप राग आला. भांडून, चिडून त्याने फोन ठेवला.
पण त्याचा राग शांत होईल म्हणून, वीणाने तिकीट कॅन्सल केली नाहीत.
रात्री राहुल घरी आला तो घुश्यातच. प्रमोशन न मिळाल्याचा सारा राग त्याने वीणावर काढला आणि चार वर्षांच्या संसारात कधी नव्हे ते, दोघांनी एकमेकांशी अबोला धरला.
मात्र चार दिवसानंतर कंपनीने राहुलला दुसऱ्या शहरात ट्रेनिंगसाठी पाठवल्याने वीणा जाम चिडली. या साऱ्या गडबडीत फ्लाईटची तिकिटे कॅन्सल करायची राहूनच गेली. राहुलला घरी यायला चांगले दहा दिवस लागणार होते. मग रागारागाने वीणाने एकटीनेच ट्रीपला जायचा प्लॅन केला.
‘सोलो ट्रीप.’ हा विचार करूनच तिला मनातुन खूप छान वाटत होत. पण थोडी भीतीही वाटत होती. एकटीनेच फिरायचं, एकटीनेच हॉटेलमध्ये राहायचं, खायचं – प्यायचं!
“पण एखादे वेळेस धाडस करायला काय हरकत आहे?” म्हणून वीणाने थोडी फार शॉपिंग केली आणि आपली बॅग भरून ठेवली. ट्रीपला जायची सारी तयारी झाली, तसा सासुबाईंचा फोन आला. “आम्ही दोघे येतोय तिकडे तुमच्या एनिवर्सरीला.”
पण वीणाने स्पष्टच सांगितलं, “राहुल दुसऱ्या शहरात ट्रेनिंगला गेला आहे आणि मी ‘सोलो ट्रीपला’ जाणार आहे.” हे ऐकून सासुबाई घाबरल्याच. म्हणाल्या, “अगं एकटीने जाण्यापेक्षा तो आल्यावर जा, दोघे मिळून. तिकीट कॅन्सल कर. तरुण पोरींन असं एकटीने फिरणं चांगल वाटत नाही गं.” हे ऐकूनही वीणाने आपला हट्ट काही सोडला नाही.
ट्रिपचा दिवस उजाडला तसा विणाला नाही म्हंटले तरी थोडं टेन्शन आलंच. ‘आयुष्यातली पहिली सोलो ट्रीप म्हणून.’ आज राहुल सोबत असता तर फार बरं झालं असतं’, असं राहून -राहून तिला वाटू लागलं. फ्लाईटमध्ये बसल्यावर तर विणाच्या पोटात गोळाच आला. तसा न राहवून तिने राहुलला फोन लावला. वीणा खरचं एकटीने ट्रीपला जाईल असा कॉन्फिडन्स राहुललाही नव्हता, त्यामुळे त्याला खरा धक्का आत्ता बसला. पण तो म्हणाला, “मी इथले काम आटोपून ‘गोव्याला’ यायचा प्रयत्न करतो.” तेव्हा विणाचे टेन्शन कुठल्या कुठे पळलं आणि ती निर्धास्त झाली.
अखेर विणाचं फ्लाईट गोव्याला पोहोचलं. तिथंल वातावरण पाहून वीणा जाम खुश झाली. काही मिनिटांतच बुक केलेल्या टॅक्सीने हॉटेलवर पोहोचली. तिथे मिळालेली रूम इतकी छान होती की, ‘राहुल सोबत हवा होता’ असं तिला मनापासून वाटू लागलं.
दोन तास छान विश्रांती घेऊन ती रिसेप्शनिस्ट कडून माहिती घेऊन हॉटेलमधून बाहेर पडली. अगदी चालत जाण्याएवढ्या अंतरावर समुद्र किनारा असल्याने लवकरच बीचवर पोहोचली.
तिथलं वातावरणच खुपचं छान होतं, दमट वारा, समुद्रात खेळणारे पर्यटक, वाळूवर हातात हात घालून फिरणारी जोडपी, परदेशी पर्यटक, किनाऱ्यावर पसरलेले श्याक्स, खाण्याच्या- जेवणाच्या पदार्थांचे येणारे निरनिराळे वास..हे पाहून वीणा स्वतः लाही विसरली.
किनाऱ्यावर फिरून, समुद्रात मनसोक्त खेळून झाल्यावर, तिने खायचाही मनसोक्त आनंद घेतला आणि आपल्या रूमवर परत आली. तोच तिच्या पलीकडच्या रूमची चावी हरवली होती, त्यामुळे एक परदेशी पर्यटक, “किम,” बाहेर अडकून पडली होती. हा सगळा गोंधळ निस्तरेपर्यंत किम आणि विणा दोघी एकमेकींशी गप्पा मारू लागल्या. थोडयाच वेळात छान मैत्री झाली दोघीत.
कीमला तर खूप आश्चर्य वाटलं, ‘वीणा एकटीच एनिवर्सरीच्या ट्रीपला आली आहे म्हणून!’
दुसऱ्या दिवशी दोघी नव्या मैत्रिणी टू व्हीलरने मस्तपैकी गोवा फिरून आल्या. मनसोक्त भटकून आल्या, वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढून आल्या. दोघींनी एकमेकींशी खूप साऱ्या गप्पाही मारल्या.
पुढे दोन दिवस दोघींनी नुसती धमाल केली. गोव्यातले चर्च, बीच फिरून, जंगल सफरीचाही आनंद घेतला.
आज वीणाला खूप छान वाटत होतं. नेमकी राहुलला फोनच करायची विसरली ती, एनिवर्सरीचा! शेवटी वाट पाहून राहुलचाच फोन आला. तेव्हा कुठे तिला आठवलं, ‘आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे!’
दुसऱ्या दिवशी वीणा आणि किमने खूप सारी शॉपिंग केली. वीणाने किमला खूप साऱ्या भेट वस्तू दिल्या ‘आपली आठवण म्हणून.’ कारण आज रात्रीची तिची परतीची फ्लाईट होती.
डिनर नंतर किम निघून गेली आणि वीणाला एकटं वाटू लागलं. दोन – चार दिवसांची भेट पण तिचं मन व्याकूळ झालं. आपणही उद्या निघावं म्हणून वीणाने बॅग आवरून घेतली. शिवाय राहुलला इथे यायला जमणार नव्हतंच.
“पण पुन्हा एकदा सोलो ट्रीपला नक्की यायचंच” असं ठरवून वीणा शांत झोपी गेली. ही सोलो ट्रीप वीणाच्या आयुष्यभर लक्षात राहणार होती, हे मात्र नक्की.
============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============