Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘ती’ च्या संवेदना..!

प्रिय वाचकहो…संवेदना प्रत्येकाला असतातच..जन्माला आल्यापासून माणूस संवेदनशील असतोच,शास्त्रीय कारण द्यायचे झाल्यास संवेदना ह्या मेंदूपासून उत्सर्जित होत असतात…पूर्ण असे अक्राळ-विक्राळ जाळेच पसरलेले असते संपूर्ण शरीरात कारण संवेदना पूर्ण शरीरात पोचवण्याचे काम आपला मणका करत असतो त्या मणक्यांमध्ये स्पायनल कॉर्ड सुरक्षित असते म्हणून असंवेदनशील माणूस या पृथ्वीतलावर तरी सापडणार नाही आपल्याला…तरीही महिलांच्या बाबतीत संवेदनशील असण्याचं प्रमाण जास्त आहे…कारण बाई स्वतः संवेदनशील असतेच त्याचबरोबर दुसऱ्याच्याही संवेदनांचा बाई विचार करतेच करते…अशीच आपली कथा नायिका आहे जी स्वतःच्या संवेदना दुसऱ्यांपर्यंत पोचवण्याचा विचार करत असते…मित्रहो कथा आवडल्यास नक्की लाईक करा…त्याचबरोबर शेअर आणि कमेंट करायला विसरू नका…

सकाळी मस्त भूपाळी लावून मालिनी काकू देवघरात नामस्मरण करत बसलेल्या असतात…पल्लवीची स्वयंपाकघरात गडबड चाललेली असते…इतक्यात मालिनी ताई पल्लवीला मोठ्याने आवाज देतात…

मालिनी ताई  – पल्लवी…अगं नैवेद्य कधीचा आणायला सांगितलाय तुला…लक्ष म्हणून नसतं कामात…आता बहिरी झालीस कि काय…

पल्लवी  – आई…अहो मी ताम्हण घासत होते खूप खराब झालंय ते…म्हणून पाण्याच्या आवाजाने तुमची हाक ऐकू नाही आली…

मालिनी ताई  – अगं…ते नंतर करत बसायचं ना…पहिला नैवेद्य महत्त्वाचा आहे ना…मग प्राधान्य नैवेद्यालाच द्यायला पाहिजे ना…कशाला महत्व द्यावं तेच समजत नाही तुला…जा पटकन नैवेद्याचं ताट घेऊन ये…

पल्लवी  – आणते… असं म्हणून पल्लवी लगबगीनं नैवेद्याचं ताट आणायला गेली…देवपूजा झाल्यानंतर सासरे, सासूबाई आणि पल्लवी जेवायला बसले…मिलिंद सकाळीच ऑफिसला गेला होता…म्हणून मिलिंदला काय भाजी दिलीस याची चर्चा जेवता-जेवता रंगते…

मालिनीताई – काय गं…मिलिंदला भाजी कुठली दिलीस आज ?

पल्लवी  – शेवग्याची भाजी दिली…

मालिनीताई – गूळ घातलास कि नाही त्यात…?

पल्लवी   – हो घातला ना…हे काय…तुमच्या ताटातही वाढली आहे भाजी…[इतकयात सासरेबुवा म्हणतात]

रत्नकांतराव – वाह….अप्रतिम झालीय भाजी…माली…थोडी आणखी वाढ गं…

मालिनीताई – घ्या…पण गूळ घातलाय तिनं….थोडी प्रमाणात खाल्ली तर बरं होईल हा…नाही मधुमेह आहे तुम्हाला म्हणून म्हटलं….

