Skip to content Skip to sidebar Skip to footer

श्रावणात घन निळा बरसला (भाग ४)

वदंनाने झोप येईल म्हणून डोळे मिटून घेतले पण तिला काही केल्या झोप येईना. ती वारंवार एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होती. तिचे तिलाच कळत नव्हते कि काय होतं आहे. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता तशी ती पावसाची रिमझिम ऐकत होती या रिमझिम मध्ये तिच्या कानात ” रिमझिम गिरे सावन” या गाण्याची शीळ ऐकू येत होती.

” काय सुंदर शीळ घालून हे गाण्याचे सूर ऐकवतो रे तू. खरंच सर्व गुण संपन्न आहेस तू. अभ्यास त्याच बरोबर गरीबांसाठी होणारी तळमळ मैत्री कशी असावी याचा अर्थ तुझ्या कडून शिकावे. किती आणि कशाचे म्हणून तुझे गोडवे गावे हेच समजत नाही.” वदंना म्हणाली.

” आॅऽऽऽ मला चढवतेस हरबऱ्याच्या झाडावर. वंदू माझ्या चेहऱ्यावर बघ जरा हे लिहिले आहे की मी मुर्ख आहे.” स्वप्निल म्हणाला.

यावर सुजाता जोरजोराने हसायला लागली.

तिच्या हसण्याने वदंना जराशी नाराज झाली.

” ये वेडाबाई मी असेच हसले ग. रुसू नकोस ग माझी वंदू.” असे म्हणत सुजाता ने तिला आपल्या जवळ घेतले.

स्वप्निलला बारावीच्या परीक्षेत डिस्टिंक्शन मिळाले. तिघांनी मिळून सेलिब्रेट करायचे ठरविले.

” या रविवारी आपण सगळेजण पन्हाळा गडावर जाऊ. मस्त पैकी पार्टी करु‌.” स्वप्निल म्हणाला.

” अरे नाही रे जमणार तेव्हा मला. आई आजीजवळ गावी गेली आहे. ” वदंना म्हणाली.

” ठिक आहे मग नेक्स्ट संडे.” स्वप्निल म्हणाला.

” हो तोपर्यंत येईल आई.” वदंना म्हणाली.

आई गावी गेल्यावर घरचे सगळे काम करुन वदंना आपला अभ्यास करायची. स्वयंपाकघरातील स्वच्छता बघून तिची आजी तिचे खूप कौतुक करायची. तिच्या हाताची चव बघून आजोबा खूश व्हायचे.

” सुगरण आहे हो नात आपली. नशीबवान आहे हिचा होणारा नवरा.” आजी म्हणाली.

” आजी आता हे काय मध्येच नवरा.” वदंना हसत हसत म्हणाली.

” अगं म्हणजे आज न उद्या तुझे लग्न होणारच न.” आजी म्हणाली.

” मी नाही लग्न करणार आजी.” अगदी लटकेच राग आणत वदंना म्हणाली.

दोन दिवसांनी आई आली.आई आल्या आल्या आजीच्या खोलीत गेली. तिथे आजोबा आणि बाबा पण गेले. या चौघांचे काही तरी बोलणे झाले.मग आई बाबा खोलीबाहेर आले.वदंना कॉलेजला जायची तयारी करत होती. तिला बघून आईने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि “माझी लाडाची लेक ” म्हणत तिचे पापे घेतले.

” आई उद्या आम्हाला आमच्या मित्राने पार्टी दिली आहे.यासाठी आम्ही पन्हाळ्यावर जाणार आहोत.” वदंना कॉलेज मधून आल्या आल्या म्हणाली.

” अगं उद्या…!!! नको ग उद्या पाहुणे येणार आहेत घरी.” आई म्हणाली.

” कोण पाहुणे ग आई ?” वदंना ने विचारले.

इतक्यात तिचा भाऊ नाचत नाचत म्हणाला,” गोड गोजिरी लाज लाजरी वंदू तू होणार नवरी.”

” ये गप रे तिला चिडवत जाऊ नकोस.”आई म्हणाली.

वदंनाला काहीच कळेना काय म्हणत आहे आई आणि भाऊ. इतक्यात आजी हळूहळू चालत येत वदंना जवळ आली.

” बाळा उद्या तुला पहायला मुलाकडचे येणार आहेत घरी.मग तू कशी जाऊ शकशील न.”

आजीच्या तोंडून हे वाक्य ऐकून वंदना आ वासून उभी राहिली. ती काही बोलणार तोच आई म्हणाली

” अगं मामाने एक स्थळ सुचवले आहे तुझ्या साठी. एकुलता एक मुलगा आहे.नोकरी चांगली आहे. वडील रिटायर्ड शिक्षक आहेत. मुंबईत स्वःताचा फ्लॅट आहे. गावाकडे शेती घर आहे. आणखीन काय हवं गं.मुलाचा फोटो पाहिला आहे मी. देखणा आहे ग. तुमचा जोडा अगदी लक्ष्मी नारायणासारखा शोभणार बघं.” आई म्हणाली.

” आई नको न ग माझे लग्न. मी लग्न करणार नाही बघ.” वदंना रडकुंडीला आली.

” मला पुढे शिकायचे आहे. नोकरी करायची आहे. इतक्यात का ग तू हे मांडले आहेस.” वदंना म्हणत होती.

तेव्हा तिला आपल्या जवळ घेत आजी म्हणाली,” बाळा हे स्थळ स्वतः हुन आपल्या जवळ चालत आले आहे. नको म्हणू नकोस. अगं असे स्थळ मागुन ही मिळत नाही. असे कोणत्याही गोष्टीसाठी नकाराची घंटा वाजवू नये वंदू.” आजी समजावण्याच्या सुरात म्हणाली.

वदंना तशीच पडलेला चेहरा घेऊन कॉलेजला गेली. तिच्या चेहऱ्याकडे पाहून सुजाता ने विचारले,” काय झाले? तब्येत बरी नाही का तुझी ?”

वदंनाचा आता बांध फुटला ती हुंदके देत देत सुजाताला सर्व काही सांगितले.

सुजाता पण हे ऐकून शांतच बसली. नंतर म्हणाली,” अगं पण घरचे जरा जास्तच गडबड करत आहेत असे वाटत नाही तुला.”

वदंना काहीच बोलली नाही. संध्याकाळी क्लासला पण वदंना गेली नाही. स्वप्निल रजनीला क्लासला सोडायला आला होता तेव्हा सुजाता ला एकटीला बघून आश्चर्य चकित झाला. ही जोडी कधीच अशी वेगवेगळी नव्हती मग आज ही एकटीच कशी काय ? या प्रश्नाचे उत्तर जाणण्यासाठी तो सुजाता जवळ गेला.

” काय ग आज तुमचे सयामी जुळे कुठे राहिले.” स्वप्निल ने विचारले.

” अरे ती आता बीझी झाली आहे.” सुजाता ने हसतच म्हटले.

” म्हणजे????” स्वप्निल ने विचारले.

” म्हंजे वाघाचे पंजे…!! अरे आता कु.वदंनाचे सौ.वदंना व्हायचे दिवस जवळ येत आहेत.” सुजाता म्हणाली.

” काऽऽऽय…!!!”

” हो रे..!! उद्या तिचा कांदेपोहेचा कार्यक्रम आहे. मुंबईचे आहेत रे. ते आता गावी आले आहेत मग मुलगी बघायची मोहिम सुरू आहे त्यांची.वदंनाच्या मामांनी हे स्थळ सुचवले आहे.” सुजाता म्हणाली.

” अच्छा….!!! पण यार अजून शिक्षण पूर्ण केले नाही हिने तोपर्यंत लग्न..!! हे पटत नाही आपल्याला.” स्वप्निल म्हणाला.

” अरे हो ते तर आहेच पण त्यांच्या घरी लवकरच लग्न करतात रे. नशीब बारावीपर्यंत शिक्षण घेत आहे ती.” सुजाता म्हणाली.

” दादा…!!! ये दादा…!!! श्शी याला नेहमीच कोणी न कोणी भेटतच असतो. म्हणून याच्याबरोबर जायचे तर नको होते मला.” रजनी पाय आपटत आली.

स्वप्निलने रजनीला बघून ओळखले की आता ही काय बोलणार तोच तो म्हणाला ,” झाली का तुझी बॅच. हं चल लवकर केव्हा पासून वाट बघत आहे इकडे.”

स्वप्निल घरी आला. पण आज जरा तो काहीसा उदासच दिसत होता. त्याचा चेहरा हसरा असला तरी त्याच्या हास्यात काही तरी दडलेले आहे हेच जाणवत होते. त्याने आपल्या जुन्या डायऱ्या काढल्या त्यामध्ये लिहिलेले काही जुनी पाने चाळत बसला. तेव्हा त्याला वदंना ला धडकून पडलेल्या दिवसाचे लिखाण दिसले. तो दिवस आठवून तो आणखीनच कासावीस झाला होता. रात्री त्याला जेवण पण जाईना.

” अरे स्वप्निल बेटा आज भाजी आवडली नाही का तुला? बरोबर आहे तुझ्या मामी सारखी जमत नाही रे मला. त्यात तिकडचे पाणी पण न. मग तुला आॅम्लेट बनवून देऊ का?” आईने विचारले.

” नको ग आज का कोणास ठाऊक भूकच नाही मला.” असे म्हणत तो ताटात वाढून घेतलेले तेवढेच खाऊन उठला.

रात्री त्याला झोपच येत नव्हती. तो वारंवार आपल्या खोलीतील खिडकीतून वर नभात बघत होता. रात्रीच्या अंधारात चंद्र त्याच्या अवतीभवती असलेल्या चमचमणाऱ्या चांदण्याचा लपंडाव बघत होता.

‘ अरे या चांदण्या चंद्राला किती सतावत आहेत न. तो चंद्र शांत बसला आहे त्याच्या शेजारी एकच चांदणी अगदी सावलीसारखी बसली आहे शांत आणि या दुसऱ्या चांदण्या इकडून तिकडे चमचम करत पळत आहेत. चंद्र म्हणजे मी आणि ही ती जी त्याच्या शेजारी शांत बसलेली आहे ती चांदणी म्हणजे…..!!!??? ‘ असे मनात म्हणत त्याने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. पण त्याला झोप काही लागली नाही.

इकडे वदंनाच्या मनात चलबिचल सुरू झाली होती. तिला काहीच समजत नव्हते की तिला आतून काहीतरी होतंय पण काय आणि का हेच समजत नव्हते. ती पण रात्रभर जागून काढली.

सकाळी लवकर उठून आईने पटापट सगळी कामे उरकून घेतली. वदंनाच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून सगळे घर टापटीप लावले. आजीने आपली ठेवणीतली काठपदराची हिरवीगार साडी नेसून पोहे हार घातला. आजोबांनी पांढराशुभ्र नेहरू शर्ट घातला. दोघे पण खूप खूष होते. आपल्या डोळ्यासमोर नातीचे लग्न होऊ दे तिचा सुखी संसार पाहायची इच्छा ते वारंवार सांगत होते. घरात अगदी दिवाळी असल्यासारखा भास होत होता.

दुपारी अगदी वेळेवर पाहुणे आले. आईबाबांनी अगदी हसतमुखाने त्यांचे स्वागत केले. सगळेजण आत येऊन बसले. नवरा मुलगा म्हटल्याप्रमाणे अगदीच देखणा होता. त्याचे आईवडील कोणावरही छाप पडावी असेच होते. वदंनाचा मामा मामी पण सोबत होतेच. त्याचबरोबर नवऱ्याचे काका काकू पण होते. त्याचबरोबर नवऱ्याची चुलत बहीण आणि तिची छोटीशी मुलगी पण होती. सगळेजण बोलत बसले.

” मग बोलवायचे का मुलीला ?” मामाने विचारले.

” हो हो..!! ज्यासाठी आलो आहे ते विसरून चालणार कसे.” मुलाचे काका म्हणाले आणि एकच हशा पिकला.

वदंनाची मामी आतून वदंना ला घेऊन आली. वदंना ने आपल्या आईची लाल काठपदराची साडी नेसली होती. डोक्यावर पदर घेऊन हातात चहाच्या कपाचा ट्रे घेऊन वदंना हळूहळू बाहेर आली. आज ती नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. तिला बघताच क्षणी नवरा मुलगा बघतच राहिला.

तिला बसायला सांगून नवऱ्याच्या काकूने काही प्रश्न विचारले. वदंना ने घाबरत घाबरत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

” मनोज तू काही विचारणार आहेस का? विचारून घे. नाही तर म्हणशील मला चान्सच दिला नाही.” हळूच काकांनी कोपरखळी मारली.

मनोज म्हणजेच नवरा मुलगा त्याने फक्त एक स्माइल देत आपल्या आईकडे पाहिले.

” विचार जे विचारायचे आहे तुला मनु.” आई म्हणाली.

” नाही नको…!!” मनोज म्हणाला.

मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. कळवतो आम्ही असे म्हणत पाहुणे निघून गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मामाचा फोन आला,” तायडे पेढे तयार ठेव. वदंना पसंत पडली हो. लागा तयारीला. चट मंगणी पट ब्याह.”

” अरे काय सांगतोस. खरं की काय?” आई म्हणाली.

” हो ग. मी या बाबतीत खोटं कशाला सांगू. पोरीने नशीब काढले हो. असे घर मिळाले.” मामा म्हणाला.

आठ दिवसांत साखरपुडा करायचा ठरले. घरात साखरपुड्याची तयारी सुरू झाली.

” आजी मला खरंच खुप भीती वाटते ग.” वदंना म्हणाली.

” चल वेडी कुठली. भीती कसली.ये आज तू माझ्या जवळ झोप.” आजीने वदंना च्या पाठीवर हात फिरवत म्हटले.

वदंनाची द्विधा मनस्थिती झाली होती. लग्नाला होकार देऊ कु नकार. होकार आईबाबांसाठी द्यावे पण नकार कोणासाठी हेच कळत नव्हते.

साखरपुडा अगदी साध्या सोप्या पद्धतीने पार पडला. नवऱ्या मुलाकडून अगदी थोडीच माणसे आली होती. साधाच पण अगदीच शानदार सोहळ्यात साखरपुडा पार पडला.लग्न पण त्यांना लवकरात लवकर करून हवे होते. कारण सहा महिन्यांनी मनोजला कामानिमित्त परदेशात जायचे होते.

लग्न होईपर्यंत वदंना कॉलेजला जात होती. सुजाता तिला मनोजच्या नावाने चिडवत होती. इकडे स्वप्निलने पण डिग्री साठी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.आता या तिघांची भेट इतकी होत नव्हती. कधीतरीच म्हणजे शनिवारी किंवा रविवारी जर तो रजनीला क्लासला सोडायला आला तरच व्हायची.

वदंनाच्या लग्नाची तारीख जवळ आली होती. घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती. तिचे कपडे दागिने आहेर या सगळ्यात आईबाबा व्यस्त होते. जसजसे लग्न जवळ येत होते तसतसे वदंनाच्या मनातील धडधड वाढत होती.

लग्नाच्या पत्रिका वाटण्यात आल्या. दोन दिवसांवर लग्न होते म्हणून सुजाता आता वदंनाजवळच राहू लागली होती.

” सुजाता ऐक ना. मला आतून काहीतरी वेगळं वाटत आहे गं. माझे मन लग्नाला तयारच नाही. का माझे मन असे सैरभैर होत असेल ग?”

” वंदू तू खरं सांग मला. तुझ्या मनात कोणी आहे का ? तू कोणावर प्रेम करते का ?”

” छे गं…!!!” वदंनाने आपली नजर चोरत म्हटले.

” वंदू अजून ही वेळ आहे तू खरं सांग.”

” नाही यार..!!!” वदंना ने तिथेच विषय संपवला.

आज वदंनाचे रुप अजून ही खुलून दिसत होते. ती लग्नमंडपात येताच सगळ्यांची नजर तिच्यावर खिळली. हळदीच्या अंगात ती अजूनही सुंदर दिसत होती. लग्न झाले . स्टेजवर नवरा नवरी उभे राहिले.जो तो येऊन या दोघा नवदाम्पत्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत होता. वदंनाचे सर्व कॉलेजचे मित्र मैत्रिणी आल्या होत्या.सर्वजण दोघांना येऊन भेटत होते.

स्वप्निल आपल्या आईला घेऊन आला होता.

” किती सुंदर दिसतेस ग वदंना तू. तुझी बहिण असती न तर तिला मी स्वप्निल साठी मागितली असती बघ.” स्वप्निल ची आई म्हणाली.

स्वप्निल एकसारखा वदंनाला बघतच राहिला.

वदंना मुंबई ला निघून गेली. सुजाता आपले कॉलेज आपला अभ्यास यामध्ये गुंग झाली.‌स्वप्निल आपली डिग्री पूर्ण करण्यासाठी आपल्या अभ्यासात लक्ष वेधून होता.तिघा मित्राच्या आता वाटा वेगवेगळ्या झाल्या होत्या.

इकडे वदंनाच्या घरी तिच्या कामाचे तिच्या स्वयंपाकाचे कोडकौतुक व्हायला लागले होते. वदंनाने आपल्या गोड स्वभावाने सर्वाची मने जिंकली होती. वदंनाने घरात प्रवेश केल्या केल्या सासुबाईंना काही काम करायचे नाही तुम्ही आता असे म्हणत किचनमध्ये गेली होती. पटापट कामे करायची सवय तिला तिच्या आईसारखीच होती. बघता बघता लग्नाला चार महिने झाले.

सकाळी उठल्या उठल्या न जाणे कसे काय वदंनाला एकदम भोवळ आली आणि ती ,”आई ग…!!” असे म्हणत पटकन पलंगावर बसली. नंतर पुन्हा उठायचा प्रयत्न केला तर तिला एकदम उलटी आल्यासारखे वाटले म्हणून तशीच ती हळूहळू चालत बाथरुममध्ये शिरली. तिला उलटी झाली तिने आपल्या तोंडावर पाण्याचा शिडकावा केला आणि बाथरुमच्या बाहेर आली. जरा पलंगावर बसली तोच पुन्हा उलटी आल्यासारखे वाटले.

” अगं काय होतं आहे तुला वदंना.” मनोजने विचारले.

वदंना काहीच न बोलता परत बाथरूममध्ये गेली.

” आई ये आई इकडे ये जरा. बघ वदंनाला उलट्या होत आहेत.” मनोजने आपल्या आईला बोलावले.

आई मनोजचा आवाज ऐकून पळत पळत आली. आल्या आल्या तिने मनोजचे पापे घेतले.

” वदंना ये पोरी बस इथे.” असे म्हणत तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि आपल्या डोक्यावर बोटे नेऊन कडाकड बोटे मोडत म्हटले,” कोणाचीही दृष्ट न लागो माझ्या लेकरांना.आज मी खूप आनंदी झाले आहे. मी आजी होणार आहे.” असे म्हणत पळतच जाऊन देवासमोर साखर ठेवली.

हे ऐकून वदंना लाजेने चूर चूर होऊन बसली. मनोज पण तिला एकसारखे बघतच राहिला.

” वदंना मला खरं तर या वेळी परदेशात जायचे नाही. मी या दिवसात तुझ्या जवळ असावे असेच वाटते गं.” मनोज ने वदंनाचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले.

” अहो त्यात काय आहेत न आईबाबा इथे माझ्या जवळ. आणि तुम्ही तीन महिन्यांत परत येणारच आहात न. काम महत्त्वाचे नाही का.” असे समजावण्याच्या सुरात वदंना म्हणाली.

मनोज आपल्या मनावर दगड ठेवून परदेशी निघून गेला. तो तिथे होता खरे पण त्याचे सगळे लक्ष इकडेच होते.

आता सासुबाई वदंनाची खुप काळजी घेत होत्या. तिला काय हवं काय नको ते बघायच्या. तिला वजन कामे करू देत नव्हत्या.हाताच्या फोडाप्रमाणे तिला जपत होत्या. बघता बघता वदंनाला चौथा महिना लागला. इकडे मनोज पण आपली कामे संपवून परतण्याच्या मार्गावर होता. त्याने आपल्या आई वडिलांना वदंनाला इतकेच नव्हे तर होणाऱ्या बाळासाठी खूप खरेदी केली होती.

मनोज आज खूप खुश होता कारणही तसेच होते मनोजचे काम पूर्ण झाले होते तो आज परत आपल्या मायदेशी परतणार होता. त्याने आपल्या बॅगा रात्रीच भरून ठेवल्या होत्या. त्याची सकाळी लवकर ची फ्लाईट होती.तो पहाटे लवकर उठून तयार झाला.

इकडे तो परत येणार म्हणून मनोजच्या आईने त्याला आवडणाऱ्या भाज्या आणून ठेवल्या होत्या. वदंना पण मनोजची वाट अगदी चातकासारखी पाहत होती.

फ्लाईट मध्ये बसण्याआधी मनोजने घरी फोन करून सांगितले की आता निघेल फ्लाईट.

दुपारचे तीन वाजले.

” वदंना तुझी औषधे घेतली का ग तू ? मला मेलीला आठवणीत राहीले नाही बघ मनु साठी पोळ्या करायला गेले आणि विसरलेच बघ.” असे म्हणत सासुबाई किचनमधुन बाहेर आल्या. गडबडीने त्या वदंनाजवळ येत होत्या तोच एकदम त्यांचा धक्का टेबलावर ठेवलेल्या मनोजच्या फोटो फ्रेमला लागला आणि फ्रेम धाडकन जमिनीवर पडून प्
फ्रेम तुटली. तशी सासुबाईंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

” अरे देवा पांडुरंगा हे कसे पडले .” असे म्हणत त्या आपल्या हाताने ती तुटलेल्या काचेचे तुकडे गोळा करु लागल्या तशी एक लहान काच कचकन त्यांच्या हातात टोचली.

” आई गं आईईईई गं ऽऽऽ “

” काय झाले आई ? ” सासुबाईंचा विव्हळण्याचा आवाज ऐकून वदंना पळतच आली. तशी तिचा पाय जमीनीवरील चटाईवरून सर्रकन घसरला तशी ती धाडकन जमिनीवर कोसळली. तोच घरातील फोन जोरजोराने खणखणू लागला.

” अरे देवा हे काय झाले.वदंना अगं काय गं अशी पडलीस कशी तू. थांब तुला हळूहळू उठवते. अहो कुठे गेलात या लवकर…!!!” सासुबाई फारच भांबावल्या गेल्या.

पुन्हा फोन वाजला. वदंनाला कसेबसे हात धरून उचलून सोफ्यावर बसवले आणि सासुबाई नी फोन उचलला,” हॅलो. हो मी मनोजची आई बोलतीय. कोण बोलतोय ? काय झाले? नाही ऽऽऽऽ “

फोन तसाच टाकून सासुबाई घरात सैरावैरा पळू लागल्या.”अहो लवकर या कुठे आहात अहो आपला मनु…!!! नाही असे नाही होणार…!! मला सकाळी तर म्हणाला मी येतोय….!!!! मनु …!!!”

दुसऱ्या दिवशीच्या सर्व न्युज पेपरमध्ये बातमी पहिल्या पानावर अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्लेन मध्ये आग लागली आणि प्लेन क्रॅश झाले. प्लेनचे तुकडे तुकडे होऊन जमीनीवर पडले. प्रवाशांच्या ओळखी पटण्यापलिकडले चिंधड्या उडाल्या आहेत.

आपल्या समोर आपल्या तरुण मुलगा गेला त्याचबरोबर येणारा तो निष्पाप जीव जग पाहण्याआधीच जगाचा निरोप घेतला हा धक्का सहन न होऊन वदंनाच्या सासऱ्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आपला जीवनपट संपवून टाकला.

वदंनाचे संपूर्ण आयुष्य समोर होते. वंदनाच्या माहेरी तिचे दुसरे लग्न करुन द्यायचा निर्णय घेतला पण वदंना ने नकार दिला.वदंना सासुबाईंना मी तुमच्या सोबतच राहणार आयुष्य भर मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही असे म्हणत आपले आयुष्य सासुबाईच्या सेवेसाठी वाहून दिले.

” वदंना अगं फोन करून विचारले की त्याला तू ? कोण कोण आले आहे म्हणून.” सकाळी सकाळी सासुबाईंनी विचारले.

” नाही ओ आई. दुपारी करते फोन त्याला.” वदंना म्हणाली.

वदंना ने दुपारी स्वप्निल ला फोन केला.

” हॅलो स्वप्निल मी वदंना.”

” अगं हो ओळखले. नंबर सेव्ह केला आहे तुझा मी.” नेहमीप्रमाणे हसत स्वप्निलने म्हटले.

” हे बघ तू जेवालयाच ये. आणि तुझी फॅमिली पण आहे का सोबत. त्यांना पण घेऊन ये.”

” फॅमिली….!!! अरे वंदू तुला माहित नाही का मी लग्न केलेच नाही.”

” आ….!!!! काय म्हणालास?”

” अगं हो. “

स्वप्निल अगदी वेळेवर वदंनाच्या घरी आला.

वदंना ने हसत हसत त्याचे स्वागत केले. तिला पाहून स्वप्निल थोडा आश्चर्य चकित झाला. नेहमीसारखाच हसतमुख चेहरा पण त्या हसऱ्या चेहऱ्याआड असलेल्या वेदना त्याला दिसून आल्या.

वदंनाची सासू स्वप्निल बरोबर खूप चांगले बोलत होती. तिघांनी मिळून जेवण केले.जेवता जेवता सासुने स्वप्निल ला विचारले,” अरे बाळा तू इतक्या मोठ्या नोकरीला आहेस. बंगला गाडी पैसा सगळे आहे. तर तू अजून लग्न का नाही केलेस रे?”

” वेळच मिळाला नाही लग्नाला. शिक्षण पूर्ण केले मग नोकरी मिळाली. नोकरी करत करत प्रमोशन मिळत गेले प्रमोशन मिळाले ते परदेशात पाठवले. तिकडे कामाचा व्याप वाढला या व्यापाबरोबर वय पण वाढत गेले.वय वाढत वाढत लग्नाचे वय निघून गेले.” असे म्हणत स्वप्निल हसू लागला.

” छे रे. तू काय म्हातारा झालास कि काय. अरे आपलं हक्काचं माणूस असावं रे. काम धाम पैसा सगळे एकीकडे तर हक्काचे माणूस एकीकडे. आपलं असं कोणीतरी असाव रे. बघ अजून ही वेळ गेलेली नाही विचार कर. हवं तर मी शोधेंन तुला मुलगी.” सासूबाई म्हणाल्या.

यावर काही न बोलता फक्त एक हलकीशी स्माईल देत स्वप्निल ने आपले जेवण संपविले.

” काय करायचे आज कालच्या मुलांना. कामामध्ये लग्न करायचे राहून गेले. असे कुठे असते का ?” सासुबाई स्वप्निल गेल्यावर वदंना ला म्हणाल्या.

वदंना काही न बोलता सासुबाईंना औषध देऊन झोपायला आपल्या खोलीत निघून गेली.

सकाळी रोजच्या प्रमाणे वदंना उठली तोच तिचा फोन वाजला.अरे सुजाताचा फोन इतक्या सकाळी सकाळी असे म्हणत तिने फोन उचलला,” हॅलो सुजाता आज सकाळी सकाळी आमची आठवण आली मॅडम.” असे हसत हसत वदंना म्हणाली.

” अगं एक काम होते पण ते तुझ्या सासुबाई जवळ. जरा देशील फोन त्यांना.” सुजाता म्हणाली.

” हो हो. एकच मिनिट.” असे म्हणत वदंनाने फोन सासुबाईंना दिला.

जवळजवळ अर्धा तास त्या दोघी बोलत होत्या.

दुपारचे जेवण झाले तसे वदंनाची सासू वंदना ला म्हणाल्या,” वदंना उद्या आपल्या घरी माझ्या ओळखीचे लोक येणार आहेत तू जरा आजच काही तयारी कर स्वयंपाकाची.”

” बरं पण कोण येणार आहेत. किती जण येतील?”

” पाच सहा लोक आहेत. ते गं मंदीरात येतात न ती . तू ओळखत नाहीस त्यांना.”

” बरं बरं ठिक आहे करते मी तयारी.” असे म्हणत वदंना किचनमध्ये गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून वथंना ने स्वयंपाक करायला सुरुवात केली. तशी सासुबाई किचनमध्ये आल्या. तिला स्वयंपाक करत असलेले बघून म्हणाल्या,” वंदू जरा येशील माझ्याजवळ.”

” हो आई काय हवंय का?” असे म्हणत वदंना त्यांच्या जवळ त्यांच्या खोलीत गेली.

“हे बघ हे दागिने सगळे तुलाच ठेव” असे म्हणत सासुबाईंनी आपल्या दागिन्यांची पेटी वदंनाच्या हातात दिली.

” अहो आई मला हो कशाला हे. नको नको तुमच्या जवळच ठेवा. जेव्हा मला लागतील तेव्हा घेईल मागुन मी.” असे म्हणत वदंनाने ती पेटी पुन्हा सासुबाई ना दिली.

बरोबर अकरा वाजता दारावर थाप पडली तशी वदंनाने दार उघडले आणि,” अगं बाई सुजाता तू….!!!!” वदंना जोरात ओरडली.

” अगं आत तर येऊ दे तिला.” सासुबाई म्हणाल्या.

सुजाताच्या पाठोपाठ वदंनाचे आई वडील त्याच बरोबर स्वप्निल चे आईबाबा पण होते. सर्वांना असे अचानक बघून वदंना आश्चर्य चकित झाली. तिला काहीच सुचेना की काय बोलू काय नको.

सर्व जण आत आले सर्वांना प्यायला पाणी आणून देऊन वदंना चहा करायला किचनमध्ये गेली. बाहेर सर्व जण हळूहळू आपसात काही तरी बोलत होते. सर्वांचा चहा झाला तोच दारावर टकटक झाली.सुजाताने दार उघडले.

” या वे यावे सरकार आपलीच कमी भासते आहे.” सुजाता ने हसतहसत स्वागत केले.

वदंनाने कोण असेल असे कौतुहलाने पाहिले तर समोर स्वप्निल.त्याला पाहून ती गालातल्या गालात मंद हसली.

” वदंना ये पोरी बस इथे.” असे म्हणत सासुबाईंनी तिला आपल्या जवळ बसवले.

” हे बघ आजपर्यंत तू माझी सेवा मनोभावे केली. मनोज गेला तेव्हा पासून माझी अवस्था अशी झाली मी चिडचिड करते तुला टोमणे मारले पण तू सर्व हसत हसत सहन केले. पोरी तुझे उभे आयुष्य तू माझ्या साठी वाहत आली आहे पण आता नाही. मी तुझ्या आयुष्याची अशी राखरांगोळी झाली हे बघणार नाही तुझ्या आयुष्यात आता पालवी फुटणार आहे. तुझे आयुष्य जगायचे दिवस सुरू होणार आहेत. आज मी तुझा हात स्वप्निलच्या हातात देत आहे. स्वप्निल माझी मुलगी आजपासून तुझी झाली आहे. तिचा नीट सांभाळ कर. खूप गुणी मुलगी आहे रे. हळवी तर खूपच.” असे म्हणत सासुबाईंनी डोळ्याला पदर लावून आपले पाणावलेले डोळे पुसले.

वदंना हे ऐकून एकदम बावरली आणि म्हणाली,” आई काय बोलता हे. मी माझे लग्न स्वप्निल…!!!! काही नाही करणार मी लग्न. मी तुम्हाला नको झाले आहे की? माझ्या कडून काही चुकले का? का मला घरातून बाहेर काढता? नाही हे होणार नाही. मी तुम्हाला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही.” वदंना असे म्हणत रडायला लागली.

” वंदू आपण आईंना आपल्या बरोबर परदेशात न्यायचे आहे.तू काळजी करू नकोस. आजपासून मी यांचा मनु. हो न आई.” स्वप्निल म्हणाला.

” हो वंदू तू काही काळजी करू नकोस. तुला माहित आहे का तुझ्यावर प्रेम करणारा स्वप्निल पण हे कधीही त्याने बोलून दाखवले नाही. तू पण नकळत याच्यावर प्रेम करत होती पण बोलू शकली नाही. पण खऱ्या प्रेमाची कळी उमलत होती आणि तीही वेळ आली तेव्हाच उमलली ‌. तुमचे अबोल प्रेम हे तुम्ही कोणाला कळू दिले नाही पण तो वर बसलेला आहे न त्याने तुमच्या प्रेमाची हाक ऐकलीच आणि तुम्हा दोघांना एकत्र आणलेच.” सुजाता म्हणाली.

वदंनाने भरलेल्या डोळ्यांनी स्वप्निल ला पाहिले स्वप्निल ने वदंनाच्या डोळ्यात आपल्याविषयी असलेले भरभरून वाहणाऱ्या प्रेमाचे बंध रेशमाचे पाहिले तोच बाहेर रिमझिम पाऊस पडू लागला. या श्रावणात घन निळा बरसला होता.

समाप्त
©® परवीन कौसर
बेंगलोर

==========================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/sharvant-ghan-nila-barsala-part-3/

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: