Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® सौ. गीता गजानन गरुड.


नंदिनी सगळी कामं आवरून ओट्यावर बसली होती. शाळेतून पिंकी नं गोटू यायची वेळ झाली होती.

बाहेर ऊनाने हातपाय पसरले होते. ओटीबाहेरच्या इटुकल्या अंगणात मोती जीभ बाहेर काढून बसला होता. तोही मुलांची वाट पहात होता. मोत्याने कान टवकारले. उठून उभा राहिला. नंदिनीनं पाहिलं, वडाच्या झाडाकडून पायवाटेवर मुलं आली होती. हसतखिदळत होती. 

मोती शेपूट हलवीत पुढे गेला. गोटूच्या अंगावर चढू लागला. सगळे मित्र एकमेकांना टाटा करत पांगले. पिंकी नि गोटू मोतीसह घरी आले. 

बाहेरच्या पिंपातल्या पाण्याने मुलांनी हातपाय तोंड धुतले व मुलं घरात आली. मोती दरवाजापाशी बसला. 
घरातनं खमंग वास येत होता.

“ए कांदाभजी,” गोटू चित्कारला.

“माझी आवडती बटाटा भजीपण आहेत,” आईच्या गळ्यात हात घालत पिंकी म्हणाली. गोटूने मोतीच्या पांढऱ्या डीशमधे मोतीला जेवायला वाढलं. शेंगबटाट्याचा रस्सा वाफाळलेला भात, गरमागरम भजी, कैरीच्या तिखटमीठ लावलेल्या करकरीत फोडी..अहाहा..मुलं आनंदाने जेवू लागली.

थोड्याच वेळात दिनकर म्हणजे मुलांचे बाबा आले. दोन वर्षाची आवर्त ठेव उद्या मेच्युअर होणार होती.त्या पैशातनं मुलांना फिरायला घेऊन जायचं त्याच्या मनात होतं.

बऱ्याच वर्षांनी असं फिरायला जायला मिळणार म्हणून नंदिनी व मुलं खुष होती. 

आठवडाभर बाहेर जायचं म्हणजे कपडे हवेत मुलांचे ड्रेस, स्वत:साठी दोन सुती ड्रेस, टोप्या, स्लीपर्स..ही सगळी खरेदी करायची नि येताना उदरभरणमधे जेवायचं नं  शहाळ्याचं आइस्क्रीम खाऊन यायचं हा आईचा बेत मुलांनी उचलून धरला. 

दुसऱ्या दिवशी मुलं दुपारची क्यारम खेळण्यात रंगली. नंदिनीने मेडिकलमधे जाऊन प्रवासाकरिता काही जुजबी ओषधगोळ्या खरेदी केल्या. 

आता ब्याग काय ती फक्त भरणं बाकी होतं. मुलं बाबांच्या वाटेला डोळे लावून बसली होती. त्यांच्यासोबत मोतीही बसला होता.
नंदिनीने दिनकरला जेवायला वाढलं. स्वैंपाकघरातली झाकपाक केली. मुलांना थोडं लवंडायला सांगितलं. मुलांनी बळेबळेच डोळे मिटले. तीही दिनकरजवळ पहुडली.

“आणलात नं पैसै.”

“हो..पण..”

“पण काय..”

“अगं कसं सांगू तुला. कामावर जाताना बबन भेटला, खालच्या आळीतला. त्याच्या मुलीला एडमिट केलय हॉस्पिटलमध्ये. पोटाची कसली शस्त्रक्रिया करावी लागणार होती तिची. आपल्या पिंकीच्याच वर्गात आहे ना ती!”

“हो खरं बबनभावजींची प्रतिक्षा हल्ली बऱ्याचदा दांड्या मारायची. एवढ्या लहान वयात शस्त्रक्रिया म्हणजे! आपण दोघं जाऊन बघून येऊ तिला.”

“ते झालंच गं. जाऊ आपण बघायला पण मी सांगतो ते ऐकून घे नं मुलांचीही समजूत घाल कारण आता माझ्याकडे तुम्हाला फिरायला न्यायला पैसे नाहीत.”

“असं का म्हणताय? बँकेत..का वाटेत कुणी..”

“छे! तसं काही नाही. अगदी वेळेवर पैसे घ्यायला निघणार इतक्यात बबन भेटला, मला म्हणाला लेकीच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची नितांत गरज आहे.

सख्ख्या बहिणीकडे मागायला गेलो होतो खरा पण ती तरी काय दिल्या घरची. ती थोडीच नोकरी करते!
दाजींकडे मागितले पण म्हणाले पैशाचं बाजूस ठेवून बाकी कायबी बोला. दिनकर,माझे सगळे पेसे धंद्यात अडकलैत. नातेवाईक मंडळी ही अशी. डोकंच चालेना तितक्यात देवासारखा नजरेसमोर आलास बघ. म्हंटलं हा आपला शब्द पाडणार नाही. जरूर मदत करेल.”

मी थोडा विचारात पडलो पण मग बबनच्या हातात हात देऊन म्हणालो,”हक्कानं आलाहेस ना मदत मागायला.कदाचित परमेश्वराला मीच योग्य माणूस वाटलो असेन तुझी मदत करायला. चल जाऊ बँकेत…नं मग बबनला घेऊन बँकेत गेलो. पैसे काढले नि बबनच्या हाती दिले नि आलो. तो बोलला पैसे मिळाले की लवकरात लवकर फेड करतो.”

नंदिनीला दिनकरचा दयाळू स्वभाव ठाऊक होता. तो नेहमीच अडल्यानडलेल्यांना मदत करायचा आणि ही गरजवंत मंडळीही त्याचे पैसे त्याला वेळेवर परत करायची. मात्र बबनबाबत ती साशंक होती. 

” अहो, ती बबनची बायको सणासुदीला गळाभर लखलखीत सोनं घालते. हातातही चारचार सोन्याच्या बांगड्या आहेत तिच्या. बबनच्या गळ्यात दोरखंडासारखी सोन्याची चेन नि बोटांत भरीव अंगठ्या आहेत. हे सोनंनाणं गरजेवेळी वापरलं नाही तर काय कामाचं. 

एखादा सोन्याचा डाग गहाण ठेवून बबनभावजींना सहज पैसे करता आले असते. मदत जरूर करावी पण ती खऱ्या गरजूंना.
उगा गरीबीचा आव आणणाऱ्यांना कधीच करू नये. शिवाय बबनभावजींनी नाना पेडणेकरांकडूनही पैसे घेतलेत म्हणे. नानांच्या वाऱ्या सुरू असतात त्यांच्या दारी. तुम्हांला जमणारै का असे हेलपाटे घालायला!

बबनभावजींसारखी लोकं पैसे मागताना काकुळतीला येतात नि मागायला गेलं की इंगा दाखवतात.” नंदिनीने नाराजीनेच दिनकरला सुनावलं.

“माझं मी बघेन काय ते. नसती भूणभूण नको लावूस. झोपू दे मला.” दिनकर तिच्यावर चिडला व कूस पालटून झोपला. अगदी पाचव्या मिनटाला घोरूही लागला.

नंदिनी मात्र बेडशीटची चुणी चिमटीने चुरगाळत,वैतागत राहिली. 

दुपार सरली तसा गोटू चुळबुळू लागला. त्याच्या लक्षात आलं, बाहेर जायचं होतं खरेदीला. त्याने बाबांना उठवलं पण बाबांनी त्याला बबनकाकाची मुलगी किती आजारी आहे व त्यासाठी पैसे द्यावे लागले हे समजावून सांगितलं. पुढच्या वेळी नक्की जाऊ अशी हमी दिली.

फिरायला जायचा बेत फसला म्हणून मुलं हिरमुसली.

नंंदिनी दुसऱ्या दिवशी मुलांना घेऊन माहेरी जायला गाडीत बसली. दिनकर सोडायला आला होता खरा पण नंदिनी त्याच्याशी मनमोकळी बोलत नव्हती. 

गोटूच्या हे लक्षात आलं.