रत्नकांतराव – घाला…बंधन घाला आमच्यावर…तुम्हीच खावा…

मालिनीताई – अहो तुमच्या चांगल्यासाठीच सांगतेय मी…जेवण करा…ते पण सावकाश करा…कुठे लढाईला जायचं नाहीय…

रत्नकांतराव – ह्म्म्म…तू नको सांगू मला…ते कळतं मला…

पल्लवीने आपलं जेवण आटोपलं…मग बाकीची कामही झटपट आवरली…दुपारच्या निवांत वेळेत आपली डायरी आणि पेन घेतलं आणि लिहू लागली…’ दिनांक १८ जून २०२०….पप्पा…आज काय झालं माहितीय…मी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात माझं काम करत होते तर…आई मला जवळ-जवळ ओरडुनच बोलल्या…की ऐकू येत नाही का….पप्पा मी तर माझं कामचं करत होते…पाण्याच्या आवाजामुळे मला ऐकू आलं नाही…आमच्या खोल्यामधूनही सहसा आवाज नीट ऐकू येत नाही…पप्पा मला ओरडण्याची एकही संधी त्या सोडत नाही…काय करू काही कळत नाही…पण मी काही प्रत्युत्तर दिलं नाही कारण त्यांना वाईट वाटेल…’  लिखाण अर्धवट राहीलं आणि पल्लवीचा डोळा लागला…पल्लवीने अलार्म लावून ठेवला होता म्हणून ४ वाजता चहा ठेवण्यासाठी उठली…सासूबाई अजूनही झोपेतच होत्या म्हणून चहा फक्त दूध न घालता उकळून तसाच ओट्यावर झाकून ठेवला…अर्ध्या तासाने चहा पिण्यासाठी सासूबाई उठल्या असं जेव्हा पल्लवीच्या लक्षात आलं तेव्हा पटकन कोऱ्या चहात दूध घालून परत उकळी काढली…मग सासूबाईंना पल्लवीने चहा नेऊन दिला…चहाचा कप पाहताच मालिनीताई ओरडून म्हणाल्या…

मालिनीताई – पल्लवी सहा महिने झालेत तुला इथे येऊन…चहामध्ये केवढं दूध घालायचं याचा अंदाज आलेला नाही का तुला अजून ? केवढा पांढरा केलास चहा…पिल्यासारखा तरी वाटतोय का…थांब मिलिंद येऊ देत त्यालाच हा चहा पिण्यासाठी देते…आणि खबरदार चहा टाकून दिलास तर…दुसरा चहा कर माझ्यासाठी…

पल्लवी हिरमुसली होऊन लगेच दुसरा चहा करण्यासाठी गेली…आपल्या सासूबाईंना पाहिजे तसा चहा पल्लवीने करून दिला… सासऱ्यांसाठीही बिनसाखरेचा चहा घेऊन गेली…चहापान झाल्यावर सगळी आवरा-आवर करून झाली…परत पल्लवी आपली डायरी आणि पेन घेऊन लिहीत बसली…चहाचा प्रसंग जसा आहे तसा डायरीत लिहून काढला…एक साम्य होत लिखाणात…पल्लवी शेवटी कायम लिहीत असे..मी सगळं ऐकून घेतलं…पण प्रत्युत्तर केलं नाही…कारण त्यांना राग आला असता ना…संध्याकाळी पल्लवीला स्वयंपाकाची तयारी करायची असते म्हणून पेन आणि डायरी बेडखाली लपवून ठेवते…मिलिंद ऑफिसवरून आल्याची चाहूल लागताच

पल्लवी चहाची तयारी करायला जाते…मालिनी ताई सगळं पाहत असतात इतक्यात खेकसून पल्लवीला म्हणतात-

मालिनीताई – तुला सांगितलं होत ना…मघासचा चहा दे म्हणून…जो मी पिला नव्हता…त्यात जास्त दूध होत म्हणून…

पल्लवी      – [डोळ्यातून आसव गाळत म्हणते ] आई…असं नका ना करू…मी त्यांना चांगला चहा करून देते..आधीच्या चहाला खूप वेळ होऊन गेलाय…असं म्हणतात जास्त वेळ झालेला चहा पिऊ नये कुणी त्याच विष होत…मला हवं तर उपाशी ठेवा आज…पण तो चहा यांना देण्याचं कृत्य मी करणार नाही…

मालिनीताई – ठीक आहे…पण आज तुला फक्त पाणी पिऊन झोपावं लागेल…अन्नाचा एकही कण तुला मिळणार नाही…

