अनाथांची माय हरपली

sindhutai sapkal information in marathi: चिंधी..हो चिंधीच नाव होतं त्या मुलीचं..चिंधीचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ साली वर्धा जिल्ह्यातल्या एका लहानशा खेड्यात झाला. वडील अभिराम साठे हे गुराखी होते. त्यांना शिक्षणाबद्दल आस्था होती पण चिंधीच्या आईला लिना नि भिकार चिना असंच वाटायचं..ती चिंधीला पाठवायची,माळरानावर म्हसरं चरावयास..चिंधी त्यातूनही वेळ काढून शाळेत हजेरी लावायची.
चिंधी कशीबशी चौथीपर्यंत शिकली पण वयाच्या नवव्या वर्षी तिच्याहून वीस वर्षे मोठ्या असलेल्या पुरुषाचं स्थळं आलं तिच्याकरता. आईने ही ब्याद उजवून टाकली न् चिंधी गेली सासरला.
सासरी हा बारदाना!..दोन दीर,दिरांची मुलं,सासूसासरे..सासूने चांगलंच कामाला जुंपलं. चिंधीची वाचायची हौस काही जात नव्हती. कुठचाही कागद मिळो..वाचत बसायची..त्याबद्दल सासूच्या शिव्या,नवऱ्याचा मारही खायची.
अशातच चिंधी तीन मुलांची आई झाली. वडील कधीमधी येऊन बघून जात, पुढे तेही गेले. त्या गावातील बाया गावातलं शेण गोळा करुन कंत्राटदाराला विकीत. कंत्राटदार पुरेसा मोबदला देत नसे. चिंधीही त्या कामाला जायची. तिने कंत्राटदाराविरुद्ध वनाधिकाऱ्याकडे तक्रार केली.
चिंधीचा गावात,घरात तिचा मान वाढला पण कंत्राटदाराने तिच्या नवऱ्याचे कान भरले. चिंधी म्हणजेच सिंधूताईच्या पोटातलं होऊ घातलेलं चौथं अपत्य हे दुसऱ्या कोणाचं आहे..असं त्याच्या कानात भरवलं..झालं नवऱ्याने टाकलं तिला..तेव्हा नऊ महिन्याची गर्भार होती ती. गुरांच्या गोठ्यात बाळंत झाली. स्वत:च्या हाताने पातं घेऊन नवजात अर्भकाची नाळ कापली नि निघाली माहेराला..आईने दारात उभं नाही केलं.
हेही वाचा
आयुष्यात थोडे हादरे बसले, म्हणून काही संपूर्ण आयुष्य वाया जात नाही – अजय पुरकर
कसं खाऊ घालणार होती त्या इवल्या बाळाला..कसा फुटायचा तिला पान्हा! अखेर पदर पसरुन भिक्षा मागू लागली. झोपणार कुठे..गेली स्मशानात..तिथे कोण नव्हतं हटकणारं..शिवाचं ठिकाण ते..त्याने आसरा दिला. तिथे लोकं जे काही पीठ टाकत, त्याच्या भाकऱ्या चितेच्या भगभगत्या निखाऱ्यांवर भाजून खाऊ लागली..पान्हि फुटला..मुलीला दूध पाजू लागली.
सिंधूताईच्या पोटाचा प्रश्न सुटला खरा पण तिला अशी बरीच अनाथ मुलं दिसू लागली..तिने त्यांनाही घेतलं आपल्या पदराखाली..जे काय कमवेल ते या पिलांना भरवू लागली.
सिंधुताईंच्या पुण्यकर्माचं रोपटं बहरु लागलं,देणगी देणारे हात पुढे सरसावले..हजारो अनाथ बालकांसाठी बालसदन या नावाने दिमाखात उभं राहिलं. सिंधुताई अशातर्हेने अनाथांची माय झाल्या. मुखी घास,निवारा,शिक्षण या मुलभूत सोयी त्या पुरवू लागल्या..एवढंच नव्हे तर ही मुलं वयात आली की त्यांची लग्नही लावून देऊ लागल्या.
जे का रंजले गांजले
त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा
देव तेथेचि जाणावा..संत एकनाथ महाराजांच्या या ओळी त्यांनी अमलात आणल्या,आचरणात आणल्या. त्यांची कन्या, ममता ह्यासुद्धा सिंधुताईंच्यि समाजसेवेच्या कार्यात सहभागी झाल्या.
सिंधुताईंना आजपावेतो शेकडो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.
२०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,
२०१७साली भारताचा सर्वोच्च नारी पुरस्कार.
सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा अहिल्याबाई होळकर पुरस्कार..असे अनेक पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले.
सन २०१०मधे सिंधुताईंच्या जीवनावर आधारित ‘मी सिंधुताई सपकाळ‘ हा एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला ज्याची ५४व्या लंडन फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड झाली होती.
सन २०२१ मधे सिंधुताई आपल्याला नोव्हेंबरमध्ये पद्मश्री पुरस्कार, विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते घेताना दिसल्या तेंव्हा आपल्या घरातल्याच व्यक्तीला हा पुरस्कार मिळतोय असं वाटून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून आली होती.
बाल निकेतन हडपसर (पुणे)
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह(चिखलदरा)
अभिमान बालभवन (वर्धा)
गोपिका गाई रक्षण केंद्र, वर्धा(गोपालन)
ममता बालसदन(सासवड)
सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था(पुणे)..किती संस्थारुपी रोप उठवलेत माईंनी! प्रत्येकाच्या पाठीवर थाप व आशीर्वाद..प्रत्येकाला आपुलकीने बाळा म्हणणं! माईंनी आपल्याला मिळालेल्या बक्षीसांच्या रकमांचा व जमा केलेल्या निधीचा या कार्यासाठी विनियोग केला.
गेल्या महिन्यात त्यांना पुण्यातील इस्पितळात दाखल केले होते. तिथे त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले..परंतु अलिकडे तब्येत खालावल्याने त्यांना आतिदक्षता विभागात दाखल केले होते. सिंधुताईंची मरणाशी झुंज अखेर काल ४ जानेवारी रोजी संध्याकाळी अपयशी ठरली. त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला..तो फक्त देहाने.. अशी माणसं अमर असतात.
अशी ही ‘अनाथांची माय तिच्या कर्तृत्वाने,रसाळवाणीने,प्रभावशाली संभाषण कौशल्याने चिरकाल स्मरणात राहिल. सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
==================
2 Comments
Nicolas Eiselein
I must thank you for the efforts you’ve put in writing this website. I’m hoping to see the same high-grade content from you later on as well. In fact, your creative writing abilities has motivated me to get my own, personal blog now ;)
ulster-bank belfast-lombard-street
This is a topic that is near to my heart… Thank you! Exactly where are your contact details though?