Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️सौ.गीता गजानन गरुड

सुधा आपला लेक आत्ता मोठा झालाय गं. तू गेलीस तेंव्हा पहिलीत होता. केवढा रडायचा! त्याला बहीण देऊन गेलीस पण पहिलं पहिलं विराजला वाटायचं हिच्यामुळेच तू गेलीस. राग राग करायचा तिचा.

डॉक्टरांनी सांगितलं मला मुलगी झाली पण तिच्या आईला नाही वाचवू शकलो तेंव्हा काळोख झाला डोळ्यासमोर. पण मला सावरावं लागलं लवकर आपल्या बाळांसाठी. आईचीही ड्युटी निभवायची होती मला. हरुन चालणार नव्हतं.

पावडरच दूध भरवून कसंबसं मोठं केलं वल्लरीला. विराज पहायचा माझी होणारी तारांबळ, ती सकाळची घाई. एकीकडे त्याची शाळेची तयारी,डबा तर दुसरीकडे वल्लरीला दूध भरवणं. ती रडू लागताच तिला थोपटणं.

वल्लूच्या गोड गोड हासूने विराजच्या मनातली अढी हळूहळू गायब झाली. पाऊस पडल्यावर झाडांवर ग्रीष्मात साचलेली धूळ निघून जाते अन् पानं मोकळा श्वास घेऊ लागतात तसा विराज हळूहळू मोकळा होऊ लागला.

तिला चालायला शिकवू लागला. तिला गोष्ट सांगून झोपवू लागला. स्वतःच्या ताटातच तिला भरवू लागला. वल्लरीची आईच झाला तो.

किती खोड्या करायचा ना गं लहानपणी. एकदा आठवतंय तुला तू त्याची बेट मोडून टाकलेलीस, सारखा बाहेर खेळत रहायचा म्हणून. तू गेलीस त्यानंतर महिनाभर तरी तुला विनवायचा,”आई,मी पुन्हा नाही जास्त वेळ खेळणार,पण तू ये गं. ” मलापण मग भरुन यायचं. डोळे आपसूक झरु लागायचे. शेवटी मी तुझा फोटोच पेटीत घालून ठेवला. विचारलन मला तेंव्हा पडला सांगितल्यावर किती रडला. दोन दिवस जेवला नव्हता.

वल्लरी विचारते त्याला तुझ्याबद्दल. तेंव्हा त्याच्या आठवणीतली ‘तू’ अलगद उघडून ठेवतो तिच्यासमोर. तिच्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांत तुला पाहण्याची तळमळ दिसते मला.

किती जणांनी सांगितलं मला लग्न कर म्हणून पण तू अन् मी वेगळे का आहोत? तू गेलीस तेंव्हाच माझा आत्मा तुझ्यासोबत गेला. आत्ता राहिलाय तो फक्त हा देह तोही या दोन पिलांसाठी. त्यांचा मामा म्हणत होता तो घेऊन जाईल पिलांना म्हणून पण मी साफ नकार दिला. सांभाळलं असतं त्याने. त्याबद्दल वाद नाही पण मी एकटा काय करू मग? माझ्या सोबतीला कोण?

तू गेल्यावर पंधरा दिवसांत सारे नातेवाईक पांगले. मग मीच हळूहळू स्वैंपाक शिकत गेलो. कधी भाजायचं,पोळायचं,कधी बोट कापायचं..कधी दूध,आमटी उतू जायची..शिकत गेलो हळूहळू.

किचनमध्ये स्वैंपाक करताना अजुनही मनात रुणझुणतात तुझे पैंजण,तुझ्या बांगड्यांची किणकिण..आठवत रहाते तू पोळ्या करताना मी तुला मारलेली गच्च मिठी अन् तो तुझ्या अंगावर उमटलेला शहारा.

तू न्हाणं झालं की केसं पंचाने बांधून यायचीस. तुझा चेहरा तेंव्हा मोगऱ्याच्या फुलापरी टवटवीत दिसायचा. तुझे ते ओलेतं अंग..हलकेच पंचा सोडवणं अन् केस माझ्यावर झटकणं अन् माझं त्या तुझ्या प्रेमाच्या पावसात न्हाऊन जाणं.

तुझ्या हातचा आलं ठेचून घातलेला घट्ट सायीचा चहा. मी उठत नाही म्हंटल्यावर हलकेच हाताला गरम पेला लावायचीस. मग मी दचकन उठायचो. पुन्हा तुला कुशीत घ्यायचो,धसमुसळायचो. तू लटकेच रागवायचीस..पण तुलाही माझा वेडेपणा आवडायचा ना. मग विराज उठायचा नी आपल्या दोघांच्या कुशीत शिरायचा. कितीतरी वेळ गोंजारायचीस तू मला अन् विराजला.

मोगऱ्याचा गजरा किती आवडायचा तुला! मीही बरेचदा आणायचो आठवणीने तुझ्यासाठी. ती हिरवीगार पुडी उलगडून पुडीतला गजरा तुझ्या वेणीत माळायचो तेंव्हा तुझ्या चेहऱ्यावरही पांढराशुभ्र मोगरा फुलायचा. किती मोजक्या मागण्या असायच्या तुझ्या! आत्ताही ऑफीसवरुन येताना दिसतात मला मोगऱ्याचे गजरे.. वल्लूचा डान्स असला की घेऊन येतो मग बरेच. तीही हौसेने माळते. डान्सही उत्तम करते.

सुधा, तू म्हणजे चैतन्य होतीस ग घरातलं. तुला सोनचाफ्याच्या सुवासाची अगरबत्ती आवडायची नं. वल्लूलाही तोच सुगंध आवडतो. तुला जसं लिंबाचं लोणच पोळी आवडायची तशीच सेम वल्लूला आवडते. किती लवकर मोठी झाली नं वल्लू! अगं सातवीत गेली आत्ता.

सुधा एक सांगू, काल वल्लूला पाळी आली. तिने पहिलं दादाला सांगितलंन तिच्या. बारावीतला दादा तिचा. नुकतंच मिसरुड फुटलेला पण ..पण त्याने सगळं समजावून सांगितलं तिला. त्याबद्दलचे व्हिडीओ दाखवले.त्याने आधीच वल्लूसाठी सेनिटरी पेड आणून ठेवलेले. तिला कसे वापरायचे ह्याचेही व्हिडीओ दाखवले त्याने. मी स्तिमित होऊन पहात होतो त्याच्याकडे. वल्लू किती खूष झाली माहितीय.

मग आम्ही तिघांनी मिळून तिचं वयात येणं सेलिब्रेट केलं. वल्लूच्या दादाने स्वतः तिच्या आवडीची शेवयाची खीर बनवली. मी पुऱ्या तळल्या,जिरा राईस केला. तिच्या आवडीचं चॉकलेट आईसक्रीम आणलं.

खरंच सुधा आपली दोन्ही बाळं गुणी आहेत. परिस्थितीने फार लवकर समजूतदार बनवलंय त्यांना. अभ्यासात सर्वसामान्य मुलांसारखीच आहेत. जास्त हुशार वगैरे नाहीत पण माणूस म्हणून अत्युत्तम आहेत.

काल बाल्कनीत एकटाच बसलेलो मी, चांदण्यांत तुला शोधत तर विराजचा आश्वासक हात माझ्या खांद्यावर आला. मी पाहिलं त्याच्याकडे. मला म्हणाला ,”पप्पा,तुला हवं तर नवीन जोडीदार शोध तू. मी सांभाळेन वल्लरीला.तू एकटा कुठवर आयुष्य काढणार.”
मी त्याला गळामिठी घातली . माझी आसवं त्याच्या पाठीवर सांडली.

मी म्हंटलं त्याला,”विराज,तुम्ही दोघं असताना मी नाहीए रे एकटा. तुझी आईपण आहेच की आपल्यासोबत. ती बघ ती चांदणी लुकलुकतेय नं ती तुझी आई सदैव आहे आपल्यासोबत.” वल्लरीही ऐकत होती आमच्या गुजगोष्टी. तीही आली अन् तिघं मिळून मग बराच वेळ बघत राहिलो तुला. साठवत राहिलो तुला अमुच्या ह्रदयात.

—सौ.गीता गजानन गरुड.