Skip to content Skip to sidebar Skip to footer

श्रावणात घन निळा बरसला – (भाग १)

श्रावणातील घन निळा बरसत होता.हातामध्ये गरमागरम चहाचा कप घेऊन वंदना किचनमधील खिडकीतून बाहेर बघत होती. तिला आवडणारा पाऊस त्यामध्ये मनसोक्त भिजून घ्यावं आणि सारे काही विसरून जायचं असेच तिला वाटत होते. नकळतच तिचे पाय बाल्कनीत जाऊ लागले तोच…!!!

” वंदना….!!! अगं ये वंदना…!!! केव्हाची मी उठून बसली आहे. चहा आजच मिळणार आहे का मला की …..!!!!” या आवाजाने वंदना चे बाल्कनीजवळ जाणारे पाय जिथल्या तिथे थांबून गेले.

” हो…!!!! हो आई…!!! आणते हो…!!!” असे म्हणत वदंनाने एका कपात चहा त्याचबरोबर एका प्लेटमध्ये मारीची बिस्किटे घेऊन बेडरूममध्ये गेली.

” आई चहा “

” ह़…!!! नशीब गं माझं. मिळाला चहा वेळेवर. ते ही मीच ओरडून सांगितले म्हणून. नाही तर बसले असते अशीच टाळ कुटत.” जरा ठसक्यातच सासूबाईंनी वंदनाला म्हटले.

वंदनाला हे काही नवीन नव्हते. रोजचेच होते त्यामुळे तिने या बोलण्यावर काही न बोलता सासूबाईंच्या रजाईची घडी करु लागली.रजाईची घडी करून कपाटात ठेवणार तोच तिला तिचा फोन वाजत आहे याचा आवाज आला. ती रजाई लवकर लवकर कपाटात ठेवू लागली.

” येऊ दे हो फोन…!!! काही गरज नाही गडबडीने घडी करुन कपाटात ठेवायची. नीट घडी करून ठेव. फोन काय मेला दिवसभर वाजतच असतो तुझा.” सासूबाई बिस्कीट चहात बुडवत म्हणाल्या.

यावर काही न बोलता वंदना ने सासूबाईंनी चहा संपेपर्यंत त्यांचे कपडे आंघोळ करून घालायचे बाहेर काढून ठेवले.

” आई मी पाणी काढते. या तुम्ही आंघोळीला.” असे म्हणत वंदना चहाचा मोकळा कप घेऊन किचनमध्ये गेली.

सासूबाईंची आंघोळ मग त्यांची वेणी फणी करून त्यांना नाश्ता देऊन त्यांचे औषध दिले मग वंदनाने आपली राहिलेली कामे पूर्ण केली.या गडबडीत तिला आपल्याला फोन कोणाचा आला होता हे ही लक्षात राहीले नाही.

दुपारी वामकुक्षी घेण्यासाठी ती आपल्या खोलीत गेली आणि तेव्हा तिचे लक्ष तिच्या फोन कडे गेले आणि तिला आठवले की आपल्याला कोणाचा तरी फोन आला होता. तिने आपला फोन हातात घेऊन पाहिले तर अननोन नंबर ने चार मिस कॉल होते. कोणाचा असेल नंबर हा करुन बघते असे मनात म्हणत तिने त्या नंबरवर फोन केला. खूप वेळ रिंग जात होती पण फोन कोणी उचलला नाही.

‘ छे…!!! कोणी उचलत ही नाही फोन. जाऊ दे थोडी विश्रांती घेते.’ असे मनात म्हणत ती आपल्या बेडवर आडवी झाली तोच पुन्हा फोन वाजला.

‘ ओह….!!! हाच नंबर.’ असे मनात म्हणत तिने फोन उचलला.

” हॅलो…!!!”

” हाय वंदू…!!! कशी आहेस..!!! मजेत न.”

” हो…!!! पण कोण बोलतोय?” फोनवर एका पुरुषाचा आवाज आणि तेही एकेरी बोलत आहे हे ऐकून काहीशी घाबरत वंदना ने विचारले.

तिकडून जोरात हास्याचा गडगडाट.

” कोण बोलतोय हे तर सांगा?” आता तर वंदनाला घाबरून घाम फुटला होता.

” अगं असं काय विसरलीस का तू मला? मी स्वप्निल.”

” स्वप्निल….!!! तू ? तुला…!!! माझा नंबर कसा मिळाला तुला? कुठे आहेस तू ? भारतात आला आहेस का?” वदंनाने एका पाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार केला.

