Skip to content Skip to sidebar Skip to footer

शेजार

©® गीता गरुड.

गौरीच्या मुलीची स्कुलबस दुपारी दोन वाजता तिला सोडायला यायची. गौरी त्यावेळेला खाली जाऊन बसायची. तिथेच पाळंदे काकू बसलेल्या असायच्या पायरीवर. गौरी त्यांना साद घालायची,”काय काकू, बऱ्या अहात ना!” इतक्यात गौरीची छबी यायची नि आईच्या बाजुला उभी रहायची.

काकू म्हणायच्या,”आता बरंच म्हणायचं. सदा मरे त्याला कोण रडे.”

गौरी नेहमीसारखंच विचारी,”बरं नाही का?”

काकू दुखऱ्या कंबरेवर हात लावून म्हणायच्या,”फुट फुट फुटतेय गं ही. उभी, आडवी ऑपरेशनं झालैत. त्यावेळी दिलेली इंजेक्शनं अशी दुखू लागतात, सांगून सोय नाही. घरात कोणाला बोललं तर म्हणे..तुझं रोजचंच. खरंच गं गौरा, माझं हे रोजचच नि माझ्यासोबतच जायचं. आता यातून सुटका नाही बघ.

ताकद होती तेंव्हा राब राब  राबले. ओली बाळंतीण असतानाही धुण्याची कामं चुकली नाहीत. आता शरीर ऐकत नाही, साथ देत नाही. आता नं माझं जोताच्या बैलासारखं झालंय..जोताचा बैल कसा जोत धरतो तोवर मालकाला हवाहवासा असतो आणि म्हातारा झाला की मात्र टाकुनही देववत नाही आणि पाळावा तर त्याच्या खाण्याचा, औषधांचा खर्च.”

“काकू डॉक्टर काय म्हणतात?”

“डॉक्टरांनी हार पत्करली माझ्या दुखण्यावर.”

इतक्यात छबी आईला ओढू लागली. कडी काढून घरात शिरताच छबी आईवर तणतणली,”काय गं आई, रोज त्या आज्जीच्या.गप्पांना बसतेस नि ती आज्जीही एकच दुखण्याची रेकॉर्ड लावते. कंटाळा नाही येत तुला तेच तेच ऐकून!”

गौरी हसली. छबीला म्हणाली,”छबी, लहान आहेस तू. अगं आपण त्या आज्जीला काही देतो का?”

“कशाला द्यायला हवं! टुबीएचके आहे त्यांचा. कार आहे. मुलगासून नोकरी करतात. काय कमी आहे त्यांना!”

“चुकतय छबी तुझं. पैसा म्हणजेच सारं काही नसतं राणी. त्यांना गरज आहे, त्यांचं कुणीतरी ऐकून घेण्याची. बाकी काहीच अपेक्षा नाही त्यांची.”

“घेतील की त्यांची मुलं त्यांचं ऐकून. आपण कशाला!”

गौरी यावर काही बोलणार इतक्यात बाजुच्या बंटीच्या आईने बोलावलं. बंटीने खेळताखेळता स्क्रु गिळला होता आणि बंटीची आई रडकुंडीला आली होती. गौरीने घरातली उरलेली चारही केळी बंटीला खायला लावली नि डॉक्टरांकडे त्या मायलेकरांना धाडलं. खरंतर आज छबीला बनानाशेक हवा होता पण आईने सगळी केळी बंटीला देऊन टाकल्याने ती फुगली.

“छबे, जेवून घे चल.”

“नकोय मला. ते जेवणही त्या बंटीलाच दे जा. मला काहीच नको.”

“छबे, असं गं काय करतेस.”

“बोलू नको तू माझ्याशी. कट्टी फू. तू तू नं सगळ्यांची आहेस. फक्त माझीच नाहीएस तू.” छबी रडतरडत झोपून गेली. संध्याकाळी जागी झाली तेव्हा तिच्या आवडीच्या थालिपीठांचा गंध घरभर दरवळत होता. दुपारचा रुसवा विसरून ती आईपाठी गेली.

तिने पाहिलं, ओल्या फडक्यावर आई थालिपीठ थापत होती नं तव्यावर तो फडका ठेवून अलगद फडका थालिपीठापासून विलग करत होती मग ती म्हणाली,”आई मी पाडू का गं भोकं?”

तशी गौरी म्हणाली,”नको गं बाळा. तवा तापलेला असतो नं बोटं चुरचुरतील माझ्या माऊची.”

“तुझी नाही का गं चुरचुरत बोटं?” माझ्या बोटांना सवय झालेय राणी आणि कसं अलगद भोक पाडून तिथनं बाजुला व्हावं हे ठाऊक झालंय बोटांना.” छबीला पटलं थोडंथोडं पण मग तिनं कावळा हातात धरून इवलंइवलं तेल छिद्रांत ओतलं नि स्वत:च म्हणाली चुर्र चुर्र.” आईसोबत ती थालिपीठ खात असताना बंटीची आई आली बंटीला घेऊन.

“काय म्हणाले डॉक्टर?” गौरीने बंटीला थालिपीठ देतादेता विचारलं.

“अगं गौरी, तू केळी खाऊ घातलीस नं याला. डॉक्टर खूष झाले, म्हणाले..सकाळी पडेल तो स्क्रू बाहेर काही काळजी नको करायला.” मग बंटी नि छबी दोघं खेळत बसले.

रात्री गौरीच्या नवऱ्याचा, अभयचा फोन आला. “अहो, किती उशीर. अहात कुठे तुम्ही!”

“गौरी, जरा माझं ऐकशील. अगं विद्याची तब्येत बिघडली अचानक. इथे मी आहे भावजींसोबत.ऐकतेस ना तू..तू येऊ शकशील का मग भावजी अवीसोबत घरी थांबतील त्याला शेजाऱ्यांकडे ठेवलय. वर्षाचं लेकरू गं ते. आई कुठे गेली विचारत रडतय सारखं.”

“अहो..काय म्हणताय मी येऊ तिथे पण माझी छबी..इतक्या रात्री तिला कुठे ठेवू ?”

“डॉक्टर बोलवताहेत आत. मी जातो.” आणि अभयने फोन ठेवला पण आता गौरीपुढे पेचप्रसंग उभा राहिला. छबी अगदीच लहान नव्हती खरी. सहावीत होती तरी तिला एकटं कसं ठेवणार.

गौरीने पेंगुळलेल्या छबीला जागं करत पप्पांच्या फोनबद्दल सांगितलं. छबी म्हणाली,”अगं पण तुला जायलाच हवय का? अवीची नेहामावशी येईल की गावावरनं. “

“छबी, अगं नेहामावशीला बाळ होणारंय. प्रवास जमणार नाही तिला. दोन जीवांची ती.  तू प्लीज चार दिवस बंटीकडे रहा ना.”

“ए नाही हं. मला बंटीच्या पप्पांची भीतीच वाटते. मी येऊ का तुझ्यासोबत!”

“छबे, उद्यापासनं तोंडी परीक्षा सुरू होताहेत. गैरहजर राहून चालायचं नाही.”
शेवटी हो नाही करत छबीचं पार्सल पाळंदे आज्जींच्या घरी पोहोचतं करून गौरी निघाली.

गौरीचं मन हळवं झालं होतं. तिला एकीकडे छबीला निरोप देतानाचा तिचा रुसलेला चेहरा आठवत होता तर दुसरीकडे नणंदेचा छोटा अवीबाळ. दिवसभर राहिला खरा आईशिवाय पण पुढे..नक्की काय झालं असेल विद्यावन्संना.. देव करो रिपोर्ट्स चांगले येवोत. ती मनातल्या मनात प्रार्थना करत होती.

या सगळ्या धांदलीत ओट्यावर असलेला दुधाचा टोपही तिला खुणावू लागला..तो तसाच राहून गेला होता खरा. तिने बंटीच्या आईला फोन लावला. बंटीची आई म्हणाली,”नको काळजी करूस. मी ठेवते सगळं नीट करून. नळ वगैरेही बघते.” गौरीला हुश्श झालं.

इकडे पाळंदे आज्जींच्या सुनेनं पाळंदे आज्जीसोबत छबीची गादी घातली. तिला उशी, पांघरूण दिलं. रात्री छबी स्वप्नात आई आई करून ओरडू लागली. पाळंदे आज्जीने तिला थोपटलं. तिच्या पोटावर हात ठेवला नि कधी ती आज्जीच्या कुशीत निजली, तिचं तिलाच कळलं नाही.

सहा वाजता पाळंदे आज्जीच्या सुनेने छबीला उठवलं. ब्रश वगैरे झाल्यावर तिच्या केसांच्या छान घट्टशा दोन वेण्या स्वतः पाळंदे आज्जीने बांधल्या . छबीचं आवडतं मसाला दूध मिळालं तिला प्यायला तशी छबी खुलली. तिने परीक्षेला विचारणार असलेली
श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे..
ही कविता अगदी चालीत म्हणून दाखवली.

विद्याचं छोटसं ऑपरेशन करावं लागणार होतं. विद्यासोबत आठवडाभर तरी गौरीचं रहाणं गरजेचं होतं. तिने पाळंदे आज्जीला तसं फोन करून सांगितलं. पाळंदे आज्जी म्हणाल्या,”त्यानिमित्ताने तुझी लेक माझ्यापाशी राहील. माझ्या नातवाला सैनिक स्कूलला ठेवल्यापासनं घर खायला उठत होतं. छबी आल्यापासनं जरा भरलेलं वाटतय. सूनही छबीसोबत माझ्याशीही छान बोलू लागलेय. आता मला एकटं नाही वाटतंय.”

दुसऱ्या दिवशी दुपारी तर तुफान पाऊस. रस्ता क्रॉस करून जाणं छबीला जमेना पण क्लीनर काका स्वतः तिला इमारतीच्या गेटपर्यंत सोडून गेले. छबी एकटी जाते येतेय हे कळताच ते छबीची विशेष काळजी घेत होते.

शाळेतनं उपक्रम दिला होता, रोप लावण्याचा. आज्जींनी तिला छोटीशी कुंडी दिली. त्यात इमारती मागच्या पटांगणातली दगडं, माती छबीने आज्जीच्या सूचनेनुसार भरली व गुलबक्षीच्या बिया रुजत घातल्या. एवढं सगळं काम आई घरी असती तर छबीने केलंच नसतं.

काहीतरी निमित्त काढून आईकडूनच करून घेतलं असतं पण आत्ता छबी शाळेतनं आल्यावर स्वत:चे कपडे दोरीवर टांगत होती. शूज काढून नीट शू ऱ्याकमधे ठेवत होती. पानात वाढलेलं सगळं न कुरकुर करता संपवत होती.

पाळंदे आज्जीही छबीसाठी अळूवडी,पानगी,घावण असं मुद्दाम काहीतरी चवीचं करत होती. त्यानिमित्ताने तीही काही काळासाठी का होईना तिची कंबरदुखी विसरत होती पण रात्री कंबर चाळवायचीच मग आज्जीला कण्हताना पाहून छबी तिच्या कंबरेला आयोडेक्स लावून द्यायची. आज्जीच्या आग्रहाखातर तिच्या पाठीवर हलकेहलके पायाचा दाब द्यायची. उतरताना हात लावून पायादेखील पडायची.

छबीचा बाबा, अभय घरी येणार होता छबीसोबत रहायला पण आज्जीनेच सांगितलं की छबीची काळजी करू नका. तुम्ही तुमच्या बहिणीजवळ थांबा. एकाला दोघं असलात की बरंच पडेल.

आणि त्या रात्री गौरी व अभय घरी आले. रात्री पाळंदेआज्जींकडेच त्यांची जेवणं झाली, गौरी, नको मी करते म्हणत असताना देखील.

रात्री छबी आईबाबांच्या कुशीत शिरली. दोघांच्याही पोटावर  तिने हात ठेवला.

छबीला आंजारतगोंजारत गौरी म्हणाली,”माझं कोकरू ते. किती दिवस आईवेगळं रहावं लागलं माझ्या बाळाला! आत्ता नाही अशी सोडून जायची कधीच. आईच्या कुशीत शिरत छबी म्हणाली,”खरंच आई, कधीतरी सोडून जात जा मला. मला वेगळं ठेवलंस ना त्याने मला कळलं की कोणाला आपली गरज असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे जसं की पाळंदे आज्जी माझ्या वेण्या बांधायची, क्लीनर काका मला बिल्डींगपर्यंत आणून सोडायचे, आज्जीची सून मला दप्तर भरायला,ग्रुहपाठ करायला मदत करायची ,बंटीची आई बंटीला माझ्यासोबत खेळायला पाठवायची आणि एक मी स्वतः कुंडीत माती घालून त्यात बिया पेरल्यात गुलबक्षीच्या. आता थोड्याच दिवसांत रोपं येतील..मग फुलंं येतील.  आज्जी म्हणाली मला.”

“हो गं माझी गुलबक्षी ती,”म्हणत गौरीने लेकीचा मुका घेतला.

आता शाळेतून येताना आई पाळंदेआज्जीसोबत बोलत असली तरी छबी वैतागत नव्हती. उलट तीच बंटीला घेऊन आज्जीकडे खेळायला,गोष्टी ऐकायला जाऊ लागली. एका संध्याकाळी ती दोघं अशीच खेळत होती आणि आज्जीने छबीला बोलावलं.

“छबी ही बघ गंमत.” आज्जी म्हणाली.

छबीने पाहिलं. तिने लावलेल्या गुलबक्षीवर छानसं फुल उमललं होतं. किती लोभसवाणं दिसत होतं ते! अगदी छबीसारखं, गोजिरं..

–समाप्त

=================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

1 Comment

  • Jyoti Tergaonkar
    Posted Jul 20, 2022 at 4:27 pm

    खूपच सुंदर कथा,अगदी नेहमीसारखी👌👌शेजारी कधीही असावेत असा माझी आई म्हणायची,कधी त्यांची आपल्याला गरज लागेल किंवा त्यांना आपली हे सांगता येत नाही…अगदी तसाच दाखवलाय कथेमधून..खूप खूप सुंदर✍️👌👌

    Reply

Leave a Comment

error: