शादी के लड्डू

©®सौ मधुर कुलकर्णी
रात्रीचे पावणे नऊ वाजले होते.जेवणं झालीच होती.विद्याने ओटा आवरायला घेतला.नऊ वाजता बरोबर हर्षदचा फोन येईल.दर शनिवारी त्याचा फोन यायचा.यु एसला दोन वर्ष कंपनीच्या प्रोजेक्टसाठी गेला होता.तिकडे जाऊन सहा महिने होऊन गेले होते.व्हाट्स अपच्या व्हीडिओ कॉल मुळे फारच सोयीचं झालं होतं.
“विद्या,आज हर्षुच्या मागे लागू नकोस हं,लग्न कर म्हणून.जरा मोकळं राहू दे त्याला दोन तीन वर्ष.लग्न केलं की अडकला तो.मग आहेच ग आयुष्यभर ती जबाबदारी.”इंदिराताई टेबल पुसत म्हणाल्या.
“आई,हे बरंय हं तुमचं.अहो मी तुमच्या घरात सून म्हणून आले तेव्हा बावीस वर्षांची होती आणि तुमचा मुलगा,पंचवीस वर्षांचा होता.तुम्ही लवकर सून आणली हाताशी आणि मला थांब म्हणताय. अहो,सत्तावीस पूर्ण होतील त्याला पुढच्या महिन्यात.”
विद्या हसत म्हणाली.
“तुझं बरोबर आहे विद्या.पण आता काळ बदललाय. मुलांची मतं बदलली.त्यांच्यावर सक्ती करून उपयोग नाही.आम्हाला आमच्या आईवडिलांनी विचारलं पण नाही.तुझा फोटो दाखवला,आवडली असेल तर पुढचं ठरवू असं म्हणून मोकळे.”अरुणने विद्याची चेष्टा केली.
“काय वाईट झालं हो तुमचं?सकाळ संध्याकाळ सगळं आयतं मिळतंय.तुमच्यावर कसली जबाबदारी?उलट माझीच वाढली.” विद्या फणकाऱ्याने बोलली.
“हे मात्र विद्याचं शंभर टक्के खरंय अरुण.विद्या आली आणि घराची शोभा वाढली.लाखात एक सून आहे माझी.”इंदिराताई म्हणाल्या.
इतक्यात हर्षदचा कॉल आलाच.
“हाय ममा, पपा,कसे आहात?अँड माय स्वीट ग्रॅनी.”
“आम्ही सगळे मजेत हर्षु.कसं चाललंय प्रोजेक्ट?”अरूणने विचारले.
“फँटास्टिक पपा. मजा येतेय काम करायला.”
“अरे,खाण्यापिण्याचे हाल होत असतील,एकटा किती दिवस राहणार.”विद्याने विषयाला सुरवात केलीच.
“ममा, मला माहितीय तुला काय म्हणायचं आहे.पण आज सांगतोच,मला लग्नच करायचं नाहीय.इट्स सो बोरिंग ग.सगळी बंधनं. नकोच ते.मी एकटाच छान मजेत आहे.हल्ली मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत.मी पूर्ण करू शकेन का माहिती नाही.त्यापेक्षा नकोच ती जबाबदारी.”
“तुझ्या डोक्यात ते लिव्ह इन चं खुळ तर नाही न रे बाबा?”विद्या धास्तावलीच.
“ओह ममा,कुठून कुठे जातेस ग.रिलॅक्स,तसं काहीही मी करणार नाहीय.आणि तु आता लग्नाचा विषय काढला तर मी फोन करणार नाही.”
“हर्षु,असं नको करू रे बाबा.तुझ्या फोनची आम्ही वाट बघत असतो.नको करुस तु लग्न.”इंदिराताई म्हणाल्या.
“आजी,लव्ह यु.बाय,टेक केअर.दोन दिवसांनी करतो परत फोन.”हर्षद हसत म्हणाला.
“हर्षदशी आता लग्नाविषयी चकार शब्द बोलणार नाही.राहू दे तसाच.म्हातारपणी कळेल मग,एकटेपणा काय असतो ते.”विद्या चरफडत तिथून निघून गेली.
——————————————————————-
मंडईतून भाजी घेऊन विद्या बाहेर आली.आठवड्याची भाजी घेतल्यामुळे पिशव्या चांगल्याच जड झाल्या होत्या.स्कुटर पार्क केली त्या दिशेने ती जाऊ लागली.इतक्यात मागून तिला “काकू काकू” अशी हाक ऐकू आली.विद्याने वळून बघितलं.
एक उंच,गोरीपान,गोड मुलगी तिच्या दिशेने येत होती.
“काकू,मला ओळखलं का?”
विद्या संकोचून म्हणाली, “सॉरी ग,पण खरंच नाही ओळखलं.”
“काकू,इट्स ओके. मी केतकी प्रधान, हर्षदची बारावीची क्लासमेट.हर्षद बारावीत कॉलेजमधे फर्स्ट होता म्हणून तुम्ही घरी छोटीशी पार्टी दिली होती,तेव्हा मी तुमच्या घरी आले होते.नंतर मी नागपूरला इंजिनीरिंगला ऍडमिशन घेतली.आता इथेच पुण्यात हिंजवडीत एका आय टी कंपनीत जॉब करतेय.कॉलेजच्या व्हाट्स अप गृपवर चॅटिंग होतं हर्षदशी.सध्या यु एसला आहे न?”
“हो,प्रोजेक्टसाठी गेलाय.ये न तु घरी.माझा मोबाईल नंबर सेव्ह करून घे.” विद्या बॅग डिकीत ठेवत म्हणाली.
“नक्की येईन काकू,बाय.”केतकी गोड हसून म्हणाली.
कुठलीही तरुण मुलगी दिसली की ही हर्षदला शोभून दिसेल का,हेच विचार विद्याच्या डोक्यात सतत येत.केतकी तर फारच गोड होती.पण उपयोग काय?चिरंजीव बोहल्यावर चढायलाच तयार नाहीत.
——————————————————————-
हर्षदचा फोन आल्यावर विद्याने त्याला सांगितलं,
“हर्षु,तुझी बारावीची क्लासमेट केतकी प्रधान भेटली मला.मी काही तिला ओळखलं नाही.तीच माझ्याशी येऊन बोलली.”
“हो,गृप वर चॅटिंग होतं आमचं.नाईस गर्ल.हुशार आहे.पर्सनल वर पण बोलली माझ्याशी एकदोनदा.कॉलेजच्या सगळ्या आठवणी निघाल्या.”
चला म्हणजे कुठल्यातरी मुलीला नाईस गर्ल म्हणण्याइतकी प्रगती तरी झाली होती.आत्ता जास्त प्रश्न विचारले तर हर्षद वैतागेल म्हणून विद्याने विषय संपवला.जनरल गप्पा मारून तिने फोन बंद केला.पण नाईस गर्ल मात्र डोक्यात बसलं.
साधारण महिन्यानंतर केतकीचा फोन आला.
“हाय काकू,कशा आहात?”
“मी मजेत,कसा काय फोन केलास ग?” विद्याने विचारलं.
“काकू,हर्षदची आणि माझी छान गट्टी जमलीय. आम्ही व्हाट्स अप वर खूप गप्पा करतो.आमच्या दोघांचे इंटरेस्ट,आवडीनिवडी खूप सारख्या आहेत.गम्मत म्हणजे आम्ही कॉलेजमधे एकमेकांशी फारसं बोलत नव्हतो.पण आता छान ट्युनिंग जमलंय.”
“अरे वा, खूपच छान.अशीच मैत्री राहू दे.बरं तु घरी कधी येते आहेस?”
“पुढच्या आठवड्यात नक्की येईन.मला घर माहितीच आहे. “
“नक्की ये.वाट बघतेय.”विद्याने फोन बंद केला.
दोघांच्या आवडीनिवडी जुळताहेत,एकमेकांना चांगले ओळखतात,आणि केतकी सारखी सून मिळाली तर सोन्याहून पिवळं.विद्याच्या डोक्यात आता केतकीचेच विचार सुरू झाले.तिने व्हाट्स अप वर हर्षदला मेसेज टाकला.
— हर्षद,केतकीचा फोन आला होता. तुम्हा दोघांचं छान ट्युनिंग जमलंय असं म्हणली.मला आवडेल हं,केतकी सून म्हणून.
–ममा,इनफ.वी आर जस्ट फ्रेंड्स. मला लग्न करायचं नाही हे मी तुला सांगितलं आहे.ती माझी चांगली मैत्रीण आहे.एकच ब्रँच असल्यामुळे आम्ही कामाबद्दल पण बोलतो.
–सहज विचारलं रे,रागावू नकोस.
–बाय ममा.
लग्नाचा विषय काढला की ह्या मुलाचा असहकार.विद्याची काळजी आता जास्तच वाढली.एकटं आयुष्य काढणं इतकं सोपं आहे का?कितीही वादविवाद,मतभेद झाले तरी आयुष्यभर साथ देणारा पार्टनर हवाच.जसं वय वाढतं तसं कळतं की आपलं हक्काचं माणूस हवंच.
एक दिवस केतकी फोन करून घरी आली.विद्याने तिची इंदिराताईंशी ओळख करून दिली.
“आई, ही हर्षदची कॉलेजमधली मैत्रीण.हिंजवडीला जॉब करते.”
“छानच की.हर्षदशी बोलणं होतं का तुझं?”
“हो आजी,आम्ही छान फ्रेंड्स झालोय.”
“येत जा ग अधूनमधून.हर्षद तिकडे गेल्यापासून घर सुनंसुनं झालंय.”इंदिराताई म्हणाल्या.
“केतकी,ये न,तुला घर दाखवते.”विद्याने तिला मुद्दामच गॅलरीत नेलं.
“केतकी,तु हर्षदची आता जवळची मैत्रीण झाली आहेस.जरा त्याच्या मनात नक्की काय आहे हे विचार ग.लग्नच करायचं नाही म्हणतोय.परदेशात जाऊन बसलाय.माझ्या मनात नको नको ते विचार येतात ग.हल्ली तुमच्या पिढीच्या तर नको त्या गोष्टी कानावर येत असतात.”
“तुम्हाला कुठली मुलगी आवडलीय का?”केतकीने विचारलं.
“छे ग,लग्नच करायचं नाही म्हणतोय मग मुली बघायचा प्रश्न येतोच कुठे?”
“काकू,कशी सून हवीय तुम्हाला?”
“शिकलेली,आकर्षक, मनमोकळी असावी.अगदी तुझ्यासारखी.”
“मी चालेल तुम्हाला सून म्हणून?”केतकीने विचारलं आणि विद्या आ वासून तिच्याकडे बघतच बसली.
“म्हणजे तुमचं दोघांचं ठरलं की काय?”विद्याने आश्चर्याने विचारलं.
“नाही हो काकू.मला हर्षद आवडायला लागलाय.त्याची लाईफ पार्टनर व्हायला मला आवडेल.पण त्याला लग्नच करायचं नाही,हे मला देखील त्याने अनेकदा बोलून दाखवलंय.मी कसं विचारू त्याला?”
“असं आहे तर.मग त्याच्या मनातलं जाणून घ्यायला, मला एक प्लॅन करावा लागेल आणि तुला त्यात सामील व्हावं लागेल,मंजूर?”विद्याने विचारल्यावर केतकीने तिच्या हातावर टाळी देत म्हटलं,”मंजूर. “
दोघीही एकमेकींकडे बघत दिलखुलास हसल्या.
——————————————————————-
आता हर्षदचा फोन आला की विद्या लग्नाचा विषय अजिबात काढत नव्हती.एकदा सविस्तर बोलून झाल्यावर हर्षदने तिला विचारलं, “ममा,केतकी भेटली होती का ग तुला?”
“नाही रे,मागे एकदा घरी आली तेवढीच,नंतर आमचा काहीच संपर्क नाही.का रे,काय झालं?”
“काही नाही ग,जस्ट विचारलं.आठ दिवस झालेत,आमचं काही बोलणं नाहीय.माझ्या कुठल्याच मेसेजला ती रिप्लाय देत नाहीय.मला तिच्याशी चॅट करायला आवडतं. तिच्यात मॅच्युरिटी आहे.आणि आमची वेवलेंग्थ फार छान जुळलीय ग.”
“हं खरंय रे,जवळची मैत्रीण न तुझी.” विद्याला वाटलं,गाडी योग्य मार्गावर चाललीय.ती मनाशीच हसली. ” मी विचारते हं केतकीला फोन करून.पण तुझी दुसरी एखादी मैत्रीण असेलच न.तिच्याशी बोल.”
“माझं नाही जमत कुणाशी. त्यातल्या बऱ्याच जणींची लग्न झाली आहेत.” हर्षद म्हणाला.
“केतकीचेही कधीतरी होईलच न लग्न.कदाचित त्याच गडबडीत असेल ती.”
विद्याचं हे बोलणं ऐकून हर्षद गोरामोरा झाला.
“ममा बाय, नंतर बोलतो.” त्याने फोन बंद केला.
आपला प्लॅन सफल होतो की काय,विद्याला एकदम आशा वाटली.तिने केतकीला फोन लावला.
“केतकी,अग तो तुला खूप मिस करतोय.मला वाटतंय आपला प्लॅन सफल होणार.”विद्या खुशीत म्हणाली.
“काकू,पण तो नाहीच म्हणाला तर?” केतकीने शंका काढली.
“आता ती तयारी ठेव ग बाई. आपण रिस्क घेतलीय न.आणि काळजी करू नकोस.त्याच्या डोळ्यात मला आज मजनूचे भाव दिसले.” विद्या तिला चिडवत म्हणाली.
महिनाभर केतकीने काहीच रिस्पॉन्स दिला नाही तसा हर्षद अस्वस्थ झाला.त्याने विद्याला फोन लावला.
“हर्षु,आत्ता यावेळी फोन?अरे, तुझी सकाळ असली तरी आमची रात्र आहे.थांब जरा,पपा झोपले आहेत. मी किचन मधे जाऊन बोलते.”विद्या डोळे चोळत म्हणाली.
“ममा,केतकी काहीच रिस्पॉन्स देत नाहीय.मी डिस्टर्ब झालोय.आय थिंक,आय एम इन लव्ह विथ हर.”
“काय सांगतोस?” विद्या एकदम जोरात ओरडली.तिला लगेच जाणवलं आपण जास्तच रिऍक्ट झालोय.
“हो,मला आवडते केतकी.तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे.”
“ते सगळं ठीक आहे रे, पण तिच्या मनात काय आहे हे विचारायला हवं न.”
“ममा, प्लिज ते काम तु कर.मी लग्न करावं अशी तुझी इच्छा आहे न?”
“वा चिरंजीव,चांगला खडा टाकला की तुम्ही.ठीक आहे,विचारते तिला.”विद्या त्याची चेष्टा करत म्हणाली.
दुसऱ्या दिवशी विद्याने केतकीला फोन लावला,
“केतकी,अभिनंदन. तु माझी सून होणार ग.”
“काय झालं काकू?फोन आला होता का हर्षदचा?”
“अग, तुझ्या प्रेमात पडलाय.रात्री बारा वाजता मला उठवून हे सांगितलं त्याने.आता आपल्या प्लॅनचा शेवट आलाय.तो सफल होईलच,मग तुझ्या आईबाबांशी मी बोलते.” विद्या म्हणाली.
“ओके काकू.”केतकी खुश झाली.
दोन तीन दिवसांनी विद्याने केतकीला बोलावून घेतलं आणि हर्षदला व्हीडिओ कॉल लावला.
“हर्षु,माझं बोलणं झालं रे केतकीशी.तिने तिचा जीवनसाथी निवडलाय.”
“ओह,बॅडलक” हर्षद हताश झाला.
“तुला त्याचा फोटो बघायचा असेल तर आहे माझ्याजवळ. केतकीने पाठवलाय.”
“त्याचा फोटो बघून मी काय करणार.”हर्षद चिडून म्हणाला.
“बघ तरी कसा आहे ते.माझ्या दुसऱ्या मोबाईलमधे आहे. थांब दाखवते.” विद्या म्हणाली.
केतकीने फोनमधला हर्षदचा फोटो काढला आणि स्वतःचा चेहरा लपवत तो फोटो स्क्रिनवर दाखवला.
“ममा,तु चुकून माझा फोटो दाखवते आहेस. मी केतकीला आत्ताच पाठवला होता.तिची काहीच रिऍक्शन नव्हती.”
“आत्ता देते की मग.हाय हँडसम.”केतकी हसत म्हणाली.
“केतकी,तु?अच्छा म्हणजे तुमच्या दोघींचा हा प्लॅन होता तर.” हर्षद ओरडलाच.
“केतकीच तुझ्या प्रेमात पडली होती म्हणून मी हा प्लॅन केला आणि केतकीला त्यात सामील केलं.मग पपा आणि आजीला पण सांगितलं.आता केतकीच्या आईवडिलांशी पण बोलू न?” विद्याने विचारलं.
“हो ममा,मी तयार आहे.”हर्षदने हसत सम्मती दर्शवली.
“तुझं प्रेम ऑनलाइन जमलं.आता लग्नाची बोलणी पण मी ऑनलाईन करते.बेटा,ये शादी के लड्डू खाये तो भी पछताये,ना खाये तो भी पछताये.” विद्या दोघांना चिडवत हसली.
दुसऱ्याच दिवशी विद्याने केतकीच्या आईवडिलांना फोन लावला.”पलीकडून केतकीच्या आईचा आवाज आला,”बोला विहिणबाई,कधी ठरवायची लग्नाची तारीख?”
विद्या आश्चर्य, आनंदमिश्रित चेहऱ्याने म्हणाली,”तुम्ही म्हणाल तेव्हा विहिणबाई.”
दोघीही हसत हसत गप्पांमधे रमल्या…..
——समाप्त——
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
========================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/