Skip to content Skip to sidebar Skip to footer

एकटीच “ती”

निहारिका बस स्टॅन्ड वर एकटीच बसली होती. नीरजने अर्ध्यातच साथ सोडून ५ वर्षे झाली होती. ती एकटीच पिहूला सांभाळून संसाराचा गाढा चालवत होती. निहारिका तशी स्वतःच्या पायावर उभी होती. पण आपण एकटे आणि विधवा आहोत ह्याची जाणीव तिला पदोपदी सतवायची. नीरजवर असलेल्या अपार प्रेमामुळे  ती नीरज व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकत नव्हती.

नीरजला जाऊन आता हळूहळू वर्षे उलटत होती. छोटी पिहू आता मोठी होऊ लागली होती. पण नीरजनंतर पिहूची जबाबदारी निहारिकावर पडली आणि ती दिवसेंदिवस ऑफिसमध्ये बिझी राहू लागली. निहारिकाला नीरजच्या जाण्याने एकटेपणा वाटायचा म्हणून तिनेही स्वतःला ऑफिसच्या कामात गुंतवून घेतलं होतं. निहारिका आता चांगली सेट झाली होती आणि तिचं मानधनही चांगलं वाढलं होतं. पण ह्या गोष्टीमुळे तीच घरी लक्ष देणं कमी झालं होतं.

पिहूला सांभाळायला जवळच्याच गल्लीत राहणाऱ्या एक मावशी यायच्या. पिहू लहान होती तेव्हा तर तिला काही कळायचं नाही. त्यामुळे तिला मावशींकडून प्रेम मिळालं आणि तिलाही मावशींचा लळा लागला होता. पण पिहू जसजशी मोठी झाली तशी तिला एकटेपणा वाटू लागला. तिला आई वडिलांची कमी वाटायला लागली होती. पिहू दिवसभर एकटीच असल्याने शाळेतून घरी आल्यावर मावशी जेवण वाढून आपल्या घरी निघून जायच्या. त्यानंतर पिहूला घर अगदी खायला उठायचं .

एक दिवस मावशी नेहमीप्रमाणे पिहूला जेवण वाढुन घरी निघून गेल्या. थोड्याच वेळात पिहूला पोटात खूप दुखायला लागलं आणि अचानक तिला कपड्यावर रक्ताचे डाग दिसले. पिहू एकटीच होती. हे बघून ती फार घाबरली. तिने निहारिकाला बऱ्याच वेळा फोन लावला पण निहारिकाने उचलला नाही. शेवटी पिहूने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आणि तिला आपण काहीतरी पाप केल्यासारखं वाटत होतं. ती पोटाला धरून निपचित पडून राहिली.

थोड्याच वेळात निहारिका घरी आली. पिहूचे इतके मिस्डकॉल्स बघून ती आज रोजपेक्षा लवकरच घरी आली होती. तिने दारावरची बेल वाजवली पण पिहूने दार नाही उघडलं. मग तिने तिच्याकडे असलेल्या किल्लीने दार उघडलं. दार उघडताच निहारिका पिहूच्या रूम मध्ये गेली. रूम मध्ये जाताच पिहूला काय झालं ते निहारिकाच्या लक्षात आलं. निहारिका आज मनातून खूप खजील झाली होती. तिने पिहूला जवळ घेतलं आणि तिला घट्ट मिठी मारली.

पिहू – “मम्मा, काय झालं मला? मी खूप घाबरले होते….मी तुला फोन पण लावला पण तू नाही उचलला.”

पिहूचं बोलणं ऐकून निहारिकाला अपराध्यासारखं वाटत होतं…स्वतःला सावरून ती म्हणाली…

“पिहू, असा त्रास तुझ्या मम्माला पण झाला होता. मी पण अशीच पडून असायचे..पण मी घाबरले नव्हते..आणि असा त्रास प्रत्येक मुलीला होतो..असं तुला दर महिन्याला होणार बाळा….”

“आता तुला तुझ्या खाण्यापिण्याकडे आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे बाळा….आणि तू काळजी नको करु तुला काहीही नाही झालं..उलट तू आधीपेक्षा अधिक सुंदर झालीस बघ…मी तुझा दिनक्रम व्यवस्थित सेट करून देईन…”

“आणि काही दिवस माझा वेळ फक्त तुझ्यासाठीच असणार आहे… “

पिहू शांतपणे ऐकत होती. निहारिकाने पिहूला सॅनिटरी नॅपकिन आणि खाऊ ऑर्डर केला आणि व्यवस्थित मार्गदर्शन करून स्वछता कशी राखायची ह्याबद्दलची माहिती दिली.

पिहूच्या तोंडात पेढा भरवत निहारिका म्हणाली , “अगं वेडाबाई उठ आता आणि बघ आरशात स्वतःला…तू मोठी झालीस बघ आणि पहिल्यापेक्षा अजूनच सुंदर दिसायला लागली माझं बाळ.”

पिहू थोड्याच वेळात चांगलं फील करायला लागली होती पण निहारिका मात्र स्वतःला दोष देत होती की आपली मुलगी वयात आली आणि आपण ऑफिसच्या कामात गुरफुटून गेलो होतो. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही कारण आपण एकटेच आहोत. निहारिका नीरजच्या फोटोसमोर उभी राहून रडत होती कारण तिच्याकडे होता तो फक्त एकटेपणा.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.