पल्लवी  – हो चालेन…

मिलिंद ऑफिसवरून येताच चहासाठी आधण ठेवते. तो फ्रेश होऊन येईपर्यंत चहा आणि बिस्कीट देते… त्यानंतर पल्लवी संध्याकाळचा सगळा स्वयंपाक करते…सगळ्यांना अगोदर जेवायला बसवते…मग नंतर स्वतः पाणी पिऊन झोपायला जाते…मिलिंद आपलं काम लॅपटॉपवर करत बसतो…मिलिंदला काही कळू नये म्हणून…स्वयंपाकघरात उगाच काहीतरी आवरत बसते…मग अर्ध्या तासाने आपल्या बेडमध्ये जाते तसं झोप आल्याचं नाटक करते…मिलिंदही मग काम करता-करता झोपी जातो…जेव्हा पल्लवीची खात्री पटते की मिलिंद झोपी गेलाय तशी ती…आपली डायरी आणि पेन घेऊन लिहिण्यासाठी तयार होते…सगळेजण झोपले आहे की नाही ते पाहते…देवघरात कुणी नाही म्हणून देवाच्या दिव्याच्या उजेडात डायरी लिहायला बसते…अगदी मिंलिंदच्या चहापासून ते…उपाशी झोपेपर्यंत सगळं जसंच्या तसं लिहून काढते…नेहमीप्रमाणे शेवटी लिहिते मी सगळं ऐकून घेतलं…पण प्रत्युत्तर केलं नाही…कारण त्यांना राग आला असता ना..अशा प्रकारे आपलं मन कागदावर मोकळं करून मग पल्लवी शांत झोपली…परत सकाळी लवकर उठून भूक लागली असल्याने….पल्लवीने पहाटेच शेंगदाणे-गूळ खाल्लं तसं…देवाची भांडी स्वछ घासून ठेवली…कणीक मळून घेतलं…भाजीसाठी काहीच नव्हतं…कारण रात्रीच्या झालेल्या प्रकारामुळे सासूबाईंना.. उद्या भाजी काय करायची हेच विचारायचं राहून गेलं..म्हणून मस्त पाटवड्या करायचा बेत पल्लवीने आखला….काही वेळाने सासूबाई उठताच स्वयंपाकघरातली निम्म्यापेक्षा जास्त काम उरकली होती…तरीही मालिनीताईंचा तोच चिडका आवाज पल्लवीला पुन्हा ऐकावा लागला…

मालिनीताई – पल्लवी…काय गं मला न विचारता भाजी करायला घेतलीस की काय ?

पल्लवी – आई…काल ना मला भानच राहील नाही विचारायचं…गडबडीत राहून गेलं..

मालिनीताई – कसं काय राहिलं…मला गृहीत न धरून काम करायला खूप आवडत ना तुला…

पल्लवी – नाही आई..तसं नाहीय काही…तुम्हाला सकाळी विचारणारच होते…पण तुम्ही गाढ झोपल्या होत्या… मी विचार केला की…कशाला उगाच झोपमोड झाली असती तुमची…

मालिनीताई – हे बघ…माझ्या मुलाचं तुझ्याशी लग्न झालंय…याचा अर्थ असा नाही की इथे प्रत्येक गोष्टीवर तुझं वर्चस्व असेल… तुझ्या हातात दिलंय सगळं असा जरी तुझा समज असला ना तरी हा तुझा गैरसमज आहे हे लक्षात ठेव…[मालिनीताई चढ्या आवाजात बोलत असल्याने..पल्लवीला रडू कोसळत]

पल्लवी काहीही न बोलता गुपचूप पोळ्या लाटून घेते… तोवर मालिनीताई अंघोळ आटोपून स्वयंपाकघरात येतात…पुन्हा तोच आवाज मालिनीताईंचा येतो…

मालिनीताई – अगं…मिलिंदला उठव…वाजलेत किती आणि भरल्या घरात रडत काय बसलीय…

पल्लवी – आई मी आलेच…[पल्लवी हात पुसत…बेडमध्ये जाते आणि मिलिंदला उठवते]

मिलिंदची अंघोळ होईपर्यंत चहा आणि नाश्ता करते आणि मग…तोपर्यंत सासूबाई देवघरात पूजेसाठी बसतात…पल्लवी मिलिंदला चहा-नाश्ता देते…डबा भरून देऊन…मिलिंदचा निरोप घेऊन आपली डायरी लिहायला बसते…शेवटी नेहमी तेच लिहिते…मी सगळं ऐकून घेतलं पण…प्रत्युत्तर केलं नाही ‘…अशाप्रकारे जे काही घडलेलं आहे ते जसंच्या तसं कागदावर येत होत…जे माणसांना सांगू शकत नव्हती… एक दिवस असंच पल्लवी भाजी आणण्यासाठी गेली असताना डायरी कपाटात ठेवायचं विसरली…मिलिंदला सुट्टी असल्याने डायरी वाचली. मिलिंदला वाचून खूप वाईट वाटलं…त्याने विचार केला..आपली बायको एवढे दिवस सगळं लपवून ठेवत राहिली…त्यादिवशी उपाशीच झोपली…म्हणून मिलिंद यात बदल करण्याचा विचार करतो… …काही मिनिटातच पल्लवी येण्याची चाहूल मिलिंदला लागते म्हणून डायरी आणि पेन जसंच्या तस बेडवर ठेवतो…पल्लवी आल्या-आल्या मिलिंद पल्लवीला म्हणतो…

मिलिंद  – पल्लवी…साडी काढू नकोस आपल्याला बाहेर जायचंय…मी येतोच चेंज करून..

पल्लवी – ठीक आहे मी तोपर्यंत इथेच बसते… 

मिलिंद येताच पल्लवी भरभर जिने उतरून खाली पोचते…दोघेही एका हॉटेल मध्ये जाण्याचं ठरवतात…याच पल्लवीला मात्र नवल वाटतं…दोघेही जेवण ऑर्डर करतात…तसं मिलिंद खूप समजूतदार असतो म्हणून थेट विषयाला हात घालतो…

मिलिंद – पल्लवी…तू माझ्याशी बोलत का नाहीस…

पल्लवी – बोलते की…नेहमी पाहतात की तुम्ही ..

मिलिंद – मी आपल्या बोलण्याबद्दल नाही बोलत आहे…आई तुझ्याशी कसं वागते…त्यादिवशी तर तू उपाशी झोपलीस…[आपल्या नवऱ्याला सगळं समजलं असं पल्लवीला जाणवतं]

पल्लवी – तुम्हाला कसं समजलं…?

मिलिंद – अगं डायरीचे पानं भरवण्यापेक्षा…मला बोलली असतीस तर काय वाईट झालं नसतं…

पल्लवी – मला तुम्हाला कुणालाच दुखवायचं नव्हतं हो…पण आई हल्ली खूप चिडचिड करतायत…मी तुम्हाला काहीतरी सांगणार मग तुम्ही त्यांना काहीतरी बोलणार…उगाच तुमच्या दोघांमध्ये वाद नकोय मला..संवेदना सर्वांनाच असतात…

मिलिंद – अगं…पण तुझ्या संवेदनांचं काय ?

पल्लवी – हे पहा…मी सांगते…तुम्हाला माहिती आहे मी संवेदनशील आहे…तुमच्याव्यतिरिक्त मलाही ते चांगलंच माहिती आहे…पण तेच माझ्या जवळच्या माणसांना माहिती असावं म्हणून त्याने किंवा तिने माझ्याशी बोलताना, वागताना सतत त्याच भान ठेवावं असं नाही ना…हा अट्टाहासच खूप विचित्र आहे…

मिलिंद – असं कसं…पल्लवी..आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण पूर्णपणे माहिती असतो म्हणून तर आपण त्याला जवळच म्हणतो ना…

पल्लवी – मला तर असं वाटत…आपल्या सेन्सिटिव्हिटीचं ओझं दुसऱ्यांवर कशासाठी लादायचं…यातून मिळणार प्रेम हे कधी सहानुभूतीमध्ये बदलतं…कधी अपेक्षेच्या दडपणात गुदमरत…हे कसं होत याचा पत्ताही लागत नाही आपल्याला…मला मनातून जे वाटत आपण किती भावनिक आहोत…हे कळण्यासाठी कुणी माणूसच असावं असं नाहीय…अशा कितीतरी प्रकारे आपण संवेदना स्पष्ट करू शकतो…जसं आपला आवडता छंद…गायन, नृत्य…महत्वाचं म्हणजे लिहू शकतो…जे मी आत्ता डायरीत लिहिलं

मिलिंद – अगं…पण ही डायरी कुणाच्या हाती लागली तर…जशी माझ्या हाती लागली…आणि तू सगळं पप्पाना सांगत आहेस असं लिहिलंय त्यात…मग मला नव्हती सांगू शकत…

पल्लवी – ती रडायला लागेल ”….” ती फार मनावर घेईल ”…असं दबाव डोक्यात ठेऊन काही जण नाती उगाच रेटत असतात…ते साफ चुकीचं आहे…अशा नात्यांना काहीच अर्थ नसतो…राहता राहिला प्रश्न संवेदनांचा…त्या इतर कुणाशी बोलण्यापेक्षा आपल्या लेखणीने किंवा कुठल्याही माध्यमाने व्यक्त करूच शकतो…

मिलिंद – आता आईला जाब विचारू की नाही…ते तूच मला सांग…!

पल्लवी – त्याची काहीच गरज नाहीय…तू आहेस ना माझ्यासोबत…मला समजून घ्यायला…माझ्या आवडी-निवडी जपायला..[एक डोळा मिचकावत म्हणते]

तसं मिलिंदही लाजल्यासारखं करतो आणि पल्लवीला म्हणतो…

मिलिंद – मी तर आहेच गं…पण तू सुद्धा डायरी लिही पण पप्पांना नको लिहू…माझं पण नाव टाकं ना त्यात….मला जास्त बरं वाटेल ना…

पल्लवी – बरं बरं…[गालातल्या गालात हसते]

मिलिंद – म्हणजे इथून पुढं मला तुझ्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पहिली डायरी पाहावी लागेल होना..?

पल्लवी – नाही हो…ते तर आत्ता मी तुमच्याशी बोलेन…कारण लग्नानंतर पहिल्यांदाच इतकी मनमोकळेपणाने तुमच्याशी बोलतीय…आपल्याला संधी कुठे मिळत होती एकमेकांशी बोलण्याची..

अशाप्रकारे दोघेही अगदी मनमोकळेपणाने बोलले…आपल्या आवडीप्रमाणे सगळं झालं म्हणून पल्लवी खुश होती…न मागताच सगळं मिळतंय याच समाधानही तीच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होत. दोन तासांनी घरी परतल्यावर…तोफेच्या तोंडी दोघांनाही जायचं होत…घरात पोचल्यावर सासूबाईंचा तेच खेकसून बोलणं…

मालतीताई – या…कुठे उकिरडे फुंकायला गेला होता दोघे…नाही-नाही…मिलिंदची चूक नाही आहे…ह्या पल्लवीची फूस असणार याला…एवढ्या दिवसात वाटलं नाही आपल्या आईला घेऊन जावं…तीच्या मनासारखं करावं…बायकोच्या ताटाखालचं मांजर झालंय नुसतं…

मिलिंद  – आई…पुढच्या रविवारी जाऊयात गं…तुला कधी नाही म्हटलंय का मी…[पल्लवीकडे पाहत म्हणतो] नाहीतर एक काम कर…एका डायरीत लिहीत जा…तुला काय वाटतंय ते…मग मी वाचत जाईल…चालेन का…

पल्लवी…अचानक मोठ्याने हसते…आणि फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागते…मालतीताई मात्र नेहमीप्रमाणे मिलिंदशी पल्लवीच्या कागाळ्या करत बसतात…मिलिंद मात्र आपल्या बायकोच्या समजूतदारपणावर पहिल्यापेक्षा आणखी भाळून जातो आणि पल्लवीच्या आणखी प्रेमात पडतो.      

===============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.