सवय

©️®️ गीता गरुड.
बालविकास शाळेच्या उजवीकडील यशोधन इमारत. या इमारतीतील दोनशेचार क्रमांकाचा ब्लॉक, श्री.ग.बा.पाटील यांचा. पाटील सर सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी शिक्षकाची नोकरी इमानेइतबारे केली होती. हजारो मुलांना गणित, विज्ञान शिकवलं होतं. त्यांचे विद्यार्थी आता देशाच्याच काय जगाच्या कानाकोपऱ्यात वसले होते. आपापल्या क्षेत्रांत त्यांनी यश संपादन केले होते.
पाटील सरांचा मुलगाही त्यांच्या हाताखाली शिकला होता. पाटील सरांनी कधीच स्वत:चा मुलगा म्हणून त्याला वाढीव गुण दिले नव्हते की त्याचं अवास्तव कौतुक कधी केलं नव्हतं. आपल्या मुलाचं कौतुक काय ते घरी. शाळेत त्यांना सर्व मुलं सारखी होती.
पाटील सरांचा मुलगा सार्थक, अभ्यासू होता. मेहनती होता. तो शिकत गेला. आता तो नावाजलेला डॉक्टर होता. पुण्यात त्याचं क्लिनिक होतं, बायकोही त्याच्याच क्षेत्रातली. दोघांना गोंडस अपत्य होतं. राघवबाळ, नावाप्रमाणेच गुणी बाळ.
राघवबाळाच्या आज्जीकडे आईबाबा येईस्तोवर त्याची रवानगी असे, म्हणजे पाटील सरांच्या विहिणबाईंकडे. त्यांचा बंगला क्लिनिकच्या जवळपास होता. सगळं आलबेल चाललं होतं, पाटील सरांची सहचारिणी असेस्तोवर. मिसेस पाटील संसाराची वाट अर्ध्यावर टाकून अनंता प्रवासाला निघून गेल्या, अगदी चालताबोलता अहेवपणी मरण आलं त्यांना. डॉक्टर मुलगाही आपल्या जन्मदात्रीसाठी काही करू शकला नाही.
पाटील सरांचा दिनक्रम नेहमीप्रमाणे चालू होता. त्यांना पोटापुरता का होईना स्वैंपाक येत होता. लहानपणी आईने बरंचसं शिकवलं होतं. त्यांना आई म्हणायची, ‘माणूस म्हणून जन्माला आलो नं मग माणसाच्या पोटाला काय खावसं वाटतं ते माणसाला बनवता आलं पाहिजे. दोन शितं आपल्या ताटात पडावीत म्हणून कुणावर अवलंबून रहाणं वाईट.’
राघवला मात्र रहावेना. वडलांना म्हणाला,”पप्पा, डॉक्टर असून आईसाठी काहीच करू शकलो नाही आम्ही. आता तुम्ही तरी आमच्यासोबत पुण्याला चला. नातवंडासोबत रहा. हे घर वाटल्यास भाड्याने देऊ, वाटल्यास असंच ठेवू. तुमची इथली काही कामं असली की येऊन राहू शकता इथे शिवाय आपण सगळीच सुट्टीला इथे येऊन राहू, माझ्याही बालपणीच्या आठवणी आहेत, ह्या घरात.. इथल्या परिसरात.”
राघवचं हळवेपण पाहून पाटील सर हेलावले. त्यांना नाहीही बोलता येईना. घर भाड्याने द्यायचं नाही असं ठरवून मोजके कपडे नं कागदपत्र घेऊन ते पुण्याला लेकाच्या घरी रहावयास गेले. पुण्यात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या इमारतीत, दोन ब्लॉक घेतले होते सार्थकने शिवाय क्लिनिकसाठी दोन गाळे. खूप छान, शांत परिसर होता, भोवतालचा. आजुबाजूस मोजके, पुरातन व्रुक्ष, त्यांवर किलबिलणारी पाखरं, मोकळं आकाश..शहरी गर्दीपासून दूरसं हे घर पाटील सरांना आवडायचं. पत्नीसोबत वर्षातनं चारेक दिवस रहायला यायचे ते. आतातर इथंच रहायचं होतं त्यांना कायमचं.
सूनबाई देवकी, सकाळी उठली की पाटील सरांना काय हवं नको ते विचारायची, त्यांच्याशी हसतमुखाने बोलायची. सार्थकने त्यांच्या आवडीची मासिकं आणून दिली, शिवाय घरात चोवीस तास दिमतीला सखा नावाचा तीशीचा गडी व त्याची रखमा होती. दोघंही लाघवी स्वभावाची होती. पाटील सरांना गावाकडच्या गंमती सांगायची. राघवबाळ मात्र त्याच्या आईकडच्या आज्जीकडेच शाळा सुटली की जायचा तो कधी रात्री परत आला तर नाहीतर तिथेच झोपायची त्याला सवय झाली होती, किंबहुना त्याच्या आईचा डॉक्टरी पेशा असल्याने तो रांगू लागल्यापासनं त्याला आईपासनं थोडं वेगळं रहायची सवय लावली होती त्यामुळे आई कितीही उशिरा आली तरी तो रडवेला होत नसे.
पाटील सरांना काय हवं नको ते सखा, रखमा करून घालीत. सखा बाजारात जाऊन फळं, भाज्या खरेदी करून आणायचा. निवडून वगैरे द्यायचा. रखमा चारी ठाव स्वैंपाक बनवायची. त्या दोघांची आपापसातली हमरीतुमरी पाहून पाटील सरांना आपल्या दिवंगत पत्नीची आठव यायची. कितीही निग्रह केला तरी डोळे पाण्याने भरून यायचे त्यांचे.
पुण्याला आल्यापासनं पाटील सरांचे चारेक दिवस असे आले तसे गेले. दुपारी त्यांनी पुस्तक घेतलं वाचायला. पुस्तकातल्या गोष्टीत शाळा होती, चिवचिवाट करणारी, जम्माडी गंमत सांगणारी मुलं होती. वाचता वाचता खिडकीतून येणारं ऊबदार ऊन त्यांच्या डोळ्यांवर, पुस्तकाच्या पानावर विसावलं. ऊनसावलीची नक्षीच पानावर उमटली नि कसल्याशा अनामिक शांततेने सरांनी पापण्या मिटल्या, काही वेळ असाच गेला..
मग ते पापणीपलिकडल्या जगात शिरले, त्यांना हव्याहव्याशा त्या जगात त्यांची शाळा होती, त्यांचं घर होतं..पाटील सर जिन्यात उभे राहून हात कठड्यावर रेलून खालची रहदारी पहात होते. शाळा नुकतीच सुटली होती. बारीक निळ्या सळ्यांवाले सफेद शर्ट, निळी हाफपँट, पायात काळे शुज घातलेली मुलं नि तशाच रंगाचा गणवेश घातलेल्या मुली यांचा गलका उडाला होता.
समोर हातगाडीवर लहानमोठी लालपिवळी बोरं, चिंच, आवळे, ओल्या बडीशेपीचे हिरवेगार तुरे, कैऱ्या असं बरंच काही होतं, तिखटमीठाचा डबा होता. गाडीवाला पेरू कापून लालतांबडं तीखटमीठ लावून मुलांना देत होता. मुलं एकमेकांत वाटून पेरूच्या फोडी खात होते. कुणी हवेतच चेंडू उडवल्याचा अविर्भाव करत होते.
चिंच तोंडात टाकली की मुलींचे डोळे मिटायचे. त्यांच्या चेहऱ्यावरले खट्टे भाव बघुन सरांना नदीकाठच्या चिंचेच्या झाडाची आठव येई. नदीच्या पाण्यावर किरणं विसावलेली असत. सर लहान असताना एखाद्या मोठ्या खडकावरनं नदीत सूर मारायचे. श्वास धरून खाली जायचे, पुन्हा वर यायचे. हातपाय मारायचे, उन्हं अंगावर घेत मग नदीकाठी बसायचे, सोबत एकदोघे मित्र असायचे. मग ही वानरं चिंचेच्या झाडावर चढून चिंचेचे आकडे काढायची. खिसे भरले की खाली उतरायची. चिंचा खात खात पायांनी वाटेतले दगड उडवत घरी जायचे.
“सर उठा की ओ आता. सहा वाजून गेले, तिनसान झाली.”सख्याच्या हाकेने सर पुन्हा वर्तमानकाळात आले. मध्यंतरी घडलेल्या बऱ्याच घडामोडी..नोकरी, लग्न, ती नोकरी सुटणं, पत्नीच्या जीवावर काही काळ रेटलेला संसाराचा गाडा, तिने मनात जागवलेली उमेद, शिक्षकाची नोकरी, विद्यार्थीव्रुंद, आईवडलांच कालपरत्वे जाणं, त्यातूनही पत्नीने सावरायला शिकवणं, मुलाची चाहूल, त्याचं बालपण..काय नि किती किती पानं भरभर फडफडत गेली वाऱ्याची झुळूक येऊन तिनेच ती पानं पलटली जणू.
सरांनी तोंड वगैरे धुतलं. चष्मा लावला नि जरा बाहेर फिरायला गेले. गार्डनमधे त्यांचे व्याही व विहिणबाई राघवबाळाला घेऊन बसले होते. राघवबाळासोबत चेंडूफळीचा खेळ चालला होता. आजोबानातू खूष होते. छान गट्टी जमली होती.
‘हा नातू आडनाव पाटील लावत असला तरी याच्यावर माया खरी घाटपांड्यांनी केल्यामुळे तो त्यांच्याशी खेळणं पसंत करतो. आपणच आधीपासनं इथं राहिलो असतो तर..तर आपली माया त्याला लागली असती पण या घाटपांड्यांसारखं त्याने टाकलेला हरेक चेंडू आणून देणं वगैरे जमलं असतं का! छे छे! वहातं पाणी वाट मिळेल तिथे वळतं, वहात जातं तसंच लहान बाळाचं. त्याला लळा लावेल त्याच्याकडेच तो जाणार. आडनाव वगैरे सब झूठ.
ते सगळं कागदोपत्री, भावनेच्या बाजारात भावनेलाच स्थान असतं. ती विकत घेता येत नाही, रुजवावीच लागते.’पाटील सरांचं स्वत:शीच बोलणं की स्वतःला समजावणं चालू होतं.
पाटील सर नि घाटपांड्यांनी राघवबाळास आज्जीकडे सोपवून जरा बागेत फेऱ्या मारल्या.
“राग नाही ना ओ आला तुम्हाला?” घाटपांड्यांनी विचारलं
“कसला?”
“तुम्ही आला आहात तरी राघवबाळ आमच्याकडेच रहाण्याचा हट्ट करतो याचा.”
पाटील सरांनी घाटपांडेंचा हात हलकेच दाबला व म्हणाले,”खरंतर तुमचे आभार मानायला हवेत मी. तुम्ही कुरकुर न करता सांभाळताय राघवबाळाला. लहान मुल ते. कुठे लळा लागेल तिथेच हात फैलावणार.”
घाटपांडे म्हणाले,”याच्या आईने सखा नि रखमाला दिवसभर याला सांभाळण्यासाठी ठेवलीत पण या गुलामाचा पाय तिकडे लागेल तर शपथ. आम्ही नवराबायको दिवसभर बिझी असतो या बच्चमजीमुळे.”
पाटील सर हसले. त्यांना म्हणाले,” आज रात्री लेकीकडे जेवायला या.”
“छे हो. तिला वेळ कुठे असतो. दोघांनी रुग्णसेवेला वाहून घेतलय अगदी.”
“मी बनवतो की आज माझ्या सुनेचा प्रॉक्झी म्हणा वाटल्यास.”
घाटपांडे मनापासून हसले. घरी येताना पाटील सर गुलाबी गाजरं, मटार , हिरवीगार कोथिंबीर घेऊन आले.
“सरांनु, मी आणली आसती की ओ भाजी. तुमी कशापायी मंडईत गेलात.”
“तुमची मंडई पहावीसी वाटली रे जरा आणि हो तुझ्या रखमेला आंबटचिंबट खावसं वाटतय ना. हे आवळे आणलेत नि ह्या चिंचा. दे बरं तिला धुवून.”
सखा आवळे नि चिंचा बघून लाजला. ” आधी स्वैंपाक करून घेतो. मग न्हेऊन देतो. जरा निजलीय ती.” तो लाजत म्हणाला, तसे पाटील सर म्हणाले.
“जा ठेवून ये तुमच्या खोलीत. स्वैंपाकाचं काम आज मी करणारै. बघ कसा फक्कड बेत बनवतो ते.”
पाटील सरांनी जुनी गाणी लावली.
एक था गुल और एक थी बुलबुल
एक था गुल और एक थी बुलबुल
दोनों चमन में रहते थे
है यह कहानी बिलकुल सच्ची
मेरे नाना कहते थे
एक था गुल और एक थी बुलबुल……
..छान मुड लागला, मग त्यांनी गाजरं किसायला घेतली. तुपात गाजराचा कीस परतून शिजत ठेवला, त्यात दूध, साखर, खवा, सुकामेवा घालताच मस्त दरवळ सुटला. तोंडली चिरून त्यांनी बासमतीचा मसाले भात केला. तोवर सखा आला. सख्याकडून मटार सोलून घेतले. त्याच्याशी गप्पा मारत मटारच्या करंजीचं सारण बनवलं. रवा, कणिक घेऊन पीठ तिंबून ठेवलं.
सार्थक नि त्याची पत्नी,देवकी साडेनऊच्या सुमारास घरी आले. पाटील सर करंज्या तळत होते. थोड्याच वेळात घाटपांडे सपत्नीक आले. बऱ्याच दिवसांनी आईबाबा आपल्याकडे आलेले बघून देवकीचा शीण कुठच्याकुठे निघून गेला.
पाटील सर नातवाला भरवू पहात होते पण त्याला आज्जीच्या ताटातच जेवायचं होतं. सार्थक मुलावर ओरडला तसे पाटील सर म्हणाले,”नको रे ओरडू त्याला. राघवबाळाला सवय आहे आज्जीच्या ताटात जेवायची. जेवूदेत त्याला. तूही जेव.” मजेत जेवणं झाली. रात्री देवकी नि सार्थक, पाटील सरांना थँक्यू म्हणाले.
पाटील सर म्हणाले,”अरे मलाही बरं वाटलं, आपल्या माणसांना खाऊ घातल्याने जीव सुखावला माझा. तुम्हीही अधनंमधनं त्यांना जेवायला बोलवत जा. त्यांना फिरायला घेऊन जा. मी मात्र उद्या निघतो, इथली सवय करून घेण्याऐवजी, ज्या जागेची, ज्या भोवतालची सवय आहे ना तिथे रहाणं मला मनापासून आवडेल.”
“बाबा पण..इथे तुम्हाला काही कमी..” दोघांनी ओशाळवाण्या चेहऱ्याने एका सुरात विचारलं.
तसं दोघांचेही हात हातात घेत ते म्हणाले,”नाही रे बाळांनो. तुमचं जग आवडलं मला. तुमचा पेशाच असा आहे की माझी तुमच्यापाशी काही तक्रार नाही पण तुम्ही स्वत:साठी वेळ काढत जा अधेमधे. आपल्या तब्येतीलाही जपा. माणूस सवयींचा गुलाम असतो, राघवबाळाला त्याच्या आजोळची सवय तशीच मला माझ्या शाळेभोवतालच्या परिसराची, माझ्या घराची सवय. या वयात सवय बदलायला नका सांगू.”
“पण तुम्ही एकटे तिथे..” सार्थक पुन्हा कष्टी स्वरात म्हणाला.
“अरे वेड्या, एकटा कुठे! तुझ्या आईच्या असंख्य आठवणी, सवयी आहेत माझ्यासोबत आपल्या घरात. अगदी बाथरुमात साबणाच्या स्टँडवर ती गेली त्या दिवशी सकाळी तिने लावलेली साबुची वडी, तिच्या उशीपासचं कोमेजलेलं सेफ्टीपिनातलं चाफ्याचं फुल, तिच्या हातानेच गेसवर चढणारा कुकर, चहाचा टोप, चहापावडर,साखरेच्या डब्यातले चमचे, मिसळणीचा डबा..सगळं ती आसपास असल्याची जाणीव करून देतात तिथे मला, आणि आणि आपल्या शाळेतून ऐकू येणारी प्रार्थना..सकाळी अकरा वाजता ताठ उभं राहून मीही प्रार्थना म्हणतो बरं..इथेच थोडा नेम चुकला खरं. तेंव्हा….कळतय नं तुम्हाला बाळांनो!”
“हो बाबा, तुमची जाण्याची सोय करून देतो. कधी काहीही अडलं तर फोन करून कळवत चला नि तब्येतीला जपा. आम्हाला तुम्ही हवे आहात.”सार्थक म्हणाला. तीघंही मग गडदनिळ्या आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्यांकडे पहात राहिली, बराच वेळ.
समाप्त
==================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.
1 Comment
Hello World! https://apel.top/go/gu4winrshe5dgoju?hs=857fb81b7b3fb6a633d3d760b471a4c9&
klwwgu