” अगं हो हो…!!! सवय गेली नाही वाटत अजून तुझी प्रश्न करायची. मी एक महिना झाला आहे भारतात येऊन. कोल्हापूरमध्ये होतो. तिथे आपल्या कॉलेजच्या कट्ट्यावरच्या मित्र मैत्रीणी भेटल्या होत्या. तेव्हा सुजाताने तुझा नंबर दिला मला. आज सकाळीच आलो आहे मुंबईला मग आल्या आल्या तुला फोन केला. म्हटलं असेल तर मुंबईत भेटून जाऊ. कारण पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाऊन तिथूनच परत जाणार आहे मी.” स्वप्निल म्हणाला.

” हो ये ना घरी. मी घरीच असते.तुला पत्ता देते घरचा. कधीही ये. मोस्ट वेलकम.” वंदना म्हणाली.

वदंनाने फोन ठेवला. तशी ती उठून उभी राहिली. हळूहळू तीआपल्या खोलीच्या खिडकीपाशी गेली आणि ती बंद असलेली खिडकी उघडली. बाहेर रिमझिम पाऊस पडतच होता. त्याचे तुषार वदंनाच्या शरीरावर उडत होते. मध्येच एक थंड हवेची झुळूक आली तशी त्या हवेच्या झुळूकामध्ये अचानक वंदना चे मन तिच्या भूतकाळात गेले.

वंदना कोल्हापूर मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली दिसायला सुंदर तशीच अभ्यासात हुशार असलेली दोन भावांच्या पाठीवर झालेली मुलगी. लाडात वाढलेली पण आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारी अशी वदंना. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरातील नामवंत कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.दहावीमध्ये चांगले गुण असलेमुळे या कॉलेजमध्ये तिला लगेचच प्रवेश मिळाला.तिच्या बरोबर तिच्या काही वर्ग मैत्रीणींनी देखील त्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

शाळेचे आणि कॉलेजचे वातावरण वेगळे असते हे तिला ऐकून माहित होते.शाळेमध्ये सर्वांचा गणवेश त्याचबरोबर मुलींनी दोन वेण्या घालून जायचे. घरात आजी आजोबांच्या संस्कार संस्कृती कला जपून रहाणारी वंदनाला तसे पाहिले तर दुनियादारी माहितच नव्हती. एकमार्गी शांत संयमी स्वभावाची वंदना कॉलेज मध्ये पहिल्या दिवशी जायला थोडीशी घाबरली होती.

सकाळी लवकर उठून नेहमी प्रमाणे दोन वेण्या घालून फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घालून ती कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली. तिच्या बरोबर तिच्या दोन मैत्रीणी पण सोबतीला होत्या. या तिघी कॉलेजच्या आवारात आल्या. तोच अचानक रिमझिम पाऊस पडू लागला. तसा वदंना ला पाऊस खूप आवडायचा ती पावसात मनसोक्त भिजायची पण आज मात्र ती या पावसात बावरून गेली होती.तिला पावसात चिंब भिजावे का हा प्रश्न मनास सतावत होता.

पण भिजत उभा रहायचे तेही कॉलेजच्या आवारात हे तिच्या मनाला पटले नाही म्हणून ती आपल्या मैत्रिणींबरोबर तिथून पटपट पाय उचलत आपल्या वर्गात जाऊ लागली तोच एकदमच जोरात धावत येत एक मुलगा वदंनाला धाडकन येऊन धडकला तशी काही कळायच्या आत वदंना धाडकन जमिनीवर कोसळली तिच्या वर तो मुलगा पण पटकन आदळून तिच्या बाजूला पडला.

हे असे एकदम अचानक झाले कोणालाच काही कळेना की सुचेना. जो तो आ वासून उभे राहून बघू लागले. तोच

” अरे असे बघत काय उभारला आहात हात द्या की भावांनो. खाली पडलोय ते दिसत नाही का.” असे त्या पडलेल्या मुलानेच म्हटले.

तेव्हा कुठे तिथे उभारलेल्या मुला मुलींनी या दोघांना हात धरून उचलले.

” ओ सॉरी मिस. ते काय झाले मला जरा अशी गडबडच असते नेहमीच. म्हणजे येतो वेळाने कॉलेज ला आणि अटेंडेंस चुकेल या भीतीने धावत जातो क्लासमध्ये. यात आज हा पाऊस अचानक आला मग मी जास्तच घाबरलो न. आणि झाले तुला धडकलो.‌सॉरी हा. बरं मी स्वप्निल. बारावीला आहे.” आपले कपडे झटकत झटकत तो म्हणू लागला.

वदंना आधीच घाबरलेली होती त्यात हे असे झाले यामध्ये ती आणखीनच घाबरून गेली आणि काही न बोलता आपल्या क्लासमध्ये गेली.

क्रमशः
©® परवीन कौसर

===================

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/sharvant-ghan-nila-barsala-part-2/

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: