मासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेताय..तर मग हे वाचाच.


side effects of periods delay tablets: आपल्या भारतीय संस्कृतीत सणासमारंभांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सणादिवशी दारी तोरण लावतात, रांगोळी रेखाटतात, छानछान पदार्थ बनवतात. हे सारं घरातली महिला हौसेने करते.
देवासाठी नैवेद्याचं ताट तयार करते. छानछान साड्या नेसून, श्रुंगार करून सण साजरा करायला महिलांना फार आवडतं..पण मग अडचण येते कुठे तर तीच ती हो चार दिवसांची मासिक पाळी.
ही पाळी सणाच्या दिवसांत येणार असं लक्षात येताच बाई हवालदिल होते. का बरं? असं काय करता..पुजेची तयारी कोण करणार? नैवेद्याचं काय कसं करणार? आलेल्या सवाष्णींना हळदीकुंकू कसं बरं देणार..सतराशे प्रश्नांचं जाळं बाईच्या चेहऱ्यावर उमटतं.
काही घरांत तर देवकार्याच्या दिवसांत घरातील स्त्रीला पाळी आली तर ही तिचीच चूक किंवा तिला देवाने दिलेली शिक्षा असं तिच्याकडे बघितलं जातं आणि मग अशावेळी स्त्रीला अधिकच लाजिरवाणं वाटतं, मेल्याहून मेल्यासारखं होतं.. मग त्या एखाद्या मैत्रिणीला सल्ला विचारतात. ती म्हणते..सोप्पय..सो अँड सो गोळी पाळी यायच्या आधी दोनतीन दिवस सुरू कर.
रात्री एकच गोळी गरज असेस्तोवर घ्यायची. गोळी घेणं बंद केलं की दोनतीन दिवसांत येते पाळी मग मैत्रिणीचा सल्ला जादूचा दिवा मिळाल्यासारखा मानत लगेच मेडिकलकडे कूच.
काय बरोबर म्हणतेय नं. दहापैकी सात स्त्रियांच्या बाबतीत तरी दुर्दैवाने खरंच असं घडत आहे. हे सारं बरोबर की चूक..चला पाहुया.
१. स्त्रीच्या गर्भाशयात सुरू असणारे नियमित चक्र:
एकदा पाळी येऊ लागली की दर महिन्याला मुलीच्या बीजांडातले परिपक्व बीज बीजवाहक नलिकेद्वारे गर्भाशयात उतरते. गर्भाशय म्हणजे मुलीच्या भावी बाळासाठी ओटीपोटात असलेले दालन. या दालनात तलम गादीसारखे लाल आवरण दर महिन्याला तयार होते.
गर्भाशयात आलेले बीज फलित न झाल्यास या आवरणासहीत दर महिन्याला स्त्रीच्या जननेंद्रियातून सलग चार पाच दिवस बाहेर फेकले जाते. पहिले दोन दिवस जास्त रक्तस्त्राव होतो व हळूहळू तो कमी होतो. याला आपण मासिक पाळी येणे म्हणतो.
२. पाळीचं चक्र कोणत्या संप्रेरकांवर असतं अवलंबून:
●Estrogen, progesterone हे दोन संप्रेरक(harmones) स्त्रियांच्या शरीरात स्त्रवत असतात.
●या दोघा संप्रेरकांवर पाळीचं चक्र अवलंबून असतं.
●पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या या (norethindrone) हे संप्रेरक(progesterone) आहेत.
●नियमित पाळीचक्राचा कालावधी हा साधारण २८ दिवसांचा असतो.
●जेंव्हा शरीरातील estrogen व progesterone ची पातळी कमी होते तेंव्हा स्त्रीला मासिक पाळी येते.
*Norethindrone म्हणजे नेमके काय?
मासिक पाळी लांबवण्याच्या टॅब्लेटमध्ये नॉर-इथिस्टेरॉन असते, जे महिलांमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी कृत्रिमरित्या राखण्यासाठी उपयुक्त ठरते ज्यामुळे गर्भाशयातून बाहेर पडणारा कोणताही स्राव थांबवण्यास मदत होते.
तशीच काही अडचण असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्वचित प्रसंगी या पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेतल्याने त्रास होत नाही पण पुढच्यावेळी पाळी येताना अतिरक्तस्त्राव,पोटदुखी,वगैरे त्रास झाल्यास डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे किंवा पाळी आलीच नाही तरी डॉक्टरांकडे जाऊन सांगणं गरजेचं आहे.
३. पाळी पुढेमागे करण्याच्या गोळ्या व गर्भनिरोधक गोळ्या एकच असतात का?
नाही. Norethindrone गोळ्या या शरीरातली progesteroneची पातळी ठराविक काळासाठी वाढवतात व गर्भाशयाचे अस्तर पडण्यास प्रतिबंध करतात पण या गोळ्या म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या नव्हेत.
गर्भनिरोधक गोळ्या गर्भाधान प्रक्रिया थांबवतात तर पीरियड डिले टॅब्लेट वापरून, तुम्ही तुमची पाळी केवळ 17 दिवसांपर्यंत पुढे ढकलू शकता.
हेही वाचा
चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा
४. पाळी मागेपुढे ढकलण्याच्या गोळ्या कशा काम करतात
एकदा पाळी येऊ लागली की ती जर आपल्या शरीरात काही दोष नसेल तर दर महिन्याला येते किंबहुना ती ठरलेल्या वेळेत येणे हे स्त्रीसाठी चांगलेच असते पण होतं काय की आपल्याला कुठे लांबवर फिरायला जायचं असतं विशेषत: उन्हाळ्याच्या,हिवाळ्याच्या सुट्टीत.
त्या प्रवासात पाळीची झंझट मागे नको म्हणून पाळी पुढे किंवा मागे करण्याच्या गोळ्या घेतात. बऱ्याचदा या गोळ्या सांगोपांगी म्हणजेच डॉक्टरांना न विचारता मेडीकलवाल्याकडनं किंवा मैत्रिणींनी सुचवल्याप्रमाणे घेतल्या जातात.
दर दिवशी एक/दोन गोळी घ्यायची असते. गोळ्या घेणं बंद केलं की दुसऱ्या,तिसऱ्या दिवशी पाळी येते. हे असं एकदोनदा केलं की त्या महिलेला आणि तिच्या घरातल्यांनाही सोयिस्कर वाटतं.
आपल्याकडे धार्मिक कार्यात पाळी आलेल्या बाईला फिरण्यास मनाई असते किंला तिच्या हातचा नैवेद्य वगैरेही निषिद्ध आहे, मग सत्यनारायण पूजा, महालक्ष्मी पूजन, मंगळागौर, गुढीपाडवा, दिवाळी, मकर संक्रांत, गौरी गणपती, हरतालिका..या साऱ्या सणांत, तसेच हळदी,बारशी, लग्नकार्यांत पाळीची अडचण येऊ नये याकरता बाई डॉक्टरांनी एकदा सजेस्ट केलेल्या गोळ्या या वारंवार घेत रहाते. घरातल्या पुरुषमंडळींनाही ते सोयिस्कर वाटतं.
५. या गोळ्यांचा जास्त खप कधी होतो?
श्रावण महिन्यापासून सणासुदीचा काळ सुरू होतो. फुलं, पूजेचं साहित्य, सत्यनारायणाच्या पोथ्या, धूप-अगरबत्ती आणि मिठाई यांच्याबरोबरच आणखी एका गोष्टीची मागणी खूप वाढते, ती म्हणजे पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या.
सणासुदीच्या काळात या गोळ्यांची मागणी प्रचंड वाढते. बायका खास करून याच काळात या गोळ्या घेतात.
या गोळ्या म्हणजे संप्रेरकेच असतात. योग्य वेळी संप्रेरकाची पातळी कमी होऊन पाळी येणार असते पण ही बाहेरची गोळी घेतल्याने स्त्री निसर्गाने कमी केलेली संप्रेरकाची पातळी ही बाहेरून संप्रेरके घेऊन वाढवते ज्यामुळे पाळी येण्याची नैसर्गिक प्रक्रिया ही बांध घालून पाणी अडवावे तशी अडवली जाते.
पाळीच्या काळात गर्भाशयातील जे अस्तर पडून जात असतं त्या नैसर्गिक प्रक्रियेला या गोळ्यांच्या सेवनाने विरोध केला जातो.
६. या गोळ्यांच्या सेवनांचे नेमके कोणते दुष्परिणाम होतात:
या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने
डोकेदुखी,
अनियमित रक्तस्त्राव,
अतिरक्तस्राव, गुठळीयुक्त रक्तस्राव,
मोठ्या प्रमाणात केसगळती,
मळमळ,
नैराश्य,
वजन वाढणे,
गालांवर पुटकुळ्या
शरीरावर जास्तीची लव वाढणे,
चक्कर येणे,
यक्रुताच्या कार्यात बिघाड होणे,
कावीळ,
वंध्यत्व,
स्तनांचा कर्करोग
ब्रेन स्ट्रोक,
पेरालिसिस,
उच्चरक्तदाब,
अस्थमा,
पुढे जेंव्हा पाळी येते त्यात अतिरक्तस्त्राव, पोटात तीव्र वेदना होणे,
फिट येणे,वारंवार गर्भपात होणे, तसेच पाळीसंबंधी समस्या(pcod) ,फायब्रॉइड ह्या व अश्या अनेक आजारांना महिला बळी पडतात.
७. सर्वांना लागू पडतात का या गोळ्या?
ज्या स्त्रियांना हायपरटेंशन, मधुमेह,फीट येणे असे आजार असतात, त्यांनी या गोळ्या डॉक्टरी सल्ल्याशिवाय घेतल्यास त्यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो.
८. ओव्हर द काऊंटर गोळ्या मिळत असताना डॉक्टरकडे का बरं जावं?
हे खरं आहे की मेडिकलमधे गोळीची स्ट्रीप दाखवली की किती हव्या तितक्या गोळ्या दिल्या जातात. अकरा दिवस धार्मिक कार्य असेल तर मग अकरा दिवस घेणार का ह्या गोळ्या? आणि आपल्या शरीरावर आपणच अत्याचार करणार! प्रत्येक स्त्रीची प्रक्रुती वेगळी असते त्यानुसार डॉक्टर तिला गोळ्या घेतल्या तर चालतील का किंवा किती डोस चालतील हे ठरवतात.
९. घरातील इतर सदस्यांचा पाळीकडे बघण्याचा द्रुष्टीकोन:
निसर्गाच्या विरुद्ध गेलं की त्याची शिक्षा आजारांस्वरुपात मिळत जाते.
स्त्री ही कुटुंबातील महत्वाचा घटक आहे. तिच्या आरोग्याशी देवाधर्माच्या नावाखाली खेळ होणार नाही याची काळजी स्त्रीने स्वतः घेतली पाहिजेच त्याचबरोबर ती घरातल्या पुरुषमंडळींनीही घेतली पाहिजे. घरातील स्त्रियांनीही याबाबतीत एकमेकींना समजून घेण्याची गरज आहे.
आली पाळी तर येऊदेत. तू आराम कर. आम्ही बघतो घरातलं.. असा जेंव्हा घरातल्या सदस्यांकडून स्त्रीला पाठिंबा मिळेल तेंव्हा या मेडीकल दुकानांकडे पाळीत चालढकल करण्यासाठीच्या गोळ्या मागणाऱ्या भगिनींचे पायही आपसूक मागे वळतील..तेच खरं स्त्रीस्वातंत्र्याद्रुष्टीने समाजाने उचललेलं महत्त्वाचं पाऊल असेल कारण घरातली स्त्री निरोगी असेल तर घरातलं वातावरण निरोगी असतं.
देवानेच स्त्रीला मासिकपाळीची देणगी दिली आहे, ज्यायोगे ती बाळ जन्माला घालू शकते, नऊ महिने आपल्या बाळाला याच गर्भाशयात ती सांभाळते. त्याच रक्ताने प्रत्येक जीव तयार होतो मग ते अपवित्र कसं असेल! आधुनिक जगात वावरताना प्रत्येकाने आपली सदसद्विवेकबुद्धी ही जाग्रुत ठेवली पाहिजे. श्रद्धा असावीच पण श्रद्धेचा अतिरेक हा अंधश्रद्धेकडे घेऊन जाणार नाही ना याचेही भान प्रत्येकाने राखायला हवे.
==================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.
1 Comment
Sarita
Chan Mahiti sangitli