Skip to content Skip to sidebar Skip to footer

श्रावणी शुक्रवारचे महत्व, जिवतीचा कागद म्हणजे काय? जिवतीची कथा आणि पूजा विधी

shravan shukrawar puja in marathi :

श्रावणी शुक्रवार, जिवतीचा कागद, पूजा, आरती.
काय असतो जिवतीचा कागद?
काय अर्थ त्यातील प्रत्येक प्रतिमांचा?
कोण आहे जिवती?
कशी करावी जिवतीची पूजा?
कशासाठी करतात जिवतीची पूजा?
जाणून घ्यायचंय नं. चला तर मग..वाचुया.

आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षाऋतुत हा श्रावणमास येत असल्याकारणाने सगळी स्रुष्टी हिरवीगार झालेली असते. वातावरणात गारवा, पसरलेला असतो. वातावरण आल्हाददायक झालेले असते.

निसर्गदेवता आपल्या हिरव्याकंच शालूवर रंगीबेरंगी फुलांची नक्षी मिरवत असते. बळीराजाचीही लावणीची कामे संपत आलेली असतात. भाद्रपदात श्रीगणेशाचे आगमन होणार असते त्याआधीचा हा श्रावणमास यात मनाला चैतन्यमय करण्यासाठी, ईश्वरानजिक न्हेण्यासाठी अनेक व्रतवैकल्ये केली जातात.

घरातील बायकांची, मुलींची लगबग चालली असते. श्रावणी सोमवारी पतीच्या दिर्घायुष्यासाठी, सौख्यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत करतात. शंकराची उपासना करतात.

तसेच श्रावणातल्या दर मंगळवारी माता पार्वतीसारखे जन्मभर अहेवपण लाभावे, पतीची सर्व संकटांतून मुक्तता व्हावी या हेतूने नववधू मंगळागौरीची पूजा करते. पुजेला लग्न होऊन पाच वर्षे झाली नाहीत अशा स्त्रियांना बोलावतात.

बुध व ब्रुहस्पतीची पूजा बुधवारी, गुरुवारी केल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणातल्या दर शुक्रवारी जरा-जिवंतिका(जिवतीची)पूजा घरातील माता आपल्या मुलाबाळांना दिर्घायुष्य लाभो यासाठी करतात.

जीवतीचा कागद हा दुकानात मिळतो. श्रावण महिन्याच्या प्रथमदिनी हा जीवतीचा कागद आणून देवघराच्या भिंतीला चिकटवतात किंवा या कागदाची फ्रेम बनवून पूजेस लावतात.

१. पहिले चित्र असते नरसिंहाचे

बाळ प्रल्हादाची हिरण्यकश्यपूपासून सुटका करण्यासाठी भगवान विष्णुने नरसिंहावतार धारण केला. नरसिंहाने हिरण्यकश्यपूपासून बाळ भक्त प्रल्हादाची सुटका केली  म्हणून माता, या देवतेने आपल्या मुलांची वाईट शक्तींपासून रक्षा करावी या हेतूने नरसिंहाचे पूजन करतात.

बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह वा नृसिंह देवतेचे पूजन केले जाते.  अन्नातून कधी विषबाधा होणे, उंचावरून पडणे, आगीपासून होणारी हानी यांसारख्या संकटांपासून नरसिंह देवता घरातील बाळाचा बचाव करतात, अशी श्रद्धा आहे.

२. दुसऱ्या फोटोत भगवान बाळकृष्ण कालिया नागावर उभे आहेत

श्रीकृष्ण, नंद व यशोदामातेच्या छत्रछायेखाली व्रुंदावनात वाढत होता. गाई चरायला न्हेत होता. गोपींसोबत खेळायचा. कुणाची मटकी फोड, हंडी रचून दही, लोणी मटकावणं सारं काही मित्रगणांसोबत चालू होतं. याच काळात तिथल्या यमुना नदीत कालिया नावाचा विषारी साप आपल्या कुटुंबासह रहावयास आला. याला भय फक्त गरुडाचे होते पण गरुडाला एका स्त्रीने दिलेल्या शापामुळे तो काही व्रुंदावनात येऊ शकत नव्हता. या संधीचा फायदा घेत कालिया नागाने व्रुंदावनात आपला डेरा जमवला होता. तो आजुबाजूच्या रहिवाशांचे जगणे मुश्किल करत होता.

नदीचे पाणीही त्याच्या वास्तव्याने विषारी झाले होते. एकदा बाळकृष्ण गोपगणांसह विटीदांडू खेळताना त्याची विटी जोरात उडवंली व  यमुनेच्या जलात पडली.ती काढण्यासाठी म्हणून बाळकृष्णाने नदीत उडी मारली.

हा कोण धीट मुलगा आपल्या भागात येतोय असे म्हणत उन्मत्त कालियाने श्रीकृष्णाभोवती वेटोळे घातले व त्याला नदीतळाशी न्हेऊ लागला पण श्रीकृष्णाने आपला विराट अवतार धारण करताच कालियाच्या अंगाला ताण पडला. तो गयावया करू लागला. श्रीकृष्णाने त्याला गरागरा फिरवत आपटले व त्याच्या फण्यावर उभा राहून नाचू लागला. गोपगोपी आनंदित झाले पण कालियाच्या भार्या भयभित होऊन श्रीकृष्णाकडे आपल्या पतीचे जीवनदान मागू लागल्या श्रीकृष्णाला त्यांची दया आली त्याने कालियानागाला जीवदान दिले पण तिथून दूर जायला सांगितले.

या गोष्टीचे स्मरण ठेवत माता आपल्या मुलांचेही ती खेळत असताना काही संकट ओढवलं तर श्रीकृष्णाने त्यांचा बचाव करावा अशी प्रार्थना करतात.

३. तिसरं चित्र आहे जरा-जिवंतिकेचं. या यक्षदेवता..यांच्याबाबत महाभारतात कथा वर्णिली आहे.

मगध नरेशास दोन राण्या होत्या. मगधनरेशास मुलबाळ नव्हते. तो व्यथित असायचा. तेंव्हा चंडकौशिक ऋषी तेथून जात असतात. राजा ऋषींना जाऊन भेटला व त्याने आपली व्यथा ऋषींना सांगितली. ऋषींनी त्या राजास एक आंबा दिला व पत्नीस देण्यास सांगितले.राजाने आंबा कापला व दोघी राणींना अर्धा अर्धा दिला. राणींनी पुत्रास जन्म दिला पण अर्धा अर्धा. ते दोन्ही भाग घेऊन राजा रानात गेला. तिथे त्याला जरा यक्षिणी भेटली.

तिने तिला अवगतं असलेल्या अवयव सांधण्याच्या कलेने ते भाग सांधले. राजास पुत्र मिळाला. राजाने त्याचे नाव जरासंध ठेवले. जिवंतिका हीसुद्धा अशीच प्रेमळ यक्षिणी. या दोघी बालकांसोबत खेळतात, त्यांवर प्रेमाची पाखर करतात, त्यांचे रक्षण करतात असं मानलं जातं व श्रावणी शुक्रवारी या जरा-जिवंतिकेची पूजा केली जाते. आपल्या बाळांच्या दिर्घायुष्यासाठी व रक्षणासाठी जिवतीकडे माता साकडे घालतात.

४.चौथ्या प्रतिमेत आहेत बुध – बृहस्पती..

बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर  बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व हे गुण प्राप्त होतात.
बुधाचे वाहन हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतिक. माणसात जाग्रुत झालेला उन्मत्तपणा..  बुद्धीचा, ज्ञानाचा वापर करून माणसाने नाहिसा करावा हे बुधाची प्रतिमा सुचित करते.

बृहस्पतीचं वाहन वाघ. हे अहंकाराचे प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये, आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला सुचित करते. म्हणूनच बुध – बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.

श्रावण महिन्यातील पहिल्या दिवशी जिवतीचा कागद आणून देव्हाऱ्यात चिकटवतात. श्रावणातील दर शुक्रवारी सकाळी उठून स्नान उरकून पुजास्थानासमोर रांगोळी रेखाटावी.

•दिवा,समई प्रज्वलित करावी.

•प्रथम गणेशपूजन करावे. यासाठी थोड्या अक्षता पुजेस्थानी ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. श्रीगणेशाला हळद, कुंकु वहावे. चंदन अर्पावे. सुवासिक फुले वहावीत. गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

• समईस हळद, कुंकू लावावे, फुले वहावीत.

•कुलदेवी व लक्ष्मीमातेचे पूजन करावे.
हळद,कुंकू,चंदन,फुले वहावी, दिपाने औक्षण करावे.
कुलदेवतेची ओटी भरावी.

•जिवतीच्या चित्रातील प्रत्येक प्रतिमेस हळद,कुंकू,चंदन अर्पावे, सुवासिक फुले वहावीत, अत्तर लावावे.

• आघाडा,दुर्वा,फुले यांचा तयार केलेला हार जिवतीच्या फोटोवर लावावा. २१ मण्यांचे हळदकुंकू लावलेले कापसाचे गेजवस्त्र अर्पण करावे. विड्याच्या पानासोबत सुपारी व फळ ठेवावे.

•अक्षता वहाव्यात.

•धुप,अगरबत्ती दाखवावी. दिपाने ओवाळावे.

• हा श्लोक म्हणावा.

जरे जीवान्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी।
रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते।।


• आपल्या मुलाबाळांना दिर्घायुष्य लाभावे व त्यांचे रक्षण करा ही प्रार्थना करावी.
मुले बाहेरगावी रहात असल्यास चारी दिशांना औक्षण करावे व अक्षता उडवाव्यात व जिवतीस प्रार्थना करावी की ज्या दिशेला माझी मुलं रहात आहेत, तिथे त्यांचे रक्षण कर.

• जिवतीला दूध, साखर, फुटाण्यांचा नैवद्य दाखवावा. कणकेचे पाच/सात/नऊ असे दिवे बनवून त्यांनी जिवतीची आरती म्हणावी.

• दर शुक्रवारी एका मुठीचे पुरण घालावे. कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळ्या कराव्या इतर वरणभात, खीर,कटाची आमटी,भाजी,तळण आवडीप्रमाणे करावे. देवीला नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवावयास बोलवावे. तिच्या पानाभोवती रांगोळी रेखाटावी. सुवासिक अगरबत्ती लावावी. तिच्या पानासमोर विडा व दक्षिणा ठेवावी. ती जेवल्यावर तिची खणानारळाने ओटी भरावी.

• संध्याकाळी सख्याशेजारणींना हळदीकुंकवास बोलवावे. त्यांना हळदीकुंकू लावावे. त्यांच्या ओट्या भराव्यात. त्यांना दूध, चणेफुटाणे हा प्रसाद द्यावा.

• घरातील लहान मुलांना पाटावर बसवून कुंकू,अक्षता लावावी. त्यांचे औक्षण करावे. त्यांना दूध, चणे,फुटाणे हा प्रसाद द्यावा.

जाणून घ्या श्रावणात सोमवारच्या दिवशी शंकराच्या पूजेला एवढं महत्व का आहे?

मंगळा गौरीची माहिती मराठीत

आषाढी एकादशीचे महत्व आणि माहिती

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
 
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा ।
गृहांत स्थापूनि करुं पूजना ।
आघाडा दूर्वा माळा वाहूं या ।
अक्षता घेऊनि कहाणी सांगू या ॥ १ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
 
पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।
सुवासिनींना भोजन देऊ ।
चणे हळददीकुंकू दूधही देऊं ।
जमुनि आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
 
सटवीची बाधा होई बाळांना ।
सोडवी तींतून तूंचि तयांना मातां ।
यासाठी तुजला करिती प्रार्थना ।
पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
 
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।
वंशाचा वेल वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥ 

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. 

ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. “ अग अग सुईणी, मला नाळवारीसुद्धां एक मुलगा गुपचुप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन.” सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली.

गांवांत एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हां ही सुईण तिच्या घरीं गेली, तिला सांगूं लागली कीं, “बाई बाई, तूं गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखूं लागेल तेव्हां मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन.”

तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली, “बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरांत एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचींच दिसताहेत. तेव्हां आपल्या घरापासून तों तिथपर्यंत कोणास कांही कळणार नाहीं असं एक गुप्त भुयार तयार करावं.

आपल्यास कांहीं दिवस गेल्याची अफवा उठवावी. “मी तुम्हांस नाळवारीचा मुलगा आणून देईन.” असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला, आणि जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणं डोहाळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरितां त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरतांच बाळंतपणाची तयारी केली.

इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखूं लागलं. सुईणीला बोलावूं आलं त्याबरोबर “तुम्ही पुढं व्हा, मी येतें,” म्हणून सांगितलं. धांवत धांवत राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग करूं सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरीं आली. “बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहींस, नाहीं बांधलेस तर भय वाटेल.” असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला.

सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला, आणि तिच्यापुढें ठेविला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगूं लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्यें दुःखी झालीं. सुईण निघून राजवाड्यांत गेली.

राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊं लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणामासीं दर शुक्रवारीं जिवतीची पूजा करावी, आणि नमस्कार करून म्हणावं कीं, ‘जय जिवतीआई माते! जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो.” असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमीं वागूं लागली.

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशीं बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशीं ही न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हां याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्रीं तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्रीं तिच्या घरीं आला. दारांत गाय-वासरूं बांधली होतीं. चालतां चालतां राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला. वांसराला वाचा फुटली. तें आपल्या आईला म्हणालं, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला?”

तेव्हां ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जावयास भीत नाहीं, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय?” हें ऐकून राजा मागंपरतला आणि घरीं येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली.
काशीस जाऊं लागला. जातां जातां एका ब्राह्मणाच्या इथें उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होतीं. पण तीं पांचवी-सहावीच्या दिवशीं जात असत. राजा आला त्या दिवशीं चमत्कार झाला. पांचवीचा दिवस होता. राजा दारांत निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणूं लागली, ‘ कोण ग मेलं वाटेंत पसरलं आहे ?” जिवती उत्तर करिते, “ अग अग, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी कांहीं त्याला ओलांडूं देणार नाहीं.” मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचीं आईबाप चिंता करीत बसलीं होती. त्यांनीं हा संवाद ऐकला.

इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनीं निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. “तुमच्यामुळें आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा.” अशी विनंती केली राजानं ती मान्य केली. त्याही रात्रीं याचप्रमाणं प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला.

इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशींत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळीं ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरीं जा. सार्‍या गांवांतल्या बायकापुरुषांस जेवायला बोलाव. म्हणजे याचें कारण समजेल.”

मनाला मोठी चुटपुट लागली. घरीं आला. मोठ्या थाटानं मामदं केलं.त्या दिवशी शुक्रवार होता. गांवांत ताकीद दिली. “घरीं कोणीं चूल पेटवूं नये. सगळ्यांनीं जेवायला यावं,” ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला. “मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन.” राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धूण होतं तें काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहींत. कारल्याच्या मांडवांखालून गेलीं नाहीं. दर वेळेस “जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असॊ,” असं म्हणे.

पुढं पानं वाढलीं. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढतां वाढतां ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढूं लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडांत उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. कांहीं केल्या उठेना. तेव्हां त्याची आई गेली. त्याची समजूत करूं लागली. तो म्हणाला, “असं होण्याचं कारण काय?” तिनं सांगितलं कीं, “ ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई.” असं सांगून सर्व हकीकत सांगितली.
नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धां आपण राज्य करूं लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो.
ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

अशाप्रकारे आपल्या मुलांच्या रक्षणासाठी, उत्तम आरोग्यासाठी, दिर्घायुष्यासाठी जरा-जिवंतिकेचे पूजन हे श्रावणातील दर शुक्रवारी केले जाते.

=========

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.