गोटूने विचारलंच,”भांडण झालंय तुमचं?”

नंदिनीने मानेनेच नाही म्हणून सांगितलं.

“अगं मग दरवेळी आज्जीकडे जाताना बाबांना किती सूचना देतेस..लाईटबील भरा, बाहेरचं खाऊ नका, इस्त्री करताना लक्ष देऊन करा..सतरा सूचना..मग आजच का असं..” यावर दिनकरने गोटूच्या केसांतून आपली बोटं फिरवली व म्हणाला,”काही नाही रे. तुझ्या आईला थोडं बरं वाटत नाहीए म्हणून गप्प आहे.”

रागातही नंदिनीने दिनकरकडे चमकून पाहिलं. मग ती थोडसं हसली. पिंकी म्हणाली,”बघ बट्टी झाली पण यांची.” गोटू यावर गोड हसला व आईला त्याने गोड पप्पी दिली. बाबांनाही दिली. “मी लक्ष ठेवेन या दोघींकडे. तुम्ही नका काळजी करू,” गोटू म्हणाला.
गावी पोहोचताच आज्जीने घंगाळात ठेवलेल्या ऊन ऊन पाण्याने त्यांनी न्हाऊन घेतलं. “कुठे फिरायला जाणार होता ना!” नंदिनीच्या आईने विचारताच नंदिनीने बबनला पैसे दिले त्याबद्दल सांगितलं.

आज्जी यावर काही बोलणार इतक्यात कंबरेवर हात घेत पिंकी म्हणाली,”अगं आई,तूच तर सांगतेस ना संकटात असलेल्यांना मदत करावी. तशी ती केली आपल्या बाबांनी त्यात बिघडलं कुठे!”

“अग्गो बाई, पिंकी आमची मोठ्ठी झाली आता. बरंच कळू लागलं माझ्या नातीला. जा बरं मामासोबत नि कैऱ्या काढून आणा. ताजं चटकपटक लोणचं करुया आपण.” असं म्हणताच पिंकीच्या तोंडाला पाणी सुटलं. गोटू व पिंकी मामासोबत परसदारी गेलेसुद्धा.
त्यांचा पायरव ऐकू येईनासा होताच नंदिनीने आईला बबनभावजींच्या व्यवसायाबद्दल व त्याच्या बायकोकडे असणाऱ्या स्त्रीधनाबद्दल माहिती दिली.”आई,  त्या बबनभावजींनी असं दोनचारजणांकडून पैसे घेतल्याचं कानावर आलंय माझ्या. घेताना घेतात. देताना कांगावा करतात म्हणे.”

“नंदे, तू म्हणतेस ते सगळं बरोबर पण गोटू, पिंकी अजून लहानाहेत गं. त्यांना कुठे एवढं कळायला. मिळतील पैसे. तू थोडक्या दिवसांसाठी आली आहेस, ते तिकडच्या चिंतांचं ओझं जराशा बाजूस काढून ठेव.ओझं वाहून ते कमी का होणार आहे!”
नंदिनीला आईचा विचार पटला. तीही मग आईसोबत उन्हाळी पदार्थ बनवू लागली. हातावरच्या शेवया, कुरडया, नागली, पोह्यांचे पापड, भरलेल्या मिरच्या, साबुदाण्याच्या फेण्या, बटाट्याचे चीप्स..एक का दोन..उन्हाळी वाळवणांनी अंगण सजलं. 

मोत्यासारखा दिसणारा ऊन ऊन चीकही नंदिनीसोबत मुलांनी आवडीने खाल्ला. 

संध्याकाळला बागेत फिरायला जाऊ लागली. नाटकं पाहिली. 

आज्जी,आजोबा व मामानेही भरपूर आनंद उपभोगला नि निघायचे दिवस जवळ आले.
बांधाबांध सुरू झाली.

नंदिनीचे वडील म्हणाले,”नंदे, तुम्हाला फिरायला जाण्यासाठी मी देतो पैसे पण घरात मुलांसमोर भांडू नका. जावईबापू साधे आहेत. सांभाळू घे. त्यांच्या कलाने घ्यावं.”

नंदिनीलाही आता दिनकरला भेटण्याचे वेध लागले होते.

बाईचा जीवच असा, सासर आणि माहेर दोन्हींत गुंतलेला..नंदिनीही तशीच. 

निघताना आईने नंदिनीला हळदकुंकू लावून तिची ओटी भरली. नंदिनी व मुलांनी आज्जी,आजोबांना नमस्कार केला. 
मामाने स्टेशनवर न्हेऊन सोडलं. 

मामालाही भाचरांना निरोप देऊन माघारी परतणं जड जायचं. 

घरी गेल्यावर आईबाबा विचारणार असणारे नेहमीचे प्रश्न त्याला आठवले..मिळाली ना गाडी..बसली नं व्यवस्थित.
आता पुढच्या उन्हाळ्याची वाट पहात बसणं ओघाने आलंच.

स्टेशनवर दिनकर घ्यायला आला होता. मुलांनी त्याला घट्ट मिठी मारली. 

घर अगदी झाकपाक ठेवलं होतं. वरणभात व बटाट्याच्या काचऱ्या करून ठेवल्या होत्या. नंदिनीने ठरवलं..उगाच पैशाच्या विषयावरनं दिनकरशी अबोला धरायचा नाही. नंदिनी खूष तर सारं घर खूष.
मुलांच्या शाळा सुरू झाल्या.

बबनची मुलगीही आता शाळेत येऊ लागली होती.

बबनची बायको मात्र नंदिनीशी बोलायचं टाळत होती. तिला बढाई मारायची फार हौस होती. आमच्या ह्यांनी असं केलं, तसं केलं. आमची कोंबडी दिवसाला शंभर अंडी देते असं म्हणणाऱ्यांतली गत पण नंदिनीच्या वाऱ्यालाही ती फिरकत नसायची.
दिवस, महिने त्यांच्या वेगाने सरत होते. होता होता पुढचा चैत्र आला. नंदिन सहपरिवार गावी गेली. नंदिनीच्या भावाचं लग्न होतं. आईवडिलांना, भावाला आहेर, लग्नात घालायला मुलांना,दिनकरला कपडे, तिला दोन साड्या..बचतीच्या पैशांना पुन्हा पाय फुटले. 
जुन महिना लागताच घरी परतले.

लवकरच पावसाचं आगमन होणार होतं. दिनकर मुलांच्या वह्यापुस्तकांना कव्हर घालत बसला होता. इतक्यात घरमालक आले. गोटुने त्यांना बसायला खुर्ची दिली. नंदिनीने चहापाणी आणून दिलं.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर घरमालकांनी मुळ मुद्द्याला हात घातला.. म्हणाले,”त्याचं कायैकी आमच्या हिच्या नात्यातली कोणी मुंबईला रहावयास येत आहेत. त्यांना खोली हवीय तेंव्हा तुम्ही तुमची सोय  महिनाभरात दुसरीकडे बघा.”
दिनकरने त्यांची फार मनधरणी केली पण माझा नाइलाज आहे असं म्हणत ते आले तसे निघून गेले. मुलांच्या शाळा सुरु होणार होत्या. 

नवीन घर बघणं निकडीचं होतं. पुन्हा गावी जाणं तर शक्यच नव्हतं. नंदिनी दिनकरला म्हणाली,”बबनभावजींना जाऊन भेटा. म्हणावं, आता द्या आमचे पैसे. आम्हालाही गरज आहे.”

दिनकर आज जातो उद्या जातो करू लागला. शेवटी नंदिनीने एका सरत्या दुपारी पायात चपला चढवल्या व खालच्या आळीत गेली.
बबनच्या घराचा दरवाजा उघडाच होता. नवीन रंगीत टिव्ही बाहेरच्या खोलीत दिसत होता व बबनची बायको शेजारणींशी गप्पा मारत टिव्ही कितीला घेतला, पैसे नगद दिल्याने कसा स्वस्त पडला हे सांगत होती.

नंदिनीने दाराची कडी वाजवली तशी बबनची बायको बाहेर आली. नंदिनीस उंबऱ्याच्या आतही न घेता काय काम होतं विचारू लागली. नंदिनी ते पैशाचं..एवढं बोलली खरी बबनची बायको म्हणाली नंतर या. हे घरी नाहीत आणि पाठमोरी झाली.

नंदिनी तिथे बसलेल्या शेजारणींसमोर तिचा अपमान करू शकली असती पण तिची जीभ तसं करावयास धजावली नाही.
पुन्हा चार दिवसांनी नंदिनी मुलीला सोबत घेऊन बबनकडे जायला निघाली. मोतीही त्यांच्या मागाहून चालत होता. मागे फीर म्हंटलं तरी ऐकत नव्हता. करकरीत तिन्हीसांजेची वेळ होती. बबन ओटीवरच बसला होता.

नंदिनी म्हणाली,”भावजी, आम्ही तुम्हाला वेळाला मदत केली. आता आमच्यावर वेळ आलेय. रहातं घर सोडावं लागणार आहे. नवीन घर बघायचंय, भाड्याने. त्याची अनामत रक्कम भरायचीय तेंव्हा आमचे पैसे परत करा.”

बबन नंदिनीच्या अंगावरच आला,”काय पळून चाललो कं काय आम्ही तुमचे पैसे घेऊन. जरा तरी माणुसकी शिल्लक ठेला. देणेकऱ्यासारखे काय येता दारात!”

मोती बबनच्या अंगावर जोरात भुंकू लागला.

नंदिनीचाही संयम सुटला,”भावजी, माझा नवरा भोळा म्हणून तुमच्या याचनेला फसला. तुम्ही तर रंगीत टिव्ही घेऊन मजा करताय. पैसे हाती येताच ज्यांच्याकडून उसने घेतले त्यांना परत करावेसे नाही वाटलं तुम्हाला!”

नंदिनीचा धारदार आवाज ऐकून शेजारपाजारचे जमा झाले. या बाईमुळे आपली नाचक्की होणार हे ध्यानात येताच बबनने सूर पालटला,”अहो वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आता आणतो पैसे” म्हणत त्याने कपाटातून पैसे आणून नंदिनीच्या हातात जवळजवळ कोंबलेच.

नंदिनी  पैसे घेऊन घरी आली. आता ती नवीन घर शोधणार होती. नंदिनीसोबत गेलेल्या तिच्या मुलीला कळून चुकलं की मदत करावी पण ती माणूस पारखून.

घरी येताच पिंकी बाबांकडे धावत गेली.,”बाबा, आईने पैसे आणले.” मोतीही शेपूट हलवत दिनकरजवळ उभा राहिला.
गोट्या मोतीला म्हणाला,”मला सांगायच्या अगोदर गेलात ना!”

नंदिनीने पैसे दिनकरच्या हाती दिले.” पैसे कुणाकडे मागितलेस नंदू. तुला ठाऊक आहे नं मला असं उसणं घ्यायला आवडत नाही.”
“हो. चांगलच ठाऊक आहे. उगीच का दहा वर्ष संसार झाला सोबतीने. हे पैसे तुमचेच आहेत. बबनभावजींकडून आणले मागून.”
“त्याने दिले इतक्या सहज?”

“ते म्हणतात ना..कायकी..जब घी सिधी उंगली से नहीं निकलता तब उंगली टेढी करनी पडती है..तसंच काहीसं. नम्र शब्दात पैसै मागितले तर वस्सकन अंगावर आले, माझ्या मग मीही आवाज चढवला. खऱ्याला भिती थोडीच असते! शेजारीपाजारी जमा झाले तसे मुकाट्याने घरातनं पैसे आणून दिले.”

“मानलं नंदे तुला. आता यापुढं कुणासोबत आर्थिक व्यवहार करायचा झाला तर पहिलं तुझं मत घेईन. बाईमाणसाला सिक्थ सेन्स अंमळ जास्तीच असतो नाही का!”

“होच मुळी,” म्हणत नंदिनी टेचात हसू लागली.


समाप्त

===========

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *