Skip to content Skip to sidebar Skip to footer

शेफ नवरा

अनुराधा भलतीच खुशीत होती. एकतर तिचं लग्न ठरलं होतं आणि नवरा व्यवसायाने शेफ होता म्हणून. एकंदरीत चौदा स्थळ नाकारल्यानंतर, पंधराव स्थळ आलं ते ‘देवचं.’ तिच्या सगळ्या मैत्रीणींची लग्नं झाली तरी, अनु अजून स्थळ पाहतच होती. अचानक हे स्थळ आलं नि अनुने पहिल्याच भेटीत होकार दिला.

देव दिसायला छान आणि ‘प्रोफेशनली शेफ!’ तिच्या पाहण्यातला पहिलाच पुरुष शेफ! तिला खूप भारी वाटत होत. कारण घरात अनुराधाचे बाबा किंवा भाऊ आपली ताट -वाटी उचलून ठेवायलाही बघत नसत. अगदी चहाचा कपही हातातच द्यावा लागे त्यांच्या. मग एखादा पदार्थ करून पहायची गोष्ट, तर खूपच लांब राहिली.

घरचं तर सारं आईच पाहत असे आणि आईच्या हाताखाली अनुराधा एकदम छान तयार झाली होती.

आता नवरा शेफ असल्याने मैत्रिणी अनुला चिडवू लागल्या, “मजा आहे एका मुलीची. तुला काही काम नाही केले तरी चालेल. सारं काही आयतं हातात मिळणार!

मग लग्न झालं आणि अनुराधा सासरी आली. देवने तिला उत्साहाने खूप सारे पदार्थ करून खाऊ घातले, इंडीयन, चायनीज, इटालियन असे बरेच काही. अनु खुश झाली, आपल्या नवऱ्याच्या टॅलेंटवर. त्याच्या हाताला भारी चव होती. तिच्या मैत्रिणीही उत्साहाने तिच्या घरी जिजुंच्या हातचे पदार्थ खायला आल्या. त्यांनीही त्या पदार्थांची तोंड भरून स्तुती केली.

तसेच स्वयंपाक घरातील वेगवेगळया आकाराची, पितळेची, स्टीलची, मातीची भांडी, पातेली, हर तऱ्हेच्या डिश, वेगवेगळ्या आकाराचे चमचे, ही शेफची साधने पाहून अनुराधा हरखूनच गेली.

आता सासरी रुळलेली अनुराधा लवकरच वेगवेगळ्या तऱ्हेचे पदार्थ खाऊन कंटाळली. ‘तेच तेच काय खायचे रोज?’ असा सूर लावू लागली.

शिवाय घरच्या ऑर्डरच्या भांड्यांचा ढीग आता तिलाच घासावा लागे आणि मागची साफसफाई तिलाच करावी लागे.
आधी हे सारे सासुबाई करत होत्या. पण आता सून आल्याने त्यांनी या कामातून रजा घेतली. तसेच पदार्थ करण्यासाठी सामान- सुमान इतके लागे की, ती आवरून दमून जाई.

केर -कचरा, पसाराही जास्त होई. मग भल मोठं स्वयंपाकघरही अपुर पडायचं.
‘एकवेळ पदार्थ केलेले बरे, पण ती मागची आवरा-आवरी नको’ असे वाटू लागले तिला.

‘सुट्टीच्या दिवशी मैत्रिणींना घरी बोलवावे अन् आपण निवांत त्यांच्यासोबत बोलत बसावे, मस्त गप्पा रंगाव्यात , स्वयंपाकघरातून पदार्थांचे वास दरवळावे आणि देवने वेगवेगळ्या तऱ्हेचे, वाफाळलेले पदार्थ करून आम्हाला खाऊ घालावे. या स्वतःच्याच स्वप्नरंजनाला ती वैतागली.

त्यापेक्षा बाहेरून पदार्थ ऑर्डर केलेले बरे. असे अनुला वाटू लागले. निदान पसारा तरी होत नाही त्याचा.’ पण घरात शेफ असताना बाहेरून पदार्थ ऑर्डर करणे हा गुन्हाच होता जणू!

कधी एखाद्या पदार्थाची ऑर्डर जास्त प्रमाणात असल्यास बऱ्याचदा जेवणातही तेच खावे लागे. कारण देवला मदत करता -करता जेवणाची वेळ टळून जाई. अनुला जितकं सोपं वाटलं होत, त्यापेक्षाही शेफचे काम खूपच अवघड होते.

मग सासुबाईंनी फर्मान काढले, “हक्काची सून आली घरी, तिनेच सारा स्वयंपाक करावा. आम्ही कंटाळलो चायनीज, जापनीज, पदार्थ खाऊन. पोटाचे हाल होतात. त्यापेक्षा साधा स्वयंपाक बरा.”

आता स्वयंपाक घर अनुराधाच्या हाती आले. आपल्या आईच्या हाताखाली तयार झालेली अनुराधा, भलतीच फास्ट होती. पारंपारिक पदार्थ बनविण्यात तिचा हात कोणीच धरू शकत नसे. सासरच्या साऱ्या मंडळींना तिच्या हातच्या चवीचे खूपच कौतुक वाटले.

हे पाहून सासुबाई म्हणाल्या, “अनु तूही पारंपारिक पद्धतीच्या पदार्थांची ऑर्डर घेत जा. भारी चव आहे तुझ्या हाताला. मी ही तुला मदत करत जाईन थोडी फार.

हे ऐकून अनु कसानुसा चेहरा करत म्हणाली, नको आई, मी आपला साधा स्वयंपाकच करत जाईन. हे शेफचे काम आपल्याला परवडणारे नाहीच मुळी.. असे म्हणत, अनुने डोक्याला हात लावला.

=================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: