सोबत

®️©️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
आज दुपारपासूनच आभाळ भरून आलं होतं. ते सुंदर पावसाळी वातावरण माझ्या आनंदात अजूनच भर घालत होते. हो मी आनंदी होते! त्याचं एक वेगळंच कारण होतं. आज खूप दिवसांनी मी एकटीच घरात होते घरातील सर्व एका समारंभानिमित्त परगावी गेले होते आणि मी एकटीच होते. खूप दिवसांनी मला असा एकटेपणा मिळाला होता. आज काय काय करायचं याचं अगदी मी छान प्लॅनिंग केलं होतं. एकदा वाटलेलं मैत्रिणींना बोलावून धिंगाणा घालावा, गप्पा, नाच, गाणी पण परत म्हटलं जाऊदे नको ही वेळ आपण क्वालिटी टाईम म्हणून वापरू. आत्मपरीक्षण किंवा आपल्यासाठीच पूर्ण वेळ काढणे. दुपारी तीन वाजताच सर्वजण बाहेर पडले. मी माझ्या कामात बुडून गेले. दोन तास कसे गेले कळलेच नाही आणि पाच वाजता मला चहाची आठवण झाली.
मस्त आपल्याला हवा तसा कमी साखरेचा भरपूर आल्याचा चहा करायला मी उठले. किती मज्जा आज कोणीच नाही आपल्या चहात वाटेकरी. मस्त मग भरून चहा घेऊन मी मागीलदारी पायरीवर बसले. तोपर्यंत पावसाने जोर धरला होता. गरम गरम चहा, सोबत मुसळधार पाऊस कुठे होते मी एकटी? त्या पावसाच्या धारांकडे बघताना मला खूप मजा वाटत होती. वाटत होतं आपल्याला एकटं राहायला मजा येतेय पण हा पाऊस मात्र असंख्य धारा बरोबर घेऊन नुसता धिंगाणा घालतोय, मज्जा करतोय. तिकडे समारंभात पण सर्व जण मिळून मज्जा करत असतील. मग मीच माझी जीभ चावली. मीच सर्वांना सांगितलं होतं, माझी आठवण काढू नका, मी पण तुमची आठवण काढणार नाही. असं होतं का पण? सर्व काही ठरवतो, तसंच वागायला जमतं का? विचारांच्या सोबतीने चहाही संपला आणि मी पावसातच फेरफटका मारून यायचे ठरवले. आता दुसर्या कोणाची नको तरी त्या पावसाची सोबत मला हवीहवीशी वाटू लागली. एरवी आपण पावसातून निघालं की, नवरा टोकणार, ‘‘कशाला पावसात भिजायला जातेस?’’ सासूबाई म्हणणार, ‘‘काय नडलंय का जायचं आत्ता त्या चिखलातून?’’ मुलगा म्हणणार, ‘‘आईचं काहीपण असतं.’’ आज टोकणारं कुणी नव्हतं!! छानसा ड्रेस घातला नी नामधारी छत्री घेऊन बाहेर पडले.
पावसाचा जोर कमी झाला होता, भुरभुरणारा पाऊस होता. एका हातात छत्री, एका हाताने वार्यामुळे डोळ्यांवर येणारे केस, मध्येच पर्स असं सर्व सांभाळत मी खड्ड्यांचा अंदाज घेत हळू हळू चालत होते. पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा आला होता, हळूहळू थंडी वाजू लागली. जास्त लांब न जाता मी घराजवळच्या बागेत जावं असं ठरवून मी तिकडे गेले. बागेतली सर्व बाकडी भिजून गेली होती. त्यामुळे बसण्यात अर्थ नव्हता. तिथे एक मंदीर होते त्या मंदिरात आत जाऊन नमस्कार करून मी बाहेर पडले. आता चांगलंच अंधारून आलं होतं. रस्त्यावर पण तशी कमी वर्दळ होती. मी थोडी पुढे आले आणि माझ्या पाठीमागून कुणीतरी येतंय असा मला भास होऊ लगला. अशा वातावरणात कोणी माझा पाठलाग करतंय की काय? मला फार भीती वाटू लागली. झपाझप चालायचा प्रयत्न केला, पण ओला रस्ता, त्यात भरपूर खड्डे, साचलेला चिखल यामुळे पाऊल जपूनच टाकावं लागत होतं.
मागे वळून बघण्याचं धाडस होत नव्हतं. पण माझ्या मागे दबकी पावलं मला चांगलीच जाणवत होती. मनात सर्व विचारांची गर्दी झाली होती. उगाच एकटं राहायचा हट्ट केला. आता जर मला काही झालं तर? मी रस्त्यात पडले तर? माझ्या मागून येणार्या अज्ञात व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला तर? एकटी राहिले ती राहिले, निदान या पावसातून घरातून बाहेर तरी पडायला नको होतं. एक ना दोन शंभर विचार मनात आले आणि मनावर भीतीची काजळी पसरली, म्हणतात ना ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ ही म्हण अगदी सार्थ वाटू लागली. हळूहळू डोळे भरून येऊ लागले. आता आभाळ स्वच्छ झालं होतं, पण माझे डोळ्यातलं पाणी कधी ठिबकू लागले सांगता येत नव्हतं. मागे वळून पाहायचं धाडस होत नव्हतं. कसाबसा जरा वेग वाढवून मी माझ्या घराजवळ आले. पटकन घरात आत येऊन गेटचं दार लावलं तेव्हाच मी मागे वळले तर मला कोणीच दिसलं नाही.
हुश्श! किती घाबरले होते मी, उगाचंच! पण ती दहा मिनिटं मात्र मला एकटेपणाच्या भीतीनं ग्रासलं होतं. मन म्हणजे अगदी श्रावण महिन्यातला पाऊस झालं होतं. कधी ऊन तर कधी पाऊस! कधी एकटेपणाची हौस तर कधी एकटेपणाची वाटणारी भीती. मी घरात गेले. आता मस्तपैकी गरम गरम खिचडी करावी असं ठरवलं आणि फोन हातात घेऊन लावावा का मुलाला फोन? असा विचार केला, पण मग थोडीसा अहंकार आडवा आला, ‘‘आपणच कोणाला फोन करू नका म्हटलं होतं.’’ पण या क्षणी वाटत होतं. आपणही त्यांच्याबरोबर जायला हवं होतं.
खिचडी करून टी. व्ही. लावला, तर कोणत्याच चॅनेलवर काही चांगलं नाहीये असं वाटत होतं. पुस्तक वाचायचं ठरवलं होतं, त्यातही लक्ष लागत नव्हतं. सोबत म्हणून हवाहवासा वाटणारा पाऊसही आता पूर्ण थांबला होता. खिचडी खायला घ्यावी असंही वाटत नव्हतं. तेवढ्यात बाहेर क्षीण आवाजात म्या ऽ ऽ ऽ व असा बारीक आवाज आला. वाटलं असेल कुठून तरी आलेलं मांजर. जाईल आपल्याआपण. पण परत परत म्या ऽ ऽ व ऐकू येऊ लागलं आणि जणू मलाच कोणीतरी हाक मारत आहे. असं वाटलं. एरवी मांजरं, कुत्री मला आवडत नाहीत. पण आत्ता ती जवळून येणारी म्या ऽऽ व पण मला सुखकर भासू लागली. मी बाहेरचा लाईट लावला आणि समोर दिसलेल्या दृश्याने मी हेलावून गेले. पावसात भिजलेलं पांढरशुभ्र मांजर थंडीने काकडत पायरीवर बसलं होतं. मी खिडकी उघडताच त्याने माझ्याकडे आशेने पाहिलं. जणू त्याची नी माझी जुने ऋणानुबंध असल्यासारखे त्याने परत मला साद घातली. बहुतेक त्याला भूक लागली असावी.
काय करावं? मी मनात विचार केला. घ्यावं का या माऊला आत? तेवढीच सोबत पण झाली. पण.. नकोच मी विचार केला. मी खिडकी लावायला गेले तेव्हा त्याने परत आर्जवपूर्वक जितकी म्हणून विनवणी करता येईल इतक्या स्वरात म्या ऽऽ व केले. आता खिडकी पूर्ण बंद व्हायच्या आत परत तितक्याच जोराने मी ती उघडली. जणू मनाची कवाडंच उघडली. आता माझाही धीर चेपला होता. हे मांजर आपल्याला नुकसानकारक नसून उलट सोबतच होईल या विचाराने मी परत त्याच्याकडे पाहू लगले. त्याची ती केविलवाणी नजर परत मला सतावू लागली.
मी हळूच दार उघडलं त्याबरोबर टुणकन उडी मारून ते आत आलं दारातल्या गुबगुबीत पायपुसण्यावर बसून आपलं अंग चाटू लागलं. घरातल्या उबदारपणाने त्याचं थरथरणं कमी झालं होतं. मी त्याच्यासाठी गरम दूध आणायला म्हणून गेले तर ते हळूच माझ्या मागे दबकत दबकत येऊ लागले आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला की, मघापासून आपल्या मागे येणारं हे दुसरं तिसरं कोणी नसून माऊच होतं. माझं मलाच हसू आलं. सगळी मरगळ निघून गेली. मी पातेल्यातलं दूध जरा कोमट केलं आणि एका ताटात माझ्यासाठी छान खिचडी, पापड पण वाढून घेतलं. माऊपुढे दूध ठेवल्यावर त्याला अत्यानंद झाला. त्याच्या सोबतीने मीही सुखावले. नकोशी वाटणारी खिचडी मी पटापटा खाऊ लागले. आता बाहेर परत पावसालाही सुरुवात झाली होती. टी.व्ही.वर ही छानसे कार्यक्रम लागले होते. टी.व्ही. बघता बघता सोफ्यावर मला आणि भरपूरशा गरम गरम दुधाने पोट भरलेल्या, तसंच गारठायला नको म्हणून त्याच्या अंगावर घातलेल्या लोकरीच्या छोट्याशा रुमालाने ऊब मिळाल्याने त्या माऊला कधी झोप लागली कळलंही नाही.
रात्री मध्येच मला जाग आली. मी टी.व्ही बंद केला, पाहिलं तर माऊ सुखाने गाढ झोपलं होतं माझ्या सोबतीने ते खूश झालं होतं आणि मी? मी त्याच्या सोबतीने निवांत झाले होते. कितीही म्हटलं तरी कुणाची ना कुणाची सोबत हवीच असते असं मला जाणवून गेलं.
®️©️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी