शुभारंभ

©® सौ. गीता गजानन गरुड.
मी संकेत सावंत, सध्या सत्तावीस सुरु आहे. घरात पाय टाकताच आई लग्नाचा विषय काढायची. लग्नासाठी मुलगी शोधत होतो पण मिळत नव्हती.
बीए बीएड आहे मी. एका प्रायव्हेट शाळेत शिक्षक आहे.
तीनचार स्थळं बघून झाली. मुली थेट नकार कळवायच्या. त्यांना सरकारी नोकरी हवी असते.
एमपीएससी तीनदा दिली पण नाही जमलं मला ते. आपलं लकच खराब. गेल्याच महिन्यात एक स्थळ पहायला गेलो होतो. मुलगी नाकीडोळे छान होती.
कांदेपोहेही झक्कास होते. मुलीच्या वडलांच्या जास्त अपेक्षा नव्हत्या. तिथेच ठराव वगैरे केला.
रात्री मला त्या मुलीचा फोन आला. माटुंग्याच्या ब्रीजवर भेट म्हणाली. मी जाम खूष. रात्री स्वप्नात तिला कुशीत घेऊन झोपलो. तिच्या नाजूक बोटांशी चाळा केला. तिच्या सुंदर ओठांवर बोटं फिरवली.
अजून पुढचं स्वप्न साकारायच्या आधीच आईचा आवाज,”बंड्या,संडासाजवळ लाईन नाय हाय. मी जाऊन आले. तिनपाट घेऊन नंबर लाव जा तुझा.” आयला,चरफडतच उठलो. मनात म्हंटल,’ही आई सध्या असं बोलतेय. उद्या लग्न झाल्यावर माझ्मा बायकोसमोर असं बोलली तर काय ईज्जत राहील माझी.’
आधी आईला ट्रेनिंग द्यायला हवं असं ठरवून मी तिनपाट भरुन घेतलं नी आमच्या चाळीच्या सार्वजनिक विमानतळाकडे आगेकूच केलं.
तेवढ्यात तावडे आजोबा आले व मला म्हणाले,”बंड्या,माझ्याच्याने थोपवत नाही रे लेका. जाऊ का मी आधी?” मी मानेनेच हो म्हणालो. तरी.. “स्पष्ट तोंडाने काय ते सांग. असं नाराजीने हो म्हंटलस तर मला साफ होणार नाही. नजर लागते हो.” मी काकांना दंडवत घातला व जा म्हणालो.
एका तासात मला माटुंग्याला पोहोचायचं होतं. तिच्याशी काय बोलणार याचा विचार करत असतानाच आगलावे काकू आल्या व बोलू लागल्या,”काय रे संकेत, काल सगळीजणं मिळून मुलगी बघायला गेलेलात वाटत़ं. आवडली का तुला? मला फोटो दाखव हो.
लग्नाची तारीख कधीची धरताय? हॉल कोणता बुक करणार अहात? अरे तो बर्वेंचा हॉल बरा नाही. वाढपी मेले चमचे आपटत जातात. धड वाढतच नाहीत.
जिलबीचं ताट एकदाच येतं नंतर परत दिसतच नाही नी अळूच्या फदफद्यालाही चव नसते हो. भजी तर नुसती गारढोण. त्यापेक्षा तू त्या गांधी चौकातल्या चितळ्यांचा हॉल बुक कर. भाडं थोडं जास्त आहे. पण मसालेभात काय टेस्टी असतो सांगू तिथला. काजूही भरपूर घालतात. वरती अश्शी तुपाची धार सोडतात.
भजी तर एवढी चविष्ट असतात म्हणून सांगू आणि हो आठवलं,श्रीखंड ते स्वतः बनवतात. एकदा खाशील तर बोटं चाटतच रहाशील अशी चव हो. श्रीखंडपुरीचा घास भरवायलाही कसं बरं वाटतं नाही.”
मी म्हंटलं,”नाही ओ काकू मला अनुभव या गोष्टींचा.”
“हात मेल्या, तुला रे कसा असणार अनुभव. पीजे मारु नकोस.(इतक्यात तावडे आजोबा बाहेर आले व दार मोकळं पाहून पांडेजी आत घुसले.)
बरं उखाण्याचं काय केलसं? गुगलवर शोध. दहाबारातरी पाठ हवेत. तो जुनापुराणा मेथीचा घेऊ नक्कोस आणि त्या तांबेंच्या विशालसारखा खुळचट उखाणा नको हो घेऊस. काय तर म्हणे कपावर कप त्यावर ठेवली बशी माझी हेमा सोडून बाकी साऱ्या म्हशी. मेल्याच्या जीभेला काही हाड. चल येते हो.’
कसातरी काकूंच्या तावडीतून सुटलो. पोट मोकळं करुन आलो. आंघोळ केली. मस्त गुलाबी रंगाचा टिशर्ट घातला. जीन्स घातली. बहिणीच्या डब्यातली फेअर अँड लवली थापली. पावडरबिवडर लावली. सेंट फवारला नी तिला भेटायला निघालो.
रविवार असल्याने सुट्टी होती. आई म्हणाली,”येताना मिरची,कोथिंबीर नी लिंबू आण रे बंड्या.” मी मान डोलावली.
ब्रीजवर गेलो. ती माझ्या आधीच आली होती. माझं ह्रदय जोरात धडधडायला लागलं. कसाबसा मी तिला, चल चहा घेऊ म्हंटल.
आम्ही जिन्यातून खाली उतरलो. जरा पॉश हॉटेलात गेलो. मी तिला काही घेणार का विचारलं. ती गप्पच होती. शेवटी मी दोन कोल्ड्रिंक्स मागवले.
कोल्ड्रिंक पितापिता मी हळूच तिच्याकडे पहात होतो. जांभळा ड्रेस खुलून दिसत होता तिला. काय बरं उखाणा घ्यावा हिच्यावर असा विचार मनात चालू झाला.
इतक्यात तीच म्हणाली ,”तुम्ही मला चुकीचं समजू नका पण मी तुमच्याशी लग्न करु शकत नाही. आईबाबांसाठी मी ठरावाचं नाटक केलं. खरं तर माझं आधीच दुसऱ्याबरोबर प्रेम आहे. दोन वर्षापासून आमचं फीक्स आहे तेंव्हा दादा तुम्ही प्लीज मला नकार द्या.”
माझ्या तर पोटात गोळाच आला. आत्ता आईला काय सांगणार फार मोठं प्रश्नचिन्ह.
तिचा निरोप घेऊन व माझं भग्नावस्थेतलं काळीज घेऊन तिथून निसटलो.
लालबागला मित्राच्या खोलीवर गेलो. हा सच्या माझा लंगोटीयारच म्हणा. अगदी केजीपासून एकाच शाळेत,एकाच वर्गात. आम्ही दोघं जणू एकमेकांचा आरसाच.
त्याने मला काहीच विचारलं नाही. गरमगरम कॉफीचा पेला माझ्यासमोर ठेवला. त्याची बायको मुलाला शिकवत होती.
एका रुमचं घर पण कसं स्वच्छ ,टापटीप लावलेलं. भांड्यांची मांडणी अगदी आखीवरेखीव अशी. वरती मोठे डबे रांगेत लावलेले. त्याखाली छोटे डबे. त्याखाली नेहमीचे वापरातले टोप वगैरे.
समोरच्या गेलरीत एक तरुणी कपडे वाळत घालत होती. मी तिच्याकडे पहातच राहिलो. सच्या बोलला ,”अरे ते समोरचे पेडणेकर खोली विकून वांगणीला गेले. हिच्या मामाने ती रुम घेतली. दोन मुलं आहेत त्याला. मुलगी नुकतीच बीए झालेय,श्रावणी नाव तिचं. ती समोर दिसतेय तीच. मुलगा विकी शाळेत जातो. हिच्यासाठी स्थळं शोधणं सुरु आहे पण मुलांना नोकरीवालीच मुलगी पाहिजे.
मी म्हंटल,”सच्या माझ्यासाठी विचारशील?”
सच्या हसला. हो म्हणाला. मग तर आपण साडूसाडू होऊ म्हणाला. तिच्या घरी गेलो. वडलांना भेटलो.
तिच्या आईवडिलांना मी पसंद पडलो. तीही लाजली म्हणजे तिनेही होकार दिला. मला खूपच आनंद झाला. जिलेबी घेऊन घरी आलो. आईला सगळं सविस्तर सांगितलं. तिनेही होकार दिला.
महिन्याभरात मी बोहल्यावर चढलो. मित्रांनी हळद अक्षरश: गाजवली. गडुळाचं पानी,आलिंगनाला..कुठचं गाणं सोडलं नाही. चाळीत हीच तर खरी गंमत असते. एकाचं लग्न ठरलं की ते होईपर्यंत सगळे चाळकरी वराडी होतात. अगदी तांदूळ निवडणे,पापड लाटणे.. सगळी कामं एकत्र येऊन घरचं कार्य असल्यासारखी करतात.
लग्नाआधीचे पंधरा दिवस आम्ही घरात जेवलोच नाही. केळवणासाठी सगळ्या चाळकऱ्यांकडून आमंत्रण होती. प्रत्येकीने अगदी मनापासून खाऊ घातलं.
सुमा काकूंच्या हातच्या पुरणपोळ्या एकदम बेस्ट. दहिवले काकूंच्या हातचं वरण तर मी लहानपणापासून खात आलोय. आमच्याकडे नेहमी तिखट आमटी म्हणून मग मी दहिवले काकूंकडून रोज वरण घेऊन यायचो. केळवणाला त्यांनी माझ्यासाठी खास वरणफळं केली होती. राणेकाकूंनी वडेसागोतीचा बेत केला होता.
पुऱ्या चाळीला लायटींग केलं होतं. आमचं मंडळ भारीच. मंडळ मी तुमचा आभारी आहे असं म्हणणार नाहीच. ही पोरं नी मी वेगळा कुठेय. गणेशोत्सव, दिवाळी,शिमगा सगळं जोशात साजरं करतो आपण.
मंडळाने लग्नात गीफ्ट म्हणून मऊ गादी दिलेय. आगलावे काकूंनी रजई दिली वरती भर हॉलमध्ये सगळ्यांना ऐकू जाईल असं म्हणाल्या की वर्षभरात रजईचं काम फत्ते झालं पाहिजे. आम्हा दोघांना कुठे तोंड लपवू नी कुठे नको असं करून सोडलन.
श्रावणी दुधात साखर मिसळतात तशी आमच्या कुटुंबात मिसळली. आईसोबत घरातली,बाहेरची सगळी कामं शिकली.
रात्री माळ्यावरच माझ्या वाटेला येते. भरभरून सुख देते मला. एखाद्या अल्लड मुलीसारखी माझ्या कुशीत शिरते. सकाळपासूनचा सगळा व्रुत्तांत सांगते मला.
सकाळ होताच जवाबदार सुनेच्या भुमिकेत शिरते. नळाला तोटी लावून सगळी भांडी भरुन घेते. चहाचं आधण ठेवते. शुचिर्भूत होऊन देवपूजा करते.
आईला सध्या संधिवाताने जखडलय. तिला समजून घेते. खरंच श्रावणीने माझ्या आयुष्यात श्रावण आणलाय.
आगलावे काकू येतात कधीकधी विचारायला,”काय मग श्रावणी पेढे कधी?” त्यांच्याशीही गोड बोलता येतं श्रावूला. पोळीभाजीचे डबे करायचे म्हणतेय. मी तर हो म्हणालो तिला. तिला लागेल तेवढी सर्व मदत करणार मी. मार्केटिंगच काम मी घेतलय. तुमचे आशिर्वाद व शुभेच्छा असोत आमच्या पाठीशी.🙏
——-शुमारंभ
==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा