Skip to content Skip to sidebar Skip to footer

श्रावणात घन निळा बरसला (भाग -३)

काहीशी घाबरत घाबरत वदंना ने एक हलकीशी स्माईल देत स्वप्निल कडे पाहीले.

” अरे व्वा म्हणजे तुला हसता पण येतं म्हणायचे. बघं तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य किती सुंदर दिसते. मग आजपासून ते घाबरून चेहऱ्यावर वेगळेच भाव आणने हे बंद. समोरचा माणूस किती ही काही ही बोलू दे ओरडू दे झिडकारू दे. टेंशन लेनेका नहीं. फक्त एक हलकीशी स्माईल बस सगळे प्रश्न सुटणार.” असे म्हणत स्वप्निल ने टाळी साठी हात पुढे केला. सुजाता ने त्याच्या हातावर हात ठेवून या दोघांच्या हातांवर वदंनाचा हात ठेवला.

आता या तिघांची केमेस्ट्री जमली होती. वदंनाने पण कॉलेज मध्ये पहिल्या सारखे घाबरायचे सोडून दिले होते. ती या दोघांबरोबर खुप रुळली होती. कॉलेजच्या ब्रेक मध्ये ही तिघे कॅटिंनमध्ये जाऊन गप्पा मारत बसायची. गप्पा मारत मारत अभ्यासाबद्दृल चर्चा पण करायचे. बघता बघता परीक्षेचे दिवस आले. स्वप्निल बारावीला असलेमुळे त्याची परीक्षा नंतर होणार होती. आधी अकरावीची होती. स्वप्निल आपल्या अभ्यासाबरोबर या दोघींना त्यांच्या अभ्यासात मदत करायचा. या दोघींची परीक्षा झाली. आता स्वप्निलची परीक्षा होती. या दोघींना सुट्टी मिळाली होती.

स्वप्निल आपल्या परीक्षेच्या तयारीत होता.इकडे या दोघी मैत्रिणींनी सुट्टी मध्ये बारावीसाठी कोचिंग क्लासेस जॉईन केले होते. त्यादिवशी या दोघी क्लासला निघाल्या होत्या तोच त्यांना रस्त्याच्या कडेला एका वृध्द महिलेला काही तरी देत उभारलेला स्वप्निल दिसला.

” सुजाता स्वप्निलच आहे का ग तो?” तरीदेखील शंकेने वदंनाने विचारले.

‘ हो ग बहुतेक तोच असावा…!!” सुजाता म्हणाली.

या दोघी बोलत होत्या तोच त्यांना,” श्शी याला तर सगळ्यांना मदत करायची सवयच आहे. कोण ती किती घाणेरडी भिकारीण आहे तिचा हात धरुन रस्ता ओलांडून देऊन तिला आणखीन काय देत आहे देव जाणे. म्हणून मम्मा मी याच्याबरोबर बाहेर जात नाही बघं. …!!!”

” अगं असं म्हणू नये रजनी बेटा. बघ किती चांगले काम करत आहे तुझा भाऊ. अशा दिन दुबळ्यांची सेवा करावी गं.”

” हं…!!! म्हणे सेवा…!!! बोलाव त्याला. जाऊ लवकर वेळ होत आहे. क्लास सुरू झाले असेल. वेळ झाला तर क्लास मिस होईल.”

या संवादाने या दोघींनी मागे वळून पाहिले तर एका मोठ्या आलिशान कारमध्ये रजनी आपल्या आईबरोबर बोलत असलेली दिसली. या दोघींनी रजनीचे बोलणे ऐकून तिथून लवकर निघून जाणेच योग्य समजले.

” अरे सुजाता हे दोघे सख्खे भाऊ बहिण आहेत पण स्वभाव किती वेगळे गं दोघांचे.” वदंना म्हणाली.

” हो न. ” सुजाता म्हणाली.

या दिवसापासून वदंनाच्या मनात स्वप्निल बद्दल अजून एक वेगळीच अबोल भावना जागृत झाली होती.

आजकाल वदंना आपल्या राहणीमानात बदल करत होती. रोज वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल करत होती. काही वेळ आरशासमोर उभे राहून स्वतः ला निहारत होती. तिला आपण काही वेगळे दिसत आहोत असे वाटत होते. कधी कधी ती आपल्या बरोबरच काही तरी बोलायची आणि ‘वेडाबाई मी’ असे मनात म्हणत हसायची.

इतक्यात

” झाली का पूर्ण वामकुक्षी बाईसाहेबांची. आता जरा मिळेल न एक घोट चहा या म्हातारीला.” या आवाजाने वदंना भानावर आली. आणि तिने पटकन खिडकी बंद केली.

” हो हो उठले आताच आई. आणते हो चहा दोनच मिनिटात.” असे म्हणत आपल्या खोलीतून किचनमध्ये गेली.

सासुबाईंना गरमागरम चहा देऊन वदंना रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. तिने भाजी घेण्यासाठी फ्रिज उघडला. समोर निवडून ठेवलेली अंबाड्याची भाजी घेतली. भाजीला लागणाऱ्या शेंगदाणे ती आता थोडे बारीक कुट करून घालत होती कारण सासुबाईंना शेंगदाणे चावायला अवघड होत होते म्हणून. तिने भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि गॅसवर मोठी कढई ठेवून भाजी फोडणीला देऊ लागली.

तशी तिला तिच्या डब्यातील भाजी बघून स्वप्निल ने म्हटलेले आठवले,” अरे व्वा आज अंबाड्याची भाजी. मला खूऽऽऽप्प आवडते. मी जेव्हा आजोळी जातो न तिथे मामी नेहमी बनवते माझ्यासाठी.”

” हो का. अरे तशी मला आवडत नाही ही भाजी पण दुसरा पर्याय नव्हता म्हणून आणली.” वदंना म्हणाली.

” वंदू तू हे खा. मम्मा ने सॅन्डविच बनवले आहे. सुजाता हे तुम्हाला दोघींना खास करून आणले आहे मी.” असे म्हणत स्वप्निल ने आपल्या बॅगेतून डबा बाहेर काढून ठेवला.

तिघेजण गप्पा मारत हसत हसत आपापले डबे खात होते. काही विनोद‌ तर काही वेगळीच चर्चा रंगली होती. एका विनोदावर हसता हसता वदंना ने एकदम स्वप्निल कडे पाहीले. हवेच्या झुळूकामध्ये त्याचे केस भुरभुरत होते. त्याने घातलेला काळ्या रंगाचा टि शर्ट त्याला उठून दिसत होता. तसा तो दिसायला खुपचं छान होता. अगदी रुबाबदार हॅंडसम हिरो सारखा होता.कोणतीही मुलगी त्याला बघताच क्षणी घायाळ होईल असे त्याचे रुप होते. कोणताही रंग त्याच्यावर खुलून दिसत होता.

” ये अशी काय बघतेस?” सुजाता ने वदंनाच्या खांद्यावर हात ठेवून विचारले.

” काही नाही गं…!!” वदंना थोडीशी लाजतच म्हणाली.

” खरंच न काही नाही.” सुजाता ने हळूच तिला चिमटा काढला.

” आई गऽऽऽ”

” काय ग ? काय झाले ? चटका लावून घेतला का ? किती वेळा तुला सांगते गडबड करत जाऊ नकोस पण तुझे आपली असतेच गडबड.थांब आले मलम घेऊन.” सासूबाईंनी वदंनाच्या आवाजावरून म्हटले.

” नाही नको आई. चटका नाही लागला.ते हे असंच..!!” वदंना बोलता बोलता थांबली.

रात्री जेवण झाल्यावर वदंना आपल्या सासुचा बिछाना लावता लावता म्हणाली ,” आई तुम्हाला सांगायचेच विसरले बघा. माझा मित्र स्वप्निल मुंबईत येतोय. तो आपल्याला भेटायला येणार आहे.त्याचा फोन आला होता.”

” कोण ग स्वप्निल?”

” अहो आई असे काय करता. आपल्याला कोल्हापूर मध्ये ती रजनी भेटली होती ती आठवतेय न. तिचा मोठा भाऊ. जो अमेरीकेत असतो तो.” वदंना म्हणाली.

” अच्छा तो होय. त्याचे फोटोच पाहिले आहेत मी. पण ती रजनी मात्र चांगलीच आठवणीत आहे माझ्या.” सासुबाई म्हणाल्या.

” हो न.” असे म्हणत वदंनाने सासुबाईंना त्यांची औषधे देत देत म्हणाली,” मी काय म्हणते आई त्याला जेवायलाच बोलावले तर. नाही म्हणजे तुम्हाला काय वाटते ?”

” हू….!!! बघ बाई आता तुझा मित्र मी काय बोलणार बापडी.” सासुच्या बोलण्याचा टोण वदंनाला समजला पण तरीही ती पुन्हा म्हणाली

” येऊ दे जेवायला तो. यानंतर पुन्हा कधी येणार भारतात काय माहित.”

” त्याची बायको मुले पण आली आहेत का ग ?” सासूने विचारले.

” नाही आई मला हे माहीत नाही. मी उद्या फोन करून विचारते त्याला.” वदंना म्हणाली.

” बरं ठिक आहे. आणि हो घरात काय आहे काय नाही हे बघून आधी उद्या सगळे सामान घेऊन ये. उगीच ऐनवेळी पळापळ नको.” सासूबाई म्हणाल्या.

” हो आई.” असे म्हणत वदंनाने सासुबाईंच्या अंगावर रजाई टाकली खोलीची लाईट बंद केले आणि आपल्या खोलीत गेली.

खोलीत आल्यानंतर समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलच्या आरशात स्वतःला पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरील तेज आता काहीसे नाहीसे झाले होते. तिचा नेहमी असलेला टवटवीत चेहरा कोमजलेला वाटत होता. तिचे टपोरे डोळे नकळतच काही तरी सांगत होते.इतक्यात बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला. पावसाच्या आवाजाने वदंनाने आपल्या खोलीतील खिडकी उघडली आणि बाहेर पडणाऱ्या पावसाच्या बरसणाऱ्या धारा मध्ये भिजलेल्या मातीचा सुगंध घेऊ लागली.पावसाच्या बरसणाऱ्या सरी तिला तिच्या भूतकाळात घेऊन गेल्या.

बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. रविवार असल्यामुळे क्लासला सुट्टी होती. त्यात दोन दिवसांत बारावीचा निकाल जाहीर होणार होता. स्वप्निलला चांगले मार्क्स मिळू दे त्याची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे असे मनात म्हणत वंदना खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या धारांनी चिंब झालेली झाडे बघत होती.

” वंदू आज काय निवांत बसली आहेस. अभ्यास झाला का पूर्ण?” आईने विचारले.

” हो आई.” वदंना म्हणाली.

” हे बघ पुढच्या आठवड्यात मी आजीकडे जाणार आहे. येणार का तू ?” आईने विचारले

” छे गं…!!! आता तर आमच्या क्लासमध्ये टेस्ट घेणार आहेत. मी नाही येऊ शकत.सुट्टीत जाईन. तू जाऊन ये.” वदंना म्हणाली.

” हो ग तुझे बाबा तेच म्हणाले की वदंनाला नको नेऊ. पण मलाच वाटले एकदा विचारावे तुला.बर चहा घेणार का?” आईने वदंनाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले.

” नको आई तू बस मीच करते चहा.” असे म्हणत वदंनाने सर्वांसाठी चहा केला.

” काहीही म्हणा वदंनाच्या हातचा चहा म्हणजे झकास.” वदंनाचा भाऊ म्हणाला.

” आहाहा उगाच मला हरबऱ्याच्या झाडावर चढवू नकोस.आता आई जाणार आहे आजीकडे तेव्हा मीच आहे किचनची इन्चार्ज समजले बेटू.” वदंनाने हसत हसत म्हटले.

” बापरे….!!! आई का ग आम्हाला ही शिक्षा देतेस.” वदंनाचा भाऊ म्हणाला.

” ये काय रे असा बोलतोस. तिच्या हाताला किती चव आहे. सुगरण आहे लेक माझी. ज्या घरी जाईल त्यांच्या हृदयावर राज्य करणारी होईल वंदू बघच तू.” ‌आई म्हणाली.

” हो हो हृदयावर राज्य म्हणे आणि पोट बिघडतील त्याचे काय.” भाऊ चिडवत चिडवत म्हणू लागला.

” आई काय ग हा सारखा मला असा चिडवतो.” वदंना रडकुंडीला येऊन म्हणाली.

” आता मात्र माझा मार खाशील हो तू. लेकीला काही बोललास तर. आता असा चिडवतो मग गेली ही तिच्या घरी तर तूच तिची आठवण करून रडत बसशील.” आई म्हणाली.

माहेरात माझ्या गोकुळ नांदते.
असे माझे माहेर सुरेख ग.असे काहीसे गुणगुणत वदंना ने खिडकी बंद केली आणि आपल्या पलंगावर जाऊन आपली पाठ टेकली.

क्रमशः
©® परवीन कौसर
बेंगलोर

===================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/sharvant-ghan-nila-barsala-part-2/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/sharvant-ghan-nila-barsala-part-4/